दोन वेळा मृत ठरवलं गेलेल्या मुलाला जिवंत परत मिळवणाऱ्या आईच्या संघर्षाची कहाणी

    • Author, चंदनकुमार जजवाड़े
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

आपला मुलगा जिवंत आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा, तीन वेगवेगळ्या कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

तीन न्यायालये, कित्येक पानांचे दस्तऐवज आणि सात वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आपला मुलगा जिवंत असल्याचं आईनं सिद्ध तर केलंच, पण हा विजयही अपूर्ण आहे. कारण या आई आणि मुलाच्या दरम्यान सध्या डीएनए टेस्टचा अडथळा आहे.

हे प्रकरण बिहारमधील गयामध्ये घडलं आहे. मुन्नीदेवी एक अशी आई आहे, जिचा मुलगा तिच्या नजरेसमोर आहे, पण कागदपत्रांनुसार तो गेली अनेक वर्षं मृत आहे.

हे प्रकरण काय आहे?

मुन्नीदेवी यांच्यावर तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. 24 मे 2015 रोजी तिच्या पतीचं शव मिळाल्यानंतर काही तासांच्या आत पोलिसांनी मुन्नीदेवीला अटक केली.

अटकेच्या पाच महिन्यांआधी मुन्नीदेवी यांनी एका मुलाला जन्म दिला होता. या अटकेनंतर पाच महिन्यांचे मूल त्याच्या आईपासून वेगळं झालं.

आठ महिने तुरुंगात काढल्यानंतर जानेवारी 2016 मध्ये मुन्नीदेवीला जामीन मिळाला. त्यानंतर मुन्नीदेवी आपल्या मुलाला ताब्या घेण्यासाठी सासरी गेल्या.

सासरी गेल्यानंतर तिला सांगितले गेले की, त्यांच्या मुलाला डायरिया झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी मुन्नीदेवी यांना सरकारी कागदपत्रांसोबच गावचा प्रमुख आणि सरपंचातर्फे जारी करण्यात आलेला मृत्यूचा दाखलाही दाखविला.

पण त्या आईला मात्र या कागदपत्रांवर विश्वास नव्हता.

संशय खात्रीत बदलला

मुन्नीदेवी यांना त्याच घरात एक मूल खेळताना दिसलं. त्याचं वयही मुन्नीदेवी यांच्या मुलाइतकेच होतं.

मुन्नीदेवींनी बीबीसीला सांगितलं, "जेव्हा मी त्या मुलाला खेळताना पाहिलं तेव्हा माझं मन मला म्हणालं की, तो माझाच मुलाग आहे. तो माझ्यापासून वेगळा झाला होता तेव्हा तो पाच महिन्यांचा होता आणि आता त्याचं वय सात वर्षं आहे. त्यानंतर काही गावकऱ्यांनी आणि एका चुलत दीराने मला सांगितलं की, तो माझाच मुलगा आहे."

एका बाजूला सरकारी कागदपत्रं, संपूर्ण गाव, सासर आणि दुसऱ्या बाजूला एकट्या मुन्नीदेवी

मुन्नीदेवी लपूनछपून आपल्या सासरच्या माणसांवर नजर ठेवू लागल्या आणि तिथे घराबाहेर खेळणाऱ्या एका मुलावर विशेष लक्ष ठेवू लागल्या.

त्यानंतर 2017 मध्ये मुन्नीदेवींनी, आपला मुलगा परत मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली.

मुन्नीदेवींनी अपहरणाचा आरोप करत आपल्या सासरच्या माणसांवरही खटला दाखल केला होता. पण जिल्हा न्यायालयाने तिच्या सासरच्या माणसांना जामीन दिला.

एकाच मुलाला दोन वेळा मृत घोषित केले

या चौकशीतून एक चांगली गोष्ट झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांच्या चौकशीत एका पोलिसाने अहवाल दिला की, काही गावकऱ्यांच्या मते मुलगा जिवंत आहे तर काहींच्या मते मुलाचा मृत्यू झाला आहे.

याच वेळी मुन्नीदेवींना आशेचे किरण दिसू लागले. या पूर्ण प्रकरणात पुढील चौकशी एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने केली.

काही दिवसांपूर्वी जे प्रकरण मुन्नीदेवींच्या बाजूने वाटत होतं, नवीन पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी अहवालाने त्याला पूर्ण कलाटणी दिली.

दुसऱ्या चौकशीनंतर पोलिसांनी मुन्नीदेवींच्या मलाच्या मृत्यूचा अहवाल दिला. म्हणजे सरकारच्या माध्यमातूनही एकदा मुलाला जिवंत म्हटलं गेलं, त्यानंतर मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर मुन्नीदेवी पूर्ण खचून गेल्या.

हे प्रकरण कुटुंब न्यायालयात गेले

पण आई ही आई असते. मुलगा समोर आहे आणि त्याला कुशीत घेता येत नसेल तर मनाला यातना होणारच.

2019 मध्ये मुन्नीदेवींनी आपल्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या वेळी हे प्रकरण कुटुंब न्यायालयात गेलं. त्यांच्याकडे मर्यादित अधिकार होते.

गया एसएसपीतर्फे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने सांगितले की, मूल जिवंत आहे.

पण या प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण लागलं.

त्यानंतर न्यायालयाने मुलाला समोर आणण्याचा आदेश दिला तर दुसऱ्या उपनिरीक्षकाने मुलाचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

कुटुंब न्यायालयाने मुलाच्या मृत्यूचा अहवाल पाहून हे प्रकरण पुढे नेण्यास नकार दिला.

एकच मूल, ज्याचा दोन वेळा मृत्यू झाला आहे, ते पुन्हा दोन वेळा पोलिसांच्या चौकशीत जिवंत कसे असू शकते?

हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने या पूर्ण प्रकरणाबद्दल गयाच्या एसएसपी हरप्रीत कौर यांच्याशी चर्चा केली.

हरप्रीत कौर यांनी या पूर्ण प्रकरणात पोलिसांची बाजू मांडली.

क्यूआरकोडने उलगडले रहस्य

गयाच्या एसएसपी हरप्रीत कौर यांनी बीबीसीला सांगितले, "आमच्याकडे पटणा महानगरपालिकेने जारी केलेला मृत्यूचा दाखला होता. यावर क्यूआर कोडही लावलेला होता. या व्यतिरिक्त प्रमुख आणि सरपंचाने जारी केलेला मृत्यूचा दाखलासुद्धा होता.

त्यानंतर बीबीसीने मुन्नीदेवींच्या गावातील तत्कालीन (2016) ग्रामप्रमुखांना विचारणा केली. त्यावेळी इंदूदेवी या ग्रामप्रमुख होत्या. बीबीसीने फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांचे पती अजित यांनी बीबीसीला सांगितले, "मुन्नीदेवींच्या सासरच्या माणसांनी मुलाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी मुंडण केलं होतं आणि 100 हून अधिक लोकांसह आमच्याकडे आले होते. मुलाचा मृत्यू झाल आहे, अशी साक्ष सर्वांनी त्यावेळी दिली होती.

अजितनुसार, "आता आम्हाला समजले की, मुन्नीदेवींचे सासरे या मुलाला घेऊन रांचीला गेले होते."

गावचे प्रमुख आणि सरपंचांच्या लेटरहेडवरच मुलाच्या मृत्यूचा दाखला करण्यात आला होता.

कुटुंब न्यायालयाकडून आपल्या बाजूने निकाल न लागल्यामुळे आपल्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी आणि सासरच्या माणसांना मिळालेल्या जामीनाविरुद्ध मुन्नीदेवी पाटणा उच्च न्यायालयात पोहोचल्या.

आपले वकील अविनाश कुमार सिंह यांच्या मदतीने मुन्नीदेवींनी हेबियस कॉर्पस अंतर्गत एक याचिका दाखल केली. म्हणजे एखाद्याला बळजबरीने कैदेत ठेवल्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली.

मुन्नीदेवी यांचे वकील अविनाश कुमार सिंह यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला.

अविनाश कुमार म्हणाले, "मुन्नीदेवींना आधीपासूनच सासरच्या माणसांवर संशय होता. सासरच्या माणसांनी पहिले पतीच्या हत्येच्या खोट्या आरोपावरून मुन्नीदेवी यांना तुरुंगात पाठवलं आणि मग मुलाच्या मृत्यूचं कारण पुढे केलं, जेणेकरून संपत्तीमधील वाटा द्यावा लागू नये. जेव्हा या पूर्ण प्रकरणाचा एक एक बिंदू जोडला गेला तेव्हा संपूर्ण प्रकरण आम्हाला नीट समजलं."

अविनाश कुमार यांनी सांगितले की, जातीमधील लोक आणि गाव सासरच्या माणसांच्या बाजूने असल्यामुळे मुन्नीदेवी खूप धाडस करू शकल्या नाहीत.

अविनाश कुमार यांनी पुढे सांगितलं, "आमच्यासमोर समस्या होती की, मृत्यूचा दाखला पाटणा महानगरपालिकेने जारी केला होता. पण हा दाखला मला संशयास्पद वाटत होता. मी तिथे संपर्क साधल्यावर मला सांगितले गेले की, अशा प्रकारची माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेरील आहे. त्यामुळे मला माहिती मिळू शकत नाही. पण मुन्नीदेवींना अशा प्रकारे हताश होताना पाहून माझ्याच्याने राहावलं गेलं नाही. मी वैयक्तिक पातळीवर चौकशी सुरू केली."

महापालिकेतील एका ओळखीच्या अधिकाऱ्याने अविनाश कुमारला सांगितले की, मृत्यूचा हा दाखला बनावट आहे, असं दिसत आहे.

अविनाश कुमारने याच माहितीच्या आधारे पुढे आपला शोध सुरू ठेवला.

देशातील प्रत्येक जन्म आणि मृत्यूची माहिती crsorgi.gov.in या सिव्हिल रिजिस्ट्री सिस्टिमच्या वेबसाइटवर असते.

अविनाश कुमार यांनी सांगितलं, "जेव्हा मी दाखल्याचा क्यूआर कोड स्कॅन केला तेव्हा मी त्या वेबसाइटवर पोहोचलो. तेथे हा दाखला होता. पीएमसीचे अधिकारी तर हा दाखला बनावट असल्याचे सागत होते. पण तो दाखला वेबसाइटवर पाहून मी निराश झालो."

पण जेव्हा ती वेबसाइट नीट पाहिली तेव्हा त्यांना समजले की, वेबसाइटच बनावट होती.

"क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ते अविनाश कुमार सिव्हिल रिजस्ट्रीच्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या वेबसाइटवर पोहोचले होते. कुणीतरी असे एक बनावट वेब पेज तयार केलं होतं.

ही माहिती मिळाल्यावर अविनाश कुमार यांना थोडा धीर आला.

8 सप्टेंबर 2022 रोजी या प्रकरणातील सुनावणी झाली.

मुन्नीदेवी आपले वकिल अविनाश कुमार यांच्यासोबत सगळी माहिती घेऊन पाटणा उच्च न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभ्या राहिल्या.

पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणात पाटणा महापालिका आयुक्त, गया आणि पाटण्याचे एसएसपी यांना 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं.

न्यायालयाने या दिवशी 48 तासांच्या आता मुलाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मुलाला 16 तासांमध्येच ताब्यात घेण्यात आले.

आता गावकऱ्यांच्या मतेसुद्धा हा मुलगा मुन्नीदेवी यांचाच आहे.

तिकडे, गया येथील मगध मेडिकल पोलीस ठाण्याने धोकेबाजी, दस्तावेजांची छेडछाड अशा प्रकरणांमध्ये मुन्नीदेवीच्या सासऱ्याला अटक केली आहे. मुन्नीदेवीचा दीर (पतीचा मोठा भाऊ) फरार आहे.

गयाच्या एसएसपी हरप्रीत कौर यांनी बीबीसीला सांगितलं, "न्यायालयाच्या आदेशावरून मुलाला चाइल्ड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल केली जात आहे. तूर्तास, आम्ही मुन्नीदेवी यांच्या फरार दीराचा शोध घेत आहोत, जेणेकरून अशा प्रकारचे बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळीची माहिती समजू शकेल."

मुन्नी देवी यांच्या वकिलानुसार आता या मुलाची वैद्यकीय आधारावर खात्री करण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. तब्बल सात वर्षांनंतर एका आईला तिचा मुलगा मिळू शकेल, अशी आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)