भानगढ : 'या किल्ल्यात जो जातो तो परत येत नाही,' या दाव्यात किती तथ्य?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संकल्प बाहेती
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"सूर्यास्तानंतर जो कोणी इथं जातो तो जिवंत परत येत नाही. असं म्हटलं जातं की, रात्रीच्या अंधारात जो कोणी इथं येतो एक तर जीवानिशी जातो किंवा मग बेपत्ता होतो."
टूर गाईड असलेल्या संतोष प्रजापतींनी रहस्यमयी अशा भानगढ किल्ल्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
या भानगढ किल्ल्याच्या बाहेर एक बोर्ड लावलाय. त्यावर स्पष्ट लिहिलंय की, सुर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत इथं प्रवेश निषिद्ध आहे.
स्थानिक मान्यतेनुसार, हा किल्ला पछाडलेला असून भारतातील सर्वाधिक भीतीदायक ठिकाण असल्याचं म्हंटल जातं.
16 व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झाली. हा किल्ला म्हणजे राजा माधव सिंह यांच्या राज्याचं मध्यवर्ती ठिकाण होतं. पण, सुरुवातीची काही वर्षं सोडली तर त्यानंतर इथं राहणारे रहिवासी सुद्धा हा किल्ला सोडून गेले.
स्थानिक दंतकथांनुसार, इथंच राहणाऱ्या एका मांत्रिकाने राणीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न चालवले होते, मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शेवटी या मांत्रिकाने किल्ल्यात राहणाऱ्या लोकांवर जादूटोणा केला.

फोटो स्रोत, Getty Images
पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. विनय कुमार गुप्ता सांगतात की, "हा किल्ला भारतातील सर्वाधिक भीतीदायक किल्ला असून इथं भुताखेतांची वस्ती असल्याचं बोललं जातं."
डॉ. विनय कुमार गुप्ता यांच्या मते, "या किल्ल्याचं बांधकाम 1570 च्या सुमारास सुरू झालं. जवळपास 16 वर्षं या किल्ल्याचं बांधकाम सुरूच होतं."
किल्ल्यात भूतप्रेत आहेत का?
आमेरचे राजा भान सिंह यांच्या नावावरून या किल्ल्याचं नामकरण करण्यात आलं होतं. भानसिंह यांचं दुसरं नाव होतं राजा मानसिंग.
टूर गाईड संतोष प्रजापती सांगतात की, "माधव सिंह हे इथले राजा होते, तर राणी रत्नावती त्यांची पत्नी होती. राजा माधव सिंह यांच्या राज्याची सुरुवातीची राजधानी म्हणजे हा किल्ला होता."
संतोष यांच्या म्हणण्यानुसार, "हा किल्ला साडेचारशे वर्षे जुना आहे. भुताखेतांच्या गोष्टींमध्येही याच किल्ल्याचा पहिला नंबर लागतो. इथं केवळ आणि केवळ भुतंच राहतात अशी मान्यता आहे."
अशी वदंता आहे की, रात्रीच्या वेळी इथं विचित्र आवाज ऐकू येतात. सुरुवातीच्या काळात काही लोक इथं गेले, पण परत आलेच नाहीत, त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचेही आत्मे इथं भटकत असतात.
इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीशी संबंधित सिद्धार्थ बंटवाल सांगतात की, "भानगढबद्दल काही लोककथा प्रचलित आहेत.यातल्या थोड्याफार गोष्टी तुम्ही सुद्धा ऐकल्या असतील. त्यातली सर्वात चर्चिली जाणारी गोष्ट म्हणजे राणी रत्नावतीची काठ. ती अतिशय सुंदर राणी होती आणि ती या किल्ल्याची मालकीण होती."
"त्यानंतर गोष्ट सुरू होते एका मांत्रिकाची, त्याला राणी हवी असते. राणीचं प्रेम मिळवण्यासाठी त्या मांत्रिकाने शक्य ते सर्व प्रयत्न केले पण, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. शेवटी मांत्रिकाने किल्ल्यातील लोकांना शाप दिला आणि किल्ला उध्वस्त होईल अशी व्यवस्था केली."

फोटो स्रोत, Getty Images
'भानगढ किल्ल्यात प्राण्यांव्यतिरिक्त काहीच नाही'
टूर गाईड असलेल्या संतोष प्रजापती यांनी किल्ल्यावर असलेला एक वॉच टॉवर दाखवला. याच ठिकाणी सिंधू सेवडा नावाचा तो मांत्रिक राहायचा. राणीला मिळवता न आल्याच्या दुःखात या मांत्रिकाने तंत्रमंत्राच्या साहाय्याने किल्ल्यावर जादूटोणा केला आणि 2अवघ्या 24 तासांच्या आत किल्ला उद्ध्वस्त झाला.
ही घटना 1605 मध्ये घडली असावी. त्यावेळी या किल्ल्यावर 14 हजार लोकसंख्या होती. 24 तासांत असं काही संकट कोसळलं की, राजासहित अर्धी अधिक जनता इथून पळून गेली.
संतोष सांगतात की, "या जागेला जुनं जयपूर म्हणतात. कारण इथले स्थानिक लोक पळून आमेरला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आज तिथं जयपूर शहर वसलंय. आता भारतात नवं जयपूर आहे."
इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीशी संबंधित असलेले सिद्धार्थ बंटवाल यांनी भानगडला अनेकदा भेट दिलीय. ते सांगतात की, "2012 मध्ये एका रात्री आमच्या टीमने भानगढचा दौरा केला होता. एखादया पॅरानॉर्मल टीमने या ठिकाणी भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती."

फोटो स्रोत, Getty Images
"आमची टीम एक रात्र इथं थांबली आणि या प्रकरणाची शहानिशा केली. इथं येताना आम्ही आमची यंत्रसामग्री घेऊन आलो होतो. याच यंत्रांच्या साहाय्याने आम्ही माहिती गोळा केली. इथं कोणत्या पॅरानॉर्मल एक्टिविटी होतात का याची आम्ही खात्री करून घेतली."
सिद्धार्थ सांगतात की, "आम्हाला आमच्या यंत्रांमध्ये कोणतेही असामान्य असे चढ-उतार दिसले नाहीत. खरं तर त्या रात्री अशीच कोणतीच असामान्य घटना घडली नाही, जी आम्ही रेकॉर्ड केली असेल."
सिद्धार्थ बंटवाल यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात विविध प्रकारचे प्राणी राहतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात.
ते सांगतात, "या किल्ल्याच्या परिसरात बरीच माकडंही राहतात. ही माकडं इकडून तिकडे उड्या मारतात त्यामुळे फांद्या हलत राहतात, सुकलेल्या पानांचा सळसळ आवाज येत राहतो. इथल्या कथा आणि किश्श्यांमुळे मानसिकतेवर परिणाम झाला असावा."
किल्ल्यात नेमकं काय आहे?
पुरातत्व तज्ञ डॉ. विनय कुमार गुप्ता सांगतात की, या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला भिंतींच्या तीन समांतर मालिका पार कराव्या लागतात.
ते सांगतात, "या किल्ल्याच्या सुरुवातीला दुकानांचे पुरातत्वशास्त्रीय अवशेष आहेत. तिथं बहुधा जीवनावश्यक वस्तू विकल्या जात असाव्यात. इथं सोन्याचांदीचा बाजार असावा. काही छोट्या छोट्या इमारती आहेत, जिथं मनोरंजनाचे कार्यक्रम होत असण्याची शक्यता आहे. नर्तकीची हवेली नावाचंही एक ठिकाण किल्ल्यावर आहे.
"या किल्ल्यावर जे श्रीमंत लोक राहायचे, त्यांच्यासाठीही एक वेगळी वस्ती होती. इथं राजाचा दरबार भरत असल्याने याच्याशी संबंधित काही बांधकामही आहेत. त्याकाळी युद्धांमध्ये घोडे आणि हत्तींचा वापर केला जायचा. त्यामुळे या जनावरांसाठी मोठमोठाले तबेले देखील या किल्ल्यात आहेत. राजा आणि त्याच्या राण्यांसाठी एक सुंदरसा महाल देखील या किल्ल्यावर होता."

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात की, "सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन किल्ल्यावर टेहळणी बुरूज असायचे. याच बुरुजांवरून किल्ल्यातील रहिवाशांवर आणि हल्लेखोरांवर नजर ठेवली जायची. असाच एक बुरुज भानगढ किल्ल्यावर सुद्धा आहे. या सर्वांव्यतिरिक्त शत्रूंना कैद करण्यासाठी एक तुरुंग सुद्धा बनवण्यात आलाय."
हा किल्ला सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ आहे. इथं असलेले गोड्या पाण्याचे झरे वन्य प्राण्यांना आकर्षित करतात.
टूर गाईड संतोष प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिस्का व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्र असल्यामुळे या परिसरात विजेची सोय नाही.
ते सांगतात, "संध्याकाळच्या वेळी या संपूर्ण परिसरात अंधाराचं साम्राज्य असतं. अंधार असल्याने वटवाघुळांचा, वाघ, बिबट्यांसह इतर प्राण्यांचा वावर असतो. या प्राण्यांमुळे या परिसरात येणं धोक्याचं आहे."
लोक हा किल्ला सोडून का गेले?
डॉ. विनय कुमार गुप्ता सांगतात की, "पुरातत्वशास्त्राच्या भाषेत सांगायचं झाल्यास, लोकांनी हा किल्ला सोडून जाण्यामागे बरीच कारणं आहेत. जसं की, दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू इथं पुरेशा प्रमाणात उपलब्ध असत्या तर लोक इथून कधीच गेले नसते.
"जर एखादं बाह्य आक्रमण झालं तर लोक तो परिसर सोडून जातात. मग अशी ठिकाणं ओसाड बनतात. भानगढमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडलं असेल ज्यामुळे लोकांना इथला परिसर सोडावा लागला असेल."
त्यांच्या म्हणण्यानुसार, "इथं एखादा मोठा दुष्काळ पडला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. किंवा या भागातील गोड्या पाण्याचे स्रोत आटले असतील, म्हणून कदाचित लोकांनी हा भाग सोडला असेल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








