राज ठाकरे की छगन भुजबळ: विधानसभा निवडणुकीत नाशिककर कुणाच्या बाजूनं उभे राहणार?

    • Author, विनायक गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रात निवडणूक आता अगदी तोंडावर येऊन ठेपलीये आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय चाललंय, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही निघालोय महाराष्ट्राच्या यात्रेवर, 'महाराष्ट्र कुणाचा?' हा प्रश्न घेऊन.

10 दिवसांत 10 जिल्हे पालथे घालण्याचा आमचा प्लॅन आहे आणि याचा श्रीगणेशा आम्ही सोमवारी केला नाशिकपासून...

आमचा दिवस सुरू झाला तो सलीम टी स्टॉल पासून. सकाळी-सकाळी गरमा गरम चहा पिऊन आम्ही लागलो पहिल्या फेसबुक लाईव्हच्या तयारीला. पहिला कार्यक्रम होता तो नाशिकच्या वरिष्ठ पत्रकारांसोबत. पण पत्रकारांशी गप्पा मारायच्या आणि चर्चा करायची म्हटल्यावर आपली पण तयारी आलीच...

सलीम टी स्टॉल म्हणजे नाशिकचा तरुणाईचा अड्डा. सकाळी 9 पासूनच या स्टॉलवर कॉलेजच्या मुला-मुलींची गर्दी. तसं पाहायला गेलं तर मॉर्निंग वॉक करून येणारेही काही कमी नव्हते.

आमच्या फेसबुक लाईव्हअगोदर अशाच काही कॉलेजच्या तरुणांशी गप्पा मारल्या. खरं तर मला जाणून घ्यायचं होतं की ते नाशिककडे, नाशिकच्या राजकारणाकडे आणि होऊ घातलेल्या निवडणुकांकडे ते कसं बघतात?

नाशिकचे प्रश्न तर होतेच पण त्याहून जास्त त्यांच्या मनात उत्सुकता होती ती छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून सेनेत जाणार का याची आणि याच प्रश्नापासून आमचं संपादकांसोबतचं ब्रेकफास्ट सेशनही सुरू झालं.

पाहा आमचं फेसबुक लाईव्ह

भुजबळांचं सेनेच्या तळ्यात मळ्यात

'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या मते भुजबळ सेनेत जाणार ही चर्चाच कशी सुरू झाली, हे कळत नाही. या चर्चांना सुरुवात करून राष्ट्रवादीवर दबाव आणण्यासाठी आणि शिवसेनेलाही अस्थिर करण्यासाठी भुजबळांच्याच समर्थकांनी ही चर्चा सुरू केल्याचं ते म्हणाले.

'महाराष्ट्र टाइम्स'चे नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी म्हटलं, "जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की 'तुमचा हाजी मस्तान, माझा अरुण गवळी', तसं अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे भाजपला सांगू इच्छिताहेत की 'तुमचे नारायण राणे आणि माझे छगन भुजबळ'. या चर्चा करून तेही भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताहेत."

झी २४ तासचे उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ योगेश खरे यांना असं वाटतं की ही भुजबळांसाठी अग्निपरीक्षा आहे. "आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं नाव जपण्यासाठी ते चाचपणी करताहेत. 2014 लाही त्यांनी हेच केलं होतं आणि आत्तासुद्धा ते हेच करत आहेत," असं ते म्हणाले.

या ब्रेकफास्ट लाईव्हनंतर आमचा मुक्काम होता गोखले एज्युकेशन सोसायटीचं कँपस. तिथल्या इंजिनिअरींग कॉलेजच्या मुलांनाही आम्ही भुजबळ, नाशिक, सध्याचे राजकारणातले बदलते वारे आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल विचारलं. तेव्हा भुजबळांना घेऊन नाशिकची तरुणाई काहीशी विभागलेली दिसली.

काहींना वाटतंय की हे फक्त राजकारण आहे तर काहींच्या मते अशा 'आयाराम गयारामां'चा जनतेला काहीच फायदा होत नाही. "स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी जर पक्षबदल केले तर जनतेला काय उपयोग?" असं एकानं म्हटलं.

नाशिकमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आज सेनेचं तर शहरात भाजपचं वर्चस्व आहे. येत्या निवडणुकीतही युतीला यश मिळेल, असाच अंदाज जाणकार वर्तवतायत.

नाशिकमध्ये मनसेचं इंजिन का थंडावलं?

पण नाशिकच्या सध्याच्या राजकारणाची गोष्ट फक्त छगन भुजबळांपुरतीच मर्यादित नाही. राज ठाकरे हे नाव न घेता नाशिकची यंदाची निवडणूक पूर्ण होणार नाही.

नाशिक हा मनसेचा एकेकाळचा गड. नाशिक महानगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे खूप अपेक्षेने बघितलं जायचं, पण राज ठाकरेंनी आणि मनसेनं नाशिककरांची साफ निराशा केली, असं देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले यांना वाटतं.

राज ठाकरे या नावाला करिश्मा आहे, पण त्यांच्या पक्षात आज ग्राऊंड लेव्हलवर काम करायला कार्यकर्ताही उपलब्ध नाहीये, ही परिस्थिती नाकारून चालणार नाही, असा सूर नाशिकच्या तरुणाईमधून ऐकायला मिळाला. 'आम्हाला पार्ट टाइम नको तर फुल टाइम आणि नाशिकसाठी काम करणारे राजकारणी आणि नेते हवेत, हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असंही ते म्हणतात.

नाशिकचा विकास कसा होणार?

"पण नाशिक मागे पडतंय याचं कारण म्हणजे नाशिककडे सध्याच्या घडीला नसलेला राजकीय चेहरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'आपण नाशिकला दत्तक घेतोय', असं म्हटलं खरं, पण त्यांनी नाशिकला नेहमी आपलं सावत्र बाळच मानलं," असं लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक संजय पाठक सांगतात.

आणि हीच भावना आजच्या तरुण पिढीतही बघायला मिळाली. फक्त आश्वासनांचा पाऊस पाडून नाशिकचा विकास होणार नाही. खरा विकास करायचा असेल तर आम्हाला नाशकात रोजगाराचा संधी उपलब्ध करून द्या, असं नाशिकचा तरुण सरकारला आवर्जून सांगतोय. जर नाशिकमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर मग मुंबई - पुण्याला जायची गरजच काय, असा सवालही ते विचारतात.

सक्षम राजकीय नेतृत्वाचा अभाव, दृढ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजी आणि दुफळी, यामुळे नाशकातली राजकीय परिस्थिती ढवळून निघालीये. त्यातच पक्षांतराच्या लोणामुळे नाशिकही अस्थिर बनलंय.

या राजकीय परिस्थितीत नाशिककर कुणाच्या पारड्यात मत देतात, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राचं तर माहीत नाही, पण नाशिक कुणाचं असं सध्याच्या घडीला विचारलं तर सत्ताधारी सेना-भाजपच्या दिशेनं हे राजकीय मैदान झुकलंय, हेच दिसून येतंय.

हे वाचलंत का?

हे नक्की पाहा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)