व्यापार-उद्योगासाठी अनुकूल असणारे जगातील टॉप 10 देश, भारत कितव्या स्थानावर?

फोटो स्रोत, DEA / M. BORCHI/DE AGOSTINI VIA GETTY IMAGES
'इज ऑफ डुईंग बिजनेस' किंवा व्यापार-उद्योगाला अनुकूल असणाऱ्या, पोषक असणाऱ्या देशांना किंवा राज्यानांच गुंतवणूकदारांची पसंती असते. इज ऑफ डुईंग बिजनेस जितकं चांगलं तितकी गुंतवणूक येण्याचा ओघ जास्त असं समीकरण ठरलेलं असतं.
इकॉनॉमिस्ट इंटलिजन्स युनिट (EIU) ने व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वांत अनुकूल देशांची यादी जाहीर केली आहे.
व्यवसाय-व्यापाराशी संबंधित बातम्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या द इकॉनॉमिस्ट ग्रुपच्या संशोधन विभागाने हा अहवाल दिला आहे. या अहवालानुसार व्यवसाय-व्यापार करण्यासंदर्भात अर्जेंटिनाच्या स्थानात सुधारणा झाली आहे. तर चिली देशाच्या स्थानात मोठी घसरण झाली आहे.
या यादीमध्ये भारत 51 व्या स्थानावर आहे.
EIUच्या या यादीमध्ये त्या देशांचा समावेश आहे जे मोठ्या गुंतवणुकदारांना विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वांत उत्तम संधी देतात. या देशांमध्ये गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे.
यादीतील देशांचे स्थान निश्चित करण्यासाठी त्या देशांमधील व्यापक आर्थिक स्थैर्य, राजकीय स्थिती, बाजारपेठेतील संधी, व्यवसाय-व्यापारासंदर्भातील अडथळे किंवा निर्बंध आणि कर व्यवस्था या घटकांचा विचार करण्यात आला आहे.
दक्षिण अमेरिकेतील EIUचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ निकोलस सालदिया म्हणतात, ''आम्ही या गोष्टीचा अंदाज घेतो की आगामी पाच वर्षांमध्ये काय होण्याची शक्यता आहे.''
बिझनेससाठी जगातील टॉप 10 देश
- सिंगापूर
- डेन्मार्क
- अमेरिका
- जर्मनी
- स्वित्झर्लंड
- कॅनडा
- स्वीडन
- न्यूझीलॅंड
- हॉंगकॉंग
- फिनलॅंड
हा अभ्यास करण्यासाठी एकूण 91 निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषांना 11 श्रेणींमध्ये विभागण्यात आलं होतं. याच आधारावर अभ्यासकांनी 82 देशांची एक यादी तयार केली आहे.
निकोलस म्हणतात, ''या विश्लेषणात आम्ही राजकीय अस्थैर्याचा धोका यासारख्या निकषाला देखील स्थान दिलं आहे. कारण एखाद्या देशातील व्यवसाय-व्यापारावर याचा देखील परिणाम होतो.''
EIUच्या अहवालानुसार यादीमध्ये सिंगापूर, डेन्मार्क आणि अमेरिका अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. आगामी काळात हे देश सर्वाधिक गुंतवणूक मिळवू शकतात. यादीमध्ये यानंतरच्या स्थानावर जर्मनी आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत.
सिंगापूरचं यश
आग्नेय आशियातील एक छोटासा देश या यादीत सर्वांत अव्वल स्थानावर का आहे?
60 लाख लोकसंख्या असणारा सिंगापूर गुंतवणुकदारांसाठी स्वर्ग बनला आहे. यामागचं कारण व्यापारासंदर्भातील खुलं धोरण, बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर बदल करणं, राजकीय स्थैर्य आणि कमी प्रमाणातील भ्रष्टाचार.

फोटो स्रोत, Bbc
तंत्रज्ञान, उत्पादन आणि वित्तीय सेवांच्या क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला सिंगापूर प्रोत्साहन देतं. त्याचबरोबर इथं फारच कमी कर आकारला जातो आणि हा देश व्यापारात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
हा छोटासा देश तेथील कंपन्यांना प्रोत्साहन तर देतोच, त्याचबरोबर आर्थिक बाबींना चालना देण्यासाठी सिंगापूरनं बंदर, विमानतळ, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतदेखील मोठी गुंतवणूक केली आहे.
सागरी मार्गानं होणाऱ्या व्यापाराचंदेखील सिंगापूर हा देश मोठं केंद्र आहे. या देशातील अत्यंत कुशल कामगार बड्या गुंतवणूकदारांना आकर्षून घेतात.
अर्जेंटिनामध्ये बदलांचे वारे
EIUच्या अहवालात व्यापारासाठी सर्वोत्तम 10 देशांव्यतिरिक्त आणखी एक यादीदेखील देण्यात आली आहे.
या यादीमध्ये देशांचा समावेश क्रमवारीच्या आधारावर करण्यात आलेला नाही. तर ज्या देशांमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे आणि आगामी काळात जे देश सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करू शकतात अशा देशांची नावं आहेत.
या यादीमध्ये सर्वांत पहिलं नाव ग्रीस (जागतिक क्रमवारीत 34 वा क्रमांक) या देशाचं आहे. यानंतर अर्जेंटिना (54 वा क्रमांक), भारत (51 वा क्रमांक), अंगोला (78 वा क्रमांक) आणि कतार (26वा क्रमांक) या देशांचं नाव आहे.
झेवियर माइली यांची अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या देशाच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे आणि हा देश ग्रीसनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये इथे मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक होण्याची मोठी शक्यता दिसते आहे.

फोटो स्रोत, getty images
निकोलस म्हणतात, ''आम्हाला वाटतं की आगामी वर्षांमध्ये इथलं सरकार व्यापारासाठी नकारात्मक असणाऱ्या धोरणांमध्ये बदल करून पोषक वातावरण तयार करेल.''
यामध्ये विशेषकरून खाण आणि ऊर्जा क्षेत्रात व्यापाराचं उदारीकरण, चलनावरील सरकारी नियंत्रण हटवणं आणि परकी गुंतवणूक वाढवणे या गोष्टींचा समावेश आहे.
EIUने आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडेही लक्ष दिलं आहे. तो म्हणजे मूल्य नियंत्रणाच्या बाबतीतदेखील सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यावर माइली सरकारचा भर आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.
मात्र अर्जेंटिना सरकार आता या सुधारणा लागू करण्यास सुरूवात करते आहे आणि यामध्ये सरकारला कॉंग्रेस ट्रेड युनियनकडून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
द इकॉनॉमिस्ट म्हणतं की ''अजून तिथं सुधारणेला मोठा वाव आहे.''
आणखी एका देशाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे, तो देश म्हणझे डोमिनियन रिपब्लिक.
निकोलस म्हणतात की हा देश राजकीयदृष्ट्या दक्षिण अमेरिकेत सर्वांत स्थिर समजला जातो. हा देश सातत्याने आर्थिक विकासाकडे वाटचाल करतो आहे.
त्याचबरोबर त्याचं म्हणणं आहे की 'डोमिनिकन रिपब्लिक'कडे बाजारपेठेतील मर्यादित संधी आहेत. शिवाय इथं पाय घट्ट रोवणं खूपच अवघड आहे कारण ही एक छोटी अर्थव्यवस्था आहे.
अर्थात जाणकारांच्या मते या देशाच्या अर्थव्यवस्थेत सातत्याने प्रगती होते आहे.
भारताला तरुण लोकसंख्येचा फायदा
EIUच्या अहवालानुसार गुंतवणुकदार चीनबाहेर इतर देशांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात आणि भारताला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो.
भारत अशी एकमेव बाजारपेठ आहे जिथे चीनच्या तुलनेत व्यापक बाजारपेठेची शक्यता आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे आणि मागणीनुसार कामगारांचा पुरवठा शक्य आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
भारतातील भक्कम आर्थिक धोरणं, डिजिटल पायाभूत सुविधा आणि तरुण लोकसंख्या हे सकारात्मक घटक आहेतच. त्याचबरोबर सरकार उत्पादन क्षेत्रात आणखी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याच्या दिशेने काम करतं आहे.
त्याचबरोबर अहवालात म्हटलं आहे की आगामी काळात कतार आणि भारत हे दोन देश भक्कमपणे पुढील वाटचाल करतील. या देशांमध्ये धोरणात्मक पातळीवर मोठे बदल होऊ शकतात. शिवाय आराखड्यावर आधारित योजनांमध्ये गुंतवणूक आणि बाजारपेठेच्या संधीदेखील वाढतील.
चिली देशाच्या क्रमवारीत घसरण
EIUच्या क्रमवारीत अर्जेंटिनाचा शेजारी देश असलेल्या चिली देश दक्षिण अमेरिकेत सर्वात आघाडीवर आहे.
मात्र चिली देशाच्या क्रमवारीत आठ अंकांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं हा देश या यादीत 22 व्या क्रमांकावरून घसरून 30 व्या क्रमांकावर आला आहे.
निकोलस म्हणतात, ''चिलीमधील सध्याचं गॅब्रिएल बोलिक सरकार अशा धोरणांचा अंगिकार करतं आहे जे व्यापारासाठी पोषक नाहीत.''
लिथियमचं उदाहरण देताना ते सांगतात की सरकारनं जे धोरण बनवलं आहे त्यानुसार या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सरकारबरोबर भागीदारी करणं बंधनकारक आहे.
निकोलस पुढं म्हणतात, गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून ही बाब नकारात्मक आहे.
EIUच्या विश्लेषणानुसार चिली देशाच्या क्रमवारीत घसरण होण्यामागं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे सरकारने इथं कामगारांसाठी असे कायदे बनवले आहेत जे जास्त प्रतिबंधात्मक आहेत.
यामध्ये किमान वेतन वाढवणं आणि कामाचे तास कमी करण्यासारख्या बाबींचा समावेश आहे.

फोटो स्रोत, REUTERS
अर्थतज्ज्ञ म्हणतात की खाण उद्योगाच्या क्षेत्रात परकीय गुंतवणुकदारांवरदेखील निर्बंध लादण्यात आले आहेत.
निकोलस सालदिया म्हणतात, राजकीय स्तरावर चिलीमध्ये वेगाने ध्रुवीकरण होतं आहे. यामुळं तिथं अस्थिरता वाटते आहे. चिलीमध्ये गुंतवणुकीच्या संधी कमी होण्यावर परिणाम करणारं आणखी एक कारण म्हणजे इथं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ही बाब गंभीर झाली आहे.
चिलीबद्दल 'द इकॉनॉमिस्ट'चं म्हणणं आहे की ''लोकांचं अपहरण केलं जातं आहे. देशात संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत आणि त्या देशातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत.''
चिलीसमोर असलेल्या आव्हानांव्यतिरिक्त कर, स्पर्धेची पातळी, वित्तीय बाजारपेठेचा विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास पाहता, व्यापारासाठी चिली देश उत्तम असल्याचं ईआययूने म्हटलं आहे.
इतर भक्कम पावलाबरोबर अभ्यासकांनी देशातील नियामक बॅंकेची स्वायत्तता, संस्थांची मजबुती, न्यायपालिकेची काम करण्याची पद्धत, भ्रष्टाचाराचं कमी प्रमाण आणि व्यापक आर्थिक स्थैर्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचादेखील समावेश केला आहे.

फोटो स्रोत, REUTERS/IVAN ALVARADO
देशाच्या क्रमवारीवर प्रभाव टाकणारं दुसरं कारण म्हणजे इथे खूप स्पष्ट स्वरूपातील गुंतवणूक व्यवस्था आहे.
EIUच्या विश्लेषणात असं देखील म्हटलं आहे की चिली देशाची लोकसंख्या वृद्ध होते आहे. मात्र मोठ्या प्रमाणात परदेशातून विविध प्रकारचं शिक्षण घेतलेले कामगार या देशात येत आहेत. त्यामुळे चिलीमध्ये तरुण कामगारांची फौज तयार होते आहे.
ईआययूच्या क्रमवारीत दक्षिण अमेरिकत दुसऱ्या क्रमांकावर असणारा देश म्हणजे मेक्सिको (जागतिक 45 वा क्रमांक). तर दक्षिण अमेरिकत तिसऱ्या क्रमांकावर असणारा देश आहे कोस्टा रिका (जागतिक 47 वा क्रमांक).
तर फक्त दक्षिण अमेरिकेतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील क्रमवारीत शेवटच्या स्थानावर असणारा देश म्हणजे व्हेनूझुएला.











