कोरोना व्हायरस : केनियाने मदत म्हणून भारताला चहा, कॉफी, शेंगदाणे पाठवले कारण...

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

केनियन माणूस मुळातच अगत्यशील आहे. तुम्ही घरी गेलात तर हाताला धरून जेवायला बसवणार (माझ्यासारख्या शाकाहारी व्यक्तीची पंचाईत). नाहीच जेवलात तर कमीत कमी मोठा कप भरून चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही.

मागच्याच वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात बीबीसीच्याच 'द शी वर्ल्ड' या शोचं काम पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी मी केनियाची राजधानी नैरोबीत गेले होते, त्यावेळी मला अनेकदा हा अनुभव आलाय आणि तुम्ही त्यांच्या घरी गेला नाहीत तर त्यांना वाईटही वाटतं बरका (अगदी आपल्यासारखं).

त्यामुळे केनियाने भारताला कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत मदत देऊ केली यात काहीच नवीन नाही.

आता म्हणाल मुद्दा काय, तर अभिनंदन! तुम्ही सोशल मीडियावर पडीक नसता. कारण सोशल मीडियावर एव्हाना केनियाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट फिरायला लागल्यात.

तर त्याचं झालं असं की कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी झुंजणाऱ्या भारताला अनेक देशांनी मदत देऊ केली. अमेरिका, यूके, रशियासारख्या देशांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, वैद्यकीय सामग्री आणि औषधांची मदत दिली. पण केनियाने मात्र एक गोड भेट पाठवली.

केनियाने भारताच्या रेड क्रॉस सोसायटीला या कठीण काळात मदत दिलीये. काय होतं या मदतीत? सहा टन चहा, तीन टन कॉफी आणि तीन टन शेंगदाणे.

याचा कोव्हिडशी काय संबंध म्हणाल तर तेही त्यांनी छान समजावून सांगितलंय.

केनियाच्या सरकारने म्हटलंय की, "या कठीण काळात आम्ही भारताचं सरकार आणि भारताची लोक यांच्याबरोबर उभे आहोत. काही देश भारताला वैद्यकीय सामग्रीची मदत देत आहेत हे आम्ही पाहिलं. पण आम्ही एका विशिष्ट वर्गासाठी मदत पाठवत आहोत. ते म्हणजे फ्रंटलाईनवरचे आरोग्य कर्मचारी. ते लोक दिवसरात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आराम न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या धावपळीतून दोन क्षण विश्रांतीचे मिळावे, कपभर चहा पिऊन त्यांनी फ्रेश व्हावं म्हणून आम्ही हे पॅकेज पाठवत आहोत."

दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून दृढ संबंध आहेत आणि ते या पॅकेजव्दारे आणखी घट्ट व्हावेत, असंही केनियाच्या सरकारने म्हटलं आहे.

भारत आणि केनियात इतर वेळी वैद्यकीय सामग्रीची देवाण-घेवाण होत असते. खरंतर भारताकडूनच केनियाला आरोग्यसुविधा पुरवल्या जातात. हा देश औषधांच्या बाबतीतही भारतावर निर्भर आहे. याचीही आठवण काढत केनियन सरकारने म्हटलं की, "आम्ही देऊ केलेली मदत म्हणजे भारताने आजवर केनियाला पुरवलेल्या उत्तम आरोग्यसुविधेबदद्ल आमच्या मनात असलेल्या कौतुकाचं प्रतिबिंब आहे."

सोशल मीडियावर कौतुक

केनियाच्या या मदतीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा ओघ सुरू आहे. काही मोजक्या व्यक्तींनी केनियासारख्या गरीब देशाने दिलेल्या मदतीची थट्टा केली असली तरी अनेकांनी याला महाभारतातल्या सुदाम्याने कृष्णाला दिलेल्या भेटीची उपमा दिली आहे.

#दानशूरकेनिया हा हॅशटॅगही सोशल मीडियावर फिरतोय.

राजीव शुक्ला या अकाऊंटवरून लिहिलेल्या हिंदी पोस्टचा मराठी अनुवादही बराच व्हायरल झालाय.

या पोस्टमध्ये केनियाने अमेरिकेला केलेल्या मदतीचा उल्लेख आहे. पण हे खरंच आहे का? खरंच केनियाने अमेरिकेला मदत म्हणून गाई दिल्या होत्या का? त्याबद्दल पुढे बोलूच. पण केनियाच्या या मदतीचा काय अर्थ आहे आधी हे जाणून घेऊ.

लहानशी पण धोरणी भेट

कोरोना व्हायरसच्या काळात केनियाने अशा प्रतिकात्मक भेटी पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही केनियाने युकेतल्या आरोग्यसेवकांसाठी फुलं पाठवली होती.

मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना व्हायरसने युकेत थैमान घातलं होतं. तेव्हा तिथल्या हेल्थवर्कर्सचं मनोबल उंचावण्यासाठी केनियाने 300 फुलांचे गुच्छ पाठवले होते. या फुलांना 'आशेची फुलं' असं नाव दिलं होतं.

पण यामागे एक धोरणी विचारही होता. केनिया जगातल्या फुलं निर्यात करणात अग्रेसर असणाऱ्या देशांपैकी एक आहे. युके केनियातून सर्वाधिक फुलं आयात करतं. अशात फुलांची भेट पाठवणं म्हणजे सदिच्छा भेट तर आहेच, पण त्याबरोबरीने आपले व्यापारी संबंध जपण्याची युक्ती आहे, असंही अनेकांना वाटतं.

एस्थर अकेलो बीबीसी न्यूज आफ्रिकेच्या प्रतिनिधी आहेत. त्या म्हणतात, "मुळात समोरच्या माणसाला आपल्यातलं काही देणं ही आफ्रिकन देशांची संस्कृती आहे. केनियाचा माणूस वेळ पडली तर कमरेचं वस्त्र काढून समोरच्याला देईल. संकटांत आपल्या परीने जितकं शक्य आहे तितकी समोरच्याची मदत करायची वृत्ती तुम्हाला आफ्रिकन देशात दिसेल.

कोरोनाच्या संकटात आम्ही ऑक्सिजन किंवा वैद्यकीय सामग्री तर दुसऱ्यांना देऊ शकत नाही कारण त्या गोष्टींची आमच्याच देशात कमतरता आहे सध्या, पण आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी वस्तू नक्कीच देऊ शकतो. पण केनियाच्या या सदिच्छा भेटींमागे एक धोरणी विचारही आहे. केनिया फुलं, चहा अशा गोष्टी सर्वाधिक निर्यात करतो. अशा सदिच्छा भेटींमुळे समोरच्याला हेही सांगता येतं की वाईट काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्याची चर्चाही होते."

अमेरिकेला खरंच गाई दिल्या होत्या?

आता येऊया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या केनियाचे मसाई लोक, त्यांच्या गाई आणि अमेरिका या गोष्टीकडे. ही खरी गोष्ट आहे का? तर हो असं खरंच झालं होतं.

या गोष्टीची सुरूवात होते किमेली नायोमाह या केनियात जन्मलेल्या पण 11 सप्टेंबरचा हल्ला झाला त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापासून.

किमेली मुळचे मसाई जमातीतले आणि त्यांचं गाव आहे केनिया-टांझानियाच्या सीमेवर. या हल्ल्यानंतर किमेली जेव्हा पहिल्यांदा आपल्या गावी आले तेव्हा त्यांनी या हल्ल्याचं वर्णन केलं. गावात राहाणाऱ्या मसाई लोकांनी तोवर ना वीज पाहिली होती, ना टेलिफोन ना आधुनिक दळणवळणाची साधनं.

तोवर हा हल्ला होऊनही कित्येक महिने उलटून गेले होते.

आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या दोन इमारतींवर हवेत उडणारी विमानं आदळतात काय, त्यातून आगीचे लोळ उठत त्या दोन्ही इमारती जमीनदोस्त होतात काय... हे सगळंच मसाई लोकांसाठी नवीन होतं.

पण एक भावना मात्र शाश्वत होती, ती म्हणजे दुसऱ्याला संकटात सहानुभूती दाखवण्याची.

याच भावनेतून मसाई लोकांनी अमेरिकेला 12 गाई दान देण्याचं ठरवलं.

मसाई लोकांमध्ये गाईंना प्रचंड महत्त्व आहे आणि म्हणूनच गाई दान करणं याला खूप महत्त्व आहे.

या गावातल्या लोकांनी मिळून 14 गाई जमा केल्या आणि त्या अमेरिकेला मदत म्हणून द्यायचं ठरवलं. ती मदत स्वीकारली अमेरिकेच्या दुतावासाचे उप-मुख्याधिकारी विल्यम ब्रान्सिक यांनी.

या गोदानाचा रीतसर कार्यक्रम 2002 साली म्हणजेच अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर एक वर्षांनी पार पडला. या दिवशी गावातले मसाई लोक गोळा झाले, पारंपरिक लाल रंगाचे कपडे त्यांनी घातले होते.

"अमेरिकेच्या लोकांनो, तुम्हाला मदत म्हणून आम्ही या गाई देतोय," असं लिहिलेले फलक मसाई लोकांनी हाती घेतले होते.

या कार्यक्रमानंतर किमेली यांनी रॉयटर्सला सांगितलं होतं की, "आमचे लोक शूर आहेत, लढवय्ये आहेत पण तितकेच कनवाळूही आहेत."

या गाई म्हणजे रिपब्लिक ऑफ केनियाने अमेरिकेला 9/11 नंतर दिलेली एकमेव आणि अधिकृत मदत होती.

या गाई मात्र अमेरिकेला नेल्या नाहीत. जवळच्याच स्थानिक बाजारात विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून रंगीत मणी विकत घेतले. मसाई महिलांनी त्यांचे दागिने तयार केले. हे दागिने न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)