बांगलादेश : शेख हसीना तर भारतात पळून आल्या, पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं पुढे काय झालं?

बांगलादेश : शेख हसीना तर भारतात पळून आल्या, पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं पुढे काय झालं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तारेकुज्जमां शिमुल
    • Role, बीबीसी न्यूज बांग्ला, ढाका

बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी पळ काढला आणि भारतात तात्पुरत्या आश्रयाला आल्या. हसीना पळाल्यानंतर त्यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांचे पुढे काय झालं, असा प्रश्न तुम्हाला पडला असू शकतो.

याबाबतचा सविस्तर रिपोर्ट थेट बांगलादेशची राजधानी ढाका इथून :

शेख हसीनांनी बांगलादेशातून पळ काढल्यानंतर अवामी लीगचे अनेक नेते भूमिगत झाले होते. आता दीड महिन्यानंतर त्यातील काही लोक आपल्या भागात परत येत आहेत. मात्र, घरी येण्याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागत आहे.

पैसै न देणाऱ्या लोकांना त्यांच्या भागात येऊ देत नसल्याचा आरोप होत आहे. काही भागांमध्ये या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे.

बीबीसी बांग्लाने अवामी लीगच्या अशाच काही नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, जे पैसे देऊन घरी आले किंवा घरी येण्याची वाट पाहत आहेत.

त्यातील काही लोक सुरक्षेच्या कारणास्तव आपली ओळख जाहीर करू इच्छित नाहीत, तर काही लोकांनी ते राहत असलेल्या भागाचं नाव न सांगण्याचा सुद्धा आग्रह केला.

मात्र, परत येण्यासाठी त्यांना किती पैसे द्यावे लागले आणि आता त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागत आहे, याबद्दल त्यांनी बीबीसीला सविस्तर माहिती दिली.

'घरातून बाहेर निघणं कठीण'

अवामी लीगचा एक कार्यकर्ता बीबीसी बांग्लाशी बोलताना म्हणाला, “घरातून बाहेर निघू शकत नाही. पूर्ण दिवस घरात कोंडून राहावं लागतंय.”

घरी परतलेल्या अवामी लीगच्या नेत्यांनी दावा केला की, हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्यांना खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) सह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना पैसे द्यावे लागले आहेत.

बीएनपीच्या नेत्या खलिदा झिया बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत. पण शेख हसीना यांच्या काळात त्या तुरुंगात होत्या. सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आलं.

बीएनपीच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

बांगलादेश

फोटो स्रोत, EPA

काही कार्यकर्ते, नेते घरी परतले असले तरी अजूनही अनेक नेते अद्यापही भूमिगत आहेत.

या नेत्यांपैकी अनेकजण देश सोडून गेले आहेत. काही जण देश सोडून जात असण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत अवामी लीगमध्ये नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच पक्षाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे एक महिना मौन बाळगल्यानंतर पक्षाला एक निवेदन जारी करावं लागलं.

हे निवेदन देशातून (बांगलादेश) केलं आहे की, देशाबाहेरून केलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

‘एक लाख टाका देऊन परत आलोय’

बांगलादेशात अवामी लीग सत्तेतून बेदखल झाल्यावर अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते दीड महिना आपल्या घरापासून दूर लपून आहेत.

5 ऑगस्ट 2024 नंतरच्या घटनाक्रमानंतर त्यांच्या घरांवर आणि दुकानांवर सातत्याने हल्ले झाले होते.

आता तशी परिस्थिती नाही. म्हणूनच तळागाळातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घरी परत येण्याची इच्छा आहे.

अवामी लीगचे मंत्री राशिद खान यांना पोलिसांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अवामी लीगचे मंत्री राशिद खान यांना पोलिसांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आलं.

मात्र, अचानक घरी आलो तर त्यांच्यावर हल्ला होईल असंही त्यांना वाटतंय. त्यामुळे परत येण्याआधी ते तिथल्या प्रभावशाली नेत्यांशी संपर्क करत आहेत.

अवामी लीगच्या वॉर्ड पातळीवरील एक नेता बीबीसी बांग्लाशी बोलताना म्हणाला, “आमच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नाही. बायका-मुलांना सोडून किती दिवस लपून राहू?”

लाल रेष
लाल रेष

बहुतांश भागात बीएनपीचं नियंत्रण असल्यामुळे अवामी लीगचे भूमिगत नेते आणि कार्यकर्ते बीएनपीच्या नेत्यांशी संपर्क करत आहेत. आपल्याच भागात परत येण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे.

दक्षिण बांगलादेशमधील एका जिल्ह्यातील नेत्याने बीबीसीला सांगितलं, “ते तीन लाखांची मागणी करत होते. बरीच मनधरणी केल्यावर एक लाख रुपयापर्यंत ही रक्कम खाली आणली. ते पैसे दिल्यावर मी घरी येऊ शकलो.”

पैसै कोणी घेतले?

नाव न छापण्याच्या अटीवर अवामी लीगच्या एका नेत्याने सांगितलं, “ज्याने पैसे घेतले तो काही फार मोठा नेता नव्हता. तोही आमच्यासारखाच वॉर्ड पातळीवरचाच नेता होता. काही आठवड्यांआधी त्याने आमच्याशी संपर्क केला होता. बीएनपीचा तो नेता तेव्हाच तयार होता. मात्र, काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला त्याने दिला.”

हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतरही आपल्या भागात परतलेले नेते पैसे घेणाऱ्या बीएनपी नेत्याचं नाव घ्यायला तयार नाहीत.

अवामी लीगच्या त्या नेत्याने बीबीसी बांग्लाला सांगितलं, “नाव उघडकीस आलं तर आमच्यासाठी कठीण होईल. आमच्या भागात राहणं आम्हाला कठीण होऊन बसेल.”

‘किती लोकांना पैसे देणार?’

अवामी लीगचे हे नेते तर पैसे देऊन परत आले आहेत. मात्र, असे अनेक लोक आहेत जे पैसे देऊनही परत येऊ शकलेले नाहीत.

अशाच एका नेत्याने बीबीसी बांग्लाशी बोलताना सांगितलं की, घरी परत येण्यासाठी त्याने बीएनपीच्या दोन नेत्यांना वेगवेगळी रक्कम दिली आहे.

“पैसे दिल्याच्या तीन आठवड्यानंतरही मी घरी परत येऊ शकलेलो नाही. कधी येणार हेही सांगू शकत नाही,” असं ते म्हणाले.

मात्र, पैसे देऊनही घरी परत न येण्यामागे कारण काय आहे?

माजी कायदे मंत्री अनीसुल हक आणि शेख हसीना यांचे सल्लागार सलमान एफ रहमान यांच्यासह अनेक मंत्र्यांना अटक करण्यात आलंय.
फोटो कॅप्शन, माजी कायदे मंत्री अनीसुल हक आणि शेख हसीना यांचे सल्लागार सलमान एफ रहमान यांच्यासह अनेक मंत्र्यांना अटक करण्यात आलंय.

अवामी लीगच्या या नेत्याने तीव्र नापसंती दर्शवत बीबीसी बांग्लाला सांगितलं, “कसं परत येऊ? मी दोन लोकांना पैसे दिले आहेत हे कळल्यावर अनेक लोक मला फोन करून पैसे मागत आहेत. शेवटी मी किती लोकांना पैसे देऊ?”

त्यांनी दोन नेत्यांना दीड लाख एवढी रक्कम दिली आहे. मात्र, त्याचा काहीही फायदा होणार नाही, असं त्यांना वाटतं.

त्या नेत्याने सांगितलं की, बीएनपीच्या एका स्थानिक नेत्याने पैसे घेतले होते. आता मात्र पैसे मागणारे नेते बीएनपीच्या विविध संघटनांचा सदस्य असल्याचा दावा करत आहेत.

“कोणी स्वत:ला युवा दलाचा नेता म्हणवतो, कोणी स्वयंसेवक दलाचा. जर पैसे दिले नाहीत तर या भागात पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली आहे,” अवामी लीगचा नेता सांगत होता.

लाल रेष

या बातम्याही वाचा -

लाल रेष

‘घर वाचवण्यासाठी 50 हजार’

गेल्या महिन्यात पाच ऑगस्टला शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यावर अवामी लीगच्या हजारो नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरावर आणि दुकानांवर किंवा कार्यालयांवर हल्ले करण्यात आले होते. जे लोक त्यावेळी बचावले, त्यांच्या घरांवर आता हल्ले करण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप होत आहे.

ढाकाच्या जवळ असलेल्या एका जिल्ह्यातील अवामी लीगच्या नेत्याने बीबीसी बांग्लाला सांगितलं, “मी तर गेल्या दीड महिन्यापासून घरापासून दूर आहे. या काळात बीएनपीचे लोक माझ्या घरी गेले. एका आठवड्याच्या आत 50 हजार रुपये तयार ठेवण्याची धमकी त्यांनी माझ्या बायकोला दिली आहे.”

“जर या कालावधीत पैसे तयार ठेवले नाही तर घराची तोडफोड करून आग लावण्यात येईल अशी धमकी पैसै मागणाऱ्यांनी दिली आहे. आधीच पैसा मिळत नाहीये. त्यात हा पैसा कुठून आणू हीच चिंता मला सतावते आहे,” ते पुढे म्हणाले.

मात्र, हे पैसै मागणारे कोण आहेत? अवामी लीगच्या या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्याच भागातील लोक आहे. आतापर्यंत ते राजकारणात सक्रिय नव्हते. आता युवा दलाचे सदस्य आहोत असं सांगत फिरत आहेत.

घरी परतल्यावर सुद्धा नजरकैदेसारखी परिस्थिती

अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते पैसे देऊन घरी परत आले तरी ते आधीसारखे सार्वजनिकरित्या घराबाहेर निघू शकत नाहीयेत.

दीड महिन्यानंतर घरी परतलेल्या वॉर्ड पातळीवरच्या एका नेत्याने बीबीसी बांग्लाला सांगितलं, “ज्यांच्यामार्फत मी परतलोय, त्यांनीच मला घराच्या बाहेर निघण्यास मनाई केली आहे. बाहेर पडलो तर धोका आहे असं त्यांनी मला सांगितलं.”

चाळीशी पार केलेले हे नेते आपल्या घरातच नजरकैदेत आहेत. हल्ल्याच्या भीतीने ते आपलं दुकानही उघडू शकत नाहीयेत.

ते म्हणत होते, “बाजारात माझं कपड्याचं एक दुकान आहे. ते गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. तिथे सगळं ठीकठाक आहे की नाही हेही मला माहिती नाही.”

आपल्या परिसरात परत आल्यावर सार्वजनिकरित्या कोणी दिसलं तर त्यांच्यावर हल्ले झाल्याची माहिती मिळत आहे. खुलना येथील विद्यार्थी लीगचे नेते शफीकुल इस्लाम मुन्नासुद्धा त्यापैकीच एक आहेत.

बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images

बराच काळ भूमिगत राहिल्यावर घरी आल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला आहे असं त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं.

त्या नातेवाईकांनी बीबीसी बांग्लाला सांगितलं, “रस्त्यावर तीन चार लोकांनी त्यांना पळवून पळवून मारलं. त्यांना शेवटी खाली पाडलं आणि त्यांना भोसकलं. सध्या मुन्ना रुग्णालयात दाखल आहेत.”

दुसऱ्या बाजूला लक्ष्मीपूरमध्ये नूर आलम नावाच्या नावाच्या अवामी लीगच्या एका नेत्याला बेदम मारहाण करून हत्या केल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. लक्ष्मीपूर जिल्ह्यातील सदर उपजिल्ह्यातील चंद्रगंज यूनियन भागातील ही घटना आहे.

याशिवाय गेल्या आठवड्यात बारीसाल आणि चुआडांगामधील विद्यार्थी लीगचे तीन नेते वेगवेगळ्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेत पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. मात्र पीडितांच्या कुटुंबीयांनी बीनएनपी आणि त्यांच्याशी निगडीत संघटनांना या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवलं आहे.

बीनएनपीचं काय म्हणणं आहे?

बळजबरीने पैसे घेण्यात आपल्या पक्षाचा वाटा असल्याचे आरोप बीएनपीच्या ज्येष्ठ नेत्यांनी फेटाळले आहेत.

बीएनपीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नजिरुल इस्लाम खान बीबीसी बांग्लाशी बोलताना म्हणाले, “अवामी लीग दीड दशक सत्तेत होती. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने हल्ले झाले, त्यानंतर मला वाटत नाही की आमचे नेते किंवा कार्यकर्ते अशा प्रकारच्या घटनांमध्ये सामील असतील.”

बीएनपीचे आणखी एक नेते शमा ओबैद यांच्यामते बीएनपीची प्रतिमा खराब करण्यासाठी काही लोक पैसा उकळण्यासाठी त्यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत.

ते म्हणतात, “या प्रकरणात आमच्या पक्षाचं धोरण सुरुवातीपासूनच अतिशय कडक आहे. अशा कोणत्याही प्रकारात सहभागी होऊ नका असे स्पष्ट आदेश पक्षाकडून सुरुवातीलाच देण्यात आले आहेत. असं असूनही बीएनपीच्या नावाचा काही लोक गैरवापर करत आहेत असं ऐकायला आणि बघायला मिळत आहे.”

त्यांनी सामान्य लोकांना सल्ला दिला आहे की जर बीएनपीच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागत असेल तर या लोकांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images

तसंच, पक्षाचा एखादा कार्यकर्ता त्यांच्याकडे पैशाची मागणी करत असेल तर त्यांनी त्याची पुराव्यासकट तक्रार करावी, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

स्थायी समितीचे सदस्य खान म्हणाले की, “या पैसे उकळण्याच्या प्रकाराचा फटका ज्यांना बसला आहे, त्यांनी समोर येऊन आरोपींविरुद्ध ठोस पुरावे द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध संघटनात्मक कारवाई होईल.”

गेल्या महिन्यात पाच ऑगस्टला शेख हसीना सरकार कोसळल्यावर वेगवेगळ्या भागात बीएनपी नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध हल्ले, लुटमार आणि बळजबरीने पैसे घेतल्याचा आरोप होत आहे.

गेल्या दीड महिन्यात काही प्रकरणात बीएनपीने पटुआखाली, नेत्रकोना आणि खुलना समवेत अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे, काहींना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे तर काही लोकांना पक्षातूनच काढून टाकण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)