You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजय बंगा कोण आहेत, जे पुढच्या महिन्यापासून जागतिक बँकेचे अध्यक्ष होतील..
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती.
त्यानुसार, जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी बंगा यांची नियुक्ती झाली असून पुढील महिन्यापासून ते हा कार्यभार सांभाळणार आहेत.
अजय बंगा हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ आहेत.
जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत (Climate Change) ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करताना दिसतेय. अशावेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवलंय.
अजय बंगा यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय बंगा यांना खासगी क्षेत्रासोबत बँकेनं आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसं काम करावं, याचा अनुभव आहे.
महिलांना प्राधान्य, पण...
22 फेब्रुवारी रोजी जागतिक बँकेनं सांगितलं की, तीन उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली असून, मे महिन्याच्या सुरुवातीलाच प्रमुखपदी निवड झालेल्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं जाईल.
याचसोबत जागतिक बँकेनं म्हटलंय की, महिला उमेदवाराला अधिक प्राधान्य दिलं जाईल.
अमेरिका जागतिक बँकेतली सर्वांत मोठी भागधारक आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या प्रमुखपदाच्या निवडीत अमेरिकेचं वर्चस्व कायम दिसून येतं.
जागितक बँकेच्या ट्रेजरी सेक्रेटरी जेनेट येलेन म्हणाल्या की, चांगल्या गुणवत्तेनं काम करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात जागतिक बँक आहे.
त्याचसोबत, त्या पुढे म्हणाल्या, “सरकार, खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांना भागीदार बनवून काम करण्याचा अजय बंगा यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते या पदासाठी ‘विशेषत्वाने’ सज्ज आहेत.”
अजय बंगा कोण आहेत?
अजय बंगा हे आता अमेरिकन नागरिक असले, तरी ते भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या उद्योग क्षेत्रातली कारकीर्दही भारतातून सुरू झालीय.
अजय बंगा यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी पदावर होते.
नेस्ले आणि सिटीग्रुप सारख्या कंपन्यांमध्ये अजय बंगा यांनी काम केलंय. त्यानंतर मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व त्यांनी केलं.
2021 मध्ये मास्टरकार्डमधून अजय बंगा निवृत्त झाले आणि आता ते जनरल अटलँटिक नावाच्या खासगी इक्विटी फर्ममध्ये व्हाईस चेअरमन आहेत. या कंपनीत अजय बंगा कंपनीच्या 3.5 बिलियन डॉलर क्लायमेट फंडच्या सल्लागार मंडळावरही आहेत.
अजय बंगा यांनी व्हाईट हाऊससोबतही सेंट्रल अमेरिकेशी संबंधित एका प्रकल्पावर को-चेअर म्हणून काम केलंय. हा प्रकल्पाअंतर्गत सेंट्रल अमेरिकेत खासगी गुंतवणूक वाढवणं हा उद्देश होता. तसंच, अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या प्रवाहाला रोखणं हाही उद्देश होता.
अजय बंगा यांचा बँकिंग क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव काँग्रेसमध्ये बँकेवर विश्वास निर्माण करण्यास मदतीचा ठरू शकतो. कारण रिपब्लिकन अनेकदा आंतराष्ट्रीय संस्थांवर टीका करत असतात, असं सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटच्या कार्यकारी उपाध्यक्षा अमांडा ग्लासमन म्हणतात.
ग्लासमन अजय बंगा यांच्या निवडीबाबत साशंक आहेत. कारण त्यांच्या मते, बंगा यांना सरकार आणि विकासात्मक कार्याबाबतचा अनुभव कमी आहे आणि जागतिक बँकेच्या प्रमुखपदाचं मुख्य काम नेमकं तेच आहे.
आम्ही अजय बंगांकडून त्यांचं बँकेचं व्हिजन जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत, असंही त्या म्हणाल्या.
जर अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झाली, तर ते डेव्हिड माल्पास यांच्या जागी विराजमान होतील.
माल्पास यांची शिफारस माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. माल्पास यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीला अजून एक वर्ष बाकी असतानाच ते पायउतार होणार आहे. माल्पास यांच्यावर पर्यावरणीय विषयांसंबंधी बरीच टीका झाली होती.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)