चंद्रकांत झा : तिहार जेलसमोर मुंडकी कापलेले मृतदेह ठेवून पोलिसांना आव्हान देणारा सीरियल किलर

फोटो स्रोत, NETFLIX
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
20 ऑक्टोबर 2006. या तारखेला सकाळी सकाळी पश्चिम दिल्लीतल्या हरिनगर पोलीस ठाण्यात फोन खणाणला. दुसऱ्या बाजूला फोनवर असणाऱ्याने सांगितलं की, त्याने तिहार जेलच्या 3 नंबर गेटवर एक मृतदेह ठेवलाय.
पोलीस ताबडतोब तिथं पोहोचले. तिथं पोहोचल्यावर एक टोपली बांधून ठेवली होती. त्यात शीर नसलेलं धड ठेवलं होतं. त्या टोपलीत एक चिठ्ठीसुद्धा ठेवली होती. त्या चिठ्ठीत दिल्ली पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. खुन्याने 'हिंमत असेल तर पकडून दाखवा.' असं आव्हान ही दिलं होतं.
या गोष्टीला सहा महिने उलटले. सहा महिन्यांनंतर म्हणजेच एप्रिल 2007 मध्ये पुन्हा एकदा तिहार जेलच्या 3 नंबर गेटबाहेर एक मृतदेह आढळला. प्रेत बांधलेलं होतं. पण यावेळी डोकं आणि हात पाय गायब होते. मागच्या वेळेप्रमाणे याहीवेळी मृतदेह बांधण्यात आला. हा जो सिरीयल किलर होता त्याने मारलेल्या लोकांची मुंडकी यमुना नदीत फेकून दिली होती.
पहिले सहा महिने शोधाशोध करून दिल्ली पोलीस थकले. पण दुसऱ्यांदा जेव्हा असं घडलं तेव्हा मात्र दिल्ली पोलीसांची गाळण उडाली.
सबंध एप्रिल महिना तपास सुरूच होता. पण जसा एप्रिल महिना उलटला तसा मे महिन्यात आणखीन एक मृतदेह तिहार जेलबाहेर सापडला. पहिल्याप्रमाणे याहीवेळी मृतदेहाचं मुंडकं छाटलं होतं. मृतदेह तसाच बांधून टोपलीत ठेवला होता. सोबत एक चिठ्ठीही होती. या चिठ्ठ्या हिंदीत असायच्या आणि शेवटी लिहिलेलं असायचं, 'दिल्ली पुलिस का जीजा या दिल्ली पुलिस का बाप' चिठ्ठी लिहिणारा आपलं नाव सीसी असं टाकायचा. तिहार जेलसारख्या 'अतिसुरक्षित' अशा ठिकाणाबाहेर एकामागून एक शिरच्छेद केलेले मृतदेह सापडणं, मृतदेहांसोबत चिठ्ठया सापडणं, पोलिस स्टेशनमध्ये वाजणारे फोन. या सगळ्यावरून हा सराईत गुन्हेगार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं. या गुन्हेगाराने दिल्ली पोलिसांना खुलं आव्हान दिलं होतं.
नेटफ्लिक्सवर तीन भागातल्या डॉक्युमेंट्रीमध्ये या हत्याकांडाची माहिती बघायला मिळते. बिहारमधील मधेपुरातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला चंद्रकांत झा सिरीयल किलर कसा बनतो याचीच स्टोरी या सीरिज मध्ये बघायला मिळते.
पुढील तपासात असं दिसून आलं की, चंद्रकांत झा दिल्ली पोलिसांच्या एका हवालदारावर रागावला होता. या हवालदाराने तिहार तुरुंगात चंद्रकांत झा सोबत गैरवर्तन केलं होतं. या कारणावरून चंद्रकांत झा रागावला होता. आपल्याला दिलेल्या त्रासाचा बदला तो तिहार जेलच्या गेटवर मृतदेह ठेऊन घ्यायचा.
दिल्ली पोलिसांची असहायता
या सीरियल किलर प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले सुंदर सिंह यादव हे दिल्ली पोलिस दलातून एसीपी म्हणून निवृत्त झाले आहेत. आजकाल ते आपल्या गावी शेतीभाती सांभाळतात.
यादव सांगतात की, त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. मृतदेहाला शीर नसल्यामुळे मृतव्यक्ती कोण आहे हे ओळखणं कठीण व्हायचं. मृतव्यक्तीची ओळख पटवल्याशिवाय, हत्यामागे नेमका हेतू काय होता आणि मारेकरी नेमका कोण हे शोधणं खूप कठीण काम होतं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "हे प्रकरण वेगळं होतं कारण त्यात मारल्या गेलेल्या लोकांची ओळख पटत नव्हती. मृतदेहांना शीर नव्हतं. मृतदेहांसोबत कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता."

फोटो स्रोत, Netflix
हा तो काळ होता जेव्हा केवळ पोलिसच नाही तर ही चिठ्ठ्याही लीक झाल्याने या प्रकरणात मीडियाची उत्सुकता अचानक वाढली होती. त्या दिवसांत अमित कुमार झा एका दैनिकात क्राइम रिपोर्टिंग करायचे. ते या घटनेचा तपशील सांगतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "जेव्हा ही पत्र मीडियावर लीक झाली तेव्हा एकच खळबळ उडाली. त्या दिवसात दिल्लीच्या सर्व बातम्यांमध्येच या प्रकरणाची हेडलाईन मोठी असायची. दिल्लीत साधारणपणे कोणीतरी चोरी किंवा दरोडा घालून पोलिसांना आव्हान द्यायचं. पण या प्रकरणात कोणीतरी खून करून पोलिसांना आव्हान देत होतं."
अमित कुमार झा सांगतात की, केके पॉल त्यावेळी दिल्लीचे पोलिस आयुक्त होते. हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावं असे आदेश त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला दिले होते. पण हे प्रकरण जेवढं सोप्प दिसत होतं तेवढं नव्हतं.
ते म्हणतात, "यात अडचण अशी होती की, जे मृतदेह सापडायचे त्यात शरीराचा फक्त मधलाचं भाग असायचा. डोकं गायब असायचं.
कोणत्याही गुन्ह्याची उकल करण्यासाठी मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी आवश्यक असतं. म्हणजे ज्या मृतदेहांची ओळख पटते अशी 80 ते 90 टक्के प्रकरण निकाली निघतात. कारण पोलीस मृत व्यक्तीच्या हवाल्याने लिंक जोडतात. कुटुंब, कॉल डिटेल्स या सर्व गोष्टींमुळे तपासात खूप मदत होते. पण या प्रकरणांमध्ये तसं काहीच नव्हतं. ही केस तशी अवघड होती आणि या प्रकरणाची उकल करायला पोलिसांना वर्षभराचा अवधी लागला."
चंद्रकांत झा आणि दिल्ली पोलीस आमने - सामने
सुंदरसिंह यादव आणि उर्वरित तपास पथकाने सरतेशेवटी चंद्रकांत झा याला मे 2007 मध्ये दिल्लीतील एका परिसरातून अटक केली.
यादव सांगतात, "जेव्हा चंद्रकांत माझ्यासमोर आला तेव्हा तो तर्कसंगत, जाणकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटलं. वर्षभरापूर्वीपासून मी त्याच्याशी फोनवर बोलत होतो. पण तीन-चार खून केल्यानंतर मी त्याला पकडू शकलो. मी आणि तो समोरासमोर आल्यावर त्याने मला विचारलं की तू सुंदरसिंग यादव आहेस का? हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. तेवढ्यात तो म्हणाला तू जिंकलास, मी हरलो. मी तुम्हाला सर्व माहिती देतो, पण मला त्रास देऊ नका, मला मारू नका."
पण यादव आणि त्याच्या साथीदारांचा त्रास काही संपत नव्हता. ते म्हणतात, "मी या केसवर काम करत असतानाच तीन खून झाले होते. आणि याआधीचा खून हरिनगर पोलीस स्टेशनमधला होता. आणखी चार खून दिल्लीच्या इतर भागांत झाले होते. मला त्या चार खुनांची माहिती नव्हती. ज्या लोकांचे खून झाले होते ते कोण होते याचीही माहिती नव्हती. पण चंद्रकांत झा ने त्याच्या ट्रायल स्टेटमेंटमध्ये सर्व डिटेल्स सांगितल्या."

फोटो स्रोत, MAIL TODAY
"जी मानवी कवटी सापडली होती, तिचा संदर्भ मी तपास करत असलेल्या केसशी तो लावत होता. तर दुसरी जी कवटी सापडली होती तिचा संदर्भ तो दुसर्या केसशी देत होता. दोन्ही केसमध्ये जर डीएनए प्रोफाइल जुळले नाहीत तर त्याला कोर्टात मदत होईल अशाप्रकारे तो गोष्टी रचत होता."
जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा चंद्रकांत झाची वागणूक कशी होती, याचं उत्तर तेव्हा कोर्ट रिपोर्टर म्हणून काम करणारे उत्कर्ष आनंद देतात.
उत्कर्ष आनंद बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "तो कोर्टात फार कमी बोलायचा. पण त्याच्यात एक विचित्र प्रकारचा आत्मविश्वास भरला होता. जेव्हा तो आपल्या वकिलाशी बोलायचा तेव्हा तो त्यांना काहीतरी समजावतोय असं वाटायचं. असं वाटायचं की तो काहीतरी रणनीती आखतोय, आणि तसंच काम करतोय. तो सनकी असेल किंवा वेडा आहे असं वाटायचं नाही. तो कंट्रोल आणि कंपोज्ड वाटायचा. "
चंद्रकांत झाचा मीडियाला सल्ला
चंद्रकांत झा याची एकच व्हीडिओ क्लीप उपलब्ध आहे आणि ती नेटफ्लिक्सवरच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये वापरली आहे.
या व्हीडिओ क्लीपमध्ये हातात बेड्या असलेला चंद्रकात म्हणतो, "मला मीडियाला विचारायचं आहे की तुम्ही चुकीच्या बातम्या का देता?"
"बातमी चुकीची आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची चूक आहे. कारण तुम्हीच आतापर्यंत सत्य सांगितलेलं नाही."
"तुम्ही मला विचारून बातमी छापली का? मला कुठून अटक झाली हे तुम्हाला माहिती की मला?"
एक पत्रकार विचारतो, "तुम्ही चार खून का केले?"
"कदाचित मी चारहून जास्त खून केले असतील. तुम्हाला कसं माहिती की मी चारच खून केले?"
उत्कर्ष म्हणतात, "तो मीडियाशी वाद घालताना त्याचं बोलणं तर्कसंगत असायचं. चंद्रकांतशी बोलताना तो काहीतरी निरर्थक बडबडला, असं कधीही होत नसे. तो जे काही बोलायचा त्याला अर्थ असायचा. जेव्हा-जेव्हा त्याला भेटायचो तेव्हा तो कसं रिअॅक्ट करेल, याची भीतीही असायची. खरंतर मी कधीच त्याच्याशी फार वेळ बोललो नाही."
कायद्यातील गुंतागुंतीची जाण असणारा सीरिअल किलर
उत्कर्ष सांगतात की त्याचा खटला कोर्टात चालू होता तोपर्यंत एकही तक्रार कोर्टात आली नाही किंवा जेलमधूनही आली नाही. पोलिसांचा असा समज होता की त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग यायचा आणि तो खून करायचा. मात्र, त्याने रागाच्या भारात स्वतःवरचा ताबा गमावला आहे, अशी कुठलीच तक्रार ट्रायल कोर्टात कधीच आली नाही.
पोलीस आणि न्यायमूर्तींसमोर चंद्रकांत झा जे बोलायचा, त्याचे जी साक्ष दिली, त्यात फरक होता.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अमित कुमार झा सांगतात, "त्याला कोर्टात हजर करताना न्यायालयाबाहेर तो पोलिसांना म्हणायचा की दोन-चार मर्डर काही फार मोठी गोष्ट नाही. हे तर मी कधीही करू शकतो. मात्र, कोर्टात हजर होताच तो वेगळ्याच भूमिकेत जायचा. तिथे तो म्हणायचा की मी गरीब भाजी विक्रेता आहे आणि मला पोलिसांनी उगाच फसवलं आहे. आपण पोलिसांसमोर जे बोलतो त्याला न्यायमूर्तींसमोर अजिबात महत्त्व नाही, हे त्याला माहिती होतं."
सुंदर सिंग यादव हेसुद्धा चंद्रकांत झा याच्या या धूर्तपणाची पुष्टी करतात. ते म्हणतात, "त्याच्यात फक्त एकच उणीव होती आणि तोसुद्धा म्हणायचा की त्याला इंग्रजी येत नाही. बाकी तांत्रिक बाबी, कायदे, कायद्यांतली गुंतागुंत आणि उणिवा त्याला चांगल्या ठाऊक होत्या."
बिहारच्या मधेपुरामध्येही केले खून
डॉक्युमेंट्रीमध्ये चंद्रकांतचं गाव घोषईमधल्या गावकऱ्यांचं बोलणं आणि काही फोटो यावरून गावात दहशत असल्याचं दिसतं आणि चंद्रकांत झा याने तीन-चार नाही तर याहून जास्त खून केले असावे, असा अंदाज निघतो.
चंद्रकांत झा याने किती खून केले, याविषयी बोलताना उत्कर्ष आनंद सांगतात, "हे सांगणं खूप कठीण आहे. ज्या गुन्ह्यांची शिक्षा तो भोगतोय ते गुन्हेही त्याने केले की नाही, हेसुद्धा मी सांगू शकत नाही. कारण मीडियाशी बोलताना तो अनेकदा म्हणाला होता की, तुम्हाला कसं माहिती की चारच खून केलेत, चार खुनांचा आरोप होता. त्यापैकी तीन प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. तर चौथा खून कुणी केला? मात्र, डॉक्युमेंट्रीवरून असं वाटतं की खुनाचा आकडा 40 किंवा त्याहूनही अधिक असू शकतो."
शिक्षा सुनावल्यानंतरही चंद्रकांत झा अनेकदा तुरुंगातून बाहेर आल्याचं उत्कर्ष आनंद डॉक्युमेंट्रीमध्ये सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "तीन प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली. तो शिक्षा भोगतोय. मात्र, हेसुद्धा सत्य आहे की त्याला चार वेळा पॅरोल मिळाला, सात वेळा फर्लो मिळाली, तो इतके दिवस तुरुंगातून बाहेर आला आहे. 2019 नंतर तो तुरुंगातून बाहेर आलेला नाही. मात्र, त्याआधी तो अनेकदा तुरुंगातून बाहेर येत होता."
2019 नंतर काय बदललं, याचं उत्तर देताना उत्कर्ष आनंद सांगतात, "त्यावर्षी त्याच्याविरोधात मारहाणीची तक्रार झाली होती. त्यामुळे पुढची दोन वर्ष त्याला फर्लो किंवा पॅरोलवर सोडणार नसल्याचा निर्णय झाला. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने दिल्ली उच्च न्यायालयात रिट पीटिशन दाखल केली होती की त्याला मुलीचं लग्न करायचं आहे आणि आईच्या निधनानंतर बंद झालेली पेंशन पुन्हा सुरू करायची आहे. मात्र, त्याच्या तक्रारी आणि कारणं फारशी गंभीर नसल्याने त्याला परवानगी मिळाली नाही."
अमित कुमार झासुद्धा चंद्रकांतचा एक रंजक किस्सा सांगतात.
ते म्हणाले, "शिक्षा सुनावल्यानंतर चंद्रकांत तुरुंगात असताना मला त्याच्या पत्नीचा कॉल आला होता. त्या म्हणाल्या मी चंद्रकांत झाची पत्नी बोलतेय आणि खुनाच्या एका प्रकरणात त्याची सुटका झाली आहे. मी विचारलं की तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला तर त्यांनी सांगितलं की त्या चंद्रकांतला भेटायला तुरुंगात गेल्या होत्या तेव्हा त्यानेच हा नंबर दिला. मला खूप आश्चर्य वाटलं की तुरुंगातही त्याच्याजवळ माझा नंबर होता."
डॉक्युमेंट्रीमध्ये चंद्रकांतच्या कुटुंबातील एकाही सदस्याची प्रतिक्रिया किंवा म्हणणं दाखवलेलं नाही. असं का?
याचं उत्तर देताना सीरिजच्या हेड ऑफ रीसर्च आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर नंदिता गुप्ता सांगतात, "माझी चंद्रकांत झा याच्या कुटुंबीयांशी भेट झाली आहे. ती चांगली माणसं होती आणि त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करत त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही."
त्या म्हणतात, "ही डॉक्युमेंट्री बनवायला दोन वर्ष लागली. चार महिने आम्ही फक्त रिसर्च करत होतो. बिहारमधल्या त्या गावातल्या अनेकांशी बोललो. जवळ-जवळ 40-50 जणांशी बोललो. अनेक महिन्यांनंतर हे काम पूर्ण झालं."
तपासातील आव्हानं
तपासाच्या दृष्टीने हे प्रकरण कठीण होतं, हे क्राईम कव्हर करणारे पत्रकारही मान्य करतात.
अमित कुमार झा म्हणतात,"त्या काळी फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. मोबाईल फोनचा वापरही फार नव्हता. आज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नाही, असे गुन्हे विरळच आहेत. मोबाईल फोन असतात. पोलीस सगळा डेटा गोळा करतात. त्यावर काम करतात. त्याकाळी तपासात अशी मदत कमीच मिळायची. तिहारच्या बाहेर संपूर्ण वर्षभर पोलीस शिपाई ठेवू शकत नव्हते. तो मृतदेह कधी टाकेल, कुठे टाकेल, याचा काहीच अंदाज नसायचा."

फोटो स्रोत, Getty Images
सुंदर सिंग यादव यांच्या मते या प्रकरणामध्ये परीस्थितीजन्य पुरावे मजबूत होते.
ते म्हणतात, "आम्ही तपशिलांचा अभ्यास करत होतो, अनेक कोनातून तपासत होतो, मग पुढे गेलो. आरोपी पुढे आणखी त्रास देईल, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही फक्त मृतदेहच नाही त्यांच्या वेगवेगळ्या भागांनाही डीएनए प्रोफायलिंगसाठी पाठवलं. तो पत्रं लिहायचा. त्यामुळे हस्ताक्षर तपासले. ही चाचणी गणितासारखी असते. एकतर तुम्हाला शंभर पैकी शंभर मिळतील किंवा मग शून्य."
चंद्रकांत झा हाती कसा लागला?
ही केस संपूर्ण पोलीस दलासाठी आव्हान ठरलं होतं आणि केस सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता. पण, यश कसं मिळालं?
यादव सांगतात, "तो जेव्हा कॉल करायचा आम्ही त्याच्याशी बराच वेळ बोलायचो. जेणेकरून बोलण्याच्या ओघात त्याने असं काही बोलावं ज्यातून आम्हाला सुगावा मिळेल. त्याच्याशी बराच वेळ बोलणं, हा सुद्धा आमच्या तपासाचाच भाग होता. याच बोलण्यातून आम्ही त्याच्याकडून बरीच माहिती काढून घेतली. काही अशा गोष्टीही ज्या त्याने सांगायला नको होत्या."
ही केस सोडवण्यासाठी पोलिसांना खबऱ्यांचीही बरीच मदत घेतली. खबऱ्यांच्याच मदतीमुळे पोलीस चंद्रकांत ज्या डॉक्टरांकडे जायचा त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचं डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं आहे. या डॉक्टरचे एक नातलग आणि चंद्रकांत झा यांच्यात काहीतरी वाद झाला होता.
डॉक्युमेंट्रीमध्ये यादव सांगतात, "याच नातलगाने सांगितलं होतं की चंद्रकांतजवळ एक गाडा आहे ज्याला इंजिन लावलं आहे. कॉल रेकॉर्ड्सवरून एका विशिष्ट भागाची ओळख पटवण्यात आली आणि त्या भागात गस्तीदरम्यान पोलिसांना इंजिन लावलेला गाडा दिसला. याच सुगाव्यावरून आम्ही चंद्रकांतला अटक करण्यात यशस्वी झालो."
चंद्रकांत झा सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








