उपासमारीमुळे ते उंदीर, हाडं, माती खाऊन जिवंत राहण्याचा प्रयत्न करत आहेत

    • Author, स्वामीनाथन नटराजन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल घडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. जसं की, दुष्काळ, गरिबी, युद्ध आणि रोगराई अशी बरीच कारणं.

मग अशा परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी लोकांना कधी माती तर कधी उंदीर, फेकून दिलेली हाडं, प्राण्यांची चामडी खाऊन आपली भूक भागवावी लागलीय.

आज जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात भूक, कुपोषण, अन्नाची टंचाई या रोजच्या समस्या झाल्यात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात किमान 82.8 कोटी लोक रोज रात्री उपाशी झोपतात. तर 34.5 कोटी लोकांना गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतोय.

काल 16 ऑक्टोबर रोजी आपण जागतिक अन्न दिवस साजरा केला. या अन्न दिवसाच्या पार्श्वभूमीवर बीबीसीने जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात तीव्र उपासमारीला तोंड देणाऱ्या चार लोकांशी संपर्क साधला. हे लोक या परिस्थितीत कसे जगले हे समजून घेतलं.

उंदराचं मांस विकत घेता येईल एवढीचं माझी ऐपत आहे...

भारताच्या दक्षिणेकडे तामिळनाडू राज्यात राहणाऱ्या राणी सांगतात, "मी लहानपणापासूनचं उंदराचं मांस खाऊन जगले आहे. मला आजवर कधीच आरोग्याच्या समस्या उद्भवल्या नाहीत. मी माझ्या दोन वर्षांच्या नातवालाही उंदराचं मांस खाऊ घालते. आणि आता तेच खाण्याची आम्हाला सवय झालीय."

49 वर्षांची राणी तामिळनाडू राज्यातील चेन्नईजवळ राहतात. त्या भारतातील सर्वात मागास समुदायाच्या एक सदस्या आहेत. पाच वर्षांची असताना त्यांची शाळा सुटली.

जातींच्या आधारावर विभागलेल्या भारतात राणीचा समुदाय नेहमीच उपेक्षित राहिलाय. त्यांच्या समाजाला अनेक शतकांपासून भेदभावाला सामोरं जावं लागलंय. राणी स्वतः एका एनजीओ मध्ये काम करतात. या एनजीओच्या माध्यमातून त्या त्यांच्या समुदायातील लोकांना मदत करतात.

इरुला समुदायातील जे लोक वेठबिगारी मध्ये अडकले आहेत त्यांना ही एनजीओ मदत करते.

राणी बीबीसीशी बोलताना सांगतात की, "आमची वस्ती नेहमीच शहरं किंवा गावकुसाच्या बाहेर असते. माझे वडील, आजोबा आम्हाला सांगायचे की, आमच्याकडे खायला काहीच नसायचं. एखादं कंदमुळं सुद्धा मिळणं मुश्किल होतं. त्या काळात पोषणासाठी आमचा समाज उंदरावर अवलंबून राहू लागला.'

"मी खूप लहान असल्यापासून उंदीर पकडायला शिकले."

आपल्या पोटाची खळगी भरून जीव वाचवण्यासाठी राणी लहानपणापासूनचं उंदीर पकडायला शिकल्या. ती कला आजही त्यांच्या मदतीला येते. आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा तरी त्या त्यांच्या घरी उंदीर शिजवतात."

इरुला समाजाचे लोक शेतात सापडणाऱ्या एका विशिष्ट जातीच्या उंदराला मारून खातात. हे लोक घरात सापडणाऱ्या उंदरांना खात नाहीत.

राणी सांगतात, "आम्ही उंदराची चामडी काढतो आणि त्याला विस्तवावर भाजून खातो. कधीकधी त्या उंदराच्या मांसाचे बारीक बारीक तुकडे करून त्यात चिंच आणि मसुरची चटणी घालून शिजवतो."

उंदीर आपल्या बिळात जे काही धान्य साठवतात ते सुद्धा बाहेर काढून हे इरुला लोक खातात.

राणी सांगतात, "मी महिन्यातून एकदाच चिकन नाहीतर मासे खरेदी करू शकते. उंदीर फुकट मिळतात आणि खूप सापडतात. म्हणून आम्ही उंदीरचं खातो."

जनावरांची चामडी खावी लागली...

सोमालियात सध्या अति भीषण उपासमार सुरू असल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलंय. मागच्या चाळीस वर्षात एवढा भयानक दुष्काळ पडला नव्हता एवढा भीषण दुष्काळ तिथं पडलाय. यात लाखो लोकांनी आपली घरदार सोडली आहेत.

पदरात सात मुलं असणाऱ्या चाळीस वर्षीय शरीफो अलीने सुद्धा आपलं घर सोडलंय.

त्या त्यांचं गाव सोडून सुमारे दोनशे किलोमीटर पायपीट करत मोगादिशूच्या बाहेर आल्या. त्या सलग पाच दिवस चालतच होत्या.

त्या सांगतात, "या प्रवासात आम्ही दिवसातून एकदाच जेवायचो. जेव्हा आमच्याकडे खाण्यापिण्याचं समान कमी असायचं तेव्हा आम्ही फक्त मुलांना खाऊ घालून स्वतः उपाशी राहायचो."

राजधानीकडे कूच करताना रस्त्यात त्यांना बरीच हैराण करणारी दृश्य दिसली.

शरीफो अली सांगतात, "नदी कोरडीठाण पडली होती. बऱ्याच वर्षांपासून नदीचं पाणी आटलं होतं, नदीला पाणी कमी होतं. त्यामुळे आम्ही नेहमी गढूळ पाणीच प्यायचो."

रस्त्याने जाताना आम्हाला शेकडो जनावरं मेलेली दिसली. उपासमारीमुळे लोकांना या प्राण्यांची हाडं, चामडी खावी लागत होती.

शरीफोकडे 25 गायी आणि तेवढ्याच शेळ्या होत्या. या दुष्काळात यातलं एकही जनावरं जिवंत राहिलं नाही.

"पाऊस न पडल्यानं आमच्या शेतात पिकं आली नाहीत."

शरीफो अली आता लोकांकडे घरकाम करतात आणि दिवसाला दोन डॉलर कमावतात. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हे पैसे पुरेसे नाहीयेत.

"या पैशातून किलोभर तांदूळ आणि भाजी सुद्धा विकत घेता येत नाही. आमच्याकडे कधीच भरपेट जेवण नसतं. या दुष्काळामुळे आमचं खूप नुकसान झालंय."

शरीफो अलीला काही एनजीओ मदत करतायत पण तेवढी मदत पुरेशी नाहीये.

त्या सांगतात, "आमच्याकडे काहीच नाहीये."

फेकून दिलेल्या जनावरांच्या हाडांवर, चामड्यावर दिवस काढतोय....

ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात राहणाऱ्या 63 वर्षीय लिंडिनाल्व्हा मारिया दा सिल्वा नॅसिमेंटो फेकून दिलेल्या जनावरांच्या हाडांवर चामड्यावर दिवस काढतायत. हे मागच्या दोन वर्षांपासून सुरू आहे.

लिंडिनाल्व्हा यांना पेन्शन मिळते. त्यांच्याकडे पुऱ्या दिवसासाठी मोजून चार डॉलर्स असतात. यात त्यांना त्यांचे पती, एक मुलगा आणि दोन नातवंडांचा खर्च भागवावा लागतो. एवढ्या सगळ्यांसाठी मांस खरेदी करणं शक्य नसतं, म्हणून त्या कासायाकडे जाऊन उरलेली हाडं, कोंबड्यांची सोललेली चामडी खरेदी करतात. एका किलोमागे त्यांना 0.70 डॉलर मोजावे लागतात.

"या हाडांवर थोडसं मांस चिकटलेलं असतं, मी ते शिजवून त्यात चवीसाठी बिन्स टाकते."

त्या सांगतात, "त्या कोंबड्यांची सोललेली चामडी एका पॅनमध्ये विनातेल फ्राय करतात, त्यातून जी चरबी निघते त्यात त्या दुसरं जेवण फ्राय करतात."

कोव्हीड साथीच्या काळात लिंडिनाल्व्हा यांची नोकरी गेली. त्यांचा मुलगाही बेरोजगार आहे.

त्या सांगतात, "काही लोक त्यांना जेवण आणून देतात, तर स्थानिक कॅथलिक चर्च देखील काही मदत देऊ करतं. आणि यांवरच आम्ही जगतोय."

ब्राझीलच्या नेटवर्क फॉर फूड सिक्युरिटीच्या एका नव्या रिपोर्टनुसार, ब्राझील मध्ये 3.3 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट कोसळलंय.

जूनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, देशातील अर्ध्याहून अधिक जनता भीषण अन्न टंचाईचा सामना करते आहे.

लिंडिनाल्व्हा तक्रारीच्या सुरात म्हणतात की, "कधी कधी कसाई हाडं उरली नसल्याचं सांगतो."

त्या सांगतात की, अन्न शिल्लक राहावं म्हणून त्या शक्य तितकं कमी खाण्याचा प्रयत्न करतात.

"कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर आम्ही जिवंत आहोत" असं लिंडिनाल्व्हा सांगतात.

रेड कॅक्टसची फळ खाऊन जिवंत राहिलो...

हिंदी महासागरातील मादागास्कर बेटावर राहणाऱ्या 25 वर्षीय पेफिनियाना सांगतात, "ना पाऊस आहे ना पिकं, ना आमच्याकडे विकण्यासारखं काही आहे. आमच्याकडे तांदूळ विकत घेता येतील इतकेही पैसे नाहीयेत."

पेफिनियानाला दोन मुलं आहेत. त्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आंबोसरी शहरात राहतात.

त्या सांगतात, मागची दोन वर्ष झाली इथं पाऊस पडलेला नाही. यामुळे पिकं जळून गेली. जनावरं आणि माणसं भुकेने तडफडून मेली.

संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टनुसार, या दुष्काळामुळे जवळपास दहा लाखांहून अधिक लोक उपसमारीचा सामना करत आहेत.

नवऱ्यासोबत पाणी विकून त्या आपला चरितार्थ चालवतात.

युनिसेफच्या एका अनुवादकाच्या मदतीने त्या बीबीसीशी संवाद साधतात. त्या सांगतात, "आम्हाला थोडेफार पैसे मिळाले की आम्ही तांदूळ आणि कसावा विकत घेतो. जेव्हा आमच्याकडे काहीच नसतं तेव्हा आम्ही रेड कॅक्टसची फळ खातो. आणि जर ते पण नसेल तर उपाशी झोपतो."

त्या सांगतात, "इथं बहुतेक लोक तरी कॅक्टसची फळंच खातात. ही फळं चिंचेसारखी आंबट असतात."

"जवळपास चार महिने झाले आम्ही हेच खातोय. यामुळे आता माझ्या दोन्ही मुलांना जुलाब सुरू झालेत."

मागच्या वर्षी वर्ल्ड फूड प्रोग्रामने सांगितलं होतं की, साऊथ मादागास्करमध्ये लोक चिंचेचा कोळ आणि पांढरी माती खातायत. याशिवाय ते कॅक्टसची पानं, जंगली कंदमुळं खाऊन त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न करतायत.

कॅक्टसचं हे फळ पेफिनियाना आणि त्यांच्या कुटुंबाला जिवंत तर ठेवतंय पण शरीराला ज्या जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज आहे त्याची पूर्तता यातून होत नाहीये.

इथली बरीच मुलं कुपोषणाला बळी पडली आहेत यात पेफिनियानाचा मुलगा देखील आहे. या मुलांवर उपचार सुरू आहेत.

त्या सांगतात, इथं जरा जरी पाऊस पडला तरी आम्ही शेतात कशाचं ना कशाचं पीक घेऊ. "त्यानंतर आम्हाला बटाटे, कसावा आणि फळं खाता येतील."

त्यानंतर आम्हाला कॅक्टसचं हे फळ खावं लागणार नाही.

वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या मते आता परिस्थिती अशी आहे की अर्ध जग भुकेलं आहे.

सतत सुरू असणारा हिंसक संघर्ष, हवामान बदल, कोव्हीड साथरोगाचा आर्थिक परिणाम आणि वाढती महागाई या सर्व गोष्टींमुळे संकट अधिकच गडद होताना दिसतंय.

डब्ल्यूएफपीच्या 2022 च्या एका रिपोर्टनुसार, "जागतिक आरोग्य कार्यक्रमावर दर महिन्याला 7.36 कोटी डॉलर खर्च होतात. आणि हा खर्च 2019 च्या सरासरी खर्चापेक्षा 44 टक्के जास्त आहे."

"कार्यक्रमाच्या ऑपरेशनवर जे जास्तीचे पैसे खर्च होतात ते कपात करून महिन्याला चाळीस लाख लोकांना अन्न पुरवता येऊ शकतं."

मात्र संघटनेला असं वाटतं की, फक्त पैसे या समस्येवरचं समाधान ठरू शकत नाही. यासाठी हवामान बदल हे मुख्य कारण असून ते थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत या संकटातून सुटका नाही.

रिपोर्टच्या शेवटी जे निष्कर्ष काढण्यात आलेत त्यात असं म्हटलंय की, "भुकेची अनेक कारणं समोर येतंच राहतील."

(या रिपोर्टसाठी फिलिप सुजा यांची मदत मिळाली आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)