काश्मीर वादामुळे मराठी अधिकाऱ्याची जेव्हा अपहरण करून हत्या करण्यात आली होती : रविंद्र म्हात्रे हत्याकांड

सध्या 'द कश्मीर फाईल्स' या सिनोमाच्या निमित्ताने 1980चं दशक आणि त्यानंतर काश्मीरमध्ये फोफावलेला कट्टरवाद आणि त्याच्या परिणामाची चर्चा सुरू आहे.

सुरुवातीच्या काळात या कट्टरवादाची थेट झळ मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बसली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा बदल झाला. त्याची बातमी तुम्ही इथं वाचू शकता- शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन

दुसऱ्या श्रेणीच्या भारतीय राजनयिक रविंद्र म्हात्रे यांना युकेतल्या बर्मिंघममध्ये राहायला येऊन फक्त 18 महिने झाले होते. पण त्याचं रुटीन मात्र सेट झालं होतं.

4 फेब्रुवारी 1984चा शुक्रवारचा दिवस मात्र त्यांच्यासाठी खास होता. त्यांची मुलगी आशा 14 वर्षांची झाली होती. न्यू स्ट्रीटवरच्या त्यांच्या कार्यलयातून आपलं नेहमीचं काम संपवून म्हात्रे त्या दिवशी घरी जायला निघाले. मुलीच्या वाढदिसाच्या निमित्ताने त्यांनी केकसुद्धा खरेदी केला.

दररोज त्यांना त्यांच्या क्लेंट व्ह्यू रोडवरच्या घरी घेऊन जाणारी 12 नंबरची बस त्यांनी नेहमीप्रमाणे पकडली. सात मैलांनंतर ते त्यांच्या रोजच्या बस स्टॉपवर उतरले. तिथून त्यांचं घर फक्त 300 यार्डावर होतं. पण ते बस मधून उतरताच एका कार मधून आलेल्या काही लोकांनी बंदुकीच्या धाकावर त्यांना कारमध्ये बसण्यास भाग पाडलं.

खूप वेळ झाला पती घरी आले नाहीत म्हणून चिंतातूर झालेल्या शोभा म्हात्रेंनी पोलिसांत तक्रार दिली. त्याच दरम्यान लंडनच्या 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या कार्यालयात म्हात्रेंच्या सुटकेच्या बदल्यात 1 दशलक्ष पौंड आणि दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये असलेल्या आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मकबूल बट्टच्या सुटकेची मागणी करणारं पत्र पाठवण्यात आलं.

जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट या कट्टरवादी संघटनेनं या अपहरणाची जबाबदारी घेतली होती. मकबूल बट्टनेच 1976 मध्ये या संघटनेची स्थापना केली होती.

'रॉयटर्स'ने जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या या पत्राची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी 24 तासांची मूदत भारत सरकारला देण्यात आली होती. त्यानंतर एक फोन करून ती तीन तासांनी वाढवण्यात आली.

तिकडे नवी दिल्लीत तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी कट्टरवाद्यांच्या कुठल्याही मागणीला भीक न घालण्याचा निर्णय घेतला.

मागण्या पूर्ण होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आपहरण करणाऱ्या जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या 4 कट्टरवाद्यांनी रविंद्र म्हात्रे यांची गोळ्या घालून हत्या केली. रविवारी 7 फेब्रुवारीला लिक्टेनशायरजवळच्या डोंगराळ भागात म्हात्रेंचा मृतदेह सापडला होता.

त्यांच्या डोक्यात, गळ्यात आणि छातीत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

म्हात्रेंच्या हत्येचं वृत्त नवी दिल्लीत पोहोचताच पंतप्रधान इंदिरा गांधींनी तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि मकबुल बट्टच्या फाशीवर निर्णय घेण्यात आला.

मकबूल बट्टने फाशी रद्द होण्यासाठी तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्याकडेचा दयेचा अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्याची शिफारस इंदिरा गांधी मंत्रिमंडळानं त्यांना केली. त्यावर तात्काळ अंमल करण्यात आला आणि 11 फेब्रुवारीला तिहार जेलमध्ये मकबूल बट्टला फाशी देण्यात आली. तिहार जेलमध्ये त्याच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं.

कोण होता मकबूल बट्ट?

मकबूल बट्टने जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट या कट्टरवादी संघटनेची 1976मध्ये स्थापना केली होती.

1971 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या गंगा विमानाचं अपहरण झालं होतं. मकबूल बट्ट त्यातील प्रमुख आरोपी होता.

"काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याकडे जगातचं लक्ष जावं म्हणून हे अपहरण करण्यात आलं होतं," असं तेव्हा त्यांच्या साथीदारांनी बीबीसीला सांगितलं होतं.

मकबूल बट्टला फाशीची शिक्षा मात्र 1966 च्या सीआयडी इंस्पेक्टर अमरचंद हत्ये प्रकरणी सुनावण्यात आली होती.

असं सांगितलं जातं की, जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा मला फाशी देता येईल अशी दोरी अजून तयारच झाली नसल्याचं वक्तव्य बट्टने कोर्टात केलं होतं.

कोर्टाच्या निर्णयाच्या 4 महिन्यांनतरच बट्टने जेलमधून 38 मीटरचं भुयार खणून पळ काढला होता. आठ वर्ष लपून राहिल्यानंतर त्याने हिंडवारा आणि बारामुलामध्ये एक बँकसुद्धा लुटली होती.

पुण्यातल्या प्रसिद्ध म्हात्रे पुलाचं नाव रविंद्र म्हात्रे यांच्यावरूनच देण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)