You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फिरोजशहा कोटला: पाकिस्तानसोबतचा सामना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी जेव्हा पिच खोदलं होतं...
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटली यांचं नाव दिलं जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वनडे आणि टेस्ट सामने पाहिलेलं हे स्टेडिअम ज्या मैदानावर आहे, त्याचं नाव मात्र फिरोजशाह कोटला मैदानच राहील, असं दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट मंडळ (DDCA)ने स्पष्ट केलं आहे.
हे तेच स्टेडिअम होय ज्याचे पिच 1999मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून खोदण्यात आले होते.
"बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की जो पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय, भारतातल्या निष्पाप लोकांचा बळी घेतोय, त्या पाकिस्तानशी कसलाही संबंध असता कामा नये. त्यामुळे पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅचही व्हायला नको. पण त्यावेळच्या सरकारनं ठरवलं की क्रिकेट मॅच होईल. पण आम्ही ठरवलं होतं की क्रिकेट मॅच होऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी," दिल्लीत शिवसेनेचा आक्रमक चेहरा राहिलेले आणि सध्या भाजपवासी झालेले जय भगवान गोयल यांनी त्या वेळची आठवण सांगितली.
"मी तेव्हा शिवसेनेचा उत्तर भारताचा अध्यक्ष होतो. मग दिल्लीत ज्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर मॅच होणार होती, त्या स्टेडियमचे पीच खोदले," ते सांगतात.
गोयल पुढे सांगतात, "मग पुढे पंधरा दिवस दिल्ली पोलीस माझा शोध घेत होते, पण बाळासाहेबांचा मला आदेश होता की अटक व्हायचं नाही. आमच्या बाकी लोकांना अटक झाली, पण मला अटक झाली नाही."
डिसेंबर 1998 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्यानं मुंबईत होणारा सामना दिल्लीला हलवावा लागला.
पण दिल्लीतही सामना होण्यास शिवसेनेनं विरोध केला. दिल्लीतील शिवसैनिकांनी रात्रीतून जाऊन पिच खोदले. अर्थात हे पिच खोदले गेले असले तरी ते दुरुस्त करून कडक सुरक्षा व्यवस्थेत भारत-पाकिस्तान कसोटी सामना खेळला गेला होता.
'त्यांनी स्टंट केला होता'
पिच खोदण्याची शिवसेनेची सुरुवात 1991 मध्ये झाली. शिशिर शिंदे यांनी पाकिस्तानशी सामना होऊ नये म्हणून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमचे पिच खोदले होते. दिल्लीतल्या 1999च्या प्रकाराबद्दल शिशिर शिंदे म्हणतात, "त्यांनी स्टंट केला होता. फोटोग्राफर नेऊन, कॅमेरे नेऊन अशी आंदोलन होत नसतात. आम्ही ज्यावेळी वानखेडेचं पीच खोदलं त्यावेळी ते अत्यंत गुप्तपणे तर केलंच, पण पिच खोदून त्यावर ऑईलही टाकले. त्यामुळे सामना होऊ शकला नाही, म्हणजे आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करू शकलो."
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सांगतात की, "पाकिस्तानबरोबर खेळायचंच नाही, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होते. पण तरीही काहींनी भूमिका घेतली की सामना होऊद्यात. मग आपल्या दिल्लीतल्या शिवसैनिकांनी पिच खोदून टाकले. जय भगवान गोयल यांच्यासोबत त्यावेळी मंगतराम मुंडे, ओमदत्त शर्मा हे शिवसैनिक होते.
यावेळी 'सामना'च्या अग्रलेखात पिच खोदण्याच्या या कृतीचं समर्थन करताना बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की ही 'सच्ची देशभक्ती' आहे. शिवसेनेच्या तत्कालीन खासदार मधुकर सरपोतदारांनी म्हटलं होतं की जर कुणाला काही दुखापत झालेली नाही तर हा प्रकार काही गुन्हा होत नाही.
त्यावेळी सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया मात्र सावध अशी होती. पक्षाचे प्रवक्ते जे. पी. माथुर यांनी म्हटलं होतं की 'हे खोडसाळपणाचे कृत्य' आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजनांनी स्पष्ट केलं की याचा शिवसेनेसोबतच्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही, असं फ्रंटलाईन या नियतकालिकाने म्हटलं होतं.
वाजपेयी सरकारची कोंडी
ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे या घटनेबद्दल सांगतात की, "शिवसेनेला उत्तर भारतात आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं होतं आणि जय भगवान गोयल यांना प्रसिद्धी हवीच होती. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नको ही तर शिवसेनेची भूमिका होतीच. त्यातून हा प्रकार घडला.
"शिवसेनेनं पहिल्यांदा दिल्लीत अशाप्रकारचं आंदोलन केलं होतं. या प्रकारामुळे तत्कालीन केंद्र सरकारची मात्र कोंडी झाली. त्यावेळी दिल्लीत NDAचे सरकार होते आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. पाकिस्तानशी संबंध सुरळीत करण्याचा त्यांच्या सरकारचा प्रयत्न होता आणि त्यांच्याच मित्रपक्षानं हा प्रकार केला होता."
'सकाळ'चे दिल्लीचे ब्युरो चीफ अनंत बागाईतकर या घटनेची आठवण सांगतात, "बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानबरोबरचा सामना मुंबईत होण्यास विरोध केला होता. त्यामुळे हा सामना दिल्लीत घेण्याचं ठरलं. दिल्लीमध्ये जसं घ्यायचं ठरलं, त्यावेळी शिवसेनेची जी दिल्लीतील मंडळी होती जय भगवान गोयल वगैरे, त्यांनी जाऊन ते पिच खोदले.
"त्यावेळी न्यूज चॅनल कमी होते, मात्र जे काही होते ते चॅनलवाले आणि वर्तमानपत्राचे फोटोग्राफर यांना त्यांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे टीव्हीवरही त्याचे फुटेज दाखवले गेले होते. असं ठरवून ते सगळं केलं गेलं होतं."
"त्यावेळी सरकार वाजपेयींचं होतं, त्यांनी यापासून स्वत:ला दूर ठेवलं होतं आणि खेळात राजकारण आणू नये, अशी त्यांची भूमिका होती."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)