मोबाइल चोरीला गेला तर वेळ न घालवता करा 'या' 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
मॉलमध्ये वावरताना किंवा एखाद्या मोकळ्या जागेत फिरताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलेलं असताना आपण त्या वातावरणात गर्क झालेले असतो. मग थोड्या वेळाने आपण खिशात किंवा पर्समध्ये हात घालतो तर मोबाइल गायब झाल्याचं आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला धक्का बसतो.
सराईत मोबाइलचोर डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या क्षणात मोबाइल घेऊन पसार होऊ शकतात. मोबाइल फोन चोरीला गेल्यावर आपली खाजगी कागदपत्रं आणि वैयक्तिक माहिती यांचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो.
शिवाय, नवीन फोन घ्यायचा भुर्दंड वेगळाच...
आजकाल कोणाचाही मोबाइल चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे दुर्दैवाने फोन कधी चोरीला गेला, तर त्यातून होणारं नुकसान कमी करण्यासाठी तातडीने कोणत्या गोष्टी करायला हव्यात याची माहिती हवी.
1. मोबाइल फोन तत्काळ ब्लॉक करावा
डिजिटल सुरक्षा या विषयातील तज्ज्ञ एमिलिओ सिमोनी म्हणतात, "तुमचा मोबाइल फोन चोरीला गेला, तर पहिल्यांदा ते डिव्हाइस लॉक करून टाकावं. आपल्या फोन नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधून सिम कार्ड ब्लॉक करायला सांगणंही तितकंच आवश्यक आहे. असं केल्याने फोनचा काही उपयोगच करता येत नाही.
यासाठी कोणाला संपर्क करायचा, याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइल ऑपरेटरच्या वेबसाइटवर मिळू शकते.
इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेन्ट आयडेन्टिटी (आयएमईआय) या संस्थेच्या सहाय्यानेसुद्धा हे करता येतं. ही एक आंतरराष्ट्रीय नोंदणीसंस्था असून ती आपला मोबाइत तातडीने बंद करू शकते.
त्यासाठी मोबाइलमधील कोड कुठेतरी लिहून ठेवावा. डिव्हाइस बॉक्समध्ये किंवा मोबाइल फोनमध्ये हा कोडनंबर मिळतो.
2. अॅपचे पासवर्ड बदलावेत
चोरीला गेलेल्या मोबाइलवरील सर्व अॅपचे पासवर्ड लगेचच बदलून टाकायला हवेत, असं सिमोनी सांगतात. असं केलं नाही तर मोबाइलचोराला आपली खाजगी आणि इतर महत्त्वाची माहिती मिळू शकते.
विशेषतः बँकिंग अॅप स्वतःहून ओळखतपासणीची प्रक्रिया पार पाडत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु, ई-मेल, सोशल मीडिया, एसएमएस, या द्वारे संबंधित चोराला पासवर्ड मिळवता येऊ शकतो. एसएमएस ऑथेन्टिकेशनची प्रक्रिया पार पाडून तो बँकेच्या खात्यापर्यंत पोचू शकतो.
काही संकेतस्थळांच्या माध्यमातून असे पासवर्ड तातडीने बदलता येतात.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांशी संबंधित पासवर्ड बदलायची सोय 'लॉग-इन'च्या किंवा 'सिक्युरिटी'च्या सेटिंगमध्ये असते. जी-मेलचा पासवर्ड 'पर्सनल इन्फर्मेशन' या विभागात जाऊन बदलता येतो.
3. बँकांना आणि इतर संबंधित वित्तसंस्थांना कळवा
फोन चोरीला गेला तर तत्काळ आपल्या बँकेला व संबंधित वित्तसंस्थांना कळवून ठेवावं. अशी माहिती मिळाल्यावर बँक तुमच्या मोबाइल फोनवरील अॅप ब्लॉक करू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
संबंधित चोर तुमच्या खात्यावरील पैसा एखाद्या तिसऱ्याच खात्यावर पाठवण्याच्या तयारीत असेल, तर त्याला यापासून रोखणं शक्य आहे.
प्रत्येक बँक अशा प्रकारची सेवा देते. बँकांच्या संकेतस्थळांवर याची माहिती नोंदवलेली असते. बँकेचे दूरध्वनी क्रमांकही गुगलवर सहज उपलब्ध होतात.
4. तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांनाही कळवा
मोबाइल चोरीला गेल्याचं तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना कळवणं आवश्यक आहे.
गुन्हेगार लोक मेसेजिंग अॅपचा वापर करून किंवा तुमचं सोशल मीडियावरील खातं वापरून तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शोधू शकतात आणि त्यांच्या पैशांचाही अपहार होऊ शकतो, त्यांच्या बँकखात्याचा तपशील मिळवून गैरव्यवहार केले जाऊ शकतात.
5. पोलिसांकडे तक्रार नोंदवा
मोबाइल चोरीला गेल्यावर पोलिसांकडे तक्रार करणं आवश्यक आहे.
अशा तक्रारीची प्रत म्हणजे फोन चोरीला गेल्याचा तुमच्याकडील पुरावा असतो.

फोटो स्रोत, Getty Images
बँका, विमा कंपन्या आणि इतरही काही ठिकाणी हा पुरावा गरजेचा ठरतो.
अनेकदा मोबाइल चोरीला गेल्यानंतर त्यातील तुमच्या ओळखीशी संबंधित कागदपत्रं चोरीला जातात. ओळख पटवणाऱ्या कागदपत्रांविना आपली अडचण होते. अशा वेळी पोलीसही आपली चौकशी करू शकतात.
त्यामुळे मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करणं गरजेचं आहे. तक्रार दाखल केल्यावर गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.
मोबाइल फोन जास्त संख्येने कुठल्या भागांमध्ये चोरीला जातात, याची माहिती गोळा करायलासुद्धा पोलिसांना या तक्रारींचा उपयोग होतो. अशा ठिकाणी लोकांनी अधिक सजग राहावं, अशी सूचना पोलीस करू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








