You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कर्ज फेडता न आल्याने मी माझ्या दहा वर्षांच्या मुलीला विकून टाकलं'
- Author, सहर बलोच
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी, बलुचिस्तानहून
"गेल्या वर्षी आलेल्या पुरात माझ्या पत्नीचं ऑपरेशन करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकतर मूल दगावेल किंवा पत्नी मरेल. मी साडेतीन लाख रुपये कर्ज घेतलं आणि ऑपरेशन केलं. पण नंतर मला कर्जाची परतफेड करावी लागली. लोकांनी व्याजाचे पैसे परत मागितले आणि साडेतीन लाखांऐवजी आता मला पाच लाख द्यावे लागले. मला काहीच समजलं नाही काय करावं, शेवटी मी माझ्या दहा वर्षाच्या मुलीला एक किलोमीटर दूर राहणाऱ्या शेजारच्या परिसरातील एका व्यक्तीला विकलं."
ही गोष्ट मला बलुचिस्तानच्या चौकी जमाली भागातील एका मजुरानं सांगितली होती, जेव्हा मी पुराच्या एका वर्षानंतर तिथं गेले होते.
गेल्या वर्षीच्या पुरात मी बलुचिस्तानमधील अनेक भागांना भेट दिली होती.
त्यावेळी या राज्यातील अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. याच भागात चौकी जमालीचाही समावेश होता.
बलुचिस्तानच्या दुर्गम जाफराबाद जिल्ह्याचा हा भाग दुर्लक्षित म्हणावा लागेल.
सहसा अधिकारी इथं येत नाहीत. 2022 च्या महापुरानंतर सरकारी संस्थांनी चौकी जमाली आणि इतर भागांना भेटी दिल्या, त्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या.
इथं पोहोचल्यानंतर मला कळलं की 2022 च्या महापुरानंतर त्या भागात राहणारी अनेक कुटुंबं हलाखीचं जीवन जगत आहेत आणि त्यामुळं बहुतेक कुटुंबं आपल्या मुली विकत आहेत.
चौकी जमालीचा परिसर सिंध आणि बलुचिस्तानच्या सीमेवर वसलेला असून येथील लोकसंख्या सुमारे 50 हजार असल्याचं सांगितलं जातं.
इथली बहुतांश लोकसंख्या ही शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची आहे.
2022 च्या पुराच्या वेळी, माजी पर्यावरण मंत्री शेरी रहमान यांनी बीबीसीला सांगितलं होतं की पुरामुळं 32 लाख कुटुंबं बेघर झाली होती आणि सिंध आणि बलुचिस्तान राज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, शेवटचा एवढा मोठा पूर 1976 मध्ये आला होता. यानंतर 2010 आणि 2022 मध्ये असा पूर आला.
पुरानंतर चौकी जमालीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, लोकांना आपल्या अल्पवयीन मुलींची विक्री करावी लागत आहे.
बलोच नागरिक कर्जाच्या सापळ्यात अडकले
मुलींना विकण्याचं कारण सांगताना शाळेतील एका शिक्षकानं सांगितलं की, पुरानंतर शेतकरी व्याजावर कर्ज घेत राहिले आणि व्याजावर व्याज वाढत राहिलं. त्यानंतर कर्ज न भरल्यास त्यांना त्यांच्या अल्पवयीन मुली या 40 ते 60 वयोगटातील पुरुषांना विकल्या.
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, 2022 च्या पुरानंतर येणार्या आर्थिक संकटानंतर अशा घटना पूर्वीपेक्षा जास्त ऐकायला मिळत आहेत.
इथं मला एक मजूर भेटला ज्यानं सांगितलं की त्याची रोजची कमाई फक्त 500 रुपये आहे. (भारतीय चलनानुसार 145 रुपये).
त्यांनी मला सांगितलं की, त्यांची दहा वर्षांची मुलगी 40 वर्षांच्या इसमाला कशी विकावी लागली.
ते म्हणाले, "मी असहाय्य होतो. माझ्या पत्नीचं ऑपरेशन करावं लागलं. मूल तर वाचलं नाही पण पत्नी वाचली. ही गोष्ट पुराच्या काही दिवसांनंतरची आहे, जेव्हा एक एक करून सर्व रस्ते बंद झाले होते. इथं एकही रुग्णालय नव्हतं किंवा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नव्हता आणि जर मार्ग असेल तर तिकडे जाण्यासाठी पैसे नव्हते."
पुढं ते सांगतात, "मी घेतलेले कर्ज आता मी कसं फेडू? हा प्रश्न मला सतावत होता, मी त्यावेळी माझ्या मुलीला समजावून सांगितलं की तुला या माणसाशी लग्न करावं लागेल कारण त्या बदल्यात आम्हाला पैसे मिळतील, तुझ्या आईवर उपचार केले जातील आणि तिची औषधं आणता येतील."
ज्या मजुरांच्या घरी मी गेले त्यांच्याकडे जेवणासाठी एक दाणाही नव्हता. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बोट दाखवत ते म्हणाले की, यावेळी आमच्याकडे एवढही पीठ नाही की आम्ही एका वेळची भाकरी खाऊ शकू.
"आम्ही आठवड्यातून तीन दिवस खातो, उर्वरित चार दिवस आम्हाला उपाशी राहावं लागत."
त्यांनी सांगितलं की यावेळी त्यांची मुलगी माहेरी आलीय. ती या घरात बसली आहे कारण "तिचा नवरा त्याच्या घरातील काही वाद मिटवण्यासाठी शहरात गेला आहे आणि या काळात तो आपल्या मुलीला शाळेत जाऊ देत आहे."
"पण इथून गेल्यावर तिचा नवरा तिला शाळेत जाऊ देईल की नाही हे मी सांगू शकत नाही."
' बलोच मुलींना 3-5 लाख रुपयांना विकलं जातं'
बहुतेक मुलींसाठी तीन ते पाच लाख रुपये आकारले जातात. या रकमेतून शेतकरी आणि मजूर त्यांचं कर्ज फेडतात, उपचारासाठी कराचीला जातात किंवा त्यांच्या मुलाच्या शिक्षणात गुंतवणूक करतात.
मी विचारलं असता एक वडील म्हणाले, "आम्ही फक्त मुलींना विकतो कारण त्यांना भविष्यात मुलं होतील. आम्ही मुलांना विकत नाही कारण त्यांना विकून आम्हाला काही मिळत नाही."
तसंच काही लोकांनी आपल्या घरात मुली नसल्याचं सांगून घराचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळं पुरानंतर उरलेल्या घरातील काही वस्तू विकून किंवा जमीन मालकाच्या जमिनीवर काम करून ते कर्ज फेडत आहेत.
हे कर्जही दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे जिथं मजूर शेतीसाठी कर्ज घेतात आणि त्यांना कमी वेतनावर काम करावं लागतं. याशिवाय पुरामुळं उद्ध्वस्त होणाऱ्या जमिनीचं कर्जही भरावं लागतं.
दुसरं कर्ज उपचारासाठी आणि घरखर्च भागवण्यासाठी घेतलं जातं, मात्र या दोन्ही परिस्थितीत अल्पवयीन मुलींची विक्री करून कर्जाची रक्कम फेडली जात आहे.
एका स्थानिक शिक्षकानं सांगितलं की, अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलीला दोन ते तीन वेळा विकलं जातं, जेव्हा मुलगी 'तडजोड' करू शकत नाही तेव्हा असं घडतं.
अनेकदा विकलेल्या मुली घरातून पळून जातात. त्यानंतर बहिणी असतील तर त्यांच्या पळून जाण्याचं नुकसान त्यांच्या लहान बहिणींशी लग्न करून भरून काढलं जातं.
शिक्षकानं सांगितलं की, ज्या जमीन मालकांच्या जमिनीवर शेतकरी काम करतात ते अल्पवयीन मुलींवर कधीही व्यभिचाराचा आरोप करू शकतात.
बदनामी होण्याच्या भीतीनं पालक घाईघाईनं आपल्या अल्पवयीन मुलींचं लग्न लावून देतात.
'क्लाइमेट ब्राइड्स’ आणि हवामान बदल
या संपूर्ण परिस्थितीतून जाणाऱ्या तरुणींसाठी 'क्लाइमेट ब्राइड्स' हा शब्द वापरला जातो.
बलुचिस्तानमध्ये हवामान बदलावर काम करणाऱ्या 'मदत कम्युनिटी' या संस्थेनं अलीकडेच या राज्याविषयी सांगितलं की, हवामान बदल आणि पुरामुळं शेती क्षेत्रातून कमाई करणं खूप कठीण झालं आहे.
या संस्थेच्या संचालक मरियम जमाली म्हणाल्या, "बहुतेक लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं गेलं आहे, त्यात बलुचिस्तानच्या मध्यमवर्गाचाही समावेश आहे. गरीब शेतकरी अशा स्थितीत कुठं जाणार. त्यातच अति उष्णतेमुळं दुष्काळ आणि पुराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे."
त्या सांगतात की, शेती करणाऱ्या आणि फक्त शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळणं आता कठीण झालं आहे. कारण प्रत्येक हंगामात पिकं उत्पादनात घट येत आहे आणि अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतंय.
मरियम यांनी सांगितलं की, कमी उत्पन्नामुळं चौकी जमाली गावातील लोक मुली विकून उदरनिर्वाह करत आहेत.
अल्पवयीन विवाहांमध्ये 13 टक्के वाढ
या भागात राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, इथं आधीही कमी वयात लग्न झाली आहेत.
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणारी राज्य संस्था ‘पीडीएमए’नं (प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण), ऑगस्ट 2022 मध्ये बलुचिस्तानमधील 14 जिल्ह्यांचं सर्वेक्षण केलं होतं.
सर्वेक्षणानुसार, अल्पवयीन विवाहांमुळे मुलींच्या विक्रीच्या घटनांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चौकी जमालीच्या शाळेला भेट दिली. या शाळेच्या मुख्याध्यापिका सादिया यांनी सांगितलं की, जेव्हा लहान मुलींचं लग्न होतं तेव्हा त्या आपल्यावर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल सांगतात.
सादिया सांगतात की, "शिक्षणामुळं काही प्रमाणात फरक पडला आहे पण तरीही पालक आपल्या मुलींची विक्री करणं थांबवत नाहीत."
या शाळेपासून काही अंतरावर चौकी जमालीचे आरोग्य केंद्र आहे. येथील महिला आरोग्य सेविका शहजादी यांनी सांगितलं की, दर दुसऱ्या दिवशी गरोदरपणात मृत्यूचं प्रकरण समोर येत आहे.
महिला आरोग्य सेविका शहजादी सांगतात की काही प्रकरणांमध्ये मुली वेदनांनी इथं रडतात, काहींचा मृत्यू होतो. "आम्ही अजूनही आवाज उठवतो, आम्ही काही बोलू शकतो पण त्या मुलींच्या माता या प्रकरणी काही बोलू शकत नाहीत कारण घरातील पुरुषच मुलींना विकण्याचा निर्णय घेतात."
त्या सांगतात की नुकतीच एक आई तिच्या 16 वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांच्याकडे आली होती.
"मुलीच्या आईनं सांगितलं की, पुरानंतर वाढत्या गरिबीमुळं तिनं आपल्या 16 वर्षांच्या मुलीचं लग्न एका 40 वर्षीय पुरुषाशी लावलं."
गर्भधारणेदरम्यान मृत्यू
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गरोदरपणात तरुण मुलींच्या मृत्यूची सर्वाधिक प्रकरणं सिंध आणि बलुचिस्तानमधील आहेत. याशिवाय फिस्टुला आजार, गर्भधारणा होण्यात अडचण आणि मूत्रमार्गातून रक्तस्त्राव होण्याच्या घटना तरुण मुलींमध्ये आढळतात.
कराचीचे डॉ. सज्जाद यांनी बीबीसीला सांगितलं की, युएनएफपीए सोबत काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की या दोन राज्यांमध्ये अल्पवयीन विवाह होत आहेत आणि 2022 च्या पुरानंतर हे प्रमाण वाढलं आहे.
"मी अशीही प्रकरणं पाहिली आहेत, ज्यात तरुण मुलींना गरोदरपणात जीव गमवावा लागतो. पालक त्यांचं वय लपवतात पण मुलींच्या वयाचा अंदाज त्यांच्या मनगटावरून लावता येतो."
आता सर्व काही माहीत असूनही अधिकारी हे विवाह का रोखू शकत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा फौजिया शाहीन म्हणाल्या की, बलुचिस्तानमध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.
"आम्ही पूर्ण आकडे देऊ शकत नाही कारण आमच्याकडे विवाह नोंदणीची सुविधा नाही, परंतु अल्पवयीन विवाहांमध्ये वाढ झाली आहे यात शंका नाही."
फौजिया शाहीन म्हणाल्या की, बालविवाह रोखण्यासाठी कोणताही प्रभावी कायदा नाही.
“आता हे विवाह खूप वेगानं वाढत असल्यानं ही चिंताजनक बाब आहे, आम्ही बालविवाह प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, जो अनेक दशकांपासून बलुचिस्तानमधील विधानसभेत मांडला जात आहे. पण दुर्दैवानं हे विधेयक सभागृहात मांडलं गेलं नाही. आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत."
या विवाहासाठी आणि अल्पवयीन मुलींच्या विक्रीसाठी काहीही कारणं दिली जात असली तरी, पुरामुळं झालेल्या नुकसानीची किंमत बलुचिस्तानमधील अल्पवयीन मुलांना चुकवावी लागत असल्याचं वास्तव आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)