You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझा मुलगा कॅनडाला सांगून हैदराबादला आलाय, कृपया त्याला माफ करा'
- Author, मोहम्मद जुबैर खान
- Role, बीबीसी उर्दूसाठी
“माझा मुलगा कॅनडाला जात असल्याचं सांगून भारतात आला. त्याचा आवाज ऐकून 14 दिवस झाले आहेत. भारतातही माझ्यासारख्या अनेक माता राहतात आणि म्हणून मला आशा आहे की ते माझी व्यथा समजू शकतील"
मोहम्मद फय्याज नावाच्या एका मुलाची आई अत्यंत भावनिक होऊन हे सांगत होती.
भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या गुन्ह्याखाली तेलंगणा पोलिसांनी, पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय मोहम्मद फय्याजला अटक केली आहे.
या घटनेबाबत बीबीसीचे प्रतिनिधी अमरेंद्र यारलागड्डा यांनी हैदराबाद दक्षिण विभागाचे डीसीपी साई चैतन्य यांच्याशी संपर्क साधला आणि तरुणाच्या अटकेची खात्री केली.
ते म्हणाले की, "मोहम्मद फय्याज हा पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय नेपाळमार्गे भारतात बेकायदेशीरपणे घुसला होता आणि हैदराबादमध्ये राहत होता.
याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी 31 ऑगस्टला किशनबागमध्ये मोहम्मद फय्याजला अटक केली.
बीबीसीने पाकिस्तानातील शांगला येथे राहणाऱ्या मोहम्मद फय्याजच्या कुटुंबाशी संपर्क साधला.
मोहम्मद फय्याजच्या आईने बीबीसीला सांगितलं की, "माझ्या मुलाने अशा पद्धतीने भारतात जायला नको होतं. पण आता असं घडलंय.
माझा मुलगा, सून आणि नातवाला भारताने माफ करावं आणि त्यांना पाकिस्तानात परत पाठवावं."
त्या पुढे सांगतात, "दोन दिवसांपूर्वी मला माझ्या मुलींनी मला घडलेली घटना सांगितली. मला त्याच्या लग्नाबद्दल काहीही माहिती नव्हतं. मला आधी कळलं असतं तर दुबईत असतानाच मी सून आणि नातवाला घरी आणायला सांगितलं असतं. पण, मला न सांगताच त्याने हे लग्न केलं.
माझ्या मुलाला त्याच्या कुटुंबियांना धोका द्यायचा नव्हता. म्हणून त्याने केलेल्या धाडसाचं मला अभिमान आहे. या लग्नावर विश्वास ठेवून माझा मुलगा ज्या पद्धतीने तिथे जाऊन पोहोचलाय त्याचं भारतीयांनी कौतुक करायला हवं."
तो भारतात कसा पोहोचला?
हैदराबाद दक्षिण विभागाचे डीसीपी साई चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोहम्मद फय्याज हा मूळचा पाकिस्तानचा रहिवासी असून, हैदराबादमध्ये राहणारी त्याची पत्नी नेहा फातिमा (29) आणि त्याच्या तीन वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी तो हैदराबाद शहरात आला होता.
फातिमाच्या वडिलांनी बनावट कागदपत्रं बनवून या कुटुंबाची हैदराबादमध्ये कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करू, असं सांगितलं होतं आणि म्हणून फय्याज तिथेच राहत होता."
मोहम्मद फय्याज काराचीतल्या एका कपड्यांच्या डिझायनिंग फर्ममध्ये काम करत होता. 2018 मध्ये, कंपनीने मोहम्मद फय्याजला संयुक्त अरब अमिरातीमध्ये काम करण्याची संधी दिली होती.
वर्षभरानंतर तो हैदराबादहून आलेल्या फातिमाला तिथे भेटला आणि त्या दोघांनी तिथे लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षानंतर फातिमा यांनी एका मुलाला जन्म दिला.
2022 मध्ये फातिमा दुबईहून तेलंगणातील हैदराबादला परत आल्या. तेव्हापासून त्या त्यांच्या आईवडिलांसोबत हैदराबादमध्ये राहून मुलाची काळजी घेत होत्या.
मोहम्मद फय्याज नोव्हेंबर 2022 मध्ये टुरिस्ट व्हिसावर नेपाळला पोहोचला. तेथून तो बेकायदेशीरपणे हैदराबादला पोहोचला आणि कुटुंबासोबत राहू लागला.
यावर्षीच्या मार्च महिन्यात मोहम्मद घौस या नावाने बनावट आधार कार्ड काढण्यासाठी तो आधार नोंदणी केंद्रावरही गेला होता.
मात्र, तेलंगणा पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी मोहम्मद फय्याजला अटक करून काही कागदपत्रंही ताब्यात घेतली.
फय्याजने घरी तो कॅनडाला जात असल्याचं सांगितलं होतं
मोहम्मद फय्याजचा भाऊ इक्बाल हुसैन यांनी बीबीसीशी संवाद साधला. ते म्हणाले की,
“माझा भाऊ 2018 मध्ये यूएईला गेला होता. तो तिथे शारजाहमध्ये राहून कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. चार वर्षे तो तिथे राहिला पण त्याने लग्न झाल्याचे सांगितलं नव्हतं.
2022 मध्ये शांगला येथे तो परत आला आणि दोन महिने आमच्यासोबत राहिला."
"तो नेहमी सांगायचं की मलेशिया किंवा कॅनडामध्ये त्याचा एक मित्र आहे आणि त्याला त्या मित्राला भेटण्यासाठी तिथे जायचं आहे. अखेर 2022 च्या शेवटी कॅनडाला जात असल्याचं सांगून तो घरातून निघून गेला.
तो कॅनडाला पोहोचला आहे आणि तिथेच मित्रांसोबत राहत आहे असंही त्याने आम्हाला सांगितलं होतं.
पण आमच्या भागातील एका व्यक्तीने येऊन भारतीय माध्यमांनी प्रकाशित केलेले काही फोटो आणि व्हिडिओ आम्हाला दाखवले. ते बघितल्यावर आम्हाला मोहम्मद फय्याजला अटक झाल्याचं कळलं."
“आम्ही सुशिक्षित नाही. माझ्या भावासाठी काय करावं हेही मला कळत नाहीये. सध्या आम्ही माझा भाऊ ज्या शाळेत शिकला त्या शाळेतून रेकॉर्ड मिळवत आहोत. त्याची सुटका करण्यासाठी आम्ही इस्लामाबाद सरकारकडे मदतीचं आवाहन करणार आहोत,” असं इकबाल हुसैन यांनी सांगितलं.
मोहम्मद फय्याजच्या आईचा संघर्ष
फय्याजचा आईचा चुलत भाऊ असणाऱ्या अझहर इकबाल यांनी बीबीसीला सांगितलं की, "तो दिवस फय्याजच्या आईसाठी काळाकुट्ट दिवस होता.
फय्याजच्या आईने अगदी लहान वयातच तिचे आई-वडील गमावले होते. माझ्या आईने त्यांना वाढवलं आणि त्यांचं लग्न केलं. पण काही वर्षांपूर्वी दुर्दैवानं फय्याजच्या वडिलांचा मृत्यू झाला.
त्यांनी मुलांना वाढवलं. माझ्या बहिणीला एकूण सहा मुलं होती. यामध्ये फय्याज हा सगळ्यात लहान होता. फय्याज दुबईत काम करायचा तेव्हा माझ्या बहिणीला थोडं सुख मिळालं होतं असं म्हणता येईल."
त्यांनी सांगितलं की, "या भावंडांमध्ये केवळ फय्याजच शिकलेला आहे. त्याचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालंय. इतर भावंडांपैकी कुणीही शिकलं नाही."
“त्याची भावंडे इकडे-तिकडे काम करण्यात वेळ घालवतात. मलाही कधी कधी काम मिळते. कधीकधी काम मिळत नाही.
माझ्या बहिणीने फय्याजची खूप काळजी घेतली. फय्याजही पैसे कमवून कुटुंबाचा आधार बनला होता."
फय्याजच्या आईने सांगितलं की, “माझा मुलगा मला रोज फोन करायचा. तो म्हणत होता की तो पैसे पाठवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करत आहे आणि ते एकदा तयार झाले की तो पैसे पाठवेल."
आता त्याला अटक झाल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.
भारत आणि नेपाळच्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी व्हिसाची गरज नाही. सीमा ओलांडण्यासाठी वैध ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार, आधार कार्ड आवश्यक आहे.
पण भारत-नेपाळ सीमेवर असणाऱ्या तपासणी नाक्यावर नीट तपासणी होत नाही त्यामुळे बरेच जण पायी चालत सहज भारतात प्रवेश करतात.
नेपाळ सीमेवरून दिल्लीपर्यंत थेट बस सेवा देखील आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने नेपाळी आणि भारतीय नागरिक प्रवास करत असतात.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)