'समलैंगिकांचं लग्न निसर्गालाच मान्य नाही'; धार्मिक नेत्यांची भूमिका

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांविरोधात धार्मिक संघटना एकत्रित आल्या आहेत.
समलैंगिक विवाहाविरोधात जमीयत उलेमा-ए-हिंदने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून म्हटलं आहे की, लग्नाचा मूलभूत पाया हाच महिला आणि पुरुषाने एकत्र येण्यावर आधारलेला आहे.
समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याचं या धार्मिक संघटनांचं म्हणणं आहे. समलैंगिक अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे की, आम्हालाही निसर्गानेच बनवलं आणि आम्ही आमच्या अधिकारांसाठी लढतच राहू.
जमीयत उलेमा-ए-हिंदचे सचिव नियाझ अहमद फारुकी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “लग्नाचा उद्देश हा कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवणं हा आहे. त्यामुळे यामध्ये जर दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र येणं ही शक्यताच नसेल तर लग्न ही संकल्पनाच संपुष्टात येईल.”
याच मुद्द्यावर पुढे बोलताना केरळच्या कॅथलिक बिशप्स कौन्सिलचे प्रवक्ते फादर जेकब पालाकपिली कोच्ची यांनी फोनवर बोलताना सांगितलं, “पारंपरिकरित्या लग्न सज्ञान महिला आणि पुरुषाला एकत्र राहण्याची मुभा देतं. दोन महिला किंवा दोन पुरुषांमधले संबंध लग्न समजले जाऊ शकत नाहीत, कारण निसर्गालाच ही गोष्ट मान्य नाही. त्यामुळेच नैसर्गिक गोष्ट म्हणून याचा स्वीकार कसा केला जाऊ शकतो?”
त्यांच्या मते, “बायबल सांगतं की, ईश्वराने महिला आणि पुरुषांना बनवलं. नंतर ते लग्नाच्या बंधनात अडकले.”
फादर जेकब पालाकपिली यांनी म्हटलं की, सध्या तरी त्यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये, मात्र भारतीय समाज ही गोष्ट स्वीकारू शकत नाही आणि आम्हालाही समलैंगिक विवाह मान्य नाहीये.
घटनापीठासमोर सुनावणी

फोटो स्रोत, Getty Images
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता देणाऱ्या याचिका घटनापीठाकडे सोपविल्या आहेत.
या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन सदस्यीय पीठाने हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगताना म्हटलं, “पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर घटनेच्या कलम 145(3) नुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न करणं हे अधिक योग्य ठरेल. त्यामुळेच आम्ही हा मुद्दा घटनापीठासमोर मांडण्याचे निर्देश देत आहोत.”
या प्रकरणाची सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे.
या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यासाठी विशेष विवाह अधिनियमाला सांमजस्याने समजून घेता येईल. पीठ नवतेज सिंह जौहर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (ज्या खटल्यात समलैंगिकता हा अपराध नसल्याचं म्हटलं गेलं होतं) या खटल्यातील निर्णयाचा आधार घेऊ शकतं.
त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, स्पेशल मॅरेज अॅक्टमध्ये जेंडर न्यूट्रल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या अधिनियमात म्हटलं आहे की, कोणत्याही दोन व्यक्तिंमध्ये विवाह होऊ शकतो.
यापूर्वी केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र दाखल करून समलैंगिक विवाहाला मान्यता देणाऱ्या याचिकेला विरोध केला होता.
केंद्र सरकारचं म्हणणं होतं की, भिन्न लिंगी व्यक्तिंमधील संबंधांना भारतात विवाहाच्या रुपाने सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर पातळीवर मान्यता आहे. त्याची न्यायालयीन परिप्रेक्ष्यातून व्याख्या करून त्याच्याशी छेडछाड करणं योग्य नाही.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळेंनी म्हटलं होतं की, संघ केंद्र सरकारच्या विचारांशी सहमत आहे.
हरियाणामध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत त्यांनी म्हटलं होतं, “ तुम्ही कोणासोबतही राहू शकता हे मी यापूर्वीही ऑन रेकॉर्ड बोललो आहे. पण हिंदू जीवनपद्धतीमध्ये लग्न हा एक संस्कार आहे. लग्न केवळ आनंदाचं साधन नाही, तर एक करार आहे. विवाह संस्काराचा अर्थ दोन लोक एकमेकांसोबत एकत्र राहू शकतात, मात्र केवळ स्वतःसाठी नाही. ते कुटुंबव्यवस्थेचाही पाया घालतात.”
सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता हा अपराध नसल्याचं 2018 मध्ये म्हटलं होतं.
समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
या याचिकांमध्ये हिंदू विवाह अधिनियम 1955, स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 आणि परदेशी विवाह अधिनियम 1969 अंतर्गत समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती.
धार्मिक संघटनांची भूमिका

फोटो स्रोत, Getty Images
नियाज अहमद फारुकी सांगतात, “भारतात वेगवेगळ्या धर्मांनुसार आचरण करणारे लोक आहेत. त्या सर्व धर्मांमध्ये लग्नाबद्दल हीच धारणा आहे. समलैंगिकता हा पाश्चिमात्य विचार आहे आणि आपण त्याचं आचरण का करावं? इस्लाममध्ये समलैंगिक विवाह कधीच शक्य नाही.”
ते म्हणतात, “जगभरातच लग्न- कुटुंब व्यवस्था संपुष्टात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यानंतर विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आली. आता लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बोललं जातंय. आपण या विचारांसमोर शरणागती पत्करायची का? ज्याप्रमाणे आपण घटना बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे लग्नाबद्दलचे मूलभूत विचारही बदलले जाऊ शकत नाहीत.”
मुनी धर्म रक्षा समितीचे राष्ट्रीय संयोजक रवींद्र जैन यांनी म्हटलं की, जेव्हापासून समलैंगिक विवाहाचा मुद्दा जोर पकडू लागलाय, तेव्हापासून मुनी आणि संत धर्मसभांमधून प्रवचन करून समलैंगिकता निसर्गाच्या विरूद्ध आहे आणि आपण त्याविरुद्ध जाऊ नये हे सांगत आहेत.
ते पुढे सांगतात, “विवाह केवळ महिला आणि पुरूषांमध्येच होऊ शकतो, हे आमचे महात्मे आणि संत सातत्याने सांगत आहेत.”
अकाल तख्तचे माजी जत्थेदार ज्ञानी गुरूबचन सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, गुरुग्रंथ साहिबमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना एक जोडी म्हणून पाहिलं गेलंय.
त्यांनी म्हटलं, “गुरुग्रंथामध्ये विवाह विधीचा उल्लेख आहे. त्यात स्त्री आणि पुरूषांमध्ये विवाहाचा उल्लेख आहे. त्यावरून हे लक्षात येतं की, लग्न केवळ स्त्री आणि पुरूषांमध्येच होऊ शकतं. हाच निसर्गनियम आहे.”

फोटो स्रोत, HARISH IYER
दुसरीकडे समलैंगिक अधिकारांसाठी लढणारे हरीश अय्यर यांनी गंमतीने म्हटलं की, आमच्या आंदोलनाने सर्व धर्मांना आमच्याविरुद्ध एकत्र केलं आहे.
हरीश अय्यर सांगतात, “तुम्ही आमचे संबंध निसर्गनियमाच्या विरुद्ध असल्याचं म्हणता. पण निसर्गाची रचना जर अल्लाह, ईश्वर, येशूने केली असेल तर आम्हालाही निसर्गानेच बनवलं आहे. जर तुम्ही आमच्यावर नाराज असाल, तर तुमची नाराजी ईश्वर, अल्लाह आणि येशूसोबतही आहे.”
आरएसएसशी संबंधित मॅगझिन ‘द ऑर्गनायझर’मध्ये छापलेल्या एका लेखात संघाची कामगार संघटना भारतीय मजदूर संघाचे (बीएमएस) माजी अध्यक्ष सीके साजी नारायण यांनी दावा केला की, आपलं धर्मशास्त्र अशाप्रकारच्या लैंगिक व्यवहारांना अपराध मानतं. सोबतच त्यांनी समलैंगिक संबंधांना राक्षसांशी जोडून अनैसर्गिक असल्याचं म्हटलं.
आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर विचाराधीन आहे. मानवाधिकारांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे असा विचार करणारा एक गट आहे. या प्रकरणी कोर्टात नाही, संसदेत निर्णय घेतला जावा, असंही त्यांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








