You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या समाजावर चोरी-लबाडीचा डाग आहे, त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न होता'
- Author, बीबीसी मराठी टीम
- Role, अहमदनगर
बीबीसी मराठी 'कणखर बायांची गोष्ट' ही मालिका घेऊन येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिला आपला जाहीरनामा सादर करत आहेत. आदर्श समाजासाठी एक आदर्श जाहीरनामा कसा असावा याचा वस्तुपाठ या महिलांनी आपल्या कार्यातूनच दिला आहे. अशा महिलांची ओळख तुम्हाला या मालिकेतून आम्ही करुन देत आहोत.
सातवी शिकलेल्या द्वारका पवार यांनी ठरवलं, “मी फार काही बदल करू शकत नाही, तरीही झिरोमधून थोडं का होईना पण वर येणार."
अहमदनगर जामखेडच्या पारधी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पारधी ही भटके विमुक्त अशी जमात आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा समाज मात्र आजही दारिद्र्याच्या पारतंत्र्यात आहे.
हा समाज आजही जगण्यासाठी धडपडतोय. द्वारका पवार याच समाजातल्या धडपडीची कहाणी सांगत आहेत. सततच्या भटकंतीमुळे हक्काची जागा नाही, शिक्षण नाही, स्मशानभूमी नाही की अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.
“आमच्या समाजामध्ये या गावातून त्या गावात जाणं असं अनेक वर्ष सुरू होतं. स्वतःचा व्यवसाय नाही, व्यापार नाही. आमच्यात कोणी असा नेता नाही, विचाराची देवाण-घेवाण नाही कारण गावापासून लांब पालावर राहतात.”
‘वडिलांनी चोरी सोडून सुरू केला दारुचा व्यवसाय...’
पारधी समाजाची स्वतःची वेगळी भाषा आहे, त्यामुळे अनेकांना आजही बाहेरच्या लोकांशी बोलताना अडचणी येतात. महाराष्ट्रात या समाजाची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.
द्वारका सांगतात, “माझे वडील आधी चोरी करायचे. मग चोरी करायचं सोडून दारूचा व्यवसाय करायला लागले. त्यातही भागत नव्हतं मग ते 3-4 गावांमध्ये राखणी करायचे. शेतकऱ्यांकडून तीन-चार पायली धान्य गोळा करायचे. आई मात्र दुसऱ्या समाजातली होती.
वयात आलेल्या मुलीची सुरक्षा हा आजही भटक्या विमुक्त समाजातील पालकांसमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पारधी चालीरिती प्रमाणे द्वारका यांचा बालविवाह झाला. “लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलगी 17-18 वर्षांची होई तोवर तिला तीन-चार लेकरं झालेली असतात.”
“गुटखा, गांजा, दारू, तंबाखूचं व्यसन समाजात भरपूर आहे. अशात घरातला पुरुष व्यसनाच्या आहारी गेलेला असतो. मग महिलेनेच दारुभट्टीसाठी सामान आणायचं, दारु विकायची आणि लेकरांनाही साभाळायचं."
द्वारका पुढे सांगतात घरात दारूचा व्यवसाय होताच. व्यसनी नवऱ्यासोबत सकाळ-संध्याकाळ वाद सुरू झाले. मग त्याने दुसरी बायको नांदवायला आणली. मग तिची मुलंही या एकाच छताखाली राहू लागली. भांडणं वाढतच होती. हे पारधी कुटुंबात नवं नव्हतं.
‘समाजावर चोरीचा, लबाडीचा डाग’
“तिची चार लेकरं, माझी चार लेकरं आम्ही एकत्र राहात होतो. आमच्या दोघींमध्ये राहण्यावरून, पैशांवरून, खाण्यावरून वाद होत होता. नवरा दारू पिणार आणि घरात भांडण करणार.
मग आमचे वडील, चुलते आणि काही नातलगांनी एकत्र बैठक घेऊन तोडगा काढला की तिला चार लेकरं तर ती 10 लीटर दारू विकणार आणि तुला दोन लेकरं तर तू 5 लीटर दारू विकणार.”
पण या तोडग्यातूनही भांडणं संपली नाहीत, म्हणून द्वारकांनी आपल्या दोन मुलांसह नवऱ्याचं घर सोडलं. आणि दुसरीकडे दारूचा व्यवसाय सुरू केला. पण शाळा शिकलेल्या द्वारकांना हे कळत होतं की हे काही सन्मानाचं जगणं नाही.
“माझ्या समाजावर चोरीचा, लबाडीचा डाग आहे. त्यामुळे नेमकं कसं जगावं हा प्रश्न होता. जगण्याचं एकच साधन दारुभट्टी होतं. त्यामुळे तेच करावं लागत होतं.”
आपल्या आई-वडिलांनी चालत आणलेला व्यवसाय आपणही केला पण आपल्या मुलांना दारुच्या गुत्त्याची वाट दाखवायची नाही हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं. पण मार्ग काही सापडत नव्हता.
मुलांचं आयुष्य बदलण्याच्या धडपडीतूनच त्यांची ओळख जामखेडमधल्या ग्रामीण विकास केंद्राशी 2004 मध्ये झाली आणि त्यांनी दारुचा व्यवसाय बंद केला.
अहमदनगरच्या जामखेडमध्ये 1995 मध्ये ग्रामीण विकास केंद्र या संस्थेची स्थापना झाली होती. वंचित समूहांच्या मानवी हक्कांसाठी ही संस्था काम करत होती. द्वारका पवार यांच्या माध्यमातून संस्थेने पारधी समाजात काम वाढवलं.
‘बाई फिरते म्हणून बदनामी’
त्यांच्या गावात, गावाबाहेर लोकांशी भेटीगाठी होऊ लागल्या. पण त्यांच्याच समाजाने त्यांचं चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करण्यात आला.
“पारधी पुरुष जसं एक नाही, दोन नाही कितीही लग्न करू शकतो तशी मोकळीक पारधी बाईला सुद्धा आहे. तिला कोणी अडवत नाही. पण मी दुसरं लग्न केलं नाही. मी फिरते म्हणून लोक माझ्याबद्दल खूप चर्चा करायचे. तहसीलला-पोलीस स्टेशनला जाते, पुरुषांसोबत हॉटेलमध्ये चहा पीत बसते.”
“2004 मध्ये मी कामाला सुरूवात केली. तेव्हा शिबिरं, कार्यशाळा, आंदोलन, उपोषणं यामध्ये सहभागी व्हावं लागायचं. पीडितांना भेटणं, अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागायच्या.”
"मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आजचे दिवस बघायला मिळाले नसते," असं त्या आवर्जून सांगतात.
आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवताना द्वारका यांना अडचण येत होती. कॉलेज कागदपत्र दाखल करुन घेताना कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला मागत होती, तोही वडिलांचा. आईच्या उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून लावण्यासाठी द्वारकांनी पाठपुरावा केला, अखेर शिक्षकांनी मान्य केला.
त्यांचा मोठा मुलगा ग्रॅज्युएट झाला, तर लहान मुलाने बारावी पर्यंत शिक्षण घेतलं.
‘पारधी महिलेवर पहिला हल्ला’
पारधी ही जमात अनुसूचित जमात म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. ब्रिटीश काळात 1871मध्ये तत्कालीन सरकारने पारधींना गुन्हेगारी समाज म्हणून घोषित केलं होतं. स्वातंत्र्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.
पण समाजावरचा कलंक आजही पूर्णपणे पुसलेला नाही. पायाभूत सुविधांपासून पारधी आजही वंचित आहेत. पारधी समाजात शिक्षणाचं प्रमाण अवघं 5 टक्के आहे. तर 65 टक्के लोकांवर गुन्हेगारीच्या केसेस केल्या गेल्या आहेत.
पारधी महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण तर 45 टक्के आहे.
पारधी महिलेवर जातीअंतर्गतही अन्याय होतो आणि जातीबाहेरुनही. याकडे जामखेडचे मानवी हक्क कार्यकर्ते अॅडव्होकेट अरुण जाधव लक्ष वेधतात.
“समाजात काहीही घडलं की पुरुषांपेक्षा महिलाच सर्वांत आधी पुढे येतात. प्रस्थापित समाजाला ती महिलाच पहिल्यांदा तोंड देते. ज्या लोकांना या पारधींबद्दल गैरसमज, द्वेष वा भेदभाव असतो ते लोक आधी त्या महिलेवरच हल्ला चढवतात. आणि मग महिलांची अब्रू लुटणं, त्यांना मारहाण करणं असे प्रकार घडतात. तिचा मानसिक छळ केला जातो, अपमानास्पद वागणूक दिली जाते.”
“जातपंचायतीपुढे चारित्र्य सिद्ध करण्याची कसोटी म्हणून महिलेला हातावर जळके निखारे घ्यायला लावणं, पुरुषांची विष्ठा चाखायला लावणं, असे अमानुष प्रकारही घडले आहेत,” अरुण जाधव सांगतात.
पारधी समाजाच्या मागण्या
पारधी समाजाच्या सरकारकडे काही मागण्या आहेत.
- जन्माची नोंद झाली नसल्याने अडचणी येतात, त्यामुळे पारधी व्यक्तीला नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजेत.
- दोन गावांच्या वेशीवरती अंत्यसंस्कार करावे लागतात, त्यामुळे स्मशानभूमी आवश्यक आहे.
- पारधी समाज भूमिहीन आहेत, त्यांना राहायला हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे.
- मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्याणकारी योजना असणं गरजेच्या आहेत.पारधी मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करायला हवी.
- पारध्यांना गुन्हेगार म्हणून न पाहाता त्यांच्याशी ग्रामपंचायत, तलाठी आणि पोलिसांनी मिळून संवाद केला पाहिजे.
निवडणुकीच्या जाहिरनाम्यातील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी द्वारका पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत पुढाकार घेत आहेत.
द्वारका आपल्या अनुवभातून शिकल्या, त्यांचा प्रवास आत्मसन्मानाकडे झाला. आज त्या आपल्यासारख्यात समाजातील इतरांसाठी जनजागृती करतायत. पारधी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी नेतृत्वाचं प्रशिक्षणही घेतलं आहे. गावाच्या विकास आराखड्यात तसंच, जात प्रमाणपत्र, आरोग्य सेवा, सरकारी योजना पोहचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
(या लेखासाठी अत्त दीप या ग्रासरुट लिडरशीप अकॅडमीच्या रिसर्चची मदत झाली.)