LGBTQIA+ समलैंगिकतेला प्राचीन भारतात कशी मान्यता होती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
'स्त्री आणि पुरूष या ठोस संकल्पना नाहीत', असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान म्हटलं. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी यासाठीच्या याचिकांवरचे अंतिम युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला होता. शरीरामुळे मिळालेलं लिंग आणि त्याच्या विपरीत वाटणारी स्वतःची लैंगिक ओळख यावर गेली काही वर्ष जाहीरपणे वाद-प्रतिवाद सुरू आहेत. आज समाजात समलैंगिकतेकडे 'भारतीय संस्कृतीत न बसणारं' म्हणून पाहिलं जातंय, त्या सगळ्याचा भारताच्या इतिहासात उल्लेख सापडतो. हिंदू' शास्त्रांमध्ये काय लिहिलंय, पुराणकथा, लोककथा काय सांगतात, याविषयी भारतात भरपूर साहित्य उपलब्ध आहे.
आज जे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स म्हणजेच LGBTQ+ या नावाने ओळखले जातात, त्यांना वैदीक भारतात स्वैरीणी, क्लिबा, कामी, षंढा, नपुंस ही नावं होती. प्राचीन भारतात या लैंगिक ओळखीच्या आणि लिंगभावाच्या खाणाखुणा कुठे सापडतात, त्याविषयीचे दावे आणि अन्वयार्थ काय आहेत याची ओळख करुन घेऊया.
'माझ्यातला पुरुष आणि स्त्री दोन्ही जिवंत'
प्राचीन भारतातल्या या संकल्पनांविषयीचं कुतुहल जागं झालं ते किरणशी बोलताना.
किरण. मुक्काम मुंबई. उच्चविद्याविभूषित. वर्ण सावळा. उंची 5 फूट 4 इंच. मध्यम कमनीय बांधा. दिसायला स्मार्ट. कायमस्वरूपी नोकरी.
"मी आरशात पाहून अनेकदा स्वतःला विचारलंय की मी किती टक्के पुरुष आहे आणि किती टक्के स्त्री. मी ट्रान्सजेंडर नाही हे देखील मला माहितीये. क्रॉस ड्रेसिंग करुन पाहावं म्हटलं तर त्यातही समाधान नाही वाटतं, मग मूड असेल तसे कपडे परिधान केले जातात. माझ्या जवळची प्रतिमा मला आजूबाजूला सहज म्हणून कुठे दिसत नाही. हो, पण अर्धनारीश्वरसारखी प्राचीन मूर्ती पाहिली की वाटतं, माझं काहीतरी त्या मूर्तीशी नातं आहे. अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री. माझ्यातला पुरुषही जिवंत राहिला पाहिजे आणि स्त्री देखील असं वाटत राहातं."
किरण आज पन्नाशीत आहेत, पण आपली लैंगिक ओळख काय आहे हे त्यांना अजूनही स्पष्ट सांगता येत नाही. मुंबईत त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं की- "मी समाजाला मान्य असणाऱ्या 'स्त्री' आणि 'पुरुष' या दोन्ही लैंगिक ओळखीशी स्वतःला जोडून घेऊ शकत नाही. तसं मला वाटत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
हे असेच किरण भारतातल्या पुराणकथा, महाकाव्यं आणि अगदी देवळांमधल्या शिल्पांमध्येही आढळतात.
क्विअर म्हणून शोध...
कॉर्पोरेट कंपन्यांसोबत काम केल्यानंतर आता मल्टिनॅशनल संस्थेत किरण यांची मोठ्या पदावर नेमणूक झालीये. क्रिएटिव्ह फिल्डमध्ये त्यांचं खरं नाव अनेकांना परिचित असल्याने आपलं नाव गोपनीय ठेवायची अट त्यांनी मला घातली. समाजातल्या या यशस्वी व्यक्तीच्या लैंगिकतेचा प्रवास समजून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत होते. क्विअर म्हणून त्यांचा प्रवास भारतातील प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारा होता.
एखाद्या व्यक्तीची ओळख 'सेक्स' आणि 'जेंडर' या शब्दात सांगितली जाते तेव्हा या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे हे समजून घेतलं पाहिजे.
सेक्स म्हणजे लिंग. स्त्री आणि पुरुषांमधील जीवशास्त्रीय वा शारीर फरक.
जेंडर म्हणजे लिंगभाव. लिंगाच्या फरकामुळे समाजाच्या असलेल्या अपेक्षा, भूमिका आणि दिल्या जाणाऱ्या संधी.
हा लिंगभाव लिंगांच्या फरकांमुळे येणाऱ्या सत्ता संघर्षातून तयार होतो. याच सत्ता संघर्षातून पुरुषाची प्रतिमा अमुक-अमुकच असली पाहिजे, बायकांनी असंच वागलं पाहिजे हे ठरवणाऱ्या/टिकवणाऱ्या हितसंबंधांचा गट किंवा घटक जात आणि धर्माला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असतो. त्याला लिंगभावाचं राजकारण म्हणजेच जेंडर पॉलिटिक्स म्हटलं जातं. ही लिंगभावाची बीजं घरात आणि घराबाहेरील वातावरणात पेरली जातात.
ती तशी पेरली गेली नाहीत तर स्त्री, पुरुष हे नैसर्गिक आणि सामाजिकदृष्ट्या समान आहेत हे दिसतं आणि इतरही लैंगिक विविधता दिसू शकतात.
किरण यांचं बालपण मुंबईत गेलं. मुंबईतील मध्यम वर्गातल्या पारंपरिक उच्चवर्णीय मराठी हिंदू कुटुंबात त्यांच्यावर संस्कार झाले.
किरण सांगतात- मी वयात येण्याचा काळ खूप गोंधळाचा होता. मला काही शिक्षकांविषयी आकर्षण वाटायचं. इतकं की माझ्या फँटसीतही त्यांचा प्रभाव राहायचा. हे असं का हे उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं. नंतर मनात कमालीची अपराधी भावना असायची. कारण आजूबाजूला स्त्री आणि पुरूष यांच्यातच फक्त आकर्षण असतं असं मी पाहात असे, ऐकत असे. मला वाटणाऱ्या आकर्षणाला समलैंगिक आकर्षण म्हणतात हे माझ्या नावी-गावीही नव्हतं. त्यात आई आणि वडिलांचे रोल ठरलेले. बालपणी भातुकलीच्या खेळातही आम्ही हेच रोल घेऊन खेळायचो. आपल्याला नेमकं कोणासारखं व्हायचंय याचा विचार मी करत असे. मग अजूनच गोंधळायला होई."

फोटो स्रोत, Getty Images
वयात आल्यानंतर अपराधी मन आणि गोंधळलेली अवस्था यातून जाताना किरण यांना सेक्स, नातं म्हणजे नेमकं काय याची स्वतःच्या बाबतीतली जाणीवही नव्हती, असं किरण सांगतात. त्यामुळेच असुरक्षित लैंगिक संबंधांचा सामना त्यांना करावा लागला.
स्त्री आणि पुरुषात असलेलं नातंच योग्य असं चित्र मनात उभं राहिलेल्या किरण यांनी बराच आपली लैंगिकता स्वीकारलीच नाही. उलट ती दूर ढकलण्याचा प्रयत्न केला.
"लहानपणापासून स्त्री आणि पुरुषांमध्येच फक्त 'खरं' नातं असतं हे गोष्टीची पुस्तकं, पाठ्यपुस्तकं, सिनेमे, घरात, नातेवाईकांमध्ये, कॉलेजमध्ये पाहिलं होतं. सोशल कंडिशनिंगचा भाग असेल कदाचित मी माझीच लैंगिकता तोपर्यंत नाकारली होती. आणि समाजाच्या अपेक्षेनुसार वागायचं ठरवलं. पण त्यामुळे गुंता अधिक वाढत गेला. आजूबाजूला समलैंगिक माणसं दिसायची, सिनेमे असायचे पण माझं काही यांच्यासारखं नाही असंच वाटायचं"
आज समलैंगिक नातं स्वीकारणं म्हणजे आपली घरातली आणि समाजातली 'पत' घालवण्यासारखं, स्थानाला (position) धक्का लावण्यासारखं आहे असं किरण यांना वाटतं. कमावलेलं यश क्षणात पत्त्याच्या इमारतीसारखं खाली कोसळेल अशी भीती त्यांना वाटते. किरण आज ज्या संस्थेत काम करतात तिथे केवळ तृतियपंथिय ट्रान्सजेंडर लोकांविषयी थोडीफार आस्था बाळगली जाते.
अर्धनारीश्वराशी नातं जुळलं...
किरण यांनी आपल्या लैंगिकतेचा आणि सोशल कंडिशनिंगचा प्रवास उलगडून दाखवला.
"आपल्या अवतीभवती आपण काय करावं याचं इतकं प्रेशर असतं की स्वतःचा शोध घेण्यासाठी तितका निवांतपणा नसतो. आधुनिक काळात तर तो नाहीच. सतत स्वतःला सगळीकडे सिद्ध करायची धडपड असते. पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत स्वतःचा शोध घेणं, आपली नेमकी आवड काय आहे, लैंगिक कल काय आहे हे एक्सप्लोर करणं लवकर जमतं. स्त्रियांवर मात्र जेंडरचं खूप प्रेशर असतं."
मी कोण आहे, स्त्री आहे की पुरुष आहे हे समाजाने का ठरवावं? असा सवाल किरण करतात.

फोटो स्रोत, Getty Images
किरण नास्तिक आहेत. तरीही स्वतःला घारापुरी लेणीतल्या अर्धनारीश्वरशी जोडून घेण्याविषयी म्हणतात- "माझ्या अवतीभवती असं काहीच नाहीये की जे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करुन देईल. आत्मविश्वास देईल. ते मला या मूर्तीत सापडलं."
किरण यांच्या भेटीनंतर घारापुरी लेण्यांची चित्र पाहिली. घारापुरी म्हणजेच एलिफंटाची लेणी आठव्या किंवा नवव्या शतकातील असावी असा अंदाज बांधला जातो. त्यातील अर्धनारीश्वरचं शिल्प शंकर आणि पार्वती यांचं मिश्रण आहे.
किरण यांच्या अवतीभवतीचा आजचा समाज जाहीरपणे फक्त स्त्री-पुरुष यांच्यातल्या हेट्रोसेक्शुअल नात्याची वाहवा करतो, हे किरण यांना खटकत राहातं.
आजच्या समाजातली किरण ही व्यक्ती आणि प्राचीन भारतातल्या 'हिंदू शास्त्रात'दावा करणाऱ्या ग्रंथ-पुराण-शिल्पातून वेगळी लैंगिक ओळख दाखवणाऱ्या प्रतिमा यांच्यात काय नातं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही अभ्यासकांशी बोललो.
पूर्वी भारतीय समाजात समलैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा व्यक्त झाला आहे हे पाहण्यासाठी इतिहासातले महत्त्वपूर्ण दाखले काही लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक देतात. हे दाखले हस्तलिखितं, शिल्पं, चित्रं, लोककथा, मौखिक परंपरा, चालीरीती, रुढी-परंपरा यामधून व्यक्त होणाऱ्या लैंगिक वैविध्याचे आहेत.
सध्या सर्वत्र दिसणाऱ्या 'स्त्री-पुरुष विरुद्धलैंगिक'ते पेक्षा वेगवेगळ्या प्रकारची लैंगिकता त्यात पहायला मिळते. Heterosexual म्हणजेच विरुद्धलैंगिकतेसोबतच Homosexuality (समलैंगिकता) ही देखील नैसर्गिक आणि सुख देणारी आहे असा विचार त्यातून पुढे येताना दिसतो.
हा इतिहासनिव्वळ लैंगिक संबंधांबद्दल बोलत नाही तर लिंगभाव आणि व्यक्तीच्या लैंगिक ओळखीविषयी आणि व्यक्त होण्याविषयी सांगतो.
वैष्णवांची समलैंगिक हक्क संघटना
GALVA-108 (गे अँड लेस्बियन वैष्णव असोसिएशन) या आंतरराष्ट्रीय संस्थेने वैदीक साहित्यातील लैंगिक विविधतेवर संशोधन आणि लेखन केलंय. अमारा दास विल्यम्स यांनी 2001 मध्ये या संस्थेची स्थापना आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसह केली.
अमारा यांना किशोरवयातच आपल्याला स्त्रियांविषयी आकर्षण नाही याची जाणीव झाली. पुढे वैष्णव भक्तीचा मार्ग स्वीकारल्यानंतर कोलकाताच्या वैष्णव पंथाशी आपलं नातं जुळवून घेतलं. इस्कॉन या संस्थेचा ते भाग झाले.

फोटो स्रोत, Amara Das Wilhelm
नव्वदच्या दशकात LGBTI समुदायातील व्यक्तींबद्दल नकारात्मक टिपण्णी केली जायची तसंच अनेक गैरसमज होते हे पाहुन अमारा दास यांनी संस्कृत ग्रंथांमध्ये काय म्हटलंय याविषयी संशोधन करायचं ठरवलं. तेव्हा त्यांना वेदात आणि ग्रथांत संस्कृतमध्ये तृतीय प्रकृतीविषयी सविस्तर विवेचन केलेलं वाचायला मिळालं.
2010 साली त्यांनी 'तृतीय प्रकृती- पिपल ऑफ द थर्ड सेक्स' हे संशोधनपर पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक वाचताना आश्चर्यकारक अशी माहिती हाताशी लागते.
"सध्याच्या समाजात टॅब्यू आणि समलैंगिकतेला गुन्हा ठेवण्याच्या दृष्टीकोनापासून प्राचीन पारंपरिक हिंदूत्वाचा दृष्टीकोन अधिक उदारमदवादी आणि समजूतदार होता," असं लेखकाचं म्हणणं आहे.
प्राचीन शास्त्रांमधील विविध लैंगिकता
अनेक प्राचीन शास्त्रांमधील समलैंगिकतेचा अभ्यास करताना लेखक प्रामुख्याने तीन ग्रथांचा उल्लेख करतात. नारद स्मृती, सुश्रूत संहिता आणि वात्सायन लिखित कामसूत्र.
कामसूत्रामध्ये 'तृतीय प्रकृती' हा शब्द वापरला असल्याचं अमारा म्हणतात.
सुश्रृत संहितेनुसार समलिंगी पुरुष म्हणजेच क्लिबा या लैंगिक संबंधाच्या प्रवृत्तीनुसार पाच प्रकार सांगितल्याचं लेखक लिहितात. असेक्य, सुगंधिका, कुंभिका, इर्षका आणि षंढ अशी वर्गवारी केली आहे.
तर नारद स्मृतीमध्ये मुखेभाग, सेव्यका आणि इर्षका असे तीन प्रकार सांगितलेले असून याप्रकारच्या पुरुषांना स्त्रियांशी लग्न करण्यास मनाई असल्याचं लिहिलंय. तर वात्सायनांनी समलिंगी पुरुषांसाठी पांडा या शब्दाखाली 14 वेगवेगळे प्रकारचे पुरुष नमूद केले आहेत.

फोटो स्रोत, Amara Das Wilhelm
तर समलिंगी स्त्रियांसाठी आणि स्त्रीच्या लैंगिक ओळखीसाठी नस्त्रिय हा शब्द वैदिक साहित्यात येतो. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये असलेल्या उल्लेखांमधून लेखकाने 10 प्रकारच्या नस्त्रियांची नोंद केली आहे.
स्वैरीणी - इतर स्त्रियांसोबत प्रेमसंबंध ठेवणारी
कामिनी- पुरुष आणि स्त्रिया या दोघांसोबत प्रेमसंबंध ठेवणारी
स्त्रीपुंसा- वागण्यात पुरुषी भाव असणारी
षंढी- पुरुषासारखी दिसणारी आणि जिला मासिक पाळी किंवा स्तन नाही अशी
नरषंढा- जिचं स्त्रित्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय अशी
वर्ता- जिचं स्त्री-बीज गर्भाशयात रुजू शकत नाही
सुसीवक्त्रा किंवा सुसीमुखी- जिची योनी अविकसित वा लहान आहे
वंध्या- मासिक पाळी नसणारी
मोघपुस्पा - गर्भधारणा न होणारी आणि
पुत्रघ्नी - वारंवार गर्भपात होतो अशी स्त्री
स्वैरीणीचा उल्लेख कामसूत्रामध्ये करण्यात आलाय. तर कामिनीचा भार्गव पुराणात आणि स्त्रीपुंसाचा महाभारतात. या तिन्ही प्रकारच्या स्त्रियांची लैंगिक संबंधांच्या वर्तनावरुन वर्गवारी करण्यात आली आहे.
संस्कृत शब्द षंढा अशा पुरुषाच्या संदर्भात वापरला जातो, ज्याला जन्माने मिळालेलं पुरुषत्व संपुष्टात आलंय आणि त्याचं वागणं स्त्री सारखं आहे. या प्रवृत्तीच्या विरोधी षंढी हा शब्द अशा स्त्रीसाठी आहे जिला पुरुष म्हणून जगायचंय.
नपुंसा म्हणजे Intersex. जन्मतःचा स्त्री की पुरुष हे लिंग ठरवणं शक्य नसतं अशा व्यक्ती. पूर्णतः विकसित न झालेल्या जननांगसाठी निसर्ग हा संस्कृत शब्द वापरण्यात आलाय. शरीरातील अविकसित प्रजनन व्यवस्था याचा उल्लेख आहे. अशा व्यक्ती विरुद्धलिंगीही असू शकतात आणि समलिंगी देखील असू शकतात.
कामी या संस्कृत शब्दाचा अर्थ देताना लेखक म्हणतो, अशा व्यक्ती प्रेम, प्रणयात उत्सुक असतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रदर्शित करत असतात. स्त्री आणि पुरुष या दोन्हींकडे ते आकर्षित होतात. दोन्हीकडे अधूनमधून आकर्षित होण्याला 'पक्ष' हा शब्द वापरण्यात आलाय.
प्राचीन वैदीक भारतात ट्रान्सजेंडरना समाजात आपली लैंगिक ओळख लपवण्याची आवश्यकता नसायची असं सांगताना बीजकोश काढण्याची प्रथा नव्हती तर लैंगिक अवयव कपड्याने घट्ट बांधून ठेवायची प्रथा होती, असं लेखक लिहितात.
अमारा म्हणतात- "वैष्णव धर्माचा प्रसार करणाऱ्या पंधराव्या शतकातील चैतन्य महाप्रभू (ISKON) यांच्या शिकवणीनुसार सर्वांना सामावून घ्या या संदेशाला अनुसरुन समाजातील 'Third Gender' ला सामावून घेणं हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे."
इस्कॉनचे संत चैतन्य महाप्रभू यांचं रुपही कृष्णाचं द्विलिंगी होतं असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Amara Das Wilhelm
गाल्वा-108 संस्था एकपत्नी/एकपती विवाह आणि संबंधांची (monogamous) पाठराखण करते. कारण सुदृढ आयुष्यासाठी ते अधिक पोषक आहे असं त्यांचं मत आहे.
पण इस्कॉन औपचारिकरित्या कोणत्याच समलैंगिक विवाहांना मान्यता देत नाही, पण इस्कॉनमधील काही वरिष्ठ अशा विवाहांना आणि संबंधांना पाठिंबा देतात, असं अमारा सांगतात.
"आधुनिक समाजात समलैंगिक समुदायाबद्दल आम्ही सातत्याने राबवलेल्या अभियानांमधूनही अनेकांचं याविषयी शिक्षण झालं. समलैंगिकतेचा, ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्सविषयीचा वेदकालीन दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहचवण्यात आम्ही यशस्वी होतोय."
याच काळात भारतात संशोधनात्मक अभ्यास झाला. त्यातील नव्वदच्या दशकातलं गीती थडानी यांचं हिंदू शक्ती देवतांसंबधांचं संशोधन महत्त्वाचं मानलं जातं.
त्यांनी 'सखियानी: लेस्बियन डिझायर इन एन्शिअंट अँड मॉडर्न इंडिया' हे पुस्तक लिहिलं. याच काळात डॉ. रुथ वनिता आणि सलीम किडवाई यांचं 'सेम सेक्स लव्ह इन इंडिया' हे संशोधनात्मक पुस्तक उपलब्ध झालं. वैदिक तसंच पौराणिक संदर्भ आणि आजच्या काळातले दृश्य-अदृश्य पुरावे या पुस्तकांमधून पुढे येतात.
सेक्स, लव्ह आणि इतिहास
'सेम सेक्स लव्ह इन इंडिया'च्या पहिल्या भागात व्यासांनी संस्कृमध्ये लिहिलेलं महाभारत, पाली भाषेतील मनिकांथा जातका, विष्णू शर्मा यांचं संस्कृतमधील पंचतंत्र, वात्स्यायनांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं कामसूत्र, तर दुसऱ्या भागात पुराण आणि प्रचलित लोककथांविषयी सविस्तर मांडणी आहे.
याखेरीज पुस्तकात मध्ययुगीन भारतातील पर्शियन आणि उर्दू परंपरेतील प्रेम, लैंगिकता याविषयीच्या संकल्पना, उदाहरणं अधोरेखित करण्यात आली आहेत. ते थेट आधुनिक भारतातील अभिव्यक्ती देखील कशी होती याचं सविस्तर चित्रण आहे.

फोटो स्रोत, Palgrave.com
डॉ. रुथ वनिता या युनिव्हर्सिटी ऑफ मोंटानामध्ये प्राध्यापक आहेत. लिंगभाव, भारतातील समलिंगी विवाह, समलिंगी प्रेम या विषयावर त्यांनी पुस्तकं लिहिली असून त्या अनुवादक आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आणि इतिहासकार सलीम किडवाई यांनी संपादीत केलेल्या 'सेम सेक्स लव्ह इन इंडिया' या पुस्तकाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या 'समलैगिकता गुन्हा नाही' या निर्णयाच्या सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुरावा म्हणून कोर्टात ते सादर करण्यात आलं होतं.
या पुस्तकात 'सेक्स'पेक्षा 'समलिंगी प्रेम' या संकल्पनेवर जोर देण्यात आलाय. भारतीय इतिहासातील कहाण्या अधिक तपशीलवर समोर येतात.
स्त्रियांमधील प्रेम आणि पुरुषांमधील प्रेम याविषयी याविषयी दक्षिण आशियातील वाङमयात कशी अभिव्यक्ती करण्यात आली आहे, याचे दाखले देत विश्लेषण केलं गेलंय.
नव्वदच्या दशकात या संशोधनात्मक अभ्यासाला रुथ वनिता त्यांनी सुरूवात केली. या अभ्यासाने भारतातल्या LGBTIQ चळवळीला ताकद दिली.
अशा संशोधनात्मक पुस्तकांमधून अनेक लेखकांना प्रेरणाही मिळाली. समलैंगिकतेविषयीच्या पौराणिक कथांचे अन्वयार्थ पुढे आले.
पौराणिक साहित्याच्या बाबतीत ठोस असे दावे इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक करत नाहीत. नवव्या शतकापर्यंत महापुराणे लिहिली गेली आणि पुढे तेराव्या शतकापर्यंत उपपुराणे लिहिली गेली, यात काळानुसार अनेक बदल झाल्याने धर्मशास्त्राचा अभ्यास करणारे सांगतात.
पुराणसंहिता या वेदसंहितांप्रमाणे निश्चित नसल्यामुळेही त्यांच्याविषयी वेगवेगळे अन्वयार्थ (interpretation) काढले जाण्याची शक्यता असते.
या अन्वयार्थाविषयी प्रसिद्ध लेखक आणि पौराणिक कथांचे (Mythology) अभ्यासक देवदत्त पट्टनायक सांगतात,
"पौराणिक कथा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा भाग आहे. हजारो वर्षांपासून ब्राम्हणच शास्त्र सांगत आले आहेत. त्यात ते स्वतःला उच्चस्थानी दाखवतात. अमुक एक गोष्ट शास्त्र सांगतं की ब्राम्हण सांगतात हा मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या दृष्टीकोनातून त्याची मांडणी करतं.
शास्त्रात नेमकं काय म्हटलं होतं हे आपल्याला कसं समजणार? शास्त्र सांगणारे वात्सायन, मनू, चाणाक्य, वशिष्ठ, गौतम ऋषी, विश्वामित्र हे सगळे पुरुषच होते, तर शास्त्र स्त्रियांविषयी काय सांगतं हे पुरुषांच्याच नजरेतून समोर येतं."
हिंदू देवता आणि लैंगिक प्रवाहीपणाविषयी (Gender fluidity) हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक, अकेडेमिस्ट आणि लेखकांनी पुराणकथा, मंदिरांच्या मूर्त्यां यावर सविस्तर लिहिलंय.
त्यात वैकुंठ कमलजा म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचं एकत्र रुप ही देवता आहे. तर हरिहर हे शिव आणि विष्णूचं एकत्रित रुप दर्शवलं जातं.
शिखंडी ती होता की तो?
महाभारतातली शिखंडीची कथा तर प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Devdutt Pattanaik
महाभारतातली ही कथा सांगितली जाते. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं सैन्य समोरासमोर ठाकलं होतं. जेव्हा भीष्म आणि अर्जुन समोरासमोर आले तेव्हा दोघांसमोर कसोटी होती.
पांडवांच्या सैन्यात महारथी शिखंडी होता. शिखंडीच्या मागे राहून अर्जुनाने भीष्मांवर बाणांचा मारा केला. शिखंडी हा स्त्री असल्याने भीष्मांनी बाणांचा प्रतिकार केला नाही. कारण स्त्रीसोबत लढायचे नाही अशी भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती. अखेर अर्जुनाच्या बाणांने घायाळ होऊन रणांगणावर भीष्म कोसळले.
या कथेत शिखंडी ही राजा द्रुपदाची मुलगी म्हणून जन्माला येते. पण राजा तिला मुलगा म्हणून वाढवतो. त्याला सर्व प्रकारच्या विद्या शिकवत युद्धशास्त्रात निपुण करतो. शिखंडीचं लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री जेव्हा त्याच्या पत्नीला कळतं की तो पुरुषच नाही तेव्हा ती वडीलांकडे तक्रार करते. इकडे शिखंडी आत्महत्या करण्यासाठी जंगलात जाते तेव्हा यक्ष तिची कहाणी ऐकून तिला काही काळासाठी पुरुषत्व बहाल करतो.
महाभारत या महाकाव्यातला युद्धाप्रसंगीचा भाग योगायोगाने आलेला नाही तर तो हेतूपूर्वक रचला गेला. शिखंडीची लैंगिकता आणि ब्रम्हचर्य असलेल्या भीष्मांची अलैंगिकता यात संघर्ष उभा केला गेला, अशी मांडणी देवदत्त पट्टनायक करतात.
या कथेकडे पाहताना ती ट्रान्सजेंडर होती का? याचं विवेचन पुराणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लेखकांनी केलंय.
गदाधरा हे राधेचं पुरुषसुलभ रुप मानलं जातं. तर महाभारतात अर्जुन बृहन्नळाच्या वेषात तृतीयपंथीय होतो.
अरावनाशी लग्न करण्यासाठी कृष्ण स्त्रीचं रुप घेतो. आजही या कथेशी संबंधीत कुवागम हा पारंपरिक उत्सव तामिळनाडूत चैत्र महिन्यात भरतो.

फोटो स्रोत, Devdutt Pattanaik
कृष्णाशी जोडलेल्या अनेक पौराणिक कथा, लोककथा, अजूनही अस्तित्वात असलेल्या रुढी-परंपरा यातून कृष्णाचं प्रवाही लैंगिकता असलेलं रुप समोर येतं असं अभ्यासक सांगतात.
कृष्णभक्ती करताना पुरुष स्त्रीवेष धारण करतात, हे आजच्या काळातही पाहायला मिळतं. या परंपरेचा उल्लेख देवदत्त पटनायक सखी-भाव परंपरा असा करतात.
"ही सखी-भाव परंपरा बहुदा पंधरावे ते अठरावे शतक या काळात भक्ती आणि तांत्रिक पंथ एकमेकांमत मिसळल्याने जन्माला आली असावी."
"बरेच मानववंशशास्त्रज्ञ अंदाज बांधतात की योगिनी स्त्रियांचे रास नृत्य म्हणून रासलीला सुरू झाली. कृष्ण त्यातला भैरव होता. भैरव म्हणजे ह्या देवीसमुदायासोबत असणारा एकच पुरुष! तो त्यांचा प्रेमी, पुत्र, भाऊ, सेवक असा एकाच वेळी वेगवेगळ्या रुपांत दिसतो.
"जुन्या मातृसत्ताक पद्धतीतल्या स्त्रिया अनेक पशू प्रजातींसारख्या वर्तन करुन फक्त तगड्या तडफदार, देखण्या पुरुषासच प्राधान्य द्यायच्या. अर्थात त्याने टोळीवर वर्चस्व गाजवू नये म्हणून त्याचा विशिष्ट कालावधीनंतर बळी दिला जायचा. अशा वेळेस स्वतःचा जीव वाचवायचा एकमेव उपाय होता तो म्हणजे स्वतःचं खच्चीकरण करुन घेणं. अशा तऱ्हेने पौरुषाचा त्याग करुन प्रियकराऐवजी विचित्र दासीपुत्र बनून त्याला जगावं लागे."
देवदत्त पुढे सांगतात- "भारतात देवीच्या पुरूष पुजाऱ्यांनी उत्सवाच्या वेळी स्त्रीवेष धारण करण्याचा विधी क्वचित प्रसंगी केला जातो. मात्र पितृसत्ताक काळात ही कथा बदलली."
पुराणातली अशीच एक कथा लोककथा म्हणून प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Devdutt Pattanaik
विष्णूचं मोहिनी रूप
भस्मासुराचा पिच्छा सोडवण्यासाठी शिव विष्णूची मदत मागतो. तेव्हा विष्णू मोहिनीचं रुप घेऊन भस्मासुराचं चित्त विचलित करतो. डोक्यावर हात ठेवेल त्याचं भस्म होईल असा वर भस्मासुराला शिवाकडून मिळालेला असतो.
मोहिनी नृत्य करता-करता भस्मासुराला त्याचाच हात त्याच्या डोक्यावर ठेवायला सांगते. तिथेच त्याचं भस्म होतं. इकडे शिव मोहिनीच्या रुपावर भाळतो. आणि शिव-मोहिनी यांच्या मिलनातून अय्यप्पाचा जन्म होतो.
हिजड्यांच्या मौखिक परंपरेतल्या कथेमध्ये रामायणातला प्रसंग उभा केला जातो. राम वनवास संपवून पुन्हा अयोध्येत जातो तेव्हा वेशीवर काही जण थांबलेले असतात. राम त्यांची विचारणा करतो. तेव्हा ते सांगतात- तुम्ही वनवासाला जाताना निरोप द्यायला आलेल्या अयोध्येतील स्त्री-पुरुषांना परतायला सांगितलंय. आम्ही तर स्त्री नाही आणि पुरुषही नाही, म्हणून आम्ही प्रतिक्षा करत राहिलो आहोत. तेव्हा रामाने त्यांना वचन दिलं की तुम्ही कधीही उपेक्षित राहणार नाही. या आशयाच्या अनेक लोककथा सांगितल्या जातात.
अय्यप्पाप्रमाणेच क्रॉस ड्रेसिंग असलेली देवता म्हणून गुजरातमधील बहुचारा माता तृतीय पंथीय समलैंगिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
राजा भागीरथाच्या कथेत त्याचं पालन करणाऱ्या दोन स्त्रिया येतात.
मंदिरांमधली शिल्प आणि समलैंगिकता
भारतातील अनेक मंदिरांमध्ये समलैंगिकतेविषयीची शिल्प आढळतात. देवदत्त पट्टनायक म्हणतात- "कांचीपुरम, कोणार्क, खजुराहोसारख्या मंदिरांच्या भिंतींवर समलिंगी संभोगाच्या प्रतिमा आहेत. त्यात बहुदा एकमेकींच्या उत्कट मिठीत असलेल्या स्त्रिया दिसतात. बहुदा प्रेमात असलेल्या स्त्रियांचं त्या प्रतिनिधीत्व करत असाव्यात किंवा देवळातील नृत्यांगना पुरुषाचं मन रिझवण्यासाठी नाट्याभिनय करत असाव्यात."

फोटो स्रोत, Getty Images
"त्या मानाने लैंगिक संबंध करणाऱ्या दोन पुरुषांच्या प्रतिमा तुलनेने कमी आहेत. कदाचित त्या भिंतींवर तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रतिमा असतील आणि आपण त्यांना पुरुष किंवा स्त्री चुकून म्हणत असू. हे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून असतं."
वैदीक भारतात आणि पौराणिक कथांमध्ये लैंगिकतेविषयीचे हे विचार काळाच्या ओघात मागे कसे पडले याविषयी देवदत्त सांगतात-
"हे विचार लुप्त झालेले नाहीत, आजही मथुरेत शिवजीला वृंदावनात स्त्रीरुपात पुजलं जातं, आंध्र प्रदेशात ब्रम्होत्सव साजरा केला जातो तिरुपती बालाजीला साडी नेसवली जाते, कर्नाटकात पुलिगम्मा देवीच्या पूजेला समोर एक मिशी ठेवली जाते. पुरुषरूपी देवता स्त्रियांचा वेष करतात तर स्त्रीरूपी देवता पुरुषांची आभूषणं घेतात. याचा अर्थ लिंगभावापासून आपला विचार खूप वेगळा आहे. लिंग ही अतिशय प्रवाही गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
द्विलिंगी देवतांसोबतच विवाह न करणाऱ्या, स्वावलंबी देवतांच्या आणि माणसांच्या कथा भारतात अनेक लोककथांमध्ये आढळतात.
शिखंडी या पुस्तकात पट्टनायक महाभारत, रामायण, स्कंदपुराण, कामसूत्र, गंगेच्या काठावरील लोककथा, बंगाली तसंच तमिळ लोककथा यांचे दाखले देतात. लैंगिकतेविषयीच्या कथांचे अर्थ अन्वयार्थ त्यांनी उलगडून दाखवले आहेत.
शंभर वर्षांमध्ये इतिहास बदलला?
समलैंगिकतेकडे पाहण्याचा प्रत्येक काळातला विशेष करुन राजकीय वातावरणातला दृष्टीकोन वेगवेगळा असलेला दिसून येतो. पण हा दृष्टीकोन कधी-कधी टोकाचं पाऊल उचलतो.
अभ्यासक आणि संशोधक गीती थडानी यांच्या पुस्तकातून समोर येतं.
समलैंगिक विवाहांना मान्यता मिळावी यासाठीच्या दिल्ली हायकोर्टातल्या केसमध्ये गीता थडानी एक याचिकाकर्त्या आहेत. गीती यांनी भारतातली पहिली समलैंगिक स्त्रियांची संस्था 'सखी कलेक्टिव्ह' 1990 मध्ये स्थापन केली.
आपल्या संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतात फिरून मंदिरं, ग्रामीण भागातील महिलांना ज्ञात असलेल्या परंपरा, लैंगिक धारणा यांचा अभ्यास केला आहे.
'सखियानी: लेस्बियन डिझायर इन एन्शिअंट अँड मॉडर्न इंडिया' मध्ये त्या लिहितात- "स्त्री प्रतिमांचं पुरूषत्त्वामध्ये (masculinization) जाणीवपूर्वक रूपांतर सर्रास करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात देवतेच्या मूर्तीचे स्तन कापलेले मी पाहिले आहेत.
त्याला नंतर भगवा रंग फासला गेला. त्यामुळे पुरुष प्रतिमा असलेली देवता जन्माला आली. समलिंगी स्त्रिया असलेल्या तारा-तारिणी या देवता मूळ स्वरुपात जशा होत्या तशा बदलून हेट्रोसेक्शुअल म्हणजेच विरुद्धलिंगी जोडप्यात दाखवल्या गेल्या. हे अनेक मंदिरांमध्ये आणि पुरातन स्थळांच्या बाबतीत झालंय."

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटीशांच्या वसाहतवादी राजकारणाचा लैंगिकतेविषयीच्या भारतीय दृष्टीकोनाला मोठा फटका बसला असं अनेक अभ्यासक म्हणतात.
इंडियन कल्चरल फोरमला दिलेल्या मुलाखतीत डॉ. रुथ वनिता यांनी म्हटलं होतं- "1820 ते 1920 या काळात भारतात समलैंगिकच नाही तर सर्व प्रकारच्या लैंगिकतेविषयीच्या दृष्टीकोनात खूप फरक पडला. त्याआधी लोक लैंगिकतेवबद्दल लिहिताना रोमॅँटिक, विनोदबुद्धीने, आनंदाने अभिव्यक्ती करत होते.
उदाहरणार्थ 1920 नंतर हिंदी लेखक उग्र यांनी लैंगिकतेविषयी कथा लिहिल्या तेव्हा सर्वांनी अक्षरशः त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. ब्रिटीश वसाहतवादामुळे शंभर वर्षांमध्ये हा बदल घडून आला होता. जर असा बदल एका शतकात घडून येऊ शकतो तर तो पुन्हा बदलण्याची शक्यताही आहेच."
"एकदा आत्मविश्वास मिळाला की लोक आपणहून पुढे येतात. त्यातूनच बदल घडतो. फक्त कायदा बदलला की बदल घडतो असं मला वाटत नाही. लोकांचं मत बदललं की त्या रेट्याने कायद्यात बदल होत असतो. आणि मला आनंद आहे की समलैंगिकतेविषयी लोकांचं मत बदलतंय."
भारतातील वैदिक आणि पौराणिक वाङमयातच नाही तर लोकपरंपरांमध्ये लैंगिक वैविध्याचा अविष्कार पाहायला मिळतो. भारतीय समाजात बौद्ध, जैन, मुस्लीम, शीख या धर्मांमध्ये आणि अनेक पंथांमध्येही लैंगिकतेविषयी आणि स्त्री-पुरुषांच्या जीवशास्त्रीय ओळखीपलिकडील लिंगभावाविषयी अनेक संदर्भ सापडतात. लिंग आणि लिंगभाव विविधता भारतात आजही वेगवेगळ्या स्वरुपात जिंवत आहे याचे पुरावे त्यातून पुढे येतात.

'माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.' पैदिमारी वेंकट सुब्बरावांनी रचलेल्या या राष्ट्रीय प्रतिज्ञेत विविधतेला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आहे.भारतात धर्म, भाषा, वंश, संस्कृती आणि लैंगिकतेबाबतही इतकी विविधता आहे की ती समजल्याशिवाय आणि स्वीकारल्याशिवाय हा देश उभाच राहू शकत नाही, यांची सुब्बरावांना जाणीव होती.भारतातली माणसं काही एका यंत्रातून काढलेले एका छापाचे ठोकळे नाहीत. प्रत्येकाचं वेगळं आणि सुंदर अस्तित्व आहे. हे वेगळेपण जपलं नाही, उलट ते पुसण्याचा प्रयत्न केला तर भारत खरंच भारत राहील का, याचा विचार व्हायला हवा. या दिवाळीत बीबीसी मराठीवर 1-6 नोव्हेंबर आपण साजरा करूया विविधतेने नटलेल्या समृद्ध परंपरेचा शब्दोत्सव.

संदर्भ:
सेम-सेक्स लव्ह इन इंडिया: संपादन- रुथ वनिता आणि सलीम किडवाई
तृतीय प्रकृती, पीपल ऑफ द थर्ड सेक्स: लेखक- अमारा दास व्हिल्हेल्म
सखियानी, लेस्बियन डिझायर इन एन्शिअंट अँड मॉडर्न इंडिया: लेखक- गीती थडानी
शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा: लेखक- देवदत्त पट्टनायक, अनुवाद- सविता दामले
संपादन - अमृता दुर्वे
हे वाचलंत का?
- LGBTQ, क्विअर आणि समलैंगिकता मुलांना अशी समजावून सांगा
- ‘समलैंगिकता हा आजार नाही’ भारतीय मानसोपचार तज्ज्ञांची प्रथमच जाहीर भूमिका
- समलिंगी आहे म्हणून कुटुंबाने तिच्याकडून ‘संपत्तीत वाटा मागणार नाही’ असं लिहून घेतलं
- हृषी वेड्स विन : यवतमाळमधल्या 'गे' लग्नाची गोष्ट
- 'आमचं लेस्बियन नातं घरच्यांना मान्य नव्हतं तरीही आम्ही पळून लग्न केलं'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








