गौतम अदानी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

फोटो स्रोत, mns adhikrut/twitter
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1. गौतम अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
अदानी समुहाचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्रात विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यापैकी एका भेटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या भेटीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
यापूर्वी राज ठाकरे आणि टाटा समुहाचे रतन टाटा यांचा स्नेह असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आले होते.
गौतम अदानी यांच्या समुहाला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भेटींचा संदर्भ जोडला जात आहे.
2. कोहलीच्या शतकासह भारताचा श्रीलंकेवर विजय
गुवाहाटी इथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने 67 धावांनी विजय मिळवला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी या निर्णयाचा फायदा उठवला. विराट कोहलीच्या 73व्या एकूण तर 45व्या वनडे शतकाच्या बळावर भारतीय संघाने 373 धावांचा डोंगर उभारला.
कर्णधार रोहित शर्मा (83) आणि शुबमन गिल (70) यांनी 143 धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शतकाकडे वाटचाल करत असताना हे दोघे बाद झाले, यानंतर विराट कोहलीने सूत्रं स्वीकारली.
कोहलीने 12 चौकार आणि एका षटकारासह 87 चेंडूतच 113 धावांची सुरेख खेळी साकारली. के.एल.राहुलने 39 तर श्रेयस अय्यरने 28 धावा करत कोहलीला चांगली साथ दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पण कर्णधार दासून शनकाने चिकाटीने खेळ करत कारकीर्दीतलं पहिलं शतक पूर्ण केलं.
सामन्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने शनकाला क्रीझमध्ये नसल्याच्या कारणावरुन धावबाद केलं. शनका त्यावेळी 98 धावांवर खेळत होता. शमीने अपीलही केलं. परंतु कर्णधार रोहित शर्माने हे अपील मागे घेतलं. उर्वरित दोन चेंडूवर चौकार आणि षटकार लगावत शनकाने शतकाला गवसणी घातली. त्याने 12 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 108 धावांची खेळी केली. सलामीवीर पाथुम निसांकाने 72 धावा केल्या.
भारतातर्फे उमरान मलिकने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.
शतकवीर विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना गुरुवारी इडन गार्डन्स, कोलकाता इथे होणार आहे.
झी 24तासने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
3. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलात तर...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. गेले काही दिवस अजित पवार यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपिचंद पडळकर अनेक आरोप करत आहेत.
काल पवार यांनी राजकीय विरोधक आहे म्हणून खोट्य़ा गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही असा इशारा दिला. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अजित पवार म्हणाले, “आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न… कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. याआधी अशाचप्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु त्यानंतर शरद पवारांनी त्यांना समजावून सांगितलं. मी आणि जयंत पाटीलही आव्हाडांना भेटायला गेलो. त्यातून आम्ही मार्ग काढला.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही जवळपास साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो. तेव्हाही आमच्यासमोर विरोधीपक्ष होता. तेव्हा आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापि केला नाही. त्यामुळे आता या रस्त्याने जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते सहन करणार नाही. जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा राजकीय विरोधक आहेत, म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष म्हणून आम्हीही हे सहन करणार नाही.”
4. शिंदे-फडणवीस सरकारची कर्मचाऱ्यांना भेट
महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काल 10 जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत होता. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. 1 जुलै 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेवरील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे.
महागाई भत्त्यातील दरवाढ 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत.
5. अभिजित बिचुकले यांना अपघात
बिग बॉसच्या हिंदी आणि मराठी कार्यक्रमांत उपस्थिती लावणाऱ्या अभिजित बिचुकले यांना पुण्यात अपघात झाल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने दिली आहे.
त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अपघाताच्यावेळेस बिचुकले यांच्याबरोबर त्यांचे 4 मित्रही होते असं या बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








