'ती हिंदू आहे, मी मुस्लिम...त्याने काय फरक पडतो? आमचं एकमेकींवर प्रेम आहे'

- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"ती हिंदू आहे आणि मी मुस्लिम...आम्हाला दोघींनाही या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकींवर प्रेम करतो आणि आम्हाला सोबत राहून जीवनातील प्रत्येक लढाई जिंकायची आहे एवढंच कळतं. कोणाचा धर्म काय याने आम्हाला काही फरक पडत नाही."
ही मतं मालती आणि रुबिना नावाच्या एका समलैंगिक जोडप्याची आहेत. (ओळख लपवण्याच्या उद्देशाने दोघींचीही नावं बदलण्यात आली आहेत.)
या मुली पश्चिम बंगालच्या एका छोट्या खेड्यातल्या आहेत. त्यांनी पळून जाऊन कोलकाता गाठलं.
कॉलेजात जाणाऱ्या मालतीची नजर जेव्हा रुबीनावर पडली, त्याचक्षणी या दोघींच्या प्रेमकथेला सुरुवात झाली.
या दोघीही अकरावीच्या वर्गात एकत्र शिकत होत्या. मालतीने रुबिनाला पाहिलं तेव्हा ती खूप अबोल असायची.
मालती सांगते, "मला खूप आधीपासून मुली आवडत होत्या, पण मला फक्त मुलीच आवडतात हे काही माहीत नव्हतं. मी रुबिनाला माझ्याबाजूने विचारलं. ती मला आवडू लागली होती. आमच्या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि मग प्रकरण पुढे वाढू लागलं."
ती पुढे सांगते "रुबिना खूप शांत शांत असायची, ती बोलत का नाही असं मी तिला बऱ्याचदा विचारलं होतं. पण नंतर हळूहळू ती माझ्याशी अगदी खुलून बोलू लागली."
रुबीना सांगते की यादरम्यान तिची एका मुलाशी मैत्री झाली आणि त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.
रुबिनाने याला नकार दिला आणि त्यांची मैत्री संपली, पण तिच्या घरच्यांना या मुलाविषयी समजलं होतं.
यानंतर जणू तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
रुबिना बोलताना तिचा गळा दाटून आला होता. ती सांगते, "मला टोमणे बसायचे, शिवीगाळ व्हायची, खूप मारलं जायचं. कधीकधी तर मला उपाशी ठेवलं जायचं. मालती माझ्या आयुष्यातील एकमेव मुलगी होती, जिला माझ्या शांत आणि उदास राहण्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं. यातूनच आमच्यात मैत्री आणि नंतर प्रेम फुलू लागलं."
23 वर्षीय रुबिना बीए (हिस्ट्री ऑनर्स) करते तर 22 वर्षांची मालती बीए (बांगला) शिकते आहे.
मालती एनसीसी कॅडेट असून तिला पोलिसात भरती व्हायचं आहे आणि ती त्या दृष्टीने तयारी करते आहे, तर रुबिनाला शिक्षक व्हायचं आहे.
मैत्री नंतर प्रेम

फोटो स्रोत, SOPA IMAGES
रुबिनाला पाहताक्षणी मालती तिच्या प्रेमात पडली.
रुबिनाने हळूहळू तिचं मन मोकळं करायला सुरुवात केली होती.
मालती तिची काळजी घ्यायची, अगदी शांतपणे तिची प्रत्येक गोष्ट तिचं दु:ख ऐकून घ्यायची. मालतीच्या या स्वभावावर रुबिना भाळली होती.
दोघीही वर्गात खूप बोलायच्या, एकमेकींच्या घरी येणं जाणं सुरू झालं. भेटीगाठींमधून अंतर कमी होऊ लागलं आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
रुबिना सांगते, "पहिल्यांदा माझ्या घरच्यांना वाटायचं की मालती मला दुसऱ्या मुलांशी बोलायला आणि भेटायला मदत करते आहे, पण नंतर त्यांना कळलं की मालती आणि मी एकमेकींच्या खूप जवळ आलोय."
"आता आमच्यात काहीतरी सुरू आहे याचा अंदाज माझ्या घरच्यांना येऊ लागला होता. आणि यात मला पुन्हा मारहाण सुरू झाली. मला उपाशी ठेवलं जायचं, लग्नासाठी तगादा सुरू होता. तसं ही आपल्या समाजात मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिचं लग्न लावून दिलं जातं."
ती सांगते, "माझ्या वडिलांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला नाही, पण ते मला मारायचे. माझी आई माझा शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ करायची. एवढंच नाही तर आईच्या कुटुंबातील लोकांकडून ही मला शिवीगाळ, मारहाण होऊ लागली. टोमणे मारले जाऊ लागले.

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN
रुबिना सांगते, "आमच्या दोघींमध्ये काय सुरू आहे असं मला सतत विचारलं जायचं. ते आम्हा दोघींना एकत्र राहू देतील पण आधी आमच्यात काय सुरू आहे हे सांगावं लागेल असं ते म्हणायचे. मी जर त्यांना काही सांगितलं तर माझे आईवडील नक्कीच मला कुठेतरी लांब पाठवतील हे मला कळून चुकलं होतं."
दरम्यान, सोशल मीडियावर आमच्यासारख्या लोकांना पाहिलं आणि ठरवलं की आम्हीही आमच्या इच्छेनुसार जगायला सुरुवात केली पाहिजे. पण गावात असं जगणं शक्य नव्हतं आणि गावात लपून-छपूनच आयुष्य काढावं लागेल.
सध्या या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे
सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली समलैंगिकता गुन्हा नसल्याचं म्हणत याला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढलं.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी म्हणून केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
18 एप्रिलपासून ही सुनावणी सुरू झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात समलिंगी विवाहाला मान्यता देणाऱ्या याचिकेला विरोध केला आहे.
न्यायाधीशांच्या एका गटानेही याचा विरोध केलाय, तर धार्मिक संघटनांनी समलिंगी विवाहाला 'अनैसर्गिक' असल्याचं म्हटलंय.

फोटो स्रोत, NURPHOTO
वैयक्तिक कायद्याच्या क्षेत्रात न जाता, समलिंगी विवाहांना विशेष विवाह कायद्याद्वारे अधिकार देता येतील का, हे पाहणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.
शिवाय न्यायालयाने असंही नमूद केलंय की, अधिकार, त्याच्याशी निगडीत गुंतागुंत आणि सामाजिक परिणाम लक्षात घेता या प्रकरणाचा निर्णय संसदेवर सोपवावा लागेल.
केंद्र सरकारने 3 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटलंय की, LGBTQIA+ जोडप्यांना येणाऱ्या अडचणी पाहण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल.
घरातून पळून जाण्याची योजना
मालती सांगते की, त्या दोघींनीही गाव सोडून शहरात पळून जायचा निर्णय घेतला. सोबतच नोकरीसाठी लागणारी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली.
मालती सांगते, "आम्ही 2021 पासूनच शिष्यवृत्तीचे पैसे गोळा करायला सुरुवात केली आणि तिथल्या एका ट्रान्समॅनची मदत घेतली. यानंतर या व्यक्तीने आम्हाला सेफ फॉर इक्वॅलिटी नावाच्या संस्थेचा संपर्क दिला. या संस्थेने आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आणि त्यामुळे आमचा कोलकात्याला जाण्याचा मार्ग मोकळा झाला."
सेफो फॉर इक्वॅलिटी नावाची संस्था LGBTQI+ समुदायाच्या हक्कांसाठी काम करते.
आता मालती आणि रुबिना या संस्थेच्या आश्रयाखाली आहेत आणि त्यांचं भविष्य सुधारण्याच्या दिशेने काम करत आहेत.
घरची आठवण
घरची आठवण येत नाही का? आई वडिलांची काळजी वाटत नाही का? यावर मालती सांगते, मी माझ्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही गाव सोडून पळून गेल्यानंतर रुबिनाच्या घरचे माझ्या घरी गेले होते.
मालती सांगते, "कदाचित माझी आई या नात्यासाठी तयारही होईल पण माझ्या कुटुंबातील इतर सदस्य माझ्या आईला त्रास देतील. माझ्या आईने मला सांगितलं होतं की, जोपर्यंत रुबिनाच्या घरचे संमती देत नाहीत तोपर्यंत परत येऊ नका. नाहीतर मी रुबिनाला पळवून नेलंय असे आरोप होतील. त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल."
ती पुढे सांगते, "मला माझ्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते. मी माझ्या आईसोबत कुटुंबासोबत जे खेळीमेळीचे दिवस घालवलेत, त्याचीही आठवण येत राहते. बऱ्याचदा मला त्यांचे हसरे चेहरे दिसू लागतात. पण मी रुबिनाशिवाय घरी जाणार नाही."
मालती म्हणते की तिच्या कुटुंबीयांना या नात्याचा अर्थच समजणार नाही.
"आम्हा दोघींना सोबत राहायचं आहे हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मलाच प्रतिप्रश्न करत विचारलं की, का सोबत राहायचंय? त्यांना आमचं नातं समजणार नाही. कोणत्या शब्दात त्यांना समजवायचं आम्हाला कळत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
रुबिना सांगते, "माझे माझ्या वडिलांसोबतचे संबंध चांगले नाहीत, पण मी घरात मोठी आहे. आणि मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे माझे वडील कधीही बाहेरून येऊ दे, ते माझा चेहरा बघितल्याशिवाय इतर कोणतंच काम करत नाहीत. त्यांनी मला मारहाण केलीय पण तितकंच प्रेमही केलंय.
"मी माझ्या बहिणीशी इन्स्टाग्रामवर बोलले तेव्हा मला समजलं की, ते माझा जुना नंबर लावत राहतात. पण मी माझं सिमकार्ड फेकून दिलंय. माझ्या बहिणीने मला सांगितलं की, नमाज अदा करताना ते रडत असतात आणि मीही रडते."
सध्या समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
आमच्या समुदायातील लोकांना लग्नाचा अधिकार मिळाला तर खूप चांगलं होईल, असं मालती आणि रुबिनाला वाटतं. पण त्यांच्या लग्नाला घरच्यांची संमती असली पाहिजे.
मालती म्हणते, "आमच्या लग्नाला कुटुंबातील सर्वांनी यायला हवं. अर्थात आम्हाला लग्न करायचं आहे पण त्याच्या संमतीशिवाय कसं करायचं?"
मालतीच्या या प्रश्नावर रुबीना म्हणते, मालतीच्या घरच्यांनी होकार दिला तरच मी लग्न करीन. माझ्यासाठी धर्म मोठी गोष्ट नाहीये. मला फक्त एवढंच कळतं की आम्ही दोघी एकमेकींवर खूप प्रेम करतो.
सध्या मालती आणि रुबिना सेफ फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या शेल्टर होममध्ये राहतायत. त्यांना त्यांची स्वप्नं आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी ही संस्था मदत करते आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








