You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधानसभा 2019: शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन - किस्से महाराष्ट्राचे
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेना भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधारली आहे. पण हे दोन्ही पक्ष काही त्यांच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्द्याचं राजकारण करत नव्हते. दोघांनी वेगवेगळ्या कारणांनी हिंदुत्वाला हात घातला आणि एकत्र आले.
शिवसेनेनं मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. तर भाजपनं गांधीच्या समाजवादाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू केलं होतं.
कालांतरानं भाजपनं बाबरीचा मुद्दा उचलून धरला, तो काळ 90च्या दशकाचा होता. पण शिवसेनेनं या मुद्द्याला आधीच हात घातला होता आणि त्याला निमित्त ठरलं होतं ते काश्मीर.
काश्मीरच्या मुद्द्यावर शिवसेनेचं हिंदुत्व
गोष्ट फेब्रुवारी 1984ची आहे. आणीबाणीला पाठिंबा दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा प्रभाव ओसरत चालला होता.
70च्या दशकाच्या शेवटला आणि 80च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी बाळासाहेबांना 'पेपर टायगर' बोलायला सुरुवात केली होती. एक प्रकारे त्याकाळात शिवसेना आयडिओलॉजी क्रायसिसमध्ये होती.
महाराष्ट्र विधानसभेची तेरावी निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. 1960 सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक चढउतार पाहिले. त्यातल्या 10 मुख्य वळणांच्या 10 गोष्टी सांगणारी ही मालिका - किस्से महाराष्ट्राचे.
"परिणामी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सभांना निळुभाऊ खाडिलकरांना बोलावून प्रॅक्टिकल सोशालिझ्मबाबत काही करता येईल का, याची सुद्धा त्यांनी चाचपणी करून पाहिली होती. एका सभेला तर त्यांनी श्रीपाद अमृत डांग्यांना सुद्धा बोलावून पाहिलं होतं," असं ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र सांगतात.
मराठीचं कार्ड शिवसेनेनं आधीच खेळून झालं होतं. बाळासाहेबांना नवा मुद्दा हवा होता आणि तो त्यांना काश्मीरच्या निमित्तानं घडलेल्या एका घटनेतून मिळाला.
फेब्रुवारी 1984 मध्ये युकेमधल्या बर्मिंघममध्ये भारतीय राजनायिक रविंद्र म्हात्रे यांचं अपहरण झालं. नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयातून घरी जाताना ते त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला केक घेऊन चालले होते. तेव्हा त्यांचं अपहरण झालं.
हे अपहरण काही खंडणीसाठी नव्हतं झालं तर त्यामागे होती Kashmir Liberation Army ही संघटना. 1971 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करणाऱ्या मकबुल भट्टच्या सुटकेची मागणी करण्यासाठी म्हात्रेंचं अपहरण करण्यात आलं होतं.
अपहरणाच्या तीन दिवसांनंतर म्हात्रेंची हत्या करण्यात आली, असं त्यावेळी इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या सविस्तर वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारनं मकबुल भट्टाला फाशी दिली.
नवीन मुद्द्याच्या शोधाच असलेल्या बाळासाहेब ठाकरेंना यावेळी नवा मुद्दा हाती लागला. "मराठी अधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर हा मुद्दा उचलून धरत बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणूस आणि मुस्लीम द्वेषाचं राजकारण किंवा हिंदुत्वाच्या राजकारणाची सांगड घातली आणि मराठी माणसाबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला सापडला," असं Samrat: How the Shiv Sena Changed Mumbai Forever या पुस्तकाच्या लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन सांगतात.
हिंदुत्वाची प्रयोगशाळा
त्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या 'सामना'च्या संपादकीय मधून बाळासाहेबांनी त्यांची हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली.
आता वेळ होती या मुद्द्याची परीक्षा घेण्याची. त्याची संधी शिवसेनेला 1989मध्ये मिळाली.
एप्रिल 1989 ला महाराष्ट्र विधानसभेसाठी विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी प्रखरपणे मांडला. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश प्रभू विजयी झाले. त्यांच्याविरोधात प्रभाकर कुंटे हे काँग्रेसचे मात्तबर उमेदवार होते. पण अनपेक्षितपणे या निवडणुकीत त्यांचा परभाव झाला.
त्याबाबत सांगताना अंबरिश मिश्र सांगतात,"राजकीय विश्लेषक म्हणतात की गुजरात हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा आहे, पण तसं नाही विलेपार्ले हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती आणि ती बाळासाहेब ठाकरेंनी करून पाहिली होती."
"या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाळासाहेबांनी द्वेषपूर्ण भाषणं केली. हिंदू धर्माच्या नावावर मतं मागितली. त्यांच्या या द्वेषपूर्ण भाषणांना तेव्हा कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. पण शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यानंतर मात्र काँग्रेस उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी कोर्टात धाव घेतली," अशी आठवण आनंदन सांगतात.
पुढे धर्माच्या नावावर मतं मागितल्याच्या कारणानं कोर्टानं बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता.
या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं मात्र जनसंघाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तोपर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर नव्हता.
गांधी सोशलिझमच्या विचारसरणीवर स्थापन झालेल्या या पक्षानं जनसंघाच्या उमेदावाराला म्हणूनच पाठिंबा दिला होता. पण विलेपार्लेतली ही पोटनिवडणूक महाराष्ट्रातली हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा ठरली असल्याचं भाजपच्या प्रमोद महाजनांनी अचूकपणे ओळखलं होतं.
शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यश मिळाल्यावर भाजपवाले मात्र 'संभाल के बैठे' हिंदुत्वाच्या मुद्द्यात असलेली व्याप्ती लक्षात आली, असं मिश्र सांगतात. त्याचे पडसाद लगेचच जून 1989 मध्ये पालमपूरला झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उमटले.
ठोस मुद्द्यांच्या शोधात असलेल्या भाजपलाही हा मुद्दा गवसला होता. त्यांनी रामजन्मभूमीचा मुद्दा हातात घ्यायचं ठरवलं. पण देशभर पसरायचं असेल तर छोट्या पक्षांबरोबर युती करावी लागेल, तसंच महाराष्ट्रात बाळासाहेबांसारखी व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाला हाताशी घ्यावा लागेल. हा मुद्दा प्रमोद महाजनांनी या कार्यकारणीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून दिला, असं अंबरिश मिश्र सांगतात.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती
त्यानंतर सुरू भाजपच्या बड्या नेत्यांच्या बाळासाहेबांबरोबर भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्याची परिणती दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये झाली. युतीसाठी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे मोठे नेते बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला गेले.
एक प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती करून अडवाणी आणि ठाकऱ्यांनी बहुसंख्याकवादाचं कार्ड खेळलं, असं अंबरिश मिश्र यांना वाटतं.
"युती व्हावी ही प्रमोद महाजनाची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्णत्वास नेली. त्यासाठीचा तपशील वर्ककाऊट करणं, बाळासाहेबांचा नसलेला लहरीपणा संभाळणं अशी सर्व कामं त्यांनी लिलया केली. युती झाल्यानंतर दोन्हा बाजूंकडून बाळासाहेब ठाकरेंचा योग्य सन्मान राखला जाईल हे सुद्धा त्यांनी पाहिलं. तसंच या युतीच्या कुटुंबाचं प्रमुखपद यांनी बाळासाहेबांना देऊ केलं," असं अंबरिश मिश्र सांगतात.
"तर मराठीचा मुद्दा बाळासाहेबांनी काहीकाळ मागे ठेवला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उडी मारली तेव्हा ही अपरिहार्यता शिवसेना आणि भाजपच्या लक्षात आली होती. एकट्याच्या जीवावर आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढता येणं शक्य नाही हे दोन्ही पक्षांच्या लक्षात आलं होतं. राष्ट्रीय स्तरावर आपल्याला सांभाळून घेईल आणि आपलं महत्त्व अबाधित ठेवेल आणि स्वतःची वाढ होईल, असा साथीदार बाळासाहेबांना हवा होता. आणि तो भाजपच्या रूपात त्यांना मिळाला म्हणून त्यांनी युती केली," असं राजकीय विश्लेषक सचिन परब सांगतात.
युती होताच दोन्ही पक्षांनी 1990च्या निवडणुका एकत्र लढवल्या. प्रमोद महाजनांनी राज्यभरात बाळासाहेब ठाकरेंच्या सभा आयोजित करून प्रचाराचा दणका उडवला होता. त्यावेळी 47 सभा महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी घेतल्या, पण काही त्यांची सत्ता आली नाही, मिश्र सांगतात.
पण मराठवाड्यात मात्र युतीला चांगलं यश संपादन करता आलं. त्याचं कारण दैनिक 'पुढारी'चे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सांगतात, "प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचं नेतृत्व बीडमधूनच पुढे आलं होतं, पण शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा भाजपपेक्षा जास्त आक्रमक होता. बाळासाहेबांच्या रूपानं मराठवाड्याला एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता मिळाला.
"स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात एक असंतोष एकवटला होता. आमचा आवाज मुंबई-दिल्लीपर्यंत पोहोचत नाही, अशी लोकांची खंत होती. लोकांमध्ये आणि राजकारणात एक प्रकारची मरगळ होती. गावागावांत समाजात तेढ होती. हे वातावरण शिवसेनेला इथं रुजण्यात उपयोगी ठरलं."
मराठवाड्यात मिळालेल्या या प्रतिसादामुळे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना-भाजप युती हे चलणी नाणं असल्याचं प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं. "त्या काळात भाजपचं महाराष्ट्रात फारसं अस्तित्व नव्हतं. प्रमोद महाजन काही मास लीडर नव्हते. पण बाळासाहेबांची भाषणं अत्यंत प्रभावशाली होती. लोकांच्या भावनांना ती हात घालणारी होती. भाजपातली मुंडे-महाजन जोडी एका बाजूला आणि बाळासाहेब ठाकरे एका बाजूला एवढी त्यांची बाजू भक्कम होती,"असं सचिन परब सांगतात.
1990 मध्ये शिवसेना भाजपची सत्ता तर आली नाही, पण त्यांना विरोध पक्षनेतेपद मिळालं. याचा फायदा गोपीनाथ मुंडें योग्य प्रकारे करून घेतला आणि त्यांनी थेट शरद पवारांच्या राजकारणाला आव्हानं दिलं, असं परब सांगतात.
पण 1990 नंतर मात्र घडामोडी वेगानं घडत गेल्या.
25 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लालकृष्ण अडवाणींनी राममंदिरासाठी रथरात्रा काढली. 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद प्रकरण घडलं आणि मुंबईत दंगली उसळल्या. त्यानंतर 12 मार्च 1993ला मुंबई साखळी स्फोट झाले.
या घटनाक्रमानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज बदलला. आणि लवकरच महाराष्ट्राला एका वेगळ्या सरकारचा अनुभव आला.
'किस्से महाराष्ट्राचे'च्या पुढच्या भागात आपण त्याविषयीच चर्चा करणार आहोत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)