डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्याने बांगलादेशवर काय परिणाम होणार? हसीना पुन्हा सत्तेत येणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यामुळे त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत.
जगाच्या राजकारणावर याचे काय परिणाम होणार याबद्दलचे अंदाज बांधले जात आहेत.
सध्या राजकीय अस्थैर्यातून जात असलेल्या बांगलादेशच्या राजकारणावर देखील याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
बांगलादेशातील राजकीय स्थिती काय आहे, ट्रम्प आणि शेख हसीना यांचे संबंध आणि आगामी काळात बांगलादेशातील राजकारणाची दिशा कशी असणार, याचा आढावा घेणारा हा लेख...
रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल ट्रम्प यांचं जगभरातून अभिनंदन होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्यामुळे काही देश खूश आहेत तर काही देश मात्र अस्वस्थ झाले आहेत. अस्वस्थ होणाऱ्या देशांमध्ये आपल्या शेजारी बांगलादेशसुद्धा आहे.
याच वर्षी बांगलादेशात राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. इतकंच नव्हे तर त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता.
बांगलादेशात कित्येक आठवडे हिंसक निदर्शनं झाल्यानंतर हा सत्ताबदल झाला होता. त्यानंतर तिथे हंगामी सरकारची स्थापना झाली होती. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस यांना या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
एका दृष्टीनं तेच बांगलादेशच्या सरकारचे प्रमुख आहेत. विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मोहम्मद युनूस यांना डेमोक्रॅटिक पक्ष आणि बायडन सरकारच्या जवळचे व्यक्ती मानलं जातं.


मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यामागे बायडन सरकार आणि डेमोक्रॅटिक पक्षाची महत्त्वाची भूमिका असल्याचं मानलं जातं.
त्यामुळे आता ट्रम्प यांच्या हाती अमेरिकेची धुरा आल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
बांगलादेशला अमेरिकेकडून जो पाठिंबा मिळत होता तो ट्रम्प यांच्या कार्यकाळात देखील मिळत राहील का? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.
अशा परिस्थितीत, अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना पुन्हा एकदा बांगलादेशच्या राजकारणात गमावलेलं आपलं स्थान परत मिळवू शकतील का? बांगलादेशातील घडामोडींचा भारत-बांगलादेश संबंधांवर काय परिणाम होईल? या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.
ट्रम्प यांच्या विजयावर शेख हसीना काय म्हणाल्या?
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना विजय मिळाल्यानंतर सोशल मीडियावरील 'एक्स' या व्यासपीठावरील अवामी लीगच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.
एक्सवरील या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचा शेख हसीना यांचा एक फोटोदेखील टाकण्यात आला आहे.
ट्रम्प यांना शुभेच्छा देताना या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "बांगलादेशमधील अवामी लीगच्या अध्यक्षा शेख हसीना यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं."
त्या म्हणाल्या की, "ट्रम्प यांचा निवडणुकीतील दणदणीत विजय हा त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्याबद्दल अमेरिकन लोकांमध्ये जो विश्वास आहे, त्याचा पुरावा आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या वक्तव्यात म्हटलं आहे की, शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या भेटी आणि चर्चेच्या आठवणींना उजाळा दिला.
शेख हसीना म्हणाल्या की "ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बांगलादेश आणि अमेरिकेतील मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट होतील, अशी मला आशा वाटते."
त्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली आहे.
याचबरोबर त्यांनी नवे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं अशी मनोकामना देखील व्यक्त केली.
ट्रम्प आल्यामुळे अडचणीत वाढ होणार का?
2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता.
बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी त्यावेळेस दु:ख व्यक्त करताना म्हटलं होतं की, ट्रम्प यांचा विजय हा एकप्रकारे सूर्यग्रहण आणि काळ्या दिवसांसारखा आहे.
त्याचं म्हणणं होतं की, 2016 ची निवडणूक चुकीच्या राजकारणाचा बळी ठरली आहे. त्यांनी ट्रम्प यांना सल्ला देत म्हटलं होतं की, भिंती उभ्या करण्याऐवजी एकत्र आणण्याची आणि अधिक उदार दृष्टीकोनाचा अंगिकार करण्याची आवश्यकता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
संजय भारद्वाज, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील साउथ एशियन स्टडीजचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की मोहम्मद युनूस अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या जवळचे आहेत.
ते म्हणतात, "बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर जेव्हा मोहम्मद यूनुस यांना तिथल्या हंगामी सरकारचा मुख्य सल्लागार बनवण्यात आलं तेव्हा मोहम्मद यूनुस त्या सरकारच्या संदर्भात डेमोक्रॅटिक पक्ष, बायडन सरकार आणि हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करत होते. मोहम्मद यूनुस यांना हंगामी सरकारचा मुख्य सल्लागार बनवण्यात अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे."
ही नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोहम्मद यूनुस यांचा अमेरिकेतील दौरादेखील खूपच चर्चेत राहिला होता. 25 सप्टेंबरला ते 'क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह' कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनदेखील उपस्थित होते.

भारद्वाज लिहितात, आता अमेरिकेत सत्ताबद्दल झाला आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या जागी रिपब्लिकन पक्ष सत्तेत असेल. अशा परिस्थितीत, ट्रम्प आधीच्या बायडन सरकारचंच धोरण पुढे नेतील की त्यात काही बदल करतील? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.
ते म्हणतात, "आधी अमेरिका भारताच्या भूमिकेला डोळ्यासमोर ठेवून दक्षिण आशियाकडे एक युनिट म्हणून पाहायचं. मात्र, बायडन सरकारनं बांगलादेशला एक स्वतंत्र युनिट म्हणून पाहिलं. त्याचा परिणाम होत बांगलादेशात सत्ताबदल झाला."
भारद्वाज पुढे म्हणतात, "बांगलादेशातील मानवाधिकार आणि निवडणुकांसंदर्भात आधीदेखील प्रश्न उपस्थित होत आले आहेत. मात्र बायडन सरकारच्या कार्यकाळात यासंदर्भात कठोर भूमिका घेण्यात आली होती आणि त्यामुळेच त्यांचे शेख हसीना यांच्याशी देखील चांगले संबंध राहिले नव्हते."

या बातम्याही वाचा:

बांगलादेशातील लोकांना काय वाटतं?
'प्रोथोम अलो' हे बांगलादेशातील बंगाली भाषेतील वृत्तपत्र आहे. कादिल कल्लोल त्याचे राजकीय संपादक आहेत. कादिल कल्लोल यांचं म्हणणं आहे की शेख हसीना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका-बांगलादेश संबंध चांगले होते, यामध्ये दुमत नाही.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्या काळात बांगलादेशातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र असं असतानाही ट्रम्प सरकारनं निवडणुका स्वतंत्र आणि नि:पक्षपातीपणे घेण्याचं आवाहन करण्याव्यतिरिक्त अधिकृतपणे काहीही म्हटलं नव्हतं.
कल्लोल म्हणतात की, दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि चर्चा सुरू राहिली.
ते म्हणतात की, आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की अलीकडेच मोहम्मद यूनुस अमेरिकेत गेले होते आणि त्यांची भेट जो बायडन यांच्याशी झाली होती. त्यावेळेस मोहम्मद यूनुस यांना सन्मानानं वागवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व घडामोडी लक्षात घेता बांगलादेशात पुढे काय होणार हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे.
बांगलादेशातील वरिष्ठ टीव्ही पत्रकार बरशोन कबीर यांनी बीबीसीला सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आशिया, भारतीय उपखंडाबद्दल वेगळा दृष्टीकोन आहे. कारण त्यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत.
ते म्हणतात, "ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होत आहेत ही बातमी समोर आल्यापासून बांगलादेशात यासंदर्भात संमिश्र भावना दिसून आल्या. मात्र यूनुस यांच्या नेतृत्वाखालील सध्याचं हंगामी सरकारचे अमेरिकेबरोबर खूप चांगले संबंध आहेत. कारण यूनुस यांचे क्लिंटन कुटुंबाबरोबर व्यक्तिगत संबंध आहेत. ही गोष्ट त्यांच्या मीडिया सचिवांनी सांगितली आहे."
बरशोन कबीर म्हणतात, "भारत आणि बांगलादेश ऐतिहासिकदृष्ट्या चांगले शेजारी आहेत. त्यामुळेच ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडेल आणि आम्हा सर्वांना याचीच आशा देखील आहे."
ते म्हणतात, "हे तर निश्चित आहे की इथे बांगलादेशातील स्थिती चिंताजनक नाही. मात्र पुढील काही महिने सर्वजण आतुरतेनं याकडे लक्ष देतील की पुढे काय होतं."
कबीर म्हणतात, "शेवटी अमेरिकेचं परराष्ट्र धोरण तिथेच तयार झालेलं आहे. त्यामुळे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे भारत-बांगलादेश संबंधावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही अशी आशा व्यक्त केली जाऊ शकते. मात्र अवामी लीग अजूनही काय विचार करते आहे याची कोणालाही कल्पना नाही."
बांगलादेशातील हिंदू बाबत ट्रम्प यांचं वक्तव्यं
ट्रम्प यांनी दिवाळी संदेशात देखील बांगलादेशातील हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्यं पोस्ट केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.
त्यात ट्रम्प यांनी लिहिलं होतं, "मी बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या रानटी हिंसेचा तीव्र निषेध करतो. जमाव त्यांच्यावर हल्ला करत आहेत, लूटमार करत आहेत. ही पूर्णपणे अराजकतेची स्थिती आहे."
ट्रम्प यांचं म्हणणं होतं, "माझ्या कार्यकाळात कधीही असं झालं नसतं. कमला हॅरिस आणि जो बायडन यांनी अमेरिकेसह संपूर्ण जगभरात हिंदूंकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी इस्रायलपासून ते युक्रेन आणि आमच्या दक्षिण सीमेपर्यंत अराजक माजवलं आहे. मात्र आम्ही पुन्हा एकदा अमेरिकेची भक्कमपणे उभारणी करू आणि शांतता प्रस्थापित करू."
त्यांनी लिहिलं, "आम्ही कट्टरतावादी डाव्या विचारसरणीच्या धर्मविरोधी धोरणाविरुद्ध हिंदू अमेरिकनांचं देखील रक्षण करू. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू. माझ्या सरकारद्वारे आम्ही भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरचे संबंध अधिक घट्ट करू."

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशातील अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराबाबत बोलणारे ट्रम्प अमेरिकेतील पहिले मोठे राजकारणी आहेत. हिंदू मूळ असतानादेखील कमला हॅरिस या प्रकरणात मौन राखून होत्या.
त्यावेळी संरक्षण तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांनी लिहिलं होतं की, जर ट्रम्प जिंकले तर बायडन यांच्या पाठिंब्यावर सुरू झालेला यूनुस यांचा खेळ संपू शकतो.
मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेत रिचर्स फेलो असलेल्या स्मृती. एस. पटनायक देखील हाच मुद्दा मांडतात.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, दिवाळीत हिंदूंबाबत ट्रम्प यांनी जे वक्तव्यं केलं होतं, त्याकडं बांगलादेशातील हंगामी सरकारवरील टीका म्हणून पाहिलं गेलं. तसंही ट्रम्प यांच्याशी युनूस यांचे संबंध चांगले नाहीत.
मात्र, काही जाणकारांनी या वक्तव्याकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून देखील पाहिलं होतं. त्यांचा दावा होता की, निवडणुकीत हिंदू आणि भारतीय मतदारांना भुरळ घालण्यासाठी ट्रम्प यांनी या प्रकारचे वक्तव्यं केलं होतं.
तर संजय भारद्वाज म्हणाले, "ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका, बांगलादेशला किती सुरक्षा पुरवू शकेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अमेरिकेच्या पाठिंब्या शिवाय बांगलादेशातील सरकार चालू शकत नाही."
शेख हसीना सत्तेत परतू शकतात का?
बांगलादेश सध्या राजकीय अस्थैर्यातून जातो आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशची सत्ता सोडल्यापासून तिथे हंगामी सरकार सत्तेत आलं आहे.
संजय भारद्वाज म्हणतात, "बांगलादेशात अजूनही लोकशाही व्यवस्था लागू झालेली नाही. नवीन सरकारची स्थापना केव्हा होईल याबद्दल सध्या कोणालाच कल्पना नाही."
आता प्रश्न असा आहे की शेवटी नवीन सरकारची स्थापना करण्यासाठी बांगलादेशात निवडणुका कधी होतील?
गेल्या महिन्यात हंगामी सरकारचे सल्लागार असलेल्या डॉ. असिफ नझरूल यांनी त्यांच्या वक्तव्यांमधून निवडणुकीचे संकेत दिले होते.
त्याचं म्हणणं होतं की, पुढील एक वर्षाच्या आत निवडणुका होऊ शकतात. मात्र यासाठी निवडणुकीच्या दिशेनं सुधारणा आणि राजकीय तडजोडी होण्याची आवश्यकता आहे.
नझरूल यांचं म्हणणं होतं की, आधी देशात निवडणूक आयोगाची स्थापना केली जाईल आणि मग मतदार यादी तयार केली जाईल. हे काम पूर्ण झालं तर पुढील वर्षी निवडणुका होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचं म्हणणं होतं की, देशात निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांना आहे.
स्मृती एस पटनायक म्हणतात की, अशा परिस्थितीत यूनुस यांच्यावरील दबाव वाढेल. कारण बायडन यांच्या तुलनेत ट्रम्प त्यांना यासाठी जास्त वेळ देणार नाहीत.
त्या म्हणतात, "ट्रम्प, मोहम्मद यूनुस यांना बांगलादेशात लवकरात लवकर निवडणुका घेण्यास सांगतील. दुसरा मुद्दा म्हणजे आता बांगलादेशातील निवडणुकांमध्ये अवामी लीग सहभागी होण्याची शक्यता आता वाढली आहे."
पटनायक म्हणतात की, या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांच्या पक्षाला पुन्हा एकदा राजकीय बांगलादेशमधील राजकारणात पाय रोवण्याची संधी मिळेल.
तर संजय भारद्वाज म्हणतात, "बांगलादेशात अवामी लीग परत येईल. मग ती शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली येईल किंवा त्यांच्याशिवाय येईल."
ते पुढे म्हणतात, "अर्थात अवामी लीगमधील बहुतांश लिबरल डेमोक्रॅटिक लोकांना शेख हसीना आवडत नाहीत. मात्र अवामी लीगच्या लोकांना अशी आशा आहे की बांगलादेशच्या राजकारणात त्यांना जे स्थान हवं आहे ते मिळेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











