मेकअप आणि मर्डर- या तरुणीनं असं काय केलं की तिचे व्हीडिओ लाखोंनी पाहिले?

फोटो स्रोत, BAILEY SARIAN
- Author, डिअरबेल जॉर्डन,
- Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज.
युट्यूबवर व्हीडिओ बनवण्याचा करिअर सध्या जोमात आहे. युट्यूबवर आपले व्हीडिओ हिट करण्यासाठी लोक निरनिराळ्या युक्ती वापरताना दिसतात. पण युट्यूबवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी मेहनतही तितकीच करावी लागते.
पण काही लोकांना मात्र अचानकच अशी प्रसिद्धी मिळते. योगायोगाने मिळालेल्या या प्रसिद्धीतून ते लोकप्रिय असे युट्यूबर म्हणून नंतर ओळखले जातात.
असाच योगायोग लॉस एंजिलिसच्या बेली सारियन हिच्यासोबत घडला.
खरंतर, बेली ही एक मेकअप आर्टिस्ट म्हणून आपले व्हीडिओ युट्यूबवर टाकायची. सुरुवातीच्या काळात अनेक दिवस ती इतकी प्रसिद्ध नव्हती. पण अचानक एके दिवशी तिच्या व्हीडिओंवर लोकांच्या उड्या पडू लागल्या. असं नेमकं काय घडलं?
सध्या मेकअप आर्टिस्टवरून क्राईम एक्सपर्ट बनलेल्या बेलीचे युट्यूबवर 64 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
कधी छंद म्हणून सुरू केलेलं कामच आता 33 वर्षीय बेली सारियन हिची ओळख बनली. त्याच्याच बळावर बेलीला नेटफ्लिक्ससोबत एक चांगली डिलही मिळाली आहे.
बेली बीबीसीशी बोलताना म्हणाली, "युट्यूबवरून पैसे कमावून काही खर्च भागवता येईल, असं मला आधी वाटलं होतं. पण माझे आता 64 लाख सबक्रायबर्स आहेत. ही संख्या मोठी आहे. मला कधीच वाटलं नव्हतं, माझ्याशी इतके लोक जोडले जातील."

फोटो स्रोत, Getty Images
बेलीच्या व्हीडिओंना इतकी प्रसिद्धी का मिळते, याबाबत आता चर्चा करू.
बेली आपल्या व्हीडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर मेकअप करण्यासाठी बसते. पण मेकअप करत असताना ती गुन्हेगारीशी संबंधित सत्य घटनांबाबत सांगते.
प्रत्येक व्हीडिओ बनवण्यासाठी ती खूप संशोधन करते. संशोधनाचं काम महत्त्वाचं असल्यामुळे तिने यासाठी पगारावर एक व्यक्तीही ठेवली आहे.
बेलीच्या व्हीडिओंमध्ये कोर्टाने काय म्हटलं, पोलिसांचं म्हणणं काय होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.
सुरुवात कशी झाली?
बेलीचा सर्वांत लोकप्रिय व्हीडिओ अमेरिकेचा कुख्यात सीरियल किलर जेफ्री डामर याच्यावर आहे. 1978 ते 1991 दरम्यान डामरने 17 जणांची हत्या केली होती.
बेली या व्हीडिओमध्ये डामरबद्दल सांगत चेहऱ्यावर मेकअप लावत होती. हा व्हीडिओ इतका लोकप्रिय झाला की त्याला 22 मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यानंतर लाईन ऑफ ड्युटी या टीव्ही कार्यक्रमाचा फिनाले शो 12.8 मिलियन वेळा पाहिला गेला.
त्यानंतर आतापर्यंत सारियनचे युट्यूब व्हीडिओ 800 मिलियन पेक्षाही जास्त वेळा पाहिले गेले आहेत.

फोटो स्रोत, BAILEY SARIAN
बेली सारियनचे व्हीडिओ इतके का पाहिले जातात, याविषयी तिलाही फार काही कल्पना नाही.
ती म्हणते, "प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही याविषयी अधिक माहिती पाहिजे आहे."
गंमत म्हणजे, बेलीच्या अशा व्हीडिओंची सुरुवात ही अचानकच झाली होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी ती आपल्या युट्यूब चॅनेलवर जास्त करून ब्युटी ट्यूटोरियलच अपलोड करत होती.
तिने या चॅनलची सुरुवात 2013 साली केली होती. जॉब करता करता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून तिने युट्यूब चॅनेल चालू केलं होतं.
Ipsy या ब्युटी सबस्क्रिप्शन कंपनीसोबत करार केल्यानंतर ती कमाईसाठी युट्यूब चॅनेल हाच स्त्रोत बनवला. दरम्यान, ती फ्रीलान्सर म्हणूनही मिळेल ते काम करायची.
त्यानंतर 2018 मध्ये कोलोरॅडोमध्ये ख्रिस वॉट्सबद्दल एक बातमी आली. त्यामध्ये त्याला आपली गरोदर पत्नी आणि लहान मुलींचा खून केल्याप्रकरणी दोषी सिद्ध करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.
ही एक हृदय पिळवटून टाकणारी घटना होती. जगभरातील माध्यमांमध्ये या बातमीला जागा मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
पण सर्वदृष्टीने कुटुंबवत्सल दिसणारी एखादा व्यक्ती अशा प्रकारे आपल्या संपूर्ण कुटुंबाला मारून का टाकते, याचा शोध बेलीला घ्यायचा होता.
खरं तर याबाबत बोलावं की नाही, याबाबत ती संभ्रमावस्थेत होती. आपलं ट्रोलिंग होईल का अशी भीती तिला होती.
त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण नेहमी करतो, त्यासोबतच याबाबत बोलायचं तिने ठरवलं.
मेकअप करता करताच तिने याविषयी माहिती दिली.
ती म्हणते, "फक्त कॅमेऱ्यासमोर बसून बोलणं मला अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मी मेकअप लावत बोलत होते. स्वतःला वेगळ्या कामात व्यस्त ठेवण्यासाठी मी तसं केलं."
"मला त्यावेळी आलेल्या प्रतिक्रियांची आजही भीती वाटते. कारण मेकअप करताना या भयानक गुन्ह्याबाबत बोलणं सोपं नव्हतं.
हा व्हीडिओ पब्लिश झाल्यानंतर काही वेळातच त्याचे व्ह्यू वेगाने वाढत गेले. अखेर वॉट्सबद्दलचा तो व्हीडिओ एक कोटीपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे दुसरी एखादी कथा घेऊन असाच एखादा व्हीडिओ बनवावा, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी पुन्हा तसं केलं. तो व्हीडिओही चांगला चालला. मग दर आठवड्याला मी अशा प्रकारचे व्हीडिओ केले. त्यांना प्रतिसादही तुफान मिळाला. माझे सबस्क्रायबर्स वेगाने वाढत गेले, बेली सांगते.
ब्रिटनमध्ये गुन्हेसंदर्भात प्रकरणांचा अनुभव असलेले फॉरेन्सिक मानसोपचार सल्लागार डॉ. रुथ टली म्हणतात, "आपला एक डोळा भलेही टीव्हीकडे असतो, पण दुसरा फोन किंवा टॅबलेटकडे असतो. म्हणजे आपण मल्टिस्क्रिनवाले आहोत. त्यामुळे अशा प्रकारे दोन गोष्टी जोडून कंटेट बनवणं काम करतं, कारण लोकांना तसाच कंटेट हवा असतो. अशातच गुन्हेविषयक कहाण्या रंजकपणे सांगितल्यास त्याला प्रतिसाद मिळतो."
एका संशोधनानुसार, जानेवारी ते जून 2020 दरम्यान युट्यूबवर गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये 60 टक्के महिला होत्या.
बेलीच्या मते, तिचा कंटेंटही महिलाच जास्त प्रमाणात पाहतात. त्यातही सर्वाधिक प्रमाण 25-35 वयोगटाचं आहे. त्यानंतर 18-25 वयोगट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अखेर महिला असा कंटेंट पाहणं पसंत का करतात, या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. टली म्हणतात, "अशा गुन्ह्यांपासून कसं सावध राहावं, या विचाराने हे व्हीडिओ पाहिले जातात. तसंच महिलांचा सध्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, हेसुद्धा त्याचं कारण असू शकतं."

फोटो स्रोत, Baily sarian
बेली म्हणते, "मी कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटल्यास त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काळजी कमी होते. त्यामध्ये मी गुंतून जाते."
कोव्हिड काळानेही बेली सारियनने तिचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत केली. कारण लॉकडाऊनच्या काळात लोक टीव्ही सिरीज, चित्रपट आणि वेळ घालवण्यासाठी व्हीडिओज पाहात होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली त्यावेळी तिचे केवळ 7 लाख 80 हजार सबस्क्रायबर्स होते. पण त्याच वर्षाअखेरपर्यंत तिचे 3.5 मिलियन सबस्क्रायबर झाले. ते आता दुपटीने वाढले आहेत.
बेली म्हणते, "त्यावेळी लोकांकडे काहीच नवं नव्हतं. तेव्हा प्रत्येक जण युट्यूब पाहत होता. लोकांनी माझे व्हीडिओ खूप पाहिले. क्वारंटाईनचा काळ माझ्यामुळे चांगला गेला, असंही मला अनेकांनी त्यावेळी म्हटलं."
तिच्या करिअरलाही त्यामुळे वेगळी दिशा मिळाली. आता ती डार्क हिस्ट्री सिरीज करते. याबाबत नेटफ्लिक्ससोबत तिने एक करारही केला आहे. चॅनल मोठं झाल्यामुळे आपली जबाबदारी वाढल्याचंही ती म्हणते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








