दीड-दोन कोटीत मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा दावा 'ही' कंपनी का करतेय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शेरलॉट लिटन
जर्मनीतील एक स्टार्टअप कंपनी एका आलिशान स्पोर्ट्स कारच्या किंमतीत लोकांना पुनर्जन्म देण्याची ऑफर देत आहे.
मृत्यूला चकवा देत अमर राहण्याचं तंत्रज्ञान माणूस खरंच विकसित करू शकतो का? की हे फक्त एक थोतांड आहे?
बर्लिनमधील एका रहदारीच्या रस्त्यावर लावलेली अगदी खेळण्यातील गाड्यांसारखी दिसणारी एक ॲम्ब्युलन्स मात्र अमरत्व प्रदान करण्यासाठी उभी असल्याचा दावा करते आहे. या ॲम्ब्युलन्सला दोन्ही बाजूंनी केशरी रंगाचे पट्टे आहेत. वरच्या बाजूने छतावरून अनेक वायर बाहेर निघालेल्या दिसत आहेत.
ही ॲम्ब्युलन्स टूमारो.बायो या कंपनीची आहे. युरोपातील ही पहिलीवहिली क्रायोनिक्स लॅब आहे. अत्यंत कमी तापमानात मानवी शरिरावर विविध प्रयोग करून त्याला जिवंत ठेवण्याच्या प्रक्रियेला 'क्रायोजेनिक तंत्रज्ञान' म्हणतात.
"या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मेलेल्या माणसाचं शरीर जपून ठेवणार आहोत. आणि भविष्यात हा मृत शरिराला आम्ही पुन्हा जिवंत करून दाखवणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त 2 लाख डॉलर्स (सुमारे 1 कोटी 73 लाख रुपये) द्यायचे आहेत", असा दावा या स्टार्ट अप कंपनीने केला आहे. अशा पद्धतीने क्रायोनिक्स लॅब बनवून सजवलेल्या या कंपनीच्या तीन रूग्णवाहिका आजघडीला कार्यरत आहेत.
ज्या यंत्रात मानवी अवयव कमी तापमानात जतन करून ठेवले जातात त्या यंत्राला पर्फ्युजन पम्प म्हटलं जातं.
टूमारो.बायोचे सह संस्थापक एमिल केंडझिओरा ॲम्ब्युलन्समधील पर्फ्युजन पम्पाजवळ बसले होते. स्वतःची कंपनी सुरू करण्याआधी एमिल हे कर्करोगावर संशोधन करत होते. पण वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगावरील चालू असलेलं संशोधन अतिशय संथ गतीने पुढे सरकत असल्याबद्दल हताश होऊन त्यांनी ही क्रायोनिक्स लॅब उघडून नवी कारकीर्द सुरू केली.
तसं पाहायला गेल्यास ही काही नवी गोष्ट नाही. जवळपास 100 वर्षांपूर्वी अमेरिकेतील मिशिगन राज्यात जगातली पहिली क्रायोनिक्स लॅब सुरू झाली होती. त्यावेळी अमरत्वाचा पट्टा मिरवणाऱ्या हा क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाबद्दल लोकांची अगदी टोकाची मतं होती.
कोणी याकडे मानवजातीचं भविष्य म्हणून पाहत असे तरी कोणी याची एक अवैज्ञानिक थोतांड म्हणून खिल्ली उडवत असे. आजही क्रायोजेनिक्सबद्दल लोकांची मतं प्रचंड विभागलेली आहेत. पण एमिल यांच्या मते, आज क्रायोजेनिक्सबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आणि रस प्रचंड वाढलेला आहे.

फोटो स्रोत, Charlotte Lytton
या क्रायोजेनिक तंत्रज्ञानाद्वारे मृत मानवी शरीर कमी तापमानात जतन करून ठेवण्याच्या प्रक्रियेला क्रायोप्रिझर्व्हेशन असं म्हटलं जातं.
आतापर्यंत टूमारो.बायो कंपनीनं 3 - 4 लोक आणि 5 प्राण्याचं क्रायोप्रिझर्व्हेशन केलेलं आहे, तर 700 लोकांनी भविष्यात मृत पावल्यावर स्वतःचं शरीर क्रायोप्रिझर्व्ह करण्यासाठी त्यांच्या यादीत ग्राहक म्हणून नाव नोंदवलेलं आहे.
आता या 2025 च्या वर्षात संपूर्ण अमेरिका देशात आपल्या हा व्यवसाय वाढवण्याचा मानस एमिल केंडझिओरा यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.


या क्रायोप्रिझर्व्हेशन प्रक्रियेत आजतागायत कुठलीच मृत व्यक्ती अथवा प्राणी पुन्हा जिवंत झालेली नाही. भविष्यात कधी हे शक्य झालंच तर ती जिवंत झालेली व्यक्ती अथवा प्राण्याचा मेंदू कार्यरत असेल, याची शक्यता फार कमी आहे.
"मानवासारख्या गुंतागुंतीची शारिरीक रचना आणि विकसित मेंदू असलेल्या प्रजातीला मेल्यानंतर पुर्नजीवित करणं शक्यच नाही, हे विज्ञानानं सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे क्रायोजेनिक्सचे पुरस्कर्ते करत असलेले दावे किंबहुना ही सगळी संकल्पनाच निरर्थक आणि हास्यास्पद आहे", असं लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील न्यूरोसायन्सचे प्राध्यापक क्लाइव्ह कोएन म्हणतात.
नॅनो-टेक्नॉलॉजी आणि कोनेक्टोमॉक्सच्या संयुक्त वापराने थेट जीवशास्त्राला आव्हान द्यायला निघालेले क्रायोजेनिक्सचे हे समर्थक निव्वळ हवेतल्या गप्पा मारत असून त्याचं वास्तवाचं भान हरवलं असल्याची स्पष्ट टीका ते करतात.

पण अशा अनेक टीकांचा सामना करूनही टूमारो.बायोचा आत्मविश्वास टिकून आहे. एखाद्या रुग्णानं या कंपनीत ग्राहक म्हणून आपलं नाव नोंदवलं आणि तो रुग्ण आता अखेरच्या घटका मोजत असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्यावर त्यांची ही ॲम्ब्युलन्स या रुग्णाकडे पोहचते. अधिकृतरित्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं जाहीर झाल्यावर या रुग्णाला टूमारो.बायोच्या ॲम्ब्युलन्समध्ये हलवलं जातं. मग त्या रुग्णावर (त्याच्या मृत शरिरावर) क्रायोनिक्स प्रक्रिया सुरू होते.
ही स्टार्टअप कंपनी सुरू होण्याची गोष्ट देखील तितकीच रंजक आहे. अत्यंत कमी तापमानात गोठवणाऱ्या थंडीत हृदय बंद पडल्यानं डॉक्टरांनी मृत घोषित केलेले काही लोक पुन्हा जिवंत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
ॲना बेगनहोल्म हे याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. 1999 साली नॉर्वेमध्ये स्किईंग करताना तिचा अपघात झाला होता. बर्फात अडकून पडल्याने शरिराचं तापमान घटून तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. तिचं हृदय, रक्तप्रवाह आणि इतर सगळीच मानके ती मृत पावल्याकडेच निर्देश करत होते. पण काही तासांनी अचानक बंद पडलेलं तिचं हृदय पुन्हा धडकू लागलं व ती पुन्हा जिवंत झाली.
आता पुढचं तिचं आयुष्य आज अगदी सुखकर चालू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हणून तिला पाहिलं जातं. अशा काही घटनांमधून प्रेरणा घेतच एमिल केंडझिओरानं आपल्या काही सहकाऱ्यांसोबत मिळून टूमारो.बायो ही कंपनी सुरू केली होती.
या क्रायोजेनिक प्रक्रियेत मृत शरिराला शून्यापेक्षा कमी तापमानात गोठवून त्या शरिरात क्रायोप्रोटेक्टिव्ह द्रव्य सोडले जाते. एमिल केंडझिओराची कंपनी या क्रायोनिक्स प्रक्रियेवर काम आणि संशोधन करत आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी ही प्रक्रिया समजावून सांगितली.

फोटो स्रोत, Getty Images
एकदा का शरिराचं तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं की शरीर गोठायला सुरूवात होते. मानवी शरिरात पाण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. इतक्या कमी तापमानात मग शरिरातील पाणी गोठून बर्फाचे खडे तयार होतात. हे बर्फाचे कडे मग ऊतींचं (पेशी संस्था) नुकसान करू शकतात. त्यामुळे आधी शरिरातील सगळं पाणी काढून त्याच्या जागी क्रायोप्रोटेक्टिव्ह द्रव्य शरिरात भरलं जातं. या द्रव्यांना क्रायोप्रोटेक्टिव्ह एजेंट देखील म्हणतात.
हे क्रायोप्रोटेक्टिव्ह एजेंट डिमिथिल सल्फॉक्साईड आणि इथेनाईल ग्यायकॉल या घटकांपासून बनवले जातात. एकदा शरिरातील पाणी काढून त्यात क्रायोप्रोटेक्टिव्ह द्रव्य भरले की मग ठराविक गतीने कमी तापमानात ते शरीर गोठवायला सुरूवात केली जाते. -125 अंश सेल्सिअस पर्यंत अतिशय वेगाने व नंतर -125 ते -196 अंश सेल्सिअसपर्यंत अगदी संथ गतीने शरिराचं तापमान कमी कमी केलं जातं. यामुळे इतक्या कमी तापमानात मृत शरीर कुजत नाही. शिवाय शरिरात पाण्याऐवजी न गोठणारं (कमी तापमानातही द्रव अवस्थेत राहणारं (क्रायोप्रोटेक्टिव्ह एजेंट) असल्यामुळे पेशी संस्थेचं नुकसान होत नाही.
यानंतर मग त्या रुग्णाला टूमारो.बायो कंपनी स्वित्झर्लंडमधील आपल्या स्टोरेज युनिटमध्ये हलवते. एमिल केंडझिओराच्याच शब्दात सांगायचं झाल्यास "इथून पुढे फक्त वाट बघितली जाते."
तो रूग्ण ज्या रोगामुळे मरण पावला आहे त्या रोगावर भविष्यात कधी उपचार शोधला जाईल. उदाहरणादाखल कॅन्सर. मग तेव्हा या गोठवलेल्या शरिरातील क्रायोप्रोटेक्टिव्ह द्रव्य बाहेर काढून पुन्हा पाणी भरून शरिराला पुन्हा जिवंत करून हे उपचार केले जातील. अशा प्रकारे मृत माणसाला पुन्हा आयुष्य जगता येईल, अशी ही सगळी योजना असल्याचं एमिल केंडझिओर सांगतात.
केंडझिओर यांच्या मते या उपचारांचा शोध लागायला 50, 100 किंवा 1000 वर्षही लागू शकतात. पण त्याने काही फरक पडणार नाही. कारण उपचार शोधले जात नाहीत तोपर्यंत हे मृत शरीर अतिथंड तापमानात जशास तसं जतन केलं गेलेलं असेल.

फोटो स्रोत, Charlotte Lytton
क्रायोनिक्सबद्दल माहिती नसणाऱ्या लोकांना मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याची ही कल्पना अतिरंजित किंवा मूर्खपणाचीही वाटू शकते. पण एमिल केंडझिओर यांना मात्र पूर्ण विश्वास आहे की ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. एमिल केंडझिओर यांच्या सिद्धांताला मान्यता देणारी प्रत्यक्ष उदाहरणं मात्र अजून समोर आलेली नाहीत.
आजतागायत क्रायोप्रिझर्व्हेशन करून एकाही माणसाला पुर्नजीवित करता आलेलं नाही. इतकंच काय प्राण्यांबाबतही हा प्रयोग यशस्वी झालाय, असं म्हणता येणार नाही.
नाही म्हणायला एका प्रयोगात ही संकल्पना वापरून एका उंदराच्या मेंदूचं जतन करण्यात आलं होतं. पण त्यावेळी या उंदराच्या हृदयाचे ठोके अजून चालू होते.
एकदा हृदय बंद पडल्यानंतर कुठल्या प्राणी अथवा माणासाला क्रायोनेजिक्स पद्धतीनं पुन्हा जिवंत परत आणलं गेल्याचा प्रयोग आजतागायत तरी यशस्वी झालेला नाही.
ही संकल्पना आज मानवाला हास्यास्पद वाटते. मेलेला माणूस जिवंत करणं शक्यच नाही, असं लोकांना वाटतं. पण वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा जेव्हा काही क्रांतीकारी प्रयोग यशस्वी झाले, त्या आधी लोकांना ते अशक्य आणि हास्यास्पद वाटत असत.
उदाहरणादाखल अवयव प्रत्यारोपण होऊ शकतं, याची आधी कधी माणसाने कल्पनाच केली नव्हती. त्यामुळे एका मानवी शरिरातील ह्रदय काढून ते दुसऱ्या माणसाला बसवता येईल, असं कोणी काही वर्षांपूर्वी बोललं असतं तर सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली असती. पण आज हे वैद्यकीय क्षेत्रातील वास्तव आहे.
अनेक जणांवर आज यशस्वीपणे हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत. क्रायोनिक्सबाबतही भविष्यात हेच होईल, असा एमिल केंडझिओरचा ठाम विश्वास आहे.
एका वैद्यकीय संशोधनातून सी. एलेगन्स या कीटकाचं मेल्यानंतर क्रायोप्रिझर्व्हेशन करून त्याला पुन्हा जिवंत करता येऊ शकतं, असा दावा केला गेला होता. या संशोधनाचा आधार घेत एमिल केंडझिओर क्रायोजेनिक्सचं समर्थन करतात.

फोटो स्रोत, Getty Images
2023 साली मिनिसोटा विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला. यात मेलेल्या उंदरांची किडनी काढून त्यांचं क्रायोजेनिक पद्धतीनं जतन करण्यात आलं. मग काही दिवसांनी या किडनीतील क्रायोजेनिक द्रव्य परत बाहेर काढून त्यांना सामन्य तापमानात तापवून 5 जिवंत उदारांमध्ये या किडनींचं यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं.
किडनी प्रत्यारोपणानंतर 30 दिवसांच्या आत हे उंदीर सुरळीत आयुष्य जगू लागले होते. अशा काही यशस्वी प्रयोगांचा दाखल देत क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाने माणसालाही मेल्यावर पुन्हा जिवंत करता येऊ शकेल, असा दावा आता केंडझिओर करत आहेत.
"क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाला अजूनही विज्ञान क्षेत्रात पुरेशी मान्यता आणि म्हणूनच संशोधनासाठी पुरेसा निधी पुरवला जात नसल्यानं या क्षेत्रात म्हणावी तितकी प्रगती होताना दिसत नाही. कोणी याला गंभीरपणे घ्यायलाच तयार नाही.
क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाचा विकास अजूनही प्राथमिक टप्प्यातच अडकलेला आहे. जर प्रयत्नच केला नाही तरी ही गोष्ट अशक्यच वाटणार. आधी खुल्या मनाने यावर गंभीर संशोधन करण्याची गरज आहे. ते जर का झालं तर आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या जाऊन प्रत्यक्षात येऊ शकेल", असा आशावाद एमिल केंडझिओर व्यक्त करतात.
वैद्यकीय क्षेत्रातील कुठल्याही नव्या संशोधनाप्रमाणेच यात सुरूवातीला अपयश येऊ शकतं. कारण सुरूवातीच्या टप्प्यात सगळं काही प्रायोगिक तत्वावरच होत असतं. त्यामुळे या सुरूवातीच्या अपयशाला घाबरण्याची गरज नाही. त्यावरून हा प्रयोग अशक्यच असल्याचा निष्कर्ष काढण्याची घाई करता कामा नये.
आज कीटक आणि उंदरांवर काही प्रमाणात या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. अजूनही काही लोक हे प्रयोग क्लिष्ट शरिररचना असलेल्या मानवी शरिराला लागू होणार नाहीत, असा नकारात्मक सूर आवळताना दिसतात. माणसांवर झालेले प्रयोग आज अपयशी ठरत असले तरी या दृष्टीने सातत्याने नव्या उर्जेनं काम करत राहण्याची गरज केंडझिओर यांनी व्यक्त केली.
आयुर्मान वाढवण्यासाठी किंवा चिरतरुण राहण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आज संशोधन होत आहे. चांगल्या आरोग्यासह आयुष्य कसं वाढवायचं यासंबंधी उपदेश देणारे पुस्तकं, पोडकास्ट किंबहुना वस्तू आणि औषधांचीही बाजारात प्रचंड रेलचेल दिसते.
कारण लोकांमध्ये या संबंधी बराच रस आणि उत्सुकता आहे. या मागणीसाठी बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. पण तूर्तास तरी दीर्घायुष्यासाठी नियमित व्यायाम आणि चांगला आहार या व्यतिरिक्त तिसरा कोणता ठोस सिद्धहस्त उपाय समोर आलेला नाही.
आज उपचार उपलब्ध नसलेल्या ज्या रोगामुळे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, त्या रोगावर कदाचित उद्या जाऊन उपाय शोधला जाऊ शकतो. तेव्हा हे जतन केलेलं शरीर पुन्हा जिवंत करून रोग्याला रोगमुक्त करता येईल, अशा आशावाद क्रायोनिक्सचे पुरस्कर्ते जागवतात. पण ही सगळी यंत्रणा व्यवस्थित काम करेल, याची कुठलीही शाश्वती नाही. फक्त पोकळ आशावादावर क्रायोजेनिक्सचं भवितव्य अवलंबून आहे.

क्लाईव्ह कोएन यांना तर क्रोयोजेनिक्स करत असलेल्या दाव्यावर काडीमात्र विश्वास नाही. ॲन्टिफ्रीझ यंत्रणेवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जन्म - मृत्यूच्या नैसर्गिक चक्रालाच फाट्यावर मारून हा सगळा गंडवागंडवीचा प्रकार चालू असल्याची खरमरीत टीका ते करतात.
"एकदा हृदयाचे ठोके बंद पडले की शरिरातील पेशींचं वेगानं विघटन सुरू होतं. त्यामुळे अंतर्गत अवयवही निकामे होऊ लागतात. असं मृत शरीर जरी क्रायोप्रिझर्व्हेशन पद्धतीनं जतन करुन ठेवलं आणि नंतर भविष्यात उपचार उपलब्ध झाल्यावर ते शरीर उपचारासाठी जिवंत करायचं ठरवलं तरी तरी या जतन केलेल्या शरिराचं आतूनच इतकं विघटन आधीच झालेलं असतं की त्यावर काही उपचार करणं अशक्य ठरेल.
शिवाय उपचारासाठी शरिर क्रायोप्रिझर्व्हेशन मधून बाहेर काढून सामान्य तापमानात आणल्यानंतर ही विघटनाची प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू होते. अशा विघटन होत असलेल्या शरिराला जिवंत करणं अशक्यच आहे," अशा स्पष्ट शब्दात प्राध्यापक कोएन क्रायोजेनिक्स समर्थकांचे सगळे दावे खोडून काढतात.
त्याऐवजी मेलेल्या माणसाचे अजून निकामी न झालेले अवयव बाहेर काढून ते क्रायोजेनिक पद्धतीनं जतन करता येऊ शकतात. जेणेकरून जिवंत गरजू रुग्णांमध्ये त्यांचं प्रत्यारोपन करता येईल. इतपतच प्राध्यापक कोएन क्रायोजेनिक्सची उपयुक्तता मान्य करतात. पण काही क्रायोजेनिक्स समर्थकांचा असा ठाम विश्वास आहे की या तंत्रज्ञानामुळे थेट मृत्यूला चकवा देता येतो.
न्यूयॉर्कमधील स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर सॅम पार्निया यांचा अशा पुनर्जन्म देणाऱ्या लोकांमध्ये समावेश होतो. डॉक्टर सॅम पार्निया हे मृत घोषित केल्या गेलेल्या रुग्णांना पुन्हा जिवंत करून देण्यासाठीच खास प्रसिद्ध आहेत. या हॉस्पिटलमधील मेलेल्या 33 टक्के रूग्णांना मृत्यूनंतर काही तासांत पुन्हा जिवंत करून दाखवण्याची करामत त्यांनी करून दाखवलेली आहे. त्यामुळे पुनर्जन्म देणारा डॉक्टर अशी बिरूदावली ते मिरवतात.
मृत शरीर वर्षानुवर्षे पुनर्जन्म घडवून आणण्याच्या उद्देशाने जतन करून ठेवल्याने या प्रक्रियेबद्दल अनेक नैतिक व कायदेशीर सवालही उपस्थित होतात. टूमारो.बायो या जर्मन कंपनीच्या ग्राहकांचं प्रेत स्वित्झर्लंडमध्ये एके ठिकाणी सुरक्षित जतन करून ठेवलं जात असल्याचा दावा कंपनीचे मालक केंडझिओर करतात. पण ते नेमकं किती सुरक्षित आहे? हा प्रश्न निर्माण होतोच.
शिवाय, समजा हे प्रेत वर्षानुवर्षे सुरक्षित जतन करून ठेवलंच आणि नंतर ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या हाती लागलं तर मग ते या प्रेताचं नेमकं करणार काय? या प्रेतावर आता मालकीहक्क नेमका कोणाचा असेल? असे अनेक यक्षप्रश्न या निमित्ताने उभे राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
भविष्यात आपल्या मृत ग्राहकाचा पुनर्जन्म करायची वेळ येईपर्यंत ज्या आजाराने तो मरण पावला होता त्यावर उपचार शोधले गेलेले असतील, अशी आशा क्रायोजेनिक्सचे समर्थक बाळगून आहेत. पण हे उपचार खरंच आलेले असतील का? त्या मृतवत शरिरावर ते उपचार कामी येतील का? किंबहुना मृतवत शरिर फक्त क्रायोप्रिझर्व्ह केल्यानं पुन्हा जिवंत होईल का? हे शरीर समजा पुन्हा जिवंत झालंच तरी लगेच पुढच्या क्षणाला पुन्हा मरण पावणार नाही याची खात्री काय? इत्यादी मूलभूत शंकांचं कुठलंच ठोस निरसन समर्थक करत नाहीत. त्यांना फक्त हे सगळं भविष्यात आपोआप मार्गी लागेल, अशी भोळी आशा आहे. आणि या भोळ्या आशेवरच त्यांनी आपलं दुकान चालवायला घेतलं आहे.
इतकी धुसर आणि लांबची शक्यता असलेल्या या जुगारावर संबंधित ग्राहकाची पुढची पिढी 200000 डॉलर्सची आपली वडिलोपार्जित संपत्ती पणाला लावणंही तसं जोखिमीचंच काम आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी हा जुगार खेळण्यासाठी तयार असेल का? हाही प्रश्नच आहे.
"पण उद्या तुमच्यासोबत काय होणार आहे हा तुमच्या स्वतःबद्दलचा निर्णय आजच तुम्ही स्वत: घेत असेल तर यात कुठला नैतिक पेच उभा राहण्याचा सवालच उद्भवत नाही", असा प्रतिवाद एमिल केंडझिओर करतात. "आज वयोवृद्ध लोकांकडे बराच पैसा आहे. आलिशान घर, गाड्या आहेत. पण वय संपत चाललं आहे. त्यांना पैशाची कमतरता नाही.
फक्त मृत्यू जवळ आल्यानं त्यांच्या हाताशी वेळ तेवढा नाही. मग जर 2 लाख डॉलर्स मोजून मृत्यूला चकवा देवून चिरकाल अलिशान आयुष्य जगायची एक संधी (भले ती अशक्यप्राय का असेना) त्यांना मिळत असेल तर त्यांनी या संधीचा लाभ का उठवू नये? संपत आलेलं आयुष्य पुन्हा जगण्यासाठी 2 लाख डॉलर्स किंमत मोजायला ते अगदी आनंदाने तयार होतील," अशा शब्दात केंडझिओर यांनी आपल्या व्यवसायाचं समर्थन केलं.

फोटो स्रोत, Getty Images
एमिल केंडझिओर यांचे बहुतांश ग्राहक हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि विमा उतरवून ते या कंपनीचे ग्राहक बनले आहेत. 51 वर्षीय लुईस हॅरिसन या टूमारो.बायो कंपनीच्या ग्राहक बनल्या कारण त्यांना मरणोत्तर आयुष्याबद्दल उत्सुकता होती.
"हे आयुष्य भविष्यात कधीतरी पुन्हा जगता येईल, ही कल्पनाच मला अतिशय भन्नाट वाटली. जणूकाही टाईम ट्रॅव्हल करणार असल्याची ही भावना आहे. अर्थात मला जाणीव आहे की हे प्रत्यक्षात घडण्याची शक्यता फार धूसर आहे. पण तरी हा धोका पत्कारण्यात काही फारसं नुकसान नाही. कारण चुकून जर मी खरंच पुन्हा जिवंत झाले तर! हा विचारच विस्मयकारक आहे. तसाही मृत्यू तर निश्चितच आहे. त्यामुळे ही ऑफर खोटी असली तरी काही हरकत नाही," असं हॅरिसन म्हणाल्या.
या कंपनीकडून भविष्यात मृत्यूपश्चात ही सेवा उपभोगण्यासाठी आज हॅरिसन दरमहा 87 डॉलर्सचा हफ्ता भरतात. तिच्या ओळखीच्या लोकांना हा वेडेपणा वाटतो. "काही लोक तर मला असंही विचारतात की चुकून जर भविष्यात तुझा पुनर्जन्म झालाच तरी तिथे तू काय करणार? कारण तुझ्या सोबतचे सगळे लोक तर तेव्हा मेलेले असतील.
अशा वेळी एकट्याने जगून तरी काय फायदा? पण मी असा विचार करत नाही. माणूस कधीच एकटा नसतो. आणि कोणाच्या जाण्याने आपलं आयुष्य थांबत नाही. आपण सतत आजूबाजूचे लोक गमावत असतो. तरी आपलं आयुष्य पुढे चालतच राहतं.
कालांतरानं आपण जगण्याचं कारण आणि उद्देश परिस्थिती कितीही विपरीत आली तरी शोधतोच. ही जगत राहण्याची प्रेरणा चिरंतन आहे. म्हणूनच मी या ऑफरसाठी आपलं नाव नोंदवलं आहे," असं हॅरिसन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक जणांना भविष्य कसं असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण ही उत्सुकता ते कधीच शमवू शकत नाहीत. कारण इतकं लांबचं भविष्य बघायला माणूस इतकी वर्ष जिवंत राहू शकणार नसतो. त्याचं आयुष्य मर्यादित असतं. पण क्रायोजेनिक्सच्या माध्यमातून मिळलेल्या या पुनर्जन्माच्या वरदानामुळे माणसाला हे भविष्य याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे.
भविष्याची उत्सुकता असलेले हे लोकच आपले ग्राहक मोठ्या संख्येनं बनतील आणि पूर्ण अमेरिकेत आपल्या कंपनीचा विस्तार होईल, अशी आशा टूमारो.बायोला आहे. क्रायोजेनिक्सचा अभ्यास करणाऱ्या क्रायोनिक्स इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार 1976 साली अमेरिकेत पहिल्यांदा अशी कंपनी स्थापन झाली.
तेव्हा 2000 लोकांनी ग्राहक म्हणून आपलं नाव नोंदवलं होतं. हळूहळू मृत्यूपश्चात जीवन आणि भविष्यात पुनर्जन्म घेण्याकडे लोकांचा कल व उत्सुकता वरचेवर वाढत असून त्यामुळे अशा कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.
विशेषत: कोव्हीड महामारीनंतर मृत्यू आणि मृत्यूपश्चात जीवनाबाबत चिंतन करण्याची लोकांमधील वृत्ती वाढीस लागल्याचं अनेक अहवालांमधून समोर आलं आहे. त्यामुळे टूमारो.बायो कंपनीची महत्वाकांक्षा आता वाढली असून 2028 पर्यंत मृत माणसाच्या शरिरासोबतच त्याची स्मरणशक्ती, ओळख आणि व्यक्तीमत्व देखील जतन करून पुनर्जन्म देताना या सगळ्या गोष्टी परत त्या व्यक्तीमध्ये जशास तशा उतरवून टाकण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं आहे.
"आता मला सुद्धा याची जाणीव आहे की हे प्रत्यक्षात घडवून आणणं फार अवघड आहे. कदाचित हे सगळं घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. पण एकदा मेल्यानंतर कायमसाठी स्मशानभूमीत दफन होण्यापेक्षा पुन्हा जगण्याची धूसर का होईना शक्यता कोणी निर्माण करत असेल तर तो धोका पत्करायला मी कधीही तयार आहे. कारण यात जुजबी पैशांव्यतिरिक्त नुकसान तर काहीच नाही. आणि फायदा झालाच तर थेट अमरत्वाचा पट्टा तुम्हाला मिळणार आहे," अशा शब्दात केंडझिओरा यांनी आपल्या कंपनीची भलावण केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











