'आमच्याकडे घराणेशाही नाही', असं म्हणणाऱ्या पक्षानं नगरपालिका निवडणुकीत नेमकं काय केलं?

गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्यात 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

या निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी घराणेशाहीचा जोर दिसत आहे. अनेक नेत्यांनी आपल्याच घरात सत्ता ठेवण्यासाठी नातेवाईकांनाच तिकीट दिले आहेत. काही जण तर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

नेमक्या कोणकोणत्या मतदारसंघात घराणेशाही राबवण्यात आली? जाणून घेऊयात.

या 8 मंत्र्यांच्या नातेवाईकांना संधी

घराणेशाही जोपासण्यात आणि आपल्या शहराची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक आमदार या निवडणुकीत पुढे आलेले आहेत. अनेक आमदारांनी स्वतःच्या पत्नीलाच नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. फक्त आमदारच नाही, तर मंत्रीही सत्ता आपल्याच घरात आली पाहिजे यासाठी कसून प्रयत्न करताना दिसत आहेत.

1. यात पहिलं मोठं नाव म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचं आहे. गिरीश महाजन यांनी त्यांची पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.

विशेष म्हणजे त्या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून देखील आल्या. या नगर पालिकेत शिंदे सेनेकडून उमेदवार उतरवण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी त्या उमेदवारानं भाजपकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दबाव टाकून महाजन यांनी पत्नीला निवडून आणलं, अशी टीका विरोधकांनी केली.

त्यावर गिरीश महाजन उत्तर देत म्हणाले, "आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही किंवा आमच्याकडे या असं म्हणालो नाही. साधना महाजन गेल्या 7 टर्मपासून निवडून येत आहेत. आमचा हा बालेकिल्ला आहे."

साधना महाजन आणि गिरीश महाजन

फोटो स्रोत, Girish Mahajan/Facebook

2. दुसरंही नाव येतं ते जळगाव जिल्ह्यातूनच. भुसावळचे भाजप आमदार आणि मंत्री संजय सावकारे यांनी सुद्धा पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवलं आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

3. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्या मुलीला यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं आहे. त्यांची मुलगी प्रियदर्शनी उईके नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे निवडणूक लढत आहेत.

4. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सून सेहरनिदा मुश्रीफ या कागल नगरपालिकेतून नगराध्यपदासाठी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

5. राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी नाईक घराण्यातली तिसरी पिढी आता मैदानात उतरली आहे. याआधीही नाईक घराण्याकडे नगराध्यक्षपद होतं.

6. भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपलिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आल्या आहेत. इथे भाजपचे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

7. भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिकीट मिळालं आहे. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

8. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर ते बिनविरोध निवडून आले.

घराणेशाही नाही, असं म्हणणाऱ्या पक्षाची काय स्थिती?

भाजपमध्ये घराणेशाही नाही असा दावा भाजप नेते नेहमीच करतात. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी, सुना आणि नातेवाईकांना तिकीट मिळालं आहे. यामध्ये भाजपसह इतर पक्षांचे आमदारही मागे नाहीत.

1. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्नी नलिनी भारसाकळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार भारसाकळे यांचे भाऊ सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजे एकाच घरात दोन उमेदवार आहेत.

2. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेसाठी भाजप आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी मिळाली आहे.

3. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना भाजपनं चाळीसगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले आहे.

भाजपचा झेंडा (संग्रहित)

फोटो स्रोत, ANI

4. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपरिषदेसाठी भाजप आमदार अमरीश पटेल यांचे चिंरजीव चिंतन पटेल यांना भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

5. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याणशेट्टी यांना तिकीट मिळाले आहे.

6. भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे मोठे बंधू भूपेंद्र पिंपळे यांना भाजपनं मूर्तिजापूर नगरपरिषदेतून नगरसेवक पदासाठी तिकीट दिले आहे.

ही झाली "आमच्या पक्षात घराणेशाही नाही", असा दावा करणाऱ्या भाजप आमदारांच्या नातेवाईकांची यादी, ज्यांना निवडणुकीत संधी मिळाली आहे. मात्र, इतरही पक्षातील नेतेही याच मार्गावर आहेत. त्यांनी सुद्धा घराणेशाही राबवून शहराची सत्ता आपल्याच हातात राहील अशी सोय केली आहे.

इतर पक्षातील नेत्यांची घराणेशाही

1. बुलढाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्नी पूजा गायकवाड यांना बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. यापूर्वीही त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे.

2. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील ठाकरेसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली आहे.

3. भंडारा नगरपालिकेत शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

4. तुमसर नगरपरिषदेसाठी माजी आमदार यू. व्ही. डायगव्हाणे यांची मुलगी कल्याणी भुरे यांना शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. कल्याणी यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला.

5. साकोली नगर परिषद – भाजपने माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांची सून देवश्री मनिष कापगते यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.

संजय गायकवाड (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Facebook

6. विटा नगर परिषदेसाठी भाजप व शिवसेना शिंदे पक्षांमध्ये थेट लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचे सख्खे भाऊ अमोल बाबर हे नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत.

अमोल बाबर हे प्रभाग 9 मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवत असून ते विटा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक देखील आहेत.

7. ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी महायुतीकडून विश्वनाथ डांगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डांगे हे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव आहेत.

काही महिन्यांपूर्वीच अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपामध्ये परतले होते. त्यांचा मुलगा विश्वनाथ डांगे यांना भाजपाकडून ईश्वरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.

8. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

9. नंदुरबारमध्ये शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

10. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेत माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.

11. संगमनेरमध्ये नगराध्यपदासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ निवडणूक लढवत आहेत.

12. अनगर – माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.

13. फलटण – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा अनिकेतराजे नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

14. वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदेत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.

घराणेशाहीबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

आधी काँग्रेसमध्ये घराणेशाही दिसत होती. पण, आता या निवडणुकीत भाजपमध्येही घराणेशाही दिसत आहे. काँग्रेसचं झालं तेच भाजपचं झालंय, असं राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांना वाटतं.

ते म्हणतात, "आधी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका व्हायची. भाजप सत्तेत नव्हते, त्यामुळे घराणेशाही दिसायची नाही. मात्र, आता गेली 15 वर्षे ते सत्तेत आहेत. सत्तेत बऱ्यापैकी रुळलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्येही आता घराणेशाही वाढताना दिसतेय."

"त्यांना वरच्या पातळीवर थेट घराणेशाही दाखवता येत नाही. पण, खरी सत्ता राबवली जाते ती खालच्या पातळीवर. आता तिथे घराणेशाही राबवून त्यांना सत्ता हाती राखायची आहे. राजकारण इतकं बेभरवशाचं झालंय की कोणावरही विश्वास टाकता येत नाही."

"तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट केंद्रातूनही निधी येतो आणि राज्यातूनही निधी मिळतो. या निधीवर आपल्याच घराचा हक्का राहायला हवा यासाठी आमदार प्रयत्न करतात. आता लोकांनीच त्याचा प्रतिकार करायला हवा," असं मत राजेंद्र साठे व्यक्त करतात.

व्हीडिओ कॅप्शन, घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपच्या पहिल्या यादीत अनेक नेत्यांचे नातेवाईक

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. इथं अनेकांना संधी मिळायला हवी. पण, याआधी अनेकदा नगराध्यक्ष असलेल्या महिलांना, नेत्यांच्या नातेवाईकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे तळागाळातील नेतृत्व किंवा कार्यकर्ते कसे पुढे येतील? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पण, आताच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. कार्यकर्ता विरोधात वागला की थेट त्याला निधी मिळणार नाही, असं सांगितलं जातं. तसेच बंडखोरांना कसं संपवायचं हे सत्ताधारी भाजपला माहिती आहे, असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

ते म्हणतात, "महाराष्ट्र कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं सगळीकडे कौतुक होत होतं. पण, आता त्याचं स्वरुप बदललं आहे. आता आपल्या राज्यात कार्यकर्त्यांना पुरेसा सन्मान मिळत नाही. भाजपनं काही नगरपालिका बिनविरोध मिळवल्या आहेत. जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आणि विरोधक कुठेच नाही असं भाजपला दाखवायचं आहे जेणेकरून विरोधकांचं मनोधैर्य कमी होईल."

"गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाह म्हणाले होते की, भाजपला कुबड्यांची गरज नाही. सध्या भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कुबड्यांच्या आधारेच सत्तेत आहे. पण, त्यांचा 2029 पर्यंत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त नगरसेवक, नगरपालिका आपल्या हातात असतील, तर पुढे येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप करताना बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढतो. त्यासाठीही जास्तीत जास्त नगरपालिका मिळवण्याचा हेतू असावा," असंही मत ते व्यक्त करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)