3 खोल्याचं घर आणि दीड कोटी रुपये पगार दिला तर या बेटावर शिक्षकाची नोकरी कराल का?

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला महिना 15 हजार पौंड (15 लाख रुपये) दिले तर स्कॉटलंडमधील सगळ्यांत सुंदर जागी नोकरी करायला तयार व्हाल का? (वर्षाला एक कोटी 80 लाख पगार)
युइस्ट आणि बेनबेक्युला येथील हेब्रिडिअन बेटांवर काम करण्यासाठी आकर्षक पगारांची ऑफर देण्यात येत आहे.
रम येथील एका भागात एका नवीन शाळेत प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाच लहान मुलांसाठी एक नवीन शिक्षकही हवा आहे. त्यांना 68 हजार पौंड (अंदाजे 71 लाख) इतका पगार देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात नोकरीची समस्या सोडवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. इथल्या नागरिकांसाठी याचं महत्त्व अचाट आहे.
स्कॉटलँडच्या बेटांवर लोकांना बोलावून त्यांच्या राहण्याची आणि कामाची सोय करावी या उद्देशाने हे करण्यात येत आहे.
“आम्ही कोण येतंय, त्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचं कुटुंब कसं आहे हे पाहत असतो,” असं NHS वेस्टर्न आयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गॉर्डन जेमिसन म्हणाले.
“ज्या व्यक्तींना नोकरी मिळाली आहे त्यांच्या जोडीदारालाही नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा ठिकाणी कोणीही आपल्या चॉईसने येत नाही.”
“आरोग्य क्षेत्रातल्या लोक जेव्हा अशा ठिकाणी नोकरी करतात तेव्हा ती अगदीच छोट्या गावातील नोकरी असते. तिथे फारशा सोयी उपलब्ध नसतात.”
ग्रामीण भागात काम करण्यासाठी डॉक्टरांना 40 टक्के अतिरिक्त पगार देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात काम करणं हे एक प्रकारचं आव्हान आहे, असं त्यांना सांगून तिथे बोलावण्यात येत आहे.
हेब्रिडेसच्या बाह्य भागातील सहा बेटांवर ते काम करतील. इथली लोकसंख्या 4700 आहे. आरोग्य बोर्डाच्या मते युकेच्या सगळ्यांत सुंदर ठिकाणी काम करण्याची ही अतिशय नामी संधी आहे.
ज्या लोकांची निवड होईल त्यांना तिथे शिफ्ट होण्याचे पैसे मिळतीलच पण त्याबरोबरच स्वागत म्हणून 10,000 पौंड (अंदाजे 10 लाख रुपये) इतका पगार मिळणार आहे.
जेमिसन यांनी बीबीसी रेडिओला सांगितलं, “या संधीचं सोनं करणारा एखादा विशेषच व्यक्ती असेल. म्हणूनच आम्हाला त्याला अतिरिक्त मानधन द्यायचं आहे. प्रत्येकालाच जमेल असं हे काम नाही.”
“पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना अशा प्रकारे ग्रामीण भागात अशा प्रकारची सेवा करायची आहे.”
जेमिसन म्हणाले की ग्रामीण भागात काम करण्यासाठी लोक शोधणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे.
पण त्यांना असं वाटतं की पगार हे तिथे काम करण्याचा आणि राहण्यासाठीचं अतिरिक्त मानधन आहे.
“आम्हाला सातत्याने काम करणारे लोक हवेत आणि इथे दीर्घकाळ राहणारे लोक आम्हाला हवेत.”

फोटो स्रोत, BenBecula Medical Practice
हेब्रिडेजच्या आतील भागात, आयल ऑफ रम भागात फक्त 40 लोक राहतात. ते सर्व किनोल्च भागाच्या आसपास राहतात.
रम प्रायमरी स्कुल मध्ये पाच विद्यार्थी आहेत. पाच ते अकरा वयोगटातली ही मुलं आहेत. तीन आणि चार वर्षांची बालवाडीत शिकणारी मुलं आहेत.
हायलँड काऊंसिल तिथल्या मुख्याध्यापकांना 62 हजार पौंड (65 लाख रुपये) इतका पगार देत आहेत. तसंच ग्रामीण भागात काम करण्याचं अतिरिक्त मानधन म्हणून 5500 पौंड अतिरिक्त देत आहेत.
या पदांसाठी काहींनी रस दाखवला आहे पण भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे असं ते म्हणाले.
हा भाग लाल हरणांसाठी ओळखला जातो. नेचरस्कॉट या सरकारी संस्थेनची या जमिनीवर मालकी आहे. चार वर्षांपूर्वी किनलोचमध्ये नवीन घरं बांधली गेली.
आयल ऑफ रम ट्रस्टच्या मते यामुळे तरुण वयातली कुटुंबं इथे रहायला येतील आणि बेटावरील आयुष्याचा आस्वाद घेतील.

फोटो स्रोत, Getty Images
अरंडमुरचन द्विपकल्पातील किलोचन प्रायमरीमध्ये एका शाळेत 15 मुलांसाठी 53,000 पौंड इतक्या पगाराच्या नोकरीची जाहिरात काढली तेव्हा हे समोर आलं.
2022 मध्ये फोला प्राथमिक शाळेने एक जाहिरात काढली. तिथे त्यांनी 62 हजार पौंड पगार, तीन बेडरुमचं घर देऊ केलं. तिथे फक्त 28 लोक राहतात.
स्थानिक प्रशासनाने सांगितलं की शिक्षकांनी तिथे यावं म्हणून तिथे शिफ्ट होण्यासाठी मोठा पगार आणि पॅकेज देण्यात येत आहे. तसंच ही नोकरी कायमची असेल. भाडं आणि प्रवासासाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं.
“मुख्याध्यपकांनाही ग्रामीण भागासाठी अतिरिक्त भत्ता आणि दूरवर काम करण्याचा भत्ता दिला जाणार आहे,” असं तिथल्या प्रवक्त्याने सांगितलं.
“जिथे शक्य आहे तिथे ही कायमची नोकरी असल्याची जाहिरात करण्यात येत आहे. आम्ही आता मुख्याध्यापकांना लीडरशिप ट्रेनिंग देण्याचं पाहतोय. तसंच इतर शिक्षकांच्या विकासासाठी आणि त्यांनी नोकरी सोडून जाऊ नये यासाठी विविध कार्यक्रम घेत आहोत.”











