राम मंदिर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू असताना विरोधी पक्षांचे नेते काय करत होते?

फोटो स्रोत, ANI
अयोध्येत तयार होणाऱ्या राम मंदिरात रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी मुख्य पुजा सुरू केली.
यावेळी गर्भगृहात पीएम मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागलत यांची उपस्थिती होती.
देशातील बडे उद्योजक आणि सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांसह अनेकांची या सोहळ्यात उपस्थिती होती. पण विरोधी पक्षातील नेते मात्र कार्यक्रमात कुठंही दिसले नाहीत.
मग हा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना विरोधी पक्षातील नेते नेमकं काय करत होते?
उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात
अयोध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू असताना सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले.
प्रभू रामचंद्रांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या रामकुंड पंचवटी भागातही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात पुजा केली. त्यानंतर त्यांनी महाआरतीदेखील केली.
त्याशिवाय त्यांनी 'रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ' प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं.
अयोध्येत राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेचे संस्थापक आणि उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे मशीद पाडल्या प्रकरणी आरोपीदेखील होते.

फोटो स्रोत, @SHIVSENAUBT
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मंदिराच्या कामासाठी 1 कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.
पण उद्धव ठाकरे यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या अवघ्या दोन दिवस आधी स्पीड पोस्टाद्वारे आमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
स्पीड पोस्टाद्वारे नेत्यांना आमंत्रण पाठवल्यानं पक्षानं नाराजी व्यक्त केली. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यासाठी श्रीराम त्यांना शाप देतील असंही म्हटलं.
"तुम्ही बड्या हस्ती आणि चित्रपटातील सेलिब्रिटींना, त्यांचा राम जन्मभूमीशी काही संबंध नसताना विशेष आमंत्रण देत आहात," असं ते म्हणाले.
काँग्रेसने सोमवारी काय केलं?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना सोमवारी ते आसाममध्ये होते. अनेक बडे काँग्रेस नेतेही त्यांच्याबरोबरच यात्रेत आहेत.
सोमवारी सकाळी राहुल गांधी वैष्णव संत श्रीमंत देव यांच्या आसाममधल्या बटाद्रवा थान मंदिरात जाणार होते. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच अडवलं.
या संपूर्ण घटनेचा एक व्हीडिओही समोर आला आहे. त्यात राहुल गांधी त्यांच्या गाडीतून उतरून पोलिसांना, त्यांना नेमकं का अडवलं? अशी विचारणा करताना दिसले.
व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत,"नेमकं प्रकरण काय आहे? मी जाऊन पाहू शकतो का? मी मंदिरात का जाऊ शकत नाही? मंदिरात जाण्याची परवानगी नाही का? माझ्याकडं परवानगी आहे. मला मंदिर प्रशासनानं बोलावलं आहे. मला हात जोडायचे आहेत, देवाचं दर्शन घ्यायचं आहे."
या घटनेनंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला बोलावण्यात आलं होतं आणि आता आम्हाला जाऊ दिलं जात नाही. आम्ही बळजबरी करणार नाही. आम्ही यात्रा करण्यासाठी इथं आलो आहोत. आम्हाला फक्त कारण जाणून घ्यायचं आहे."
राहुल गांधी असंही म्हणाले की, "असं वाटतं आज फक्त एकच व्यक्ती (पीएम नरेंद्र मोदी) मंदिरात जाऊ शकते."

फोटो स्रोत, INC
10 जानेवारीला काँग्रेसनं एक निवेदन जारी करत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते अधीररंजन चौधरी सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
पक्षानं सांगितलं होतं की त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळालं होतं.
कार्यक्रमात सहभागी व्हावं की नाही? यासंदर्भात पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
"धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. पण भाजप आणि आरएसएस दीर्घ काळापासून याला राजकीय प्रोजेक्ट बनवत आहेत. एका अपूर्ण मंदिराचं उद्घाटन ते केवळ निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी करत आहेत हे स्पष्ट आहे," असं काँग्रेसनं म्हटलं होतं.
दुसरीकडं काँग्रेस नेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा श्रीरामांच्या भक्ती रंगात रंगताना दिसले.
त्यांनी सोमवारी हरियाणामध्ये झज्जरच्या पटौदीमध्ये भगवान श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा केली.
रामरंगात रंगली आम आदमी पार्टी
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सुरू असताना आम आदमी पार्टीनं दिल्लीत शोभायात्रा काढली होती. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघांमध्ये भंडाऱ्याच्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं.
दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी रामाची पूजा आणि यज्ञही केला.
आप नेते दिलीप पांडे म्हणाले की, "जवळपास सात ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. त्याशिवाय तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा सुंदरकांड पठणही करण्यात आलं. सुमारे 16-17 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुंदरकांड आणि आरतीनंतर फळांचा प्रसाद वाटप करण्यात आला."
मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून आणि निर्देशानुसार देशातील सर्वोत्तम रामलीलेचं सादरीकरण सोमवारी करण्यात आल्याचंही ते म्हणाले.
21 जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः हा रामलीला कार्यक्रम पाहिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत म्हटलं होतं की, "आज यावेळी आपण रामभक्ती करत आहोत. आपण त्यांच्या जीवनातून आणि शब्दांमधून प्रेरणा घेणं गरजेचं आहे."
आप नेते दिलीप पांडे म्हणाले की, सीएम केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, नेते, मंत्री आणि सर्वांनाच शोभायात्रेत सहभागी होऊन भंडाऱ्यात सेवा करण्यास सांगितलं होतं.
त्यापूर्वी सीएम केजरीवाल यांना पत्रकारांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, "त्यांचं एक पत्र आलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला. त्यांनी म्हटलं की, त्यांची टीम वैयक्तिकरित्या येऊन आमंत्रण देईल. पण ती टीम आलीच नाही."

फोटो स्रोत, AAP
ते म्हणाले की, "मला पत्नी आणि मुलांसह दर्शन करायचं आहे. माझे आई वडीलही दर्शनासाठी उत्साही आहेत. त्यामुळे मी पत्नी आणि आई-वडिलांबरोबर नंतर जाईल. एकदा हा 22 तारखेचा कार्यक्रम होऊ द्या."
केजरीवाल म्हणाले होते की, ज्येष्ठांना रामललाचं दर्शन घेता यावं म्हणून त्यांचं सरकार अतिरिक्त रेल्वे गाड्याही सोडणार आहे.
ममता बॅनर्जींचं उत्तर
विरोधी आघाडी इंडियामध्ये सहभागी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाल्या नाहीत.
तर सोमवारी सोहळा सुरू होता त्याचवेळी त्यांनी 'संप्रति रॅली'चं आयोजन केलं.
एका धार्मिक सोहळ्याचं राजकारण करत असल्याचा आरोप तृणमूलनं भाजपवर लावला. त्याला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जींनी सर्व धर्मांसह सद्भावना रॅलीचं आयोजन केलं.
त्यांनी तृणमूल कार्यकर्त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे सद्भावना रॅली काढण्याची विनंती केली होती.
त्याशिवाय कोलकातामध्ये अनेक रॅली काढण्यात आल्या त्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली होती.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार कोलकात्याच्या रस्त्यांवर 4 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
या रॅली भवानीपूर, कॅमक स्ट्रीट, सियालदह, गरफा, पटुली, संकुतला पार्क आणि पोर्ट एरिया मार्गे निघाल्या.

फोटो स्रोत, ANI
टीएमसीची 'संप्रति रॅली' हाजरा क्रॉसिंगहून सुरू होऊन हाजरा रोड आणि सय्यद अमीर अली अॅव्हेन्यू मार्गे पार्क सर्कस मैदानापर्यंत पोहोचली.
ममता बॅनर्जींच्या रॅलीमध्ये सुमारे लाखभरापेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते, असं तृणमूल नेत्यांनी सांगितलं.
तमिळनाडूमध्ये लाइव्ह प्रसारणावरून तणाव
तमिळनाडूमध्ये सध्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचं सरकार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हेदेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित नव्हते.
भाजपला केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यात मतं मिळू शकत नाहीत, असं स्टॅलिन यांनी म्हटलं.
पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत स्टॅलिन सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या संघर्ष पाहायला मिळाला.
राज्य सरकारनं प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मंदिरांमध्ये रामाच्या पूजेवर बंदी घातली असल्याचा आरोप सीतारमण यांनी केला. पण स्टॅलिन सरकारनं हा दावा फेटाळला.
अर्थमंत्री सीतारमण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तमिळ वृत्तपत्राचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं की, तमिळनाडू सरकारनं 22 जानेवारीला अयोध्येच्या राममंदिर सोहळ्याच्या लाइव्ह कव्हरेजवर बंदी लावली आहे.

फोटो स्रोत, ANI
त्यांनी लिहिलं की, तमिळनाडूमध्ये 200 पेक्षा जास्त श्रीराम मंदिरं आहेत. तसंच एचआर अँड सीईजी मंदिरं चालवण्याची कामं करतात त्याठिकाणी श्री रामांच्या नावाने पूजा, भजन आणि प्रसाद देण्याची परवानगी नाही.
अर्थमंत्र्यांनी लिहिलं की, "पोलिस मंदिरांना वैयक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यापासूनही अडवत आहेत. ते आयोजकांना मंडप तोडण्याची धमकी देत आहेत. या हिंदू विरोधी कारवाईचा मी निषेध करते."
त्याचवेळी तमिळनाडू सरकारमधील धार्मिककार्य मंत्री पी. के. शेखरबाबू यांच्या मते, कोणावरही कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही.
अखिलेश यांचे राम
समाजवादी पार्टीचे मुख्य नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
त्यांनी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एक पत्र लिहून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे आभारही मानले होते.
सोमवारी ते अयोध्येपासून 150 किलोमीटर अंतरावरील लखनऊमध्ये होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "श्री रामांची जी मूर्ती दगडाची होती तिला आज प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर देवाचं स्वरुप येईल. जे निती, मर्यादा याचा आदर करतात ते भाविक रामाला अगदी जवळचे वाटतात."

फोटो स्रोत, ANI
त्यापूर्वी त्यांनी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्टही केली होती.
त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट करत लिहिलं होतं, "उस पावन ह्रदय में बसते है सियाराम, जो करता रीति-नीति-मर्यादा का मान."
नंतर संपूर्ण कुटुंबासह रामललाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे.
भाजपच्या बड्या नेत्यांनी काय केलं?
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, रजनीकांत अशा अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
हजारोंच्या संख्येत लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पण भाजपचे अनेक मोठे नेते कार्यक्रमात दिसले नाहीत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी देशातील विविध भागांमध्ये असलेल्या मंदिरांमध्ये पूजा केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अमित शाह - नवी दिल्लीच्या ऐतिहासिक बिर्ला मंदिरात पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी पूजा केली. मंदिरातूनच त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह प्राणप्रतिष्ठा सोहळा लाइव्ह पाहिला.
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीच्या सनातन धर्म मंदिरात पूजा केली. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचं पुनरागमन होत आहे, हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे असं ते म्हणाले.
जेपी नड्डा - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा झंडेवालान मंदिरात पोहोचले आणि त्यांनी याठिकाणी पूजा केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








