'वेळ आली तर सांगेन माझ्यापाशी फक्त मुलगी आहे बाकी काही नाही,' एकल शेतकरी महिलेचा संघर्ष

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, यवतमाळ

“माझ्या मुलीची शिकायची इच्छा आहे पण माझ्याजवळ पैसेच नाहीत तर कसं शिकवणार? यावर्षी शेतीतून जे उत्पन्न मिळणार होतं ते काहीच मिळालं नाही. मला त्यांच्या लग्नाची सोय करायची आहे. आमच्याकडे पूर्ण सोनं करावं लागतं. जे ते मागतील ते द्यावं लागतं.

"आमच्या कास्टमध्ये लग्नाचा खर्च 5 ते 7 लाख रुपये खर्च येतो. भीती वाटते की मी कसं करेन. तशी वेळ आली तर मी सांगेन की माझ्यापाशी फक्त मुलगी आहे बाकी काही नाही."

हे सांगत असताना पुष्पा काकडे यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या यवतमाळ जिल्ह्यात राहतात.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्यांपैकी यवतमाळ हा एक जिल्हा.

42 वर्षीय पुष्पा काकडे यांच्या पतीचं कोव्हिडमध्ये निधन झालं. त्यानंतर दोन मुली, एक मुलगा, सात एकर शेत आणि घराची संपूर्ण जबाबदारी पुष्पा यांच्यावर आली.

पतीच्या निधनानंतर गेल्या दोन वर्षात त्यांनी कसंबसं स्वत:ला सावरलं. त्यांना शेतीची माहिती होती पण कधी प्रत्यक्षात त्यांनी शेती केली नव्हती. बाजारभाव, कृषी केंद्र, बियाणं, फवारणी याची काहीच माहिती त्यांना नव्हती.

घरात शेतीची दोन पुस्तकं होती. ती त्यांनी वाचली आणि कापूस आणि सोयाबीनची लागवड सुरू केली. आता यंदा आपण चांगलं उत्पन्न घेऊ या आशेवर त्या होत्या. पण ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे अतिवृष्टीने होतं नव्हतं सगळं नेलं.

‘दुष्काळात तेरावा महिना’

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी गावात आम्ही पोहचलो. इथे आमची भेट पुष्पा काकडे यांच्याशी झाली. विटांनी बांधलेलं कच्च पण नीटनेटकं घर. घरासमोर अंगणात एक सुंदर छोटी रांगोळी आणि आजूबाजूला अंगणात रचलेला कापूस.

आम्ही त्यांच्या घरी प्रवेश करताच समोर त्यांच्या पतीचा हार घातलेला फोटो दिसला. एकाबाजूला शिलाई मशीन आणि दुसरीकडे मुलांची अभ्यासाची पुस्तकं. यंदा शेतीत किती नुकसान झालं? किती उत्पन्न मिळालं? यावर मी त्यांच्याशी चर्चा सुरू केली आणि बोलता बोलता अचनाक त्यांना रडू कोसळलं. त्यांना रडताना पाहून त्यांची मोठी मुलगी प्राचीलाही रडू आवरेना.

2021 मध्ये पतीच्या निधनानंतर ते यंदा अतिवृष्टीपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांना आठवत होता.

पुष्पा काकडे म्हणाल्या, “माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. तीन मुलांना सांभाळायचं की शेती करायची. जूनमध्ये लागवड करावी लागते. मी विचार केला की दुसऱ्याला करायला देईन. पण म्हटलं जसं जमेल तसं सुरू करू.

"लागवड करण्यासाठी बियाणं आणायला गेले पण काहीच कळत नव्हतं. घरी एक पुस्तक होतं. ते वाचलं. आपल्या शेतात कोणती पराटी होते हे पाहिलं. मग बियाणं आणून लागवड केली. लोकांना विचारलं की कोणता फवारा मारायचा. असं विचारत विचारत सुरू केलं.”

गेल्या दोन वर्षात पुष्पा शेती करायला तर शिकल्या शिवाय शेतीला जोडधंदा म्हणून शिवणकाम शिकल्या. यंदा कापूस, सोयाबीन आणि चन्याची लागवड त्यांनी केली होती. पण सुरुवातीला पुरेसा पाऊस झाला नाही आणि मग अवकाळी पाऊस इतका झाला की यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

पुष्पा सांगतात, “यावर्षी खूप पाऊस झाला. आमच्या शेतात पाऊस खूप आला की काही होतच नाही. पाऊस लागला की बोंडं सडून गेली. तूर तर पूर्णच गेली. मग बोंडअळी आली. जिथं 50-60 क्विंटल कापूस व्हायचा तो 30 क्विंटल कापूस झाला. त्यातही 20 क्विंटलच निघेल फारतर.

"जेव्हा पाऊस हवा होता तेव्हा पाऊस पडला नाही. पुन्हा पेरणी केली. मग पाऊस आला की जास्तच आला. तूर गेला आणि कापूसही गेला. मेहनत वाया आणि खर्चही दुप्पट झाला.”

बेभरवशाची शेती आणि त्यात तीन मुलांचं शिक्षण, घराची जबाबदारी पुष्पा यांना एकटीला पेलावी लागते. यामुळे अनेकदा खचायला होतं असं त्या सांगतात.

“एवढं कठीण आहे की असं वाटते, आपल्या करण्याची ताकद राहत नाही. मुलं सांभाळणं, मोठ्या मुली, त्यांच्या लग्नाचा भार शिक्षणाची जबाबदारी, शेती सांभाळून एवढं करणं आणि त्यात एवढा दुष्काळ पडला तर कसं करायचं? एवढं कठीण आहे की सांगू शकत नाही. खचले तर खूपच. खचायला होते पण यातून ते म्हणतात ना देवच एवढी शक्ती देतो की कोणी नसलं तरी देव सोबत असतो.”

कर्ज, सोनं गहाण आणि न परवडणारं शिक्षण

पुष्पा काकडे यांना तीन मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. त्यांच्या मोठ्या मुलीचं नुकतंच बीएससीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं पण पुढच्या शिक्षणासाठी घरून पैसे येणं बंद झाल्याने ती नुकतीच घरी परतली.

तर यापूर्वी शेतीसाठी आणि शिक्षणासाठी पुष्पा यांनी साडे तीन लाख रुपयांचं कर्ज काढलंय. सोनंही गहाण ठेवल्याचं त्या सांगतात.

यंदा शेतीत अपेक्षित उत्पन्न न झाल्यानं त्यांचं सुरू असलेलं सगळं आर्थिक गणित कोलमडलं आणि आता याचा थेट फटका बसतोय तो मुलींच्या शिक्षणाला आणि लग्नाच्या खर्चाला. दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च एकाचवेळी पेलत नाही म्हणून त्यांनी मोठ्या मुलीला वर्ध्याहून नुकतंच परत बोलवलं. तर दुसऱ्या मुलीचं यवतमाळ जिल्ह्यात बीएचं शिक्षण सुरू आहे.

याविषयी बोलताना पुष्पा सांगतात, “छोटी मुलगी म्हणाली की तुझ्या करमण्यासाठी मी माझ्या शिक्षणाची माती करू का, मोठी शिकत आहे तर मी का मागे राहू? यावरून तिचा आणि माझा वाद झाला. मग तिला यवतमाळला प्रवेश करून दिला.

"आता दोघीचं शिक्षण सुरू झालं की मला पैसे कमी पडत गेले कारण यावर्षी ओल्या दुष्काळामुळे कापूसही गेला आणि तूरही गेली. मग माझे काही पैसे पुरत नाही असं मोठीला सांगितलं आणि तिला परत बोलवलं.”

प्राचीला बीएससीनंतर एमएससीला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी ती महाविद्यालयात गेली. पण शुल्क अधिक असल्याने प्रवेश घेतला नाही असं ती सांगते. तसंच ती आता स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत आहे. तिने नुकतीच तलाठीची परीक्षा दिली. पण स्पर्धा परीक्षेतही प्रत्येक परीक्षेसाठी एक हजार रुपये शुल्क आहे आणि ते परवडत नसल्याचं ती सांगते.

प्राची सांगते, “आईला आता परवडत नाही. यंदा शेतीत खूपच फटका बसला. म्हणून मी गावी परत आले. पण इथे मार्गदर्शन करणारं कुणीच नाही. पैसेही नाहीत. पण इच्छा आहे. खूप इच्छा आहे कारण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा द्यावी.”

हे सांगत असताना प्राचीला रडू कोसळलं. ती पुढे म्हणाली, “आईची दगदग पाहून मी आले. आईची तब्येत बरी नसायची तरी ती सांगत नव्हती. मला नातेवाईकांकडून कळायचं. पुण्याला जाण्याची इच्छा होती पण ते शक्य नाही याची कल्पना होती. म्हणून मी वर्ध्याला शिकले, तिकडेच आणखी शिकायचं होतं कारण मला चांगली नोकरी लागली तर मी माझ्या भावंडांना शिकवू शकेन.

"आता शेती तर पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. कापसाला हमी भाव नाही. आमचा चना पूर्ण गेला आणि पुन्हा लागवड केली. आता तलाठीची परीक्षा देऊन सुद्धा बरेच महिने झाले. ऑगस्टमध्ये तलाठीची परीक्षा झाली अजून निकाल लागला नाही.”

प्राचीची लहान बहीण बीएच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. गावाजवळ महाविद्यालय नसल्याने ती यवतमाळ शहरात शिकते आहे. तसंच पोलीस भरतीसाठीही तिची तयारी सुरू आहे. तर त्यांचा लहान भाऊ नववीत शिकत आहे.

एकल शेतकरी महिला म्हणून शेती, मुलांचं शिक्षण, लग्न, घर, स्वयंपाक हीच आव्हानं नाहीत तर यापलिकडे जाऊन समाजात वावरतानाही अनेक मर्यादा आणि अडचणी असल्याचं पुष्पा सांगतात.

‘लोक परीक्षा पाहत असतात की कसं करते’

शेतीला जोडधंदा म्हणून पुष्पा शिवणकाम शिकल्या. काही लोकांच्या मदतीने त्यांनी गावात ब्लाऊज आणि साड्या विकायला सुरुवात केली. पण गावातल्या गावात त्यातूनही अपेक्षित कमाई होत नाही कारण एकावेळी ग्राहक पूर्ण किंमत देत नाहीत. त्यांच्याकडे जसे पन्नास, शंभर रुपये जमतील तसे ते येऊन देतात.

“मग हेच पैसे साठवून मी मुलीला पाठवते. तिलाही ते अपुरेच पडतात. पण काही इलाज नाही. बाकी किराणा तर उधारीवरच आणते. मग त्यालाही जमेल तसं थोडे थोडे करून पैसे द्यायचे.”

पुष्पा यांचा दिवसातला सर्वाधिक वेळ आणि आर्थिक गुंतवणूक शेतीत जाते. त्यामुळे शेतीकडे त्या अधिक लक्ष देतात. पण यंदा अतिवृष्टीमुळे त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. ही सगळी आव्हानं पेलत रोजचा दिवस ढकलते असं पुष्पा सांगतात. पण याही पलिकडे समाजात वावरताना इतर अडचणी उभ्या ठाकतात.

त्या म्हणाल्या, “मी एकटी एवढं हँडल कसं करू हा प्रश्न मला रोज पडतो. मुलांचं काय आहे ते आईवरच अवलंबून असतात ना. पण आपल्याला कोणाचाही हातभार नाही. त्यात लोक परीक्षा पाहतात की ही कसं करते. मग आपल्याला तर उत्तीर्ण व्हावं लागेल असं करत मी इथपर्यंत पोहचले.”

“अनेकदा खूप टेंशन येतं. समाजाचा दबाव असतो. कारण कोणासोबत आलं की तसंही लोक बोलतात. ही बाई याच्यासोबतच गेली असं बोलतात. आता बँकेत काम असलं की आपण कुणासोबत गेलो की गावातले लोक किंवा घरचेच लोक बोलतात की ह्याच्यासोबत गेली. पुन्हा शेतीत माणसासोबत बोलत असलं की तरीही बोलतात.

"पण आपल्याकडे काय इलाज आहे. तेवढं करायला लागतंच ना. मला वाटतं की महिला नसते आणि पुरुष असते तर बरं झालं असतं. एखादे वेळी असंही वाटतं की माझे मिस्टर न जाता मी गेले असते तर बरं झालं असतं,” पुष्पा पुढे सांगतात.

खरं तर हा संघर्ष एकट्या पुष्पा किंवा त्यांच्या मुलींचा नाही. तर यंदा राज्यातील शेकडो शेतकरी आणि त्यांची मुलं दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आणि याचा थेट फटका मुला-मुलींच्या शिक्षणावर बसतोय. विशेषत: मुलींच्या शिक्षणावर आणि मग त्यांच्या लग्नावरही.

यवतमाळमधील सावित्रीज्योतिबा समाजकल्याण महाविद्यालयाने जिल्ह्यातील एकल महिलांच्याबाबतीत एक सर्वेक्षण केलं. यानुसार जिल्ह्यात 15 हजारहून अधिक एकल महिला आहेत. पण, यापैकी 50 टक्के महिलांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचं दिसतं.

याविषयी बोलताना प्राध्यापक घनश्याम दारणे सांगतात, “जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने मार खाल्ला आणि नंतरच्या टप्प्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर आला. कापूस भीजला आणि कापूस इथलं प्रमुख पीक आहे. दोन्ही पिंकाना भाव नाही. दहा बारा वर्षापूर्वीच्या भावाप्रमाणे आता भाव मिळतोय. यामुळे नैराश्याचं प्रमाण जास्त आहे. त्यापोटी आत्महत्या वाढलेल्या दिसतात.”

ते पुढे सांगतात, “स्त्रीयांचे शेतीतले कष्ट 65-70 टक्के आहे, असा एक अहवाल सांगतो. पण प्रत्यक्षात शेतीतलं उत्पादन विकण्यापासून यात पुरुष असतो. महिलांनी बाजार समितीचा, कृषी केंद्राचा अनुभव घेतलेला नसतो. यात अनेकदा महिलांचं शोषण होतं. वेगळ्या अडचणी येतात. मुलांकडे लक्ष देता येत नाही.

"त्यांच्यासमोरचा अडचणींचा डोंगर वाढतो. यवतमाळमध्ये 15 हजारवर एकल महिला आहेत. यापैकी 10 टक्के महिलांना केवळ लाभ मिळतो. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी वऱ्हाडी म्हण आहे. त्यातला हा प्रकार आहे.”

‘सरकारची कुठलीही मदत पोहचली नाही’

राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर 32 पैकी 26 जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झाल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं. तसंच गेल्या दीड वर्षांत सरकारने शेतकऱ्याला 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत केल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. शिवाय, 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याचा हफ्ता जमा झाल्याचंही सरकारने सांगितलं. पण, आपल्यापर्यंत अद्याप सरकारची कोणतीही मदत किंवा योजना पोहचली नसल्याचं पुष्पा सांगतात.

“सरकारची मदत म्हणजे अजून काहीच मिळालं नाही. एक रुपयाचा विमा काढला तो ही नाही मिळाला. आणि सोयाबीनचंही काही मिळालं नाही. एकही रुपयाची मदत झाली नाही. पीएम किसानची मदतही येत नाही. पंचनामे केलं म्हणतात पण आमच्यापर्यंत मिळालं पाहिजे ना. बाल संगोपनची योजना विधवा महिलांची आहे. त्यासाठ कागदं जमा केली तिथं नेऊन दिले तीही योजना मिळाली नाही.”

यासंदर्भात प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना संपर्क साधला. ते म्हणाले, "जुलैमधील अतिवृष्टीनंतर पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार सरकारी मदतीची प्रक्रिया सुरू आहे. पीक विमा कंपन्यांनाही आम्ही निर्देश दिले आहेत."

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती किती बिकट आहे हे सरकारी आकडेवारीवरूनही स्पष्ट होतं. राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात एकट्या अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात 246, अमरावतीत 268, तर बुलढाणा जिल्ह्यात 237 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

हे ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)