राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूरमधून सुरू, निवडणुकीत फायदा होईल?

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/INC

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, मणिपूर

लोकसभा निवडणुकीला केवळ शंभर दिवस उरले आहेत आणि काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूर ते मुंबई अशी सुमारे 6 हजार 700 किलोमीटरची पदयात्रा सुरू केलीय. भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा असून, भारत जोडो न्याय यात्रा असं या पदयात्रेला नाव देण्यात आलंय.

बस आणि पायी अशा दोन्ही माध्यमातून 66 दिवस ही यात्रा 15 राज्यांमधील 100 लोकसभा मतदारसंघांतून आणि 337 विधानसभा मतदारसंघातून प्रवास करेल.

यापूर्वी राहुल गांधींनी सप्टेंबर 2022 पासून जानेवारी 2023 पर्यंत कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

मणिपूरची राजधानी इम्फालजवळील थौबलमध्ये वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मणिपूर ज्या वेदनेतून गेलाय, त्या वेदना आम्हाला कळू शकतात. आम्ही वचन गेतो की, मणिपूरमध्ये शांतता, प्रेम आणि एकतेला पुन्हा आणू. कारण याच तीन गोष्टींसाठी हे राज्य कायम ओळखलं गेलंय.”

मणिपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळापासून मैतेई आणि कुकी समाजात हिंसा होतेय. माध्यांमधील वृत्तांनुसार, आतापर्यंत या हिंसेत 200 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.

मणिपूरमधल्या स्थितीला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा काँग्रेस आरोप आहे.

बीबीसीशी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, “आठ महिन्यांपासून पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? ते एका तासासाठीही इम्फालमध्ये आले नाहीत.”

मात्र, विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप मोदी सरकारने केलाय.

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/INC

फोटो कॅप्शन, राहुल गांधी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही यात्रा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. याबाबत काँग्रेसचं म्हणणं असं आहे की, या पक्षांतराचा यात्रेवर काहीच परिणाम होणार नाही.

यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा उजळल्याचा दावा केला जातो. तसंच, त्यांची राजकीय पत सुद्धा वाढल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.

राहुल गांधींना ऐकण्यासाठी मणिपूरमध्ये सभास्थळी उपस्थित राहिलेल्या मैबाम शारदा लेइमा म्हणतात की, “आमचं मणिपूर जळतंय. आम्हाला आशा आहे की, राहुल गांधी आमच्या समस्या जाणून घेतील आणि त्याबाबत ते बोलतील.”

लेइमा यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या वाएखोम इबेमा देवी म्हणतात की, “हे आयुष्य फार खडतर आहे. आम्ही जेव्हा कधी मदत छावणीत जातो, तेव्हा लोकांची स्थिती पाहून खूप वाईट वाटतं.”

तिथे लोकांशी बोलताना अनेकांचं म्हणणं होतं की, मणिपूरमधल्या स्थितीला सगळेच नेते जबाबदार आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, “या यात्रेनं मणिपूरची स्थिती सुधारेल, असं आम्हाला वाटत नाही.”

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी समाजातील वेगवेगळ्या घटकांशी बातचित करतील, असंही सांगितलं जातंय.

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काँग्रेस

रविवारी (14 जानेवारी) यात्रेच्या प्रारंभी मोठी गर्दी जमली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक उभे असलेले दिसत होते. प्रत्येकाच्या हातात काँग्रेसचे झेंडे होते. या गर्दीत सर्वाधिक संख्या महिलांची होती, हे विशेष.

काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला म्हणतात की, “पूर्वेकडील यात्रेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. पार्टीच्या संघटनेत सुद्धा परिवर्तन दिसून येतोय.”

पत्रकार आणि लेखिका नीरजा चौधरी म्हणतात की, “कुणीही राजकीय नेता थेट आपल्यापर्यंत आलेलं, आपल्याशी बोललेलं, आपल्याला ऐकलेलं लोकांना कायम आवडतं, चांगलं वाटतं. मात्र, या गोष्टीमुळे लोक निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या बाजूने होतील का किंवा काँग्रेसच्या शक्यतांवर किती परिणाम होईल, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.”

राहुल गांधी राजकारणाबाबत गंभीर नसल्याचा प्रचार भारतीय जनता पक्षाने अनेक वर्षे केला आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं म्हणणं आहे की, राहुल गांधींना आपल्या देशात कुणीच गांभीर्यानं घेत नाही.

या यात्रेचा उद्देश आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय असल्याचं काँग्रेस सांगतेय. राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे, असं काँग्रेस म्हणतेय.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या यात्रेला राहुल गांधींची 15 वी रिलॉन्च यात्रा म्हटलंय.

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/INC

भारत जोडो न्याय यात्रेचं महत्त्व

राहुल गांधींची यात्रा अशा काळात होतेय, जेव्हा विरोधी पक्षांसमोर आव्हान आहे की, भाजपचा विजयरथ रोखणं.

बहुतांश सर्वेक्षणांचा अंदाज असा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत.

कार्नेगी या अमेरिकन थिंकटँकचे सिनियर फेलो मिलन वैष्णव यांच्या विश्लेषणानुसार, 2024 ची लढाई सुरू झालीय आणि यात कुठलाच वाद नाही की, या लढाईत भाजप पुढे आहे.

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विजयासोबत भाजपने 28 पैकी 12 राज्यात सरकारं, तर इतर चार राज्यांमध्ये युती करून सत्तेत सहभागी आहे. काँग्रेसची तीन राज्यात सरकारं आहेत. नुकतेच तेलंगणात काँग्रेसला यश मिळालं.

विरोधी पक्ष आरोप करतायेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात भारत कमकुवत झालाय. लोकशाही हक्क, सरकारी संस्था यांचं नुकसान झालंय, अल्पसंख्यांक आणि अशक्त घटकांविरोधातील द्वेष वाढला असून हिंसेतही वाढ झालीय.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

टीकाकारांचं म्हणणं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. परिणामी राज्यघटनाच धोक्यात आहे.

भाजप आणि सरकारचं म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या विकासानं जगात आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे आणि कोट्यवधी लोकांपर्यंत सुधारणा पोहोचवली.

नुकतंच संसदेच्या सुरक्षेत कमतरता राहिल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी केल्यानंतर जवळपास 150 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर तर विरोधी पक्ष आणि सरकारमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.

जनता दल युनायटेडचे के. सी. त्यागी म्हणतात की, “जर भाजप तिसऱ्यांदा जिंकली, तर विरोधी पक्षाला काहीच भवितव्य उरणार नाही. ना भारतीय राज्यघटनेला भवितव्य उरणार, ना धर्मनिरपेक्षतेला, ना समाजवादाला, ना लोकशाहीला. अगदी भारतात विरोधी पक्षालाही भवितव्य उरणार नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, “आपल्याला आपलं काम करत राहावं लागेल. भीतीची काय चिंता करायची? ही लोकशाही आहे. आपल्याला आपली भूमिका कष्टपूर्वक पार पाडावीच लागेल.”

काँग्रेसची यात्रा अशा काळात होतेय, जेव्हा 28 विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतल्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जागावाटपासह इतर मुद्द्यांवर ही चर्चा सध्या फिरतेय.

विश्लेषक मिलन वैष्णव म्हणतात की, “इंडिया आघाडी एका समान मुद्द्यावर सहमत होणं आवश्यक आहे. इंडिया आघाडीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा नसणं हे त्यांची कमकुवत स्थिती उघड करणारी गोष्ट आहे. तसंच, जागावाटपावरही ते फारसं काही ठोस करताना अद्याप दिसत नाहीत.”

‘निवडणूक हा उद्देश नाहीय’

निवडणूक काही दिवासंवर येऊन ठेपली असताना, या यात्रेबाबत काँग्रेसचं म्हणणं आहे की, ही यात्रा निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून आखण्यात आली असून, ही एक वैचारिक यात्रा आहे, जिचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही.

हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राचे राजकीय संपादक विनोद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस म्हणणं ही ‘पब्लिक डिप्लोमसी’ आहे, तर काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांच्या मते, पक्ष ‘चूक’ करत आहे आणि अशा भूमिकेनं केवळ ‘संभ्रम’च पसरेल

संजय झा म्हणतात की, काँग्रेसनं असं म्हटलं पाहिजे की, आम्ही सामाजिक न्यायासाठी लढत आहोत आणि सत्ता मिळाल्यावर आम्ही ज्या सामाजिक न्यायाची मागणी करतोय, ते प्रत्यक्षात आणू.

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/INC

याबाबत बीबीसीशी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "निवडणुकीचं सध्या वातावरण आहे. आमचीही त्यासाठी तयारी सुरू आहे. भारत जोडो न्याय यात्रेत संपूर्ण काँग्रेस संघटना सहभागी आहे असं नाही. जे काही आम्हाला करता येतंय, ते आम्ही करतोय. मात्र, 2024 च्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल की नाही, हे मी सांगू शकत नाही."

विनोद शर्मा यांच्या मते, राहुल गांधींसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यात्रेदरम्यान त्यांनी लोकांसमोर आपली भूमिका आणि नरेटिव्ह मांडणं.

शर्मा पुढे म्हणतात, "हे नरेटिव्ह प्रत्येक राज्यात वेगळे असले पाहिजेत. मात्र, त्याचवेळी ते सर्व राज्यांमध्ये हे निश्चितपणे सांगू शकतात की, राज्यघटना आणि लोकशाहीला धोका आहे, विरोधकांना इथे स्थान नाही, राष्ट्रीय स्तरावरील एका मुद्द्यावर सरकारकडून निवेदन मागितल्यावर खासदारांना निलंबित केलं गेलं.”

यात्रेवरून ‘इंडिया’ आघाडीतही मतमतांतरं

भारत जोडो न्याय यात्रेवरून ‘इंडिया’ आघाडीतल्या नेत्यांमध्ये, पक्षांमध्येही मतमतांतरं दिसून येत आहेत.

जनता दल (यूनायटेड) चे नेते के. सी. त्यागी यांना याची काळजी वाटते की, “या यात्रेदरम्यान राहुल गांधी दिल्लीत गैरहजर असतील आणि मग जागावाटपाच्या चर्चांवर त्याचा परिणाम होईल.”

त्यागी पुढे म्हणतात की, “एवढ्या मोठ्या नेत्याची इतका काळ गैरहजेरी आम्हाला काही योग्य वाटत नाही. ते (राहुल गांधी) दिल्लीत असले तर जागावाटप करू शकतील, पक्षा-पक्षांमधील दुरावा दूर करू शकतील, कँपेन कमिटी बनवतील, बूथ कमिट्यांपर्यंत पोहोचतील, सभांचं आयोजन करतील. ते इथे असते तर जास्त व्यवाहारिक झालं असतं. जेव्हा आम्ही भाजपला पराभूत करू, तेव्हा काँग्रेस तर आपसूकच मजबूत होईल.”

“मार्चअखेरीस जर निवडणुका झाल्या, तर काय होईल? मोदी तर धक्कातंत्रात तरबेज आहेत. तुम्ही एका दिवसात 20-25 किलोमीटर चाललात, तर एका लोकसभा मतदारसंघात पोहोचाल. पण तुम्ही हेलिकॉप्टरने जा, एकदाच 10 मतदारसंघ पूर्ण होतील. राहुल गांधी पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांचा वेळ तुम्ही असा का वाया घालवत आहात?” असंही त्यागी म्हणाले.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, त्याचवेळी सुप्रिया सुळेंना वाटतं की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत आणि ते असताना फारशी काही अडचण येणार नाही. जेव्हा राहुल गांधींची गरज भासेल, तेव्हा ते फोनवर उपलब्ध असतीलच.

“इंडिया आघाडीची स्थिती सध्या चांगली आहे. राहुल गांधी चांगलं काम करतायेत. ते सगळ्यांना प्रेम आणि करुणेनं जोडू पाहतायेत. यालाच तर नेतृत्व म्हणतात,” असंही सुप्रिया सुळे यांना वाटतं.

त्यागींना वाटतं की, काँग्रेसपेक्षा ही इंडिया आघाडीची यात्रा असती तर बरं झालं असतं, जेणेकरून यूपीत अखिलेश आणि जयंत चौधरी, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार अशांना सोबत घेऊन चालता आलं असतं.

पण इंडिया आघाडीतील एखादा पक्ष असा काही उपक्रम राबवत असेल, तर त्यात चूक काय, असं सुप्रिया सुळेंना वाटतं.

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी म्हणतात की, “विरोधी पक्षांनी एकप्रकारे शस्त्र खाली ठेवली आहेत. सगळेजण आपापले पक्ष वाचवण्यावर भर देतायत. एकत्र येऊन लढलं पाहिजे, ही भावनाच कुठे दिसत नाही.”

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)