सत्ता आपल्याच हातात राहावी म्हणून घरातल्यांना तिकीट; मतदारांनी कुणाला स्वीकारलं, कुणाला नाकारलं?

विजयी उमेदवार धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे (डावीकडे), शिवाजीराव मोघे यांच्या सूनबाई प्रियंका मोघे (मध्यभागी), मंत्री गिरिश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन (उजवीकडे)

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, विजयी उमेदवार धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे (डावीकडे), शिवाजीराव मोघे यांच्या सूनबाई प्रियंका मोघे (मध्यभागी), मंत्री गिरिश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन (उजवीकडे)
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

पण, याच भाजपनं घराणेशाहीतून आलेल्या अनेक उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं. तसेच काही आमदारांनी छोट्या शहरांची सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली होती.

या घराणेशाहीला मतदारांनी नेमका काय कौल दिला? पाहुयात.

काही आमदार आणि मंत्र्यांच्या पत्नींच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली, तर काहींना मात्र मतदारांनी नाकारलं, तर काही आमदारांच्या पत्नी आधीच बिनविरोध निवडून आल्या.

या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलं

भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भुसावळमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण, सावकारे यांना स्वतःच्या पत्नीची जागा जिंकून आणता आली नाही.

अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे यांना सुद्धा दर्यापूर नगरपरिषदेच्या मतदारांनी नाकारलं असून त्यांना काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे यांनी पराभूत केले. इथं दोघी जावांमध्ये लढत झाली होती.

भाजप आमदार हरीष पिंपळे यांचे मोठे बंधू भूपेंद्र पिंगळे यांना मूर्तिजापूरमध्ये मतदारांनी नाकारलं आहे.

शिंदेसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांचा देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पराभूत झाल्या.

फोटो स्रोत, facebook/Sanjay Sawkare

फोटो कॅप्शन, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पराभूत झाल्या.

भाजपनं नांदेड जिल्ह्यात लोहा नगरपालिकेत एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिली होती.

यामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांचादेखील पराभव झाला.

बदलापूर नगरपालिकेत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी मिळाली होती.

यापैकी तिघांचा पराभव झाला असून तिघांना मतदारांनी स्वीकारलं आहे. वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून इथं भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या भाजपच्या तिकीटावर देवळी नगरपरिषदेतून निवडणूक लढवत होत्या. पण, त्यांनाही मतदारांनी नाकारलं आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ यांचा संगमनेर इथं पराभव झाला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा यश लवटे यांचा अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. इथं भाजपचा उमेदवार निवडून आला.

'या' मंत्री-आमदारांनी शहरं ठेवली ताब्यात

महायुतीतील काही मंत्र्यांचे नातेवाईक याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेर नगराध्यक्षपदी आधीच बिनविरोध निवडून आल्या.

भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेतून बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून सेहरनिदा मुश्रीफ या कागल नगरपालिकेतून नगराध्यक्षपदासाठी आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

मंत्री गिरिश महाजन पत्नी साधना महाजन यांच्यासह

फोटो स्रोत, Girish Mahajan/Facebook

भाजपचे मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके यांना यवतमाळच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांच्या गळ्यात खामगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची माळ पडली आहे.

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसदच्या नगराध्यपदी निवडून आल्या आहेत. इथं गेल्या अनेक वर्षांपासून नाईक घराण्याची सत्ता आहे.

धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी सुद्धा चाळीसगावची सत्ता राखली असून त्यांच्या गळ्यात नगराध्यपदाची माळ पडली आहे.

भाजप आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल शिरपूर नगरपरिषदेवर नगारध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी इथल्या नगरपरिषदेवर नगराध्यपदी निवडून आले.

यवतमाळ नगराध्यक्षपदी प्रियदर्शनी उईके विजयी

फोटो स्रोत, facebook/Ashok Uike

फोटो कॅप्शन, यवतमाळ नगराध्यक्षपदी प्रियदर्शनी उईके विजयी

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या बुलढाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. याआधी त्या या नगरपरिषदेच्या अध्यक्ष होत्या.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्नी सुनिता यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवलं होतं. त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला आहे.

अंबाजोगाईच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे या गंगाखेड नगरपरिषदेतून निवडून आल्या असून स्वतः धनंजय मुंडे त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी गेले होते.

संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

फोटो स्रोत, facebook/Abdul Sattar

फोटो कॅप्शन, संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या भावजय रेखा बांगर या हिंगोली नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यानंतर आमदार बांगर यांनी शहरात मिरवणूक काढली होती.

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले.

संगमनेरमध्ये डॉ. मैथिली तांबे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून त्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी आहेत. सत्यजीत यांच्या आई दुर्गाबाई तांबे या देखील नगराध्यक्ष होत्या.

पंढरपूरचे आमदार भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिती भालके या नगराध्यपदी निवडून आल्या आहेत.

राजुराचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा भाऊ अरुण धोटे राजुरा नगराध्यक्षपदी निवडून आला आहे. याठिकाणी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची आघाडी होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.