You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'रात्रीचं जेवण मिळावं म्हणून मला तुरुंगात राहू देता का?'
- Author, लिअनार्डो माचेडो
- Role, बीबीसी ब्राझील
मिना जेराइसमधील न्यायालयात एक खटला सुरू होता. 5 जुलै रोजी या खटल्यातील कैदी तुरुंगातून सुटणार होता. त्याने न्यायालयाला एक अजब विनंती केली.
तो म्हणाला, "मी इथून निघून जाण्यापूर्वी की तास इथे थांबू शकतो का? मी रात्रीचे जेवण करेन आणि मग निघून जाईन. म्हणजे मला रस्त्यावर जेवणाच्या शोधात भटकावे लागणार नाही. माझे शरीर खूपच अशक्त झाले आहे."
या खटल्यातील वकील ल्युसिआनो सॉटेरो सॅन्टिअॅगो यांनी केलेल्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. ब्राझीलमधील गरीबी, वाढती भूक आणि फौजदारी न्यायप्रणाली यातील संबंधांवर वकील आणि फिर्यादींनी वादाला तोंड फोडले.
दुसरीकडे, काहींच्या मते या बातमीतून ब्राझीलमधील आर्थिक संकट आणि ब्राझीलमधील वाढती गरीबी दिसून येते.
अन्न आणि पोषण सार्वभौमत्व व सुरक्षितता या विषयावर ब्राझिलियन संशोधन नेटवर्कने कोरोना महासाथीच्या संदर्भात अन्न असुरक्षिततेबद्दल करण्यात आलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील 3 कोटी 30 लाख लोकांना दररोज आपले पोट भरण्यासाठी अन्न मिळत नाही.
त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर देण्यात येणारा तुरुंगवास व न्याययंत्रणेवरही टीका होत होती. या दृष्टिकोनातून या दोन्ही यंत्रणा हिंसा व गरिबीचे गुन्हेगारीकरण होण्याला चालना देतात, असे मत व्यक्त होत होते. एका युजरने न्यायाधीश, फिर्यादी व वकील यांचा पगार वर्षाला 20 हजार डॉलरहून अधिक असल्याचा उल्लेख केला.
हिंसात्मक गुन्हा केलेल्या व्यक्तीची सुटका केल्याबद्दलही काही लोकांनी ताशेरे ओढले. सॉटेरो यांनी रात्रीच्या जेवणासाठी त्या तरुणाला आपल्या घरी घेऊन जावे, असाही खोचक सल्ला लोकांनी त्यांना दिला.
"मी गेली अनेक वर्षे या पेशात आहे आणि मी अनेक खटल्यांसाठी उपस्थित राहिलो आहे. पण या बातमीने मला अचंबित केले. सामान्यपणे लोकांना तुरुंगातून पळून जायचे असते. पण हा तरुण अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या भुकेबद्दल बोलला. त्यामुळे या सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला." असे या सुटकेची विनंती करणारे वकील सॉटेरो सँटिअॅगो म्हणाले.
न्यायाधीश एलिन फ्रेटास यांनी विनंती मान्य केली आणि त्या म्हणाल्या की, "तुरुंगातून बाहेर पडण्याच्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत हा तरुण रात्रीच्या जेवणासाठी तुरुंगात राहू शकतो."
ज्यो (नाव बदलले आहे) हा गवंडीकाम करणारा कामगार होता. त्याचे वय 20 आहे. 4 जून रोजी चाकूचा धाक दाखवून मोबाइल फोन चोरण्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याने पोलीस ठाण्यामध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या रिपोर्टनुसार पीडित असलेली 22 वर्षांची विद्यार्थिनी म्हणाली की, ती बसमधून खाली उतरल्यावर ज्यो तिच्याजवळ आला. "त्याने चाकूचा धाक दाखवला. मोबाइल फोन घेतला, चाकू खाली पडला आणि तो पळून गेला." त्यानंतर काही मिनिटांनी या तरुणाला अटक करण्यात आली आणि पीडितेने पोलीस ठाण्यात आरोपीला ओळखले. मोबाइल फोन तिला परत करण्यात आला.
आरोपी तुरुंगात जाणार की नाही, हे कोठडी सुनावणीमध्ये ठरत असते. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी आरोपीचे वकील सॉटेरो आणि बचावपक्षाचे वकील मिरेल मोरातो गॉन्झागा यांच्या विनंतीवरून त्याला सोडून देण्याचा निकाल दिला. न्यायाधीशांने असे मत नोंदविले की, "ज्यो इलेक्ट्रॉनिक अँकलेट वापरतो आणि तो पीडितेकडे गेला नाही. पण ज्योवर गुन्हेगारी खटल्यांतर्गत सुनावणी होईल. त्यात तो दोषी ठरला तर त्याला तुरुंगात जावे लागेल."
सॉटेरो म्हणतात, "त्याचा हा पहिलाच गुन्हा होता आणि त्याने गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली. या पूर्वी त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले जाणे हे केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्ये वापरले जावे," असे त्यांनी सांगितले.
या सुनावणीत ज्योने असेही सांगितले की, "तो झोपेच्या गोळ्या घेत असे. कारण त्याला रात्री अस्वस्थ वाटत असे. अर्थात त्याने कधीही मानसोपचारतज्ज्ञाची भेट घेतलेली नसल्याने त्याच्याकडे या गोळ्यांसाठीचे प्रिस्क्रिप्शन नव्हते. त्यानंतर न्यायाधीशांनी सँटा लुझिया सिटी हॉलला प्रत्र पाठवले आणि या तरुणाची वैद्यकीय काळजी घेण्याची आणि त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले.
आपली सुटका होणार आहे, असे ज्योला समजले तेव्हा त्याने तुरुंगात अधिक काळ राहण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून त्याला जेवण मिळू शकेल. "मी इथून बसने बाहेर जाणार आहे. मला रात्रीचे जेवण हवे आहे," असे तो म्हणाला.
बचावपक्षाचे विकील मिरेल मोरातो गोन्झागा म्हणतात की, त्याचा मागणीमुळे सर्वांनाच धक्का बसला. "त्याला त्या क्षणी सुटका करवून घ्यायची नव्हती. भूक ही त्याची सर्वांत मोठी समस्या होती. त्याला रात्री काहीतरी खायला हवे होते."
न्यायाधीश एलेन फ्रिटास यांनी त्याला हमी दिली की, सुटकेच्या औपचारिकता पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे त्याला तुरुंगातच रात्रीचे जेवण मिळेल.
तो तरुण म्हणाला की, तो आपल्या वडिलांसह सँटा लुझियाच्या सीमेवरील भागात राहतो. तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. तो बेरोजगार होता आणि त्याचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेले नाही. तो गवंड्याचा मदतनीस म्हणून काम करतो. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याच्याशी बोलणे टाळले.
फिर्यादी ल्युसियानो सॉतेरो यांच्यानुसार," ज्यो चे उदाहरण हे अन्न, आरोग्य व शिक्षण या मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या गरीबांचे द्योतक आहे."
"अनेकदा एखाद्या व्यक्तीला अटक झाली तरच त्याला डॉक्टरकडे जाण्याची संधी मिळू शकते किंवा शाळेत जाता येतं. पण आज अशी परिस्थिती ओढवली आहे की, एखाद्या व्यक्तीला जेवायचे असेल तरी तिला तुरुंगात येण्यावाचून पर्याय नाही.", असे मिना जेराइसच्या फिर्यादींच्या कार्यालयात गेली 11 वर्षे काम करत असलेले सॉटेरो म्हणाले.
"पीडित व्यक्तींचे दुःख कमी करण्याविषयी नाही तर मी स्वतःला विचारतो : दरोडा घालणे वाईट की आयुष्यात अन्न, आरोग्य व सार्वजनिक शिक्षणाची संधी नसणे वाईट? चोरी हा गुन्हा आहे आणि इतर परिस्थिती हा गुन्हा नाही, हाच फरक आहे.", असे ते म्हणतात.
यूएसपीमधील गुन्हा व गुन्हेगार याच्या शास्त्राचे प्राध्यापक मॉरिशिओ डाएटर यांच्यासाठी हे प्रकरण म्हणजे गुन्हेगारी कायद्याच्या किमान पात्रता तत्वाशी म्हणजे तुरुंगातील परिस्थिती बाहेरील परिस्थितीपेक्षा वाईट आहे, या गृहितकाशी विसंगत आहे.
"जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक होते, तेव्हा ती व्यक्ती मुक्त असतानाच्या आयुष्यापेक्षा तुरुंगातील आयुष्य बिकट असेल अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असते. तिथूनच तुरुंगवासाची संकल्पना सुरू होते. पण आपल्या समाजातील परिस्थिती याचा विपरित आहे. ब्राझीलमध्ये तुरुंगाच्या आत असलेल्या व्यक्तीला जेवण मिळते, पण बाहेर असलेल्या व्यक्तीला नाही," असे ते म्हणतात.
दुसरीकडे सॉटेरो यांना वाटते की, या तरुणाला तुरुंगात डांबणे हे "त्याचे आयुष्य संपविण्यासारखे" आहे.
"समाजात मध्यम व कनिष्ठ वर्गातील दरोडेखोर आहेत. त्यांना समाजापासून वेगळे केले पाहिजे. पण जेव्हा तुम्ही वंचित, कोणतीही संधी नसलेल्या तरुणाला तुरुंगात डांबता तेव्हा त्याचे काय होईल? प्रचंड गर्दी असलेल्या तुरुंगात तो असेल, तेथील परिस्थिती किमान गरजा भागविणारी असेल, गटांद्वारे नियंत्रित असेल. तुम्हाला शोषण सहन करायचे नसेल, स्वतःचे रक्षण करायचे असेल तर तुम्हाला त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि तुम्हाला त्यांच्या ऋणात राहावे लागेल. अशा प्रकारे अधिक गंभीर गुन्हे करण्याकडे तुमचा कल झुकू लागेल.", असे ते म्हणतात.
ब्राझीलच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवर अशीही टीका होते की, तुरुंगवास आणि गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अलीकडील दशकांमध्ये वाढले असले तरी गुन्हेगारीचा दर मात्र घटलेला नाही. हिंसेला प्रतिसाद म्हणून पोलिस यंत्रणा कठोर करणे, शिक्षा अधिक तीव्र करणे हा संदेश देणारा समाज, राजकारणी, खासदार आणि न्यायव्यवस्था यांच्या तत्वाच्या विरुद्ध परिस्थिती आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ जस्टिस (सीएनजे) या संस्थेच्या आकडेवारीनुसार 2005 मध्ये ब्राझीलमध्ये 2,96,916 कैदी होते. 2020 मध्ये 9,19,651 कैदी होते. म्हणजेच कैद्यांच्या संख्येत तब्बल 209% वाढ झालेली होती. पण या यंत्रणेतील एकूण रोजगार हे 4,42,000 म्हणजे कैद्यांच्या संख्येच्या निम्मे होते.
या कालावधीत हत्यांचे प्रमाण एकाच पातळीवर राहिले. दर वर्षी सरासरी 51,000 हत्या होतात. 2017 मध्ये ब्राझीलने हत्यांचा ऐतिहासिक विक्रम मोडला. अॅटलस ऑफ व्हायोलन्सनुसार त्या वर्षी 65,602 हत्या झाल्या.
अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भातही अनेक दोषी ठरले. त्याचप्रमाणे ही बेकायदेशीर बाजारपेठेत हाताळणाऱ्यांचे बळ व संख्या या दोन्हीमध्ये वाढ झाली. नॅशनल सर्व्हे ऑफ पेनिटेन्शरी इन्फॉर्मेशननुसार 2005 मध्ये 14% कैद्यांना अमली पदार्थांच्या तस्करीसाठी दौषी ठरविण्यात आले होते. 2019 मध्ये महिला कैद्यांपैकी 27.4% कैदी अमली पदार्थांची तस्करी करणारे होते. महिला कैद्यांपैकी हे प्रमाण 54.9% होते.
दंड संहितेत देशात होणाऱ्या एक हजाराहून अधिक गुन्ह्यांविषयी तपशील दिला असला तरी त्यापैकी फक्त तीन गुन्ह्यांचे प्रमाण 71% आहे. अमली पदार्थांची तस्करी, चोरी व दरोडा. हत्येसारख्या व्यक्तीशी संबंधित गुन्ह्याचे प्रमाण 11.3% इतके आहे.
"चोरी, दरोडा व तस्करी रस्त्यांवर होते, पोलीस त्यांना चौकशी न करताच रंगेहाथ अटक करतात आणि न्यायव्यवस्था अत्यंत ठिसूळ पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी ठरवते. अशा परिस्थितीत कोणाला अटक होते? त्या परिस्थितीत असणाऱ्या गरीब व्यक्तीला. या परिसरात आधुनिक बंदुकांसह गस्त घालणाऱ्या पोलिसांवरून काय दिसून येते? 'अमलीपदार्थांच्या तस्करीविरुद्ध लढा'. अटक झालेल्या बहुतेक व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या श्रीमंत व्यक्ती नव्हत्या. या गरीब व्यक्ती होत्या, ज्या त्यांच्यासाठी किरकोळ कामे करीत होत्या," असे डाएटर म्हणाले.
त्यांच्यानुसार मोठ्या प्रमाणावर तुरुंगवास होणे हा योगायोग नाही, सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे. "आपल्याकडे कैद्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यापैकी बहुतेक जण गरीब आहेत, कृष्णवर्णीय आहेत आणि अर्ध-साक्षर आहेत, हा योगायोग नाही. ही यंत्रणाच तशी आहे आणि अशा परिस्थितीचा परिणामही अपेक्षेप्रमाणेच आहे.", असे ते म्हणतात.
या संदर्भात, बचावकर्ते आणि गुन्हेगार अनेकदा चोरीच्या शिक्षेची तुलना कर आकारणीच्या गुन्ह्यांशी करतात. एखाद्याने अन्नधान्य चोरले तर त्यांना अटक होते आणि तुरुंगवास होतो. पण जे 20 ब्राझीलियन रीलपर्यंत करचुकवेगिरी करतात त्यांच्यावर साधा खटलाही भरला जात नाही.
"कोणत्याही गरीबाकडून 20 हजार ब्राझीलियन रील कर चुकवला जाणार नाही. ब्राझीलमध्ये कर कोणाला देय असतो? ब्राझीलमधील श्रीमंत व्यक्ती कर भरतात. पण एखाद्याने आपल्या मुलासाठी मांसाचा तुकडा चोरला तर तो गुन्हा ठरतो.", असे सॉटेरो म्हणतात.
गवंडीकाम करणारा ज्यो हा बहुतांश कैद्यांचे प्रतिनिधीत्व करतो. ब्राझिलिअन पब्लिक सिक्युरिटी इयरबुकनुसार कनिष्ठ स्तरातील तीन पैकी दोन व्यक्ती कृष्णवर्णीय आहेत. त्यांच्यापैकी केवळ 51% व्यक्तींनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांच्यापैकी 62.3% व्यक्ती 18 ते 34 या वयोगटातील आहेत.
या लोकांचा न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांच्या अगदी विरुद्ध असलेली ही प्रोफाइल आहे.
2018 साली करण्यात आलेल्या सीएनजे सर्वेक्षणात 11,000 प्रोफेशनल्सनी सहभाग घेतला. त्यांच्यापैकी 80% व्यक्ती गौरवर्णीय होत्या आणि 18% व्यक्ती कृष्णवर्णीय होत्या. त्यांच्यापैकी बहुतेक व्यक्ती (62%) पुरुष होत्या आणि श्रीमंत घरातील होत्या. 51% व्यक्तींचे वडील उच्चशिक्षित होते. 42% व्यक्तींच्या आईचेही तेवढेच शिक्षण झाले होते. एक पंचमांश दंडाधिकाऱ्यांच्या पालकांचे करिअर याच पेशामध्ये होते.
"न्यायव्यवस्था आणि खासदारांमध्ये गौरवर्णीय पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. महिला विशेषतः कृष्णवर्णीय महिलांचे प्रतिनिधीत्व नगण्या आहे. याचे प्रतिबिंब निश्चितच निकालांमध्ये दिसून येते. न्यायाधीश त्यांच्या मूल्यांच्या आधारे निर्णय देतात.", असे व्हिक्टिम स्टॅच्युटच्या निर्मात्या सेलेस्ट लिट दॉस सॅन्तोस म्हणतात. या कायद्यासंदर्भात अजूनही काँग्रेसमध्ये मतदान व्हायचे आहे. गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन सुनिश्चित करणे आहे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
सॉटेरोंसाठी कायदा राबविणाऱ्यांना देशातील वस्तुस्थितीची जाणीवच नसते. "फिर्यादी व न्यायाधीशांना सरासरीहून खूप जास्त पगार मिळतो. ते इम्पोर्टेड कारमधून प्रवास करतात. संरक्षित वसाहतींमध्ये राहतात. न्यायालयात त्यांच्यासाठी खासगी उद्वाहन असते, वातानुकूलित कार्यालय असते, कॉफी हजर असते. न्याय हे समाजाचे चित्र असते : वर्णद्वेषी, वर्गद्वेषी, पूर्वग्रहदूषित. जर यंत्रणा केवळ शिक्षेवर भर देते, हक्कांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे या यंत्रणेत गरीबांचे पिळवणूक होते."
यूएसपीमधील मॉरिसिओ डाएटर यांची धारणा आहे की, ही परिस्थिती बदलण्यासाठी न्याययंत्रणेची आणि खासदारांची प्रोफाइल बदलणे पुरेसे नाही.
"मला वाटते की, कमी लोकांना दोषी ठरवले जावे, किमान खटले चालावेत आणि कमी प्रमाणाता तुरुंगवास भोगावा लागावा. कारण मोठ्या संख्येने कैदी तुरुंगात असण्याचे कारण हे त्यांनी केलेला गुन्हा नसू, ते जसे आहेत ते आहे. न्याय हा उपाय नाही तर तो समस्येचा एक भाग आहे,"असे ते म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)