हाय-टेन्शन विजेच्या टॉवरजवळ मोबाईलवर बोलणं खरंच धोकादायक असतं का?

फोटो स्रोत, Getty Images
17 वर्षांचा संतोष तामिळनाडूमधील अवाडीजवळील तिरुमुल्लवायल या गावात राहतो. त्यानं नुकतीच बारावीची परीक्षा दिलीय.
29 मार्चच्या दिवशी तो घराच्या गच्चीवर मोबाईलवर बोलत फेऱ्या मारत होता. अचानक एक अनपेक्षित घटना घडली.
जवळच असलेल्या विजेच्या टॉवरमधील एका हायव्होल्टेज वीज वाहिनीमुळे संतोषला विजेचा झटका लागला.
संतोषचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याची सुटका करून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं.
90 टक्के भाजलेल्या संतोषला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी तिरुमुल्लवायल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.
परिसरातील घरं आणि शेतजमिनींवर हायव्होल्टेज वीज टॉवर उभारण्यावरून अनेक वाद सुरू आहेत.
घरावरून किंवा त्याच्या जवळून हाय व्होल्टेज वीज वाहिन्या असतील, तर अनेक लोक जमीन किंवा घर खरेदी करताना घाबरतात.
अशा वाहिन्यांच्या जाळ्याखाली उभं राहून फोनवर बोलत असल्यामुळे संतोषला विजेचा धक्का बसला का?

फोटो स्रोत, Getty Images
यावर अन्नामलाई विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाचे प्राध्यापक शक्तीवेल सांगतात की, "मोबाईल फोन्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा हाय-व्होल्टेज वीजवाहिन्यांमधून वाहणाऱ्या विजेशी थेट संबंध नाही."
"विजेच्या हाय-व्होल्टेज टॉवरखाली उभे राहून बोलल्याने एक प्रकारचा आवाज येतो, पण शरीरातून विद्युत प्रवाह जात नाही. कारण हाय-व्होल्टेज वीज किंवा घरगुती वीज, वायर किंवा कंडक्टरशिवाय प्रसारित केली जाऊ शकत नाही."
मात्र, हवा ही डायलेक्ट्रिक असल्याचं प्राध्यापक शक्तीवेल सांगतात.
"जेव्हा हवा अधिक दमट होते, तेव्हा विद्युत वाहकता वाढते. अशा वेळी, जेव्हा हाय-व्होल्टेज वीजवाहिन्या घराच्या वरून जात असतील आणि आपण जमीन आणि या वीजवाहिन्यांच्या मधोमध उभे असू तर आपण कंडक्टर म्हणजेच वीज प्रसरणाचं माध्यम बनतो. अशा वेळी आपल्या हातात मोबाईल असो वा नसो आपल्या शरीरातून वीज वाहू लागते," असंही ते पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक शक्तीवेल सांगतात की, मोबाईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा हाय-व्होल्टेज वीजवाहिन्यांमध्ये हस्तक्षेप करतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
शिवाय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा मोबाईल फोन टॉवर्समुळे कर्करोगासारखे आजार होतात याचाही कोणता पुरावा नसल्याचं ते सांगतात.
ते पुढे सांगतात, "उदाहरणार्थ, आपण रेल्वे स्थानक किंवा रेल्वेच्या वर असलेल्या हाय-व्होल्टेज वीज वाहिनीखाली लोकांना विजेचा धक्का लागल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. कारण मानवी शरीर पृथ्वी आणि विजेच्या तारेमध्ये कंडक्टर म्हणजेच माध्यम बनते आणि त्या व्यक्तीच्या शरीरातून वीज वाहू लागते."
पावसाळ्यात धोका
हाय-व्होल्टेज वीजवाहिन्या कमी उंचीवर असण्याव्यतिरिक्त अपघाताची इतर कारणं कोणती आहेत?
यावर प्राध्यापक शक्तीवेल सांगतात, "हवेत जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा तिची विद्युत चालकता वाढते. असं बहुतांशी पावसाळ्यात घडतं. अशावेळी वीज वाहण्याची शक्यता जास्त असते. सोबतच विजेचे झटकेही बसतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा हवेत जास्त आर्द्रता असताना हाय व्होल्टेज वीज वाहिनीखाली उभे राहू नये."
हाय-व्होल्टेज वीजवाहिनी असलेली जमीन खरेदी करू शकता का?
जमिनीवर हाय-व्होल्टेजचे पॉवर टॉवर असतील किंवा पॉवर लाइन्स गेल्या असतील तर ती जागा विकत घेऊन घर बांधायचं का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
तामिळनाडू वीज मंडळाच्या अभियंत्याने यावर माहिती देताना सांगितलं की, "वीज वाहिनी खालील जमिनी घरं किंवा शेतीसाठी खरेदी केली जाऊ शकते."
"शासनाने अशा जमिनींसाठी शेतीबाबत काही नियम केलेत. तअशा जमिनीवर भात आणि भाजीपाला अशी उंचीने लहान पिकं घ्यावीत."
नारळासारखी उंच झाडं लावण्यास मनाई असते. त्या भागातील जमीन कमी दरात विकत घेतली जाते. पण, जर हाय-व्होल्टेज वीजवाहिन्या कमी उंचीवर असतील, तर तिथल्या लोकांना धोका जास्त असल्याचं या अभियंत्याने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"वीज दोन प्रकारची असते. हाय-टेन्शन लाइन आणि लो-टेन्शन लाइन. हाय-टेंशन लाईनमधून 50 किलो वॅटपेक्षा कमी वीज वाहते. अशावेळी घर आणि विजेच्या तारांमध्ये 10 फूट अंतर असावं."
"50 ते 200 किलोवॅटसाठी 15 फूट अंतर असावं. 110 किलो वॅट किंवा त्याहून अधिकच्या लाईनला एक्स्ट्रा हाय-टेन्शन लाइन म्हणतात. लांब अंतरापर्यंत वीज वाहून नेण्यासाठी ही लाईन असते. यामध्ये वापरण्यात आलेल्या वायर्सही खूप जड असतात. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन करून ठराविक अंतरावर घरं बांधली जातात"
त्यांनी पुढे सांगितलं की, "काही लोकांना मोठं घर बांधायचं असतं. त्यामुळे ते अंतर नीट पाळत नाही. अशा परिस्थितीत अनेक अपघात होतात. आम्ही अनेक ठिकाणी तपासणी देखील केली आहे, ज्या भागात हाय टेंशन लाइन जाते त्या भागात 15 फुटांच्या वर घरं बांधल्यास त्यांना वीज दिली जात नाही."
जमीन खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी?
"पावसाळ्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटावेळी विजेच्या खांबाखाली उभे राहू नका. हाय व्होल्टेज पॉवर लाईन्स आणि टॉवर्स असल्यास अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या आम्ही इन्सुलेटर म्हणून पॉलिमर वापरत आहोत. आम्ही शक्य तितके अपघात टाळण्याचा प्रयत्न करतोय. पण कधी कधी अपघात होतात. त्यामुळे लोकांनी जमीन खरेदी करताना सावधगिरी बाळगली पाहिजे," असं तामिळनाडू वीज मंडळाच्या अभियंत्याने स्पष्ट केलं.
ज्या भागात हाय-व्होल्टेज पॉवर लाईन्स आणि घरामधील अंतर कमी आहे, अशा घरातील विद्युत उपकरणे खराब होऊ शकतात.
तामिळनाडू विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अशा भागात घरासाठी भूखंड खरेदी करताना इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेणं चांगलं आहे.











