अयोध्या राम मंदिर: प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान असलेले अनिल मिश्रा कोण आहेत?

फोटो स्रोत, ANI
- Author, अनंत झणाणे
- Role, प्रतिनिधी, बीबीसी हिंदी
- Reporting from, अयोध्या
प्राण प्रतिष्ठेच्या पद्धतीनुसार अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासून पूजेच्या विधींना सुरूवात झाली आहे. 22 जानेवारी रोजी या पूजा सोहळ्याची सांगता होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
या संपूर्ण पूजा सोहळ्यात ट्रस्टचे सदस्य व संघाचे जुने स्वयंसेवक डॉ. अनिल मिश्रा यजमानपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता सांगतात की, 'प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सात दिवस पूजा करण्याचा नियम आहे, त्यामुळे कुणाला ना कुणाला तरी सात दिवस बसून पूजा करावी लागते.'
ते म्हणतात, “डॉ. अनिल मिश्रा यांची यजमान म्हणून निवड करण्यामागे दोन कारणं होती – एक म्हणजे ते मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि दुसरं म्हणजे ते अयोध्येत आहेत. आमचे इतर सर्व विश्वस्त साधू संत आहेत. त्यामुळेच डॉ. अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नीची निवड झाली आहे."
ते म्हणाले, "जर पंतप्रधान मोदी शेवटच्या दिवशी येणार असतील तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कुणाला तरी बसून संपूर्ण पूजा करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. धर्मशास्त्रानुसार कुणाला तरी पूजा करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
"त्यामुळेच डॉ. अनिल मिश्रा यांना यजमान बनवण्यात आलं असून ते लागोपाठ सात दिवस पूजा करणार आहेत आणि त्याची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सात दिवस यजमान म्हणून पूजा करणारे अनिल मिश्रा शेवटच्या दिवशीही पूजेत सहभागी होतील," प्रकाश गुप्ता सांगतात.
22 जानेवारीच्या कार्यक्रमाविषयी प्रकाश गुप्ता सांगतात, "22 जानेवारीला सकाळपासूनच सांगता पूजेला सुरूवात होईल आणि त्या दिवशी मोदीजी शेवटची पूजा करतील. इतर विधींसह ते आरती करतील आणि नंतर पूजाविधी पूर्ण होतील. हा संपूर्ण कार्यक्रम अर्ध्या तासाचा असेल."
संघाचे जुने स्वयंसेवक आणि कार्यवाह
अनिल मिश्रा यांना जवळून ओळखणारे आणि अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेले त्यांचे एक सहकारी बीबीसीला सांगतात की, अयोध्येतील ‘आरएसएस’ कार्यालयातील बहुतेक लोकांना डॉ. अनिल मिश्रा यांची एक आदर्श स्वयंसेवक म्हणून ओळख आहे.

फोटो स्रोत, ANI
यापूर्वी अनिल मिश्रा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यकारिणी पदावर कार्यरत होते. संघाच्या रचनेत जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची भूमिका आहे. विशेषतः अयोध्येसारख्या जिल्ह्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं पद आहे.
विजया दशमी, मकर संक्रांत, रक्षाबंधन यांसारख्या दिवशी अयोध्येमध्ये ‘आरएसएस’तर्फे होणारे उपक्रम अनिल मिश्रांसारख्या जिल्हा कार्यवाह असलेल्या व्यक्तीच्या सहकार्यानेच पार पडत असत.
‘आरएसएस’चे जिल्हा कार्यवाह झाल्यानंतर ते विभाग कार्यवाह झाले आणि त्यानंतर त्यांना अयोध्या प्रांताचे प्रांत कार्यवाह बनवण्यात आलं.
अनिल मिश्रा प्रांताचे प्रभारी असताना अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर निर्णय आल्याचं ‘आरएसएस’च्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या निर्णयानंतर केंद्र सरकारने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केल्यावर डॉ. अनिल मिश्रा यांना ट्रस्टचं विश्वस्त करण्यात आलं.

अयोध्येत आम्ही ज्या स्वयंसेवकांशी बोललो, त्यांच्या मते संघ नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून अनिल मिश्रा यांच्याकडे एक मेहनती, प्रामाणिक आणि जबाबदार स्वयंसेवक म्हणून पाहिलं जातं.
डॉ. अनिल मिश्रा यांना जवळून ओळखणारे एक स्वयंसेवक सांगतात की, डॉ. मिश्रा यांनी रामजन्मभूमी आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतलेला.
डॉ. अनिल मिश्रा हे अतिशय मितभाषी असून कामाबाबत गंभीर आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून आपलं काम विचारपूर्वक करत असल्याचं स्वयंसेवक सांगतात.
शासकीय डॉक्टर असूनही संघाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या
अनिल मिश्रा हे शासकीय होमिओपॅथी डॉक्टर होते. जी लोकं त्यांना जवळून ओळखतात ते सांगतात की, सहसा ‘आरएसएस’ जिल्हा कार्यवाह म्हणून अशाच लोकांची नियुक्ती केली जाते जे गृहस्थाश्रमाचं पालन करतात आणि एखादा व्यवसाय करत असतात.

कार्यालयात उपस्थित असलेल्या संघ स्वयंसेवकांचं म्हणणं आहे की, कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्याच्या व्यवसायात हलगर्जीपणा न करण्याची संघाची शिकवण आहे आणि त्याचबरोबरीने त्याने संघाची जबाबदारीही पार पाडली पाहिजे. होमिओपॅथीचे शासकीय डॉक्टर असताना डॉ. अनिल मिश्रा यांनीही हीच कार्यशैली अवलंबल्याचं स्वयंसेवकांचं म्हणणं आहे.
डॉ. अनिल मिश्रा यांचं कुटुंब गोंडा जिल्ह्यातील महबूबपूर गावचं आहे आणि ते शासकीय डॉक्टर असल्याने त्यांची नियुक्ती अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येच होत असे.
डॉ. अनिल मिश्रा 2017 मध्ये निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांची संघातील भूमिका आणि जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यांना प्रांत कार्यवाह बनवण्यात आलं.
निवृत्तीनंतर डॉ. अनिल मिश्रा यांचा अयोध्येतील रकाबगंज येथे एक दवाखानाही होता जिथे बसून ते वैद्यकीय सुविधा पुरवायचे. मात्र रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त झाल्यापासून ते त्याच कामात व्यस्त असतात.
अयोध्या ‘आरएसएस’सोबत जुनं नातं
कृष्ण चंद्र हे अयोध्येतील ‘आरएसएस’ कार्यालयाचे प्रभारी आहेत. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त होण्यापूर्वी डॉ. अनिल मिश्रा अयोध्येतील संघाचे कार्य याच कार्यालयातून पाहत असत.
कृष्ण चंद्र म्हणतात, "डॉ. अनिल मिश्रा जेव्हापासून ट्रस्टचे विश्वस्त झाले आहेत, तेव्हापासून त्यांचा संपूर्ण वेळ ट्रस्टच्याच कामात निघून जातो."
राममंदिर आंदोलनात डॉ. अनिल मिश्रा यांनीही कारसेवा केली होती, याचा कृष्ण चंद्र यांनी पुनरुच्चार केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








