You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केनियात शाळेला आग लागून 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू
केनियाच्या एका शाळेत आग लागल्यामुळे किमान 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. गुरुवारी (5 सप्टेंबर) रात्री न्येरी गावात असलेल्या 'हिलसाइड एंडराशा अॅकेडमी' या शाळेला आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण अनेक मुलं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे एक खासगी बोर्डिंग स्कूल होतं. तिथे 6 ते 14 वर्षं वयोगटातली मुलं शिकतात. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इथे कमीत कमी 800 मुलं शिकतात.
आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग लागल्याचं कळताच स्थानिक लोक मदतीला धावले कारण रस्त्यावर चिखल असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना तिथे जाण्यास अडचणी येत होत्या.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्थानिक वेळेनुसार रात्री अकरा वाजता आग लागली.
स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, एका फोनमुळे त्यांना जाग आली होती. त्यांना या घटनेची माहिती मिळल्यावर ते इतरांबरोबर मुलांना वाचवण्यासाठी गेले.
“आग कुठून लागली कोणालाही कळलं नाही. पण आम्ही जवळजवळ 2000 लोक त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.” असं सॅमसन म्वेमा म्हणाले.
“आम्हाला काही मुलं पलंगाखाली दिसली. त्यांना आम्ही वाचवण्यात यशस्वी ठरलो. काही मुलं सापडली नाहीत,” असंही ते म्हणाले.
ही शाळा त्यांच्या भागातील सर्वोत्तम शाळा असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्राध्यक्ष विलियम रुटो यांनी ही घटना अतिशय भयानक आणि विनाशकारी असल्याचं सांगून चौकशीचे आदेश दिले आहे.
या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले.
“चौकशीचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्यास गृहमंत्रालयाला सांगण्यात आलं आहे,” ते पुढे म्हणाले.
पोलिसांचे प्रवक्ते रेसिला ओनियांगो यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की जे मृतदेह मिळाले ते इतके जळले होते की ओळख पटवणं कठीण झालं होतं.
बचावकार्य पूर्ण होईपर्यंत आणखी मृतदेह मिळण्याची शंका त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, ही आग लागल्यानंतर आजूबाजूला असलेल्या सेंट पीटर्स क्लेवर्स बॉईज सेकंडरी स्कूल आणि माइनी बॉइज सेकंडरी स्कूलच्या मुलांना घरी जाण्यास सांगितलं.
रेड क्रॉस समितीने बीबीसीला सांगितलं, की त्यांनी शाळेत एक तात्पुरतं ट्रॉमा सेंटर उघडलं आहे. या संस्थेतर्फे 59 मुलांना समुपदेशन देण्यात येत आहे आणि माऊंट केनिया हॉस्पिटलमध्येही समुपदेशन देण्यात येईल.
ज्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना काल रात्री घरी नेलं त्यांनी माऊंट केन्या रुग्णालयात समुपदेशनासाठी बोलावलं आहे. अशी बातमी केनियाच्या 'नेशन' या वृत्तपत्राने बातमी दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)