पाकिस्तानात हिंदू मुलीची हत्या, 'अपहरण करता आलं नाही म्हणून गोळी झाडली'

    • Author, मोहम्मद जुबैर खान
    • Role, बीबीसी उर्दूसाठी

पाकिस्तानात हिंदू मुलीच्या हत्येची घटना घडलीय. पूजा कुमारी असं या 18 वर्षीय मुलीचं नाव असून, पाकिस्तानमधील सिंध प्रांतातल्या सक्कर जिल्ह्यातील ही मुलगी रहिवासी होती.

पूजाच्या हत्येनंतर सक्करमध्ये लोकांनी निदर्शनं केली. पोलिसांनी एका आरोपीला पकडलं आहे.

पूजा कुमारीचे जवळचे नातेवाईक अजय कुमार यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की, "या घटनेनंतर पूजा आंदोलनाचं प्रतीक बनली आहे. आमच्या मनात पूजाबद्दल आदर आणखी वाढलाय."

पूजाचे वडील साहिब आदी यांनी आरोप केलाय की, तीन आरोपी पूजाचं अपहरण करण्यासाठी घरात घुसले. मात्र, त्यांना विरोध केल्या पूजावर गोळीबार करण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूची तपासणी करतायेत. बाकीचे आरोपीही लवकरात लवकर अटक होतील अशी आशा आहे."

पूजाचे नातेवाईक अजय कुमार म्हणतात की, "पूजाच्या हत्येचा केवळ स्थानिक हिंदूंनीच निषेध केला नाहीये, तर मुस्लिमांनीही निषेध नोंदवलाय. पूजाच्या घरी येऊन आपल्या भावना सर्व सामाजातील लोक व्यक्त करतायेत."

'विरोध केल्यानं हत्या'

अजय कुमार यांच्या माहितीनुसार, "धाडसी मुलीची हत्या केली गेलीये. पूजा अशी मुलगी होती, जिचं उदाहरण आदरानं या भागात दिलं जायचं."

"पूजा या भागातील सर्वांना आवडत असे. ती सगळ्यांची काळजी घेत असे. सगळेजण तिचं कौतुक करत. पूजा पाहा कशी तिच्या वडिलांचा आधार बनलीय, असं उदाहरण अनेकजण देत असत. ती लहानपणापासूनच वेगळी होते. ती सर्वसाधारण मुलीसारखी नव्हती. ती खूप धाडसी आणि हुशार होती," असं अजय कुमार सांगतात.

अजय कुमार यांच्या माहितीनुसार, हत्येतील एक आरोपी पूजाचा शेजारी असून, श्रीमंत आहे. तर पूजाचं कुटुंब गरीब आहे. हा आरोपी अनेक दिवसांपासून पूजाला त्रास देत होता. पूजासोबत गैरवर्तनही करत असे. त्यानंतर एकदा पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही या आरोपीला जामीन मिळाला होता.

अजय कुमार सांगतात, "घटनेच्या दिवशी पूजाचे वडील जेव्हा घराबाहेर गेले, तेव्हा आरोपी त्याच्या दोन साथीदारांसह घरात घुसला आणि त्यानं पूजाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

"मात्र, पूजा खूप धाडसी होती. तिनं विरोध केला. ते तिघेजण होते आणि पूजा एकटी होती. पूजा त्यावेळी शिलाई करत होती. तिच्याजवळ कात्री होती. पूजानं कात्रीचा वापर शस्त्राप्रमाणे केला. मात्र, ज्यावेळी पूजा कुठल्याच मार्गानं नियंत्रणात येत नाही, असं लक्षात आल्यावर आरोपीने बंदुक काढून पूजावर गोळीबार केला आणि तिची हत्या केली."

'मुलगी नाही, मुलासारखी होती'

पूजा कुमारीच्या वडिलांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना सहा मुली आहेत आणि कुणीही मुलगा नाही.

"पूजाला शिक्षण देऊ शकेन, अशी स्थिती नव्हती. घराचा खर्च सांभाळायचा की पूजाच्या शिक्षणाचा खर्च, असा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यामुळे पूजा कायम घरातच असायची."

त्यांनी सांगितलं की, पूजा त्यांची सर्वात थोरली मुलगी होती. कमी वयातही पूजा वडिलांना आधार देऊ पाहात होती.

साहिब आदी यांनी पूजाची आठवणी सांगताना म्हटलं की, पूजानं कधीच कपडे किंवा अन्य कशासाठी हट्ट केला नाही आणि कधी कुठली गोष्ट मागितलीही नाही.

"जेव्हा ती थोडी मोठी झाली, तेव्हा ती मला सांगू लागली की, मी तुमचा मुलगा आहे. मी तुमच्यासोबत काम करायला येईन. मी तुला मजुरीसाठी घेऊन जाऊ शकत नव्हतो. मात्र, ती शिलाई करत असे. त्यामुळे तिनं शिलाईचा कोर्स करून ते शिकून घेतलं."

"पूजाकडून कपड्यांची शिलाई करणारी माणसं पुन्हा तिच्याकडेच येत, इतकं चांगलं काम ती करून देत असे. तिचं काम चांगलं सुरू होतं. ती शिकू शकली नाही, पण तिनं लहान बहिणीला शाळेत प्रवेश मिळवून दिला होता."

पूजा लहान बहिणींचा आधार बनली होती.

"ती बहिणींना म्हणायची, मीच तुमचा भाऊ आहे आणि ती मला म्हणायची, मी तुमचा मुलगा आहे."

पूजाचे वडील पुढे म्हणतात की, घरी नसतानाही कधीच मला काळजी वाटली नाही, कारण पूजावर विश्वास होता की, ती सर्व सांभाळून घेईल.

"मी आता म्हातारा झालोय. पूजाच्या मेहनतीने मला ताकद दिली होती. पण आता वाटतंय की, मी पुन्हा म्हातारा झालोय."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)