आसाममध्ये राहुल गांधींविरोधात एफआयआरचे आदेश, काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोड़ो न्याय यात्रे’दरम्यान आसाममधील जोराबाट इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पोलिसांना राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना केली आहे.

मंगळवारी (23 जानेवारी) सकाळी आसाम पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना जोराबाटमधून पुढे जाण्यापासून रोखलं.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींच्या यात्रेला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हे बॅरिकेड लावण्यात आले होते.

इथेच काही कार्यकर्ते पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढले. त्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना सूचना दिली की, राहुल गांधींवर जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात यावा.

सलग दुसऱ्या दिवशी ‘संघर्ष’

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोड़ो न्याय यात्रा' आसाममधून चालली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून इथे संघर्षाचं वातावरण तयार होताना दिसत आहे.

मंगळवारी (23 जानेवारी) 'भारत जोड़ो न्याय यात्रे’चा दहावा दिवस होता. त्यादिवशी खानापाडा भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षादल तैनात करण्यात आले होते. शिवाय गुवाहाटीला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्सही लावले होते.

यात्रा सुरू करण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की आसामचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान भलेही कायदा मोडू शकतात, पण काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता कायदा हातात घेणार नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स मोडले

फोटो स्रोत, X @SRINIVASIYC

त्यांनी म्हटलं, “आपण कमकुवत आहोत असा विचार करू नका. काँग्रेसचे कार्यकर्ते सिंह आहेत. तुम्ही तुमची ताकद ओळखा.”

त्यानंतर पोलिसांनी जेव्हा ही यात्रा अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला आणि ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआरची सूचना

हिमंत बिस्वा सरमा

फोटो स्रोत, Getty Images

मंगळवारच्या बॅरिकेड तोडण्याच्या घटनेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर राहुल गांधी यांच्यावर टीका करताना लिहिलं की, “ही आसामची संस्कृती नाहीये. आम्ही एक शांततापूर्ण राज्य आहोत. ही अशी ‘नक्षलवादी रणनीती’ आमच्या संस्कृतीचा भाग नाहीये.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मी आसामच्या पोलिस महासंचालकांना सूचना दिली आहे की, त्यांनी राहुल गांधींविरोधात जमावाला चिथावणी देण्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करावी. त्याखेरीज आपल्या हँडलवर पोस्ट केलेलं फुटेज पुरावा म्हणून वापरण्याचेही निर्देश दिले आहेत.

त्यांच्या अनियंत्रित वर्तनामुळे आणि मार्गदर्शक तत्वांच्या उल्लंघनामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झालं.”

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

दुसरीकडे राहुल गांधी यांनी म्हटलं की यात्रा अडवून मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आम्हाला फायदाच मिळवून दिला आहे.

“तुम्ही मला अपशब्द वापरा, काहीही करा; मी घाबरणार नाही.”

एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटलं, “यात्रेदरम्यान आसामचे मुख्यमंत्री जे करत आहेत, त्यामुळे यात्रेला फायदाच होत आहे. ही यात्रा आसाममध्ये मुख्य मुद्दा बनली आहे. ही तर यांची (भाजपची) घाबरवण्याची पद्धत आहे...आमचा तर फायदा होत आहे. आमचा जो काही संदेश आहे, तो गावागावांत पोहोचत आहे. कारण लोक विचारत आहेत की हे काय सुरू आहे?”

जमावाला संबोधित करताना राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

राहुल यांनी म्हटलं, “राहुल यांना मंदिरात जायचं आहे, त्यांना का अडवलं जातंय? राहुल यांना विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे, त्यांना का अडवत आहेत? भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची पदयात्रा जाते, बजरंग दलाची जाते, त्यामुळे ट्राफिक थांबत नाही. पण आमच्या पदयात्रेमुळं ट्राफिक अडवलं जातं.”

याआधी राहुल गांधी यांची यात्रा जेव्हा जोरहाट शहरातून जात होती, तेव्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन केल्याबद्दल आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, काँग्रेसने आरोप केला होता की, उत्तर लखीमपूरमध्ये काँग्रेसच्या अनेक गाड्यांवर दगडफेक झाली आणि पार्टीचे बॅनरही फाडण्यात आले.

काँग्रेसने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, रविवारी जेव्हा ही यात्रा अरुणाचल प्रदेशमधून आसाममध्ये आली, तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी आरोप केला की, भाजप समर्थकांच्या हल्ल्यात ते जखमी झाले.

यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी पोलिस महासंचालकांना तक्रार दाखल करत दोषींविरोधात कारवाई करण्यास सांगितलं होतं.

कठोर वक्तव्यं

मणिपूरमधून सुरू झालेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गेल्या गुरुवारी (18 जानेवारी) आसामला पोहोचली. तेव्हापासून राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यामध्ये कठोर वक्तव्यांची देवाणघेवाण सुरू आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

हिमंत बिस्वा सरमा खूप काळापासून काँग्रेसमध्ये होते आणि नंतर 2015 मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ते सातत्याने राहुल गांधींवर टीका करताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनीही एका सभेत बोलताना हिंमत बिस्वा सरमा यांना देशातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री म्हटलं होतं आणि ‘ते भाजपच्या अन्य मंत्र्यांनाही भ्रष्टाचार शिकवू शकतात,’ असंही विधान केलं होतं.

प्रत्युत्तरादाखल सरमा यांनी गांधी कुटुंबाला देशातील सर्वांत भ्रष्ट कुटुंब म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)