'आधारच गेला तर जगून काय करू?', वाघाच्या हल्ल्यात 10 महिन्यात 45 मृत्यू; मानव-वन्यजीव संघर्षामागची 4 प्रमुख कारणं

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
(इशारा - या लेखामध्ये देण्यात आलेली काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)
"आम्ही दोघंच राहत होतो. मुलं नाहीत आम्हाला. ते बैलं घेऊन वावरात गेले तर घरी परतलेच नाही. माझा आधारच निघून गेला. आता जगायचं कसं? वावरात एकटं जायचं कसं? घरात एकटं राहायचं कसं? रात्रभर झोप येत नाही. फक्त डोक्यात विचार फिरत असतात. माझा नवराच सगळी कामं करायचा. आता मी एकटी पडले. जगून काय करू?"
तुराट्यांनी (तुरीच्या वाळलेल्या काड्या) बनवलेल्या आपल्या झोपडीवजा घरासमोर खाटेवर बसून सईबाई पाल आपलं दुःख सांगत ढसाढसा रडू लागल्या.
त्यांचे पती भाऊजी पाल यांचा 15 दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्यांचा पूर्ण मृतदेह सुद्धा मिळाला नाही. ते शेतात गेले असताना वाघानं त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले.
पतीच्या मृत्यूमुळे सईबाई पूर्णपणे खचल्या आहेत. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरीच्या रहिवासी आहेत.
आपलं पुढे कसं होईल? आपल्या शेतीचं कसं होईल? असं शून्यात बघत त्या स्वतःशीच बोलत होत्या. घरी असलेल्या 2 एकर शेतात पिकणाऱ्या भातावर आणि कापसावर दोघंही आपलं पोट भरत होते.
त्यांना राहायला पक्क घरही नाही. तुराट्यांनी बनवलेल्या झोपडीमध्ये दोघंही आपला संसार चालवत होते. पण, वाघाच्या हल्ल्यामुळे त्यांचा संसार आता उद्ध्वस्त झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सईबाईंच्या पतीचा मृत्यू ऑक्टोबर महिन्यात वाघाच्या हल्ल्यात झालेला पहिला मृत्यू आहे. त्यानंतर चेकपिपरी गावापासूनच 1 किलोमीटरवर असलेल्या गणेशपिपरी गावातही एका 45 वर्षीय अल्का पेंदोर यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला.
अल्का शेती, भाजीपाल्याचा धंदा, घर सगळं एकट्या सांभाळायच्या. पण, आता वाघाच्या हल्ल्यात त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानं शेती मोडायचा विचार त्यांचे पती पांडुरंग पेंदोर बोलून दाखवतात.
ते म्हणतात, "घरची करणारी बाईच गेली, तर आता काय करू? मी एकटा कसं सांभाळू? आमचं घरंच बुडालं पूर्ण."
पांडुरंग दुःखातून हळूहळू सावरत आहेत. पण, त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाला आई गेल्याचा धक्का बसला आहे. तो एकटक शून्यात बघत रडत बसलेला आम्हाला दिसला. जेवायची सुद्धा इच्छा होत नसल्याचं तो सांगत होता.
पेंदोर यांच्या घरची परिस्थितीही सईबाईंच्या घरापेक्षा वेगळी नाही. ते सुद्धा तुराट्यांनी बांधलेल्या झोपडीवजा घरात राहतात. त्यांच्या पत्नीनं भाजीपाला विकून घर बांधायची हिम्मत दाखवली. पण, घराचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्यांना वाघानं ठार मारलं.
वाघामुळे चंद्रपुरातील अनेक गावं दहशतीत
चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 8 दिवसांत 4 जणांचा बळी वाघानं घेतला आहे. त्यामुळे 4 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. वाघामुळे इथले गावकरी दहशतीत आहेत.
आम्ही गणेशपिपरी गावात पोहोचताच लोक जमले आणि आपल्या समस्या मांडू लागले. आमचा कापूस फुटलेला आहे. तो कधी वेचायचा? धानाकडे कोणी लक्ष द्यायचं? आता वाघामुळे वावरात जायचं नाही तर खायचं काय? रात्री बाथरुमसाठी सुद्धा घराच्या बाहेर पडायची हिम्मत होत नाही असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

सईबाई यांच्या पतीवर हल्ला झाला तेव्हापासून चेकपिपरी आणि गणेशपिपरी या दोन्ही गावातील लोकांनी शेतात जाणं बंद केलं.
"घरातून बाहेर पडायला शरीर थरथर कापते. पोराला-सुनेला मी वावरात जाऊ देत नाही. मी म्हातारी आहे तर गेली तर ठिक आहे. पण, उद्या वाघाच्या हल्ल्यात माझा लहान नातू जाईल, सून जाईल, पोरगा जाईल तर आम्ही करायचं काय? सरकारनं आपल्या वाघाला घेऊन जावं आणि आमच्या जीवाची काळजी करावी," अशी भीती गणेशपिपरी गावातल्या पार्वती कुबडे बोलून दाखवतात.
वाघाला पकडण्यासाठीचे पिंजरे बंद अवस्थेत पडलेले
तर चेकपिपरी गावातल्या तृतीयपंथी कार्यकर्त्या निधी चौधरी यांनी वेळोवेळी वाघाच्या दहशतीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोंडपिपरीमध्ये 7 तासांचं आंदोलन सुद्धा झालं.
त्या वनविभागावर प्रश्न उपस्थित करत म्हणतात, "आम्ही वनविभागाला म्हटलं की, ते पोलिसांत जातात आणि सांगतात आम्हाला गावकरी धमक्या देतात. आमच्या जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही वाघाला पकडू शकत नसलात, तर ग्रामस्थांना तसं सांगा. ते काय करायचं ते पुढे करतील."
"नाहीतर शेतकऱ्यांना एकरी 4 लाख रुपये द्या, ते घरीच बसतील. वनविभागाचे लोक बाहेर बाहेर चकरा मारत वाघाला पकडण्यासाठी फिरतात. अशानं वाघ भेटणार आहे का? इतक्या दाट पराटीत ढोर दिसत नाहीत, तर वाघ दिसणार आहे का?" असा प्रश्न निधी चौधरी विचारतात.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही 31 ऑक्टोबरला या गावांमध्ये गेलो तेव्हा सुद्धा वाघ तिकडेच फिरत होता. एसटी महामंडळाची बस चेकपिपरी गावाहून परत आली तेव्हा त्यांना वाघ दिसल्याचं ते सांगत होते.
तसेच त्याच्या दोन दिवसांपूर्वीच रस्त्याच्या एका बाजूनं उडी मारत दुसऱ्या बाजूला वाघ जाताना प्रकाश कुबडे या शेतकऱ्यानं बघितला. त्यानंतर त्यांनी गावाकडे पळ काढला.
तोच वाघ चेकपिपरी गावाजवळच एका घराच्या मागे सकाळच्या सुमारास बसलेला होता. त्याचे पगमार्क सुद्धा तिथे आम्हाला दिसले. त्यानंतर वनविभागानं वाघाला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरे लावले. पण, ते पिंजरे सुद्धा बंद अवस्थेत पडलेले दिसले. मग त्यामध्ये वाघ जाणार तरी कसा? असा प्रश्न आहे.
वाघाच्या हल्ल्यात 10 महिन्यात 46 मृत्यू
चंद्रपुरात फक्त याच भागात वाघाची दहशत आहे असं नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील गावंच्या गावं वाघांच्या दहशतीत जगत आहेत. कारण, वाघांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑक्टोबर महिन्यात 8 दिवसांत वाघाच्या हल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 34 मृत्यू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तसेच केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, वाघाच्या हल्ल्यात 2020-2024 या 5 वर्षांच्या काळात 378 मृत्यू झाले. यापैकी 218 मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
मग महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातच इतका टोकाचा मानव-वन्यजीव संघर्ष का आहे? यामागे नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊयात.
मानव-वन्यजीव संघर्ष टोकाचा असण्यामागची 4 महत्त्वाची कारणं
तर वाघांची झपाट्यानं वाढलेली संख्या, त्या तुलनेत कमी झालेलं वाघांचं खाद्य, डिस्टर्ब झालेले वाघांचे कॉरीडॉर आणि वाघांच्या संख्येमुळे निर्माण झालेला अधिवासाचा प्रश्न अशी प्रमुख 4 कारणं तज्ज्ञ सांगतात.
जगात सर्वाधिक वाघ असणारा चंद्रपूर जिल्हा
मानव-वन्यजीव संघर्षाचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे वाघांची वाढलेली संख्या. जगातील एकूण वाघांच्या 75 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. यापैकी सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात असून वाघांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. पण, यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
जिल्हानिहाय विचार केला, तर चंद्रपूर जगातील वाघांची सर्वाधिक घनता असणारा जिल्हा आहे, असं टायगर स्टेटस रिपोर्ट 2022 मध्ये म्हटलंय. वनविभागाच्या रेकॉर्डनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 208 वाघ आहेत.

पण, 2022 नंतर ही संख्या वाढली असून 2026 ला होणाऱ्या व्याघ्रगणनेत ही संख्या जवळपास 300 च्या वर जाईल असं वनविभागाचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर बोलून दाखवतात. तसेच चंद्रपूर वाघाच्या बाबतीत आपलं जागतिक स्थान कायम राखेल अशी आशाही वनविभागाला आहे.
पण, हीच वाघांची वाढलेली संख्या लोकांच्या जीवावर उठली आहे. ऑक्टोबर महिन्यात गोंडपिपरी या परिसरात झालेला वाघाचा हल्ला हा पहिलाच होता.
या परिसरातल्या लोकांनी कधीही वाघानं माणसांवर हल्ला केल्याचं बघितलं नव्हतं. म्हणजे ज्या परिसरात लोकांनी कधी हल्लेच बघितले नाही त्या परिसरातही आता वाघाचे हल्ले बघायला मिळत आहेत.
वाघांचं भक्ष्य कमी झालं
पण, इतके हल्ले का वाढले? इतका टोकाचा संघर्ष का होतो आहे? तर वाघांची संख्या वाढली, पण वाघाला खाद्य म्हणून लागणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढलेली नाही, असं तज्ज्ञ सांगतात.
सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीजचे सीनियर फिल्ड कॉन्झर्वेशनिस्ट इमरान सिद्दीकी म्हणतात, "महाराष्ट्रात ताडोबा आणि आजूबाजूच्या परिसरात वाघांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. पण, ही संख्या सस्टेनेबल नाही. कारण, वाघांच्या संख्येच्या तुलनेत त्याला खाद्य म्हणून लागणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढलेली नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"एका वाघाचं वर्षाचं खाद्य म्हणून 50 प्राणी लागतात. त्या तुलनेत वाघाला लागणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढायला पाहिजे. त्यामुळे हे वाघ शिकारीच्या शोधात जंगलाबाहेर पडून पशूधनाकडे येतात आणि माणसांवर हल्ला करतात," असं ते सांगतात.
वाघासाठी शिकारीची कमतरता असून नवेगाव नागझिरा आणि मेळघाटसारख्या परिसरात जिथं वाघांची संख्या कमी आहे तिथं वाघांसाठी शिकारी प्राणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला सुद्धा या टायगर स्टेटस रिपोर्टमध्ये दिलेला आहे.
वाघांचे डिस्टर्ब झालेले कॉरीडॉर
वाघांची संख्या वाढत असेल तर तिथून वाघ आजूबाजूच्या जंगलात जाणं सुद्धा अपेक्षित असतं. त्यासाठी वाघांचे कॉरीडॉर खुले असायला हवे.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारीच गडचिरोलीचं घनदाट जंगल आहे. पण, तिकडे वाघ जात नाहीत. कारण, वाघांचे कॉरीडॉर नष्ट होत असल्याचं टायगर स्टेटस रिपोर्टममध्ये म्हटलंय.
वनाधिकारीही कॉरीडॉरवर परिणाम झाला असल्याचं मान्य करतात.
'मध्य प्रदेशात वाघांची संख्या जास्त असूनही मानव-वन्यजीव संघर्ष कमी'
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी, रस्त्यांचे बांधकाम, रेल्वे बांधकाम, मोठमोठ्या धरणांचे बांधकाम यामुळे वाघांचे कॉरीडॉर नष्ट होत असल्याचं इमरान सांगतात. ते म्हणतात, "चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणातील कवल प्रकल्पात वाघ येण्यासाठी मोठा कॉरीडॉर आहे. पण, तिथं महामार्गाचं बांधकाम, धरणाच्या बांधकामामुळे वाघ येऊ शकत नाही."
"वाघांचे कॉरीडॉर डिस्टर्ब आहेत तिथं वनविभागानं प्राण्यांना तेवढा भाग पार करण्यासाठी मदत करावी. वनविभागानं वाघांच्या संख्येपेक्षा त्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं. वाघांना इतर ठिकाणी जाण्यासाठी कॉरीडॉर मोकळे करून द्यावे."
मध्य प्रदेशात वाघांची संख्या जास्त असूनही मानव-वन्यजीव संघर्ष कमी आहे. कारण, त्याठिकाणी वाघांच्या संख्येच्या तुलनेत वाघाचं भक्ष्य सुद्धा वाढतंय, असंही इमरान नमूद करतात.
अधिवासाचा प्रश्न
वाघांची संख्या वाढल्यामुळे वाघांचा अधिवास गुंतागुंतीचा ठरतोय. त्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडून शेतांमध्ये फिरतोय. इतकंच नाहीतर या अधिवासाच्या प्रश्नामुळे आपआपसातील झुंजीमध्ये वाघांचा मृत्यू सुद्धा होतो.
गेल्या मे महिन्यात छोटा मटका आणि ब्रम्हा नावाच्या वाघांमध्ये झुंज झाली होती. यामध्ये ब्रम्हा नावाच्या वाघाचा मृत्यू झाला होता. याआधीही 2024 च्या जानेवारी महिन्यात दोन वाघांचा झुंजीमध्ये मृत्यू झाला आहे. वनविभाग झुंजीमध्ये झालेल्या मृत्यूंची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करत असल्यानं एकूण किती मृत्यू झाले याची आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकार काय करतंय?
आमच्याकडे झपाट्यानं वाघांची संख्या वाढतेय असं सरकार सांगतंय. पण, त्यामधून उद्भवलेल्या मानव-वन्यजीव संघर्षावर सरकार नेमके काय उपाय करतंय?
यावर बीबीसी मराठीनं महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची बाजू जाणून घेतली.
वनमंत्री नाईक यांनी सुद्धा खाणकाम व रस्ते विकास प्रकल्पांमुळे वाघांचे कॉरीडॉर तुटलेले आहेत आणि वाघांचं खाद्य कमी झाल्याचं नमूद केलं. तसेच त्यामुळे ते मानवाच्या दिशेनं येत असल्याची कबुली दिली.
पण, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नेमकं काय धोरण राबवलं जातं याबद्दल त्यांनी 20 गावांमध्ये AI प्रणाली बसवली आहे असं सांगितलं. पण, एआय प्रणाली बसवल्यानंतरही इथं हल्ल्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही.
वाघ आणि मानवाच्या हालचाली अनियमित असतात. तसेच अधिवासाचा ऱ्हास झाल्यामुळे वाघ देखील गावाच्या जवळ येतात तिथं हे तंत्रज्ञान कमी पडत असल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
रस्त्यांचे बांधकाम किंवा इतर विकास प्रकल्पांमुळे वाघांचे कॉरीडॉर नष्ट होत आहेत. त्यामुळे यानंतर येणाऱ्या अशा प्रकल्पांना वनविभाग विरोध करणार का? असा प्रश्नही आम्ही वनमंत्र्यांना विचारला.
त्यावर गणेश नाईक म्हणाले, "खाणकाम आणि रस्ते बांधकामामुळे वन्यजीवांच्या मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. या समस्येमुळे तोडगा म्हणून वनविभागानं स्पष्ट भूमिका घेतली आहे की, वाघांच्या कॉरीडॉरमधून किंवा जवळून जाणारा कुठलाही प्रकल्प कठोर पर्यावरण अटींशिवाय मंजूर केला जाणार नाही."
"असा कोणता प्रकल्प वन्यजीवांच्या हालचालींसाठी धोकादायक असेल, तर वनविभाग हरकीत नोंदवून पर्यायी मार्ग सूचवेल", असंही त्यांनी नमूद केलं.
काही दिवसांपूर्वी सरकारनं एआयद्वारे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून एआय सिस्टम उभारली. पण, त्यानंतरही वाघांचे हल्ले कमी झालेले नाहीत. त्यामुळे इतके पैसे खर्च करून उभारेली यंत्रणा कोणत्या कामाची असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)










