'आईचा फोन आला तर जेवले म्हणून सांगते', दुष्काळामुळे पोटाला चिमटा घेऊन राहताहेत हे विद्यार्थी

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

16 वर्षांच्या ज्योत्स्ना सोळुंकेचं हे पुण्यातलं पहिलं वर्ष. 11 वी साठी ज्योत्स्ना पुण्यात आली. कॉलेजच्या हॅास्टेलची फी परवडत नाही म्हणून एका घरात पेईंग गेस्ट म्हणून इतर 18 मुलींसोबत शेअरिंगमध्ये राहतीये.

तिच्या खोलीत राहणाऱ्या मुलींची संख्या आहे 6. या गर्दीत सकाळी लवकर उठून आवरून ती 3 किलोमीटरचं अंतर पायी पार करुन कॉलेजला पोहोचते तेव्हा अनेकदा तिच्या पोटात अन्नाचा कणही नसतो.

जेवण दिवसातून एकदाच. तेही एक डबा ती आणि तिची मैत्रीण शेअर करुन खातात.

बीड जिल्ह्यातल्या तिच्या गावी तिची आई, दोन लहान भावंडं, आणि आजी-आजोबा राहतात. घरचं शेत आहे, पण दुष्काळात त्या शेतात पीक नाही.

एरव्ही आई मजुरी करुन थोडे पैसे गाठीशी बांधते. पण यंदा ते सुद्धा नाही. परिस्थितीची लहान वयातच जाण आलेली ज्योत्स्ना जमेल तिथे काटकसर करतेय.

"घरून आईचा फोन आला तर सांगते मी जेवले आहे,” परिस्थिती बद्दल सांगताना ज्योत्स्नाचा साहजिकच हुंदका दाटून येतो.

“वडील अचानक गेले. घरी लहान भावंडं आहेत. आजी आजोबा आजारी असतात. अशात मला शिकायला इकडे पाठवायला सगळेच नको म्हणत होते. पण वडिलांचं स्वप्न होतं मी आयएएस व्हावं. त्यामुळे आईने जिद्दिनी पाठवलं.

"आता मी शिकले तर माझे बहीण भाऊ शिकू शकतील. त्यांना शिकून मोठं करण्यासाठी मला शिकून मोठं व्हायचंय ” हे सांगताना ज्योत्स्नाचा निर्धार आणखी पक्का होत असतो.

ज्योत्स्ना सोबतच राहणारी सृष्टी सुद्धा अशीच काटकसर करत आहे. घरी वडिलांना आपण डबा शेअर करुन खात असल्याची कल्पनाही तिने दिली नाही.

आईला माहीत आहे. पण वडिलांना वाईट वाटेल म्हणून त्यांना दोन वेळ जेवल्याचं सांगत असल्याचं सृष्टी सांगते. शाळा संपली आणि अनेक मुली घरीच राहिल्या. त्यामुळे आपल्याला पुण्यात शिकण्याची संधी मिळणं तिला महत्त्वाचं वाटतं.

तिला शिकवणं हे तिच्या आईवडिलांची जिद्द.

"नातेवाईकांमध्ये एक दिवशी माझ्या लांबच्या आजी आल्या होत्या. मी दहावीलाच होते तेव्हा. दहावीचे पेपर होते. मी अभ्यास करत बसले होते. तेवढ्यात त्या म्हणल्या, की एवढं काय शिकायचंय...दहावी झाली की लग्न करून टाका.

"आई-बाबा तेव्हा खवळले होते.माझ्या सोबतच्या अनेक मुलींनी गावाकडच्याच कॅालेजमध्ये अॅडमिशन घेतली. पण त्या घरीच असतात. मला शिकून मोठं व्हायचं आहे,” सृष्टी सांगते.

बीड आणि परभणी जिल्हातल्या खेड्यातून येणाऱ्या या मुली. दोघींच्याही घरी थोडी का होईना शेती आहे. पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची परिस्थीती तर आणखी बिकट आहे.

महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबरमध्ये 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं घोषित केलं होतं.

त्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नाशिक, पुणे, धाराशिव व सोलापूर, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे.

राज्याने आणि केंद्राने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे, पण या दुष्काळग्रस्त भागातून शिक्षणासाठी शहरात स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पोटाला चिमटा काढून राहावं लागत आहे.

'आई-वडील कर्ज काढून शिकवत आहेत'

पुण्यातल्या गोखलेनगर मधल्या एका वस्तीत राहणाऱ्या नारायण राऊतच्या खोलीत आम्ही गेलो तेव्हा तिथे दोघं तिघं उभं राहिल्यावरही गर्दी झाली. एक ओटा, तिथेच शेजारी मोरी, झोपायला जागा आणि वर पत्रा असलेल्या या खोलीसाठी नारायण महिन्याकाठी अडीच हजार रुपये भरतोय.

सुरुवातीला मित्रासोबत त्याच्या हॉस्टेलवर 'पॅरासाईट' म्हणून राहून नारायणने दिवस काढले. पण ते करणं शक्य होईना तेव्हा त्याला स्वतःची जागा शोधणं भाग पडलं.

घरी आई वडील शेतमजुरी करतात. यंदा दुष्काळामुळे हाताला काम नाही. त्यात वडिलांची तब्येत बिघडलेली. अशात घरी पैसे मागण्याची शक्यताही नारायणच्या मनाला शिवत नाही.

"मला माझ्या एका मित्राने सांगितलं की आईवडील व्याजाने पैसे काढत होते बाबा. त्यानंतर बाबांचं दुखणं चालू झालं आणि आमच्या कर्जावर जे व्याज होतं ते वाढलं.

"आता दुष्काळी परिस्थितीत ते पण फेडणं कठीण जातं. त्यात माझा खर्च. मी 'कमवा आणि शिका' करत होतो.

"सध्या जेवणाचा खर्च असेल तर काही प्रमाणात वाचवणं हातात आहे. का तर आई-वडील आपले जेवण करत नाहीत तर आपण इकडं शहरामध्ये अशी जिंदगी जगण्यात काय अर्थ," नारायण अगदी काहीच शब्दात आपली परिस्थिती मांडतो.

ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची अवस्था तर बिकट आहेच. पण शेती असूनही दुष्काळाने अनेकांचं आर्थिक गणित बिघडवलं आहे.

'डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत मी शिकतोय'

10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या अनिकेत भूसनर सोबत राहणारे जवळपास सगळेच अशा परिस्थितीने गांजलेले.

बॅगांमध्ये भरून ठेवलेले कपडे, खाली अंथरलेल्या सतरंज्या किंवा पातळ शीट्स, वह्या पुस्तकं आणि कोपऱ्यात पडलेल्या फूड डिलिव्हरी अॅपच्या बॅगा अशा सगळ्या पसाऱ्यात अनिकेत आपल्या 7 रुममेट्स सोबत राहतोय.

त्यांच्यातल्या एकांची ज्यांना ते 'सर' म्हणतात त्यांची परिस्थिती तुलनेनी बरी. त्यांच्याकडे असलेल्या दोन दुचाकी या मुलांचा आधार झाल्या आहेत.

डिलिव्हरी करुन अनिकेत आणि त्याचे मित्र 4-5 तास काम केल्यावर 300 रुपये कमावतात. ज्याला जास्त गरज त्याने त्या दिवशी काम करायचं हे गणित त्यांनी ठरवून घेतलं आहे. लक्ष्मी रस्त्यावर कुठेतरी मिळणारं 30 रुपयातलं जेवण त्यांचा आधार बनलंय.

दुष्काळाच्या झळा कशा बसतायत हे सांगताना अनिकेत म्हणतो, “घरुन तीन साडेतीन हजार यायचे मागच्या वर्षी. पण यावर्षी दुष्काळ असल्यामुळे काम नाही.

"त्यामुळे घरुन तर पैसे येणं बंद झालं आहे. एखाद्यावेळी अर्जंट मागितले तर हजार दीड हजार येतात. पण मागायला पण आम्हालाच लाज वाटते. आम्ही मेसला स्कीप केलं.

"कामाचा पर्याय म्हणून आमच्या सरांच्या दोन गाड्या आहेत. एखाद्याला गरज आहे पैशांची तो झोमॅटोचं काम करतो आणि पैसे जमा करतो. जमा केलेले पैसे शिक्षणासाठी आणि राहण्या खाण्यासाठी खर्च करतो,” अनिकेत सांगतो.

अनिकेत, नारायण, सृष्टी, ज्योत्स्ना ही प्रातिनिधिक उदाहरणं. या मुलांसाठी जगण्याचेच प्रश्न इतके मोठे की अभ्यासासाठी रेफरन्स बुक्स घेणं, इतर स्किल मिळवण्यासाठी क्लास लावणं वगैरे तर त्यांच्यासाठी स्वप्नच ठरतंय.

'दुष्काळामुळे परिस्थिती आणखी बिकट'

पुण्यात गरजू विद्यार्थ्यांना हेल्पिंग हॅंड ही संस्था मदत करते.

"आज एकट्या पुणे शहरात मराठवाड्यातली 300 हून अधिक मुलं आहेत ज्यांना मदतीची तातडीची गरज आहे," असं हेल्पिंग हॅंड्स या संस्थेचा संचालक कुलदीप आंबेकर सांगतो.

"सरकारने यापैकी अनेकांच्या गावात दुष्काळ जाहीर तर केला आहे. पण पंचनामे आणि इतर सरकारी प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत शैक्षणिक वर्ष हातचं निघून जाण्याची भीती यातल्या अनेकांना वाटते.

"गावी परतलं तर शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहण्याची भिती आणि इ्थे रहायचं तर खर्च आ वासून उभे अशा कात्रीत अडकलेली ही मुलंच सध्या एकमेकांना आधार देत आहेत.

"गेल्या काळात पडलेल्या दुष्काळांपेक्षा यंदाची परिस्थिती वेगळी आहे," असं कुलदीप आंबेकर सांगतो.

विद्यापीठाकडून अजून या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणं सुरू न झाल्यामुळे त्याने आणि त्याच्या मित्रांनीच या विद्यार्थ्यांना एकत्र आणायला सुरुवात केली आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी ते सध्या अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

कुलदीप सांगतो , “विद्यापीठामध्ये मुलांना पार्ट टाईम जॅाब मिळत नाहीेयेत. 'कमवा आणि शिका' या विद्यार्थ्यांच्या बेसिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही दोन स्तरावर प्रयत्न करत आहोत- एक म्हणजे समाजातील दानशूर लोकांच्या भेटीगाठी करतो आहोत.

"दुसरं म्हणजे, या मुलांना प्रशासकीय पातळीवरुन मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. वसतीगृह मोफत द्यावेत. शैक्षणिक शुल्क माफ करावे. प्रशासकीय शुल्क माफ करावे अशा प्रकारे आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे.

"आत्ता आम्हांला तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की आमची घरची परिस्थीती हालाखीची आहे. कोणाला पालक नाहीत. हॉस्टेलची फी पेंडिंग आहे, कॉलेजची फी पेंडिंग आहे,” कुलदीप सांगतो.

आपण शिकलो, चांगली नोकरी मिळाली तर आज घरची परिस्थिती पालटेल या एकाच आशेवर ही मुलं तग धरून आहेत, धडपडत आहेत.

या मुलांना गरज आहे आधाराची. त्याचबरोबर सातत्याने येत राहणाऱ्या संकटावर मात करता यावी यासाठी सरकारने एक कायमस्वरूपी योजना आखावी, अशी आशा ही मुलं करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची सरकारला जाण असून आपण लवकरच त्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी दिलं आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, "मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मुंबई आणि पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याची मला जाण आहे.

"या विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी कृषी खात्याची थेट कोणतीही योजना अस्तित्वात नाही. परंतु सी एस आर, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय अथवा पार्ट टाइम जॉब अशा स्वरूपाची मदत देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत," अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)