अयोध्या राम मंदिर: 'दिव्यांग मंदिरात प्राण प्रतिष्ठा होऊ शकत नाही,' शंकराचार्यांचे वक्तव्य

- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
“मोदीजी म्हणाले आहेत की अपंग म्हणू नका, दिव्यांग म्हणा, त्यामुळे आजच्या तारखेला हे दिव्यांग मंदिर आहे. सकलांग देवता म्हणजे ज्यांच्या शरीराचे सकल (सर्व) अवयव आहेत, त्यांची दिव्यांग मंदिरात प्रतिष्ठापना कशी होऊ शकते?”
“पंतप्रधान मोदींनी तीनदा धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे... त्यामुळे थेट कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार त्यांना असू शकत नाही."
“जर ते विवाहित असतील, तर त्यांना पत्नीसोबत बसावं लागेल. पत्नीला दूर सारून कोणत्याही विवाहित व्यक्तीला कुठल्याही धार्मिक कार्यात सहभागी होता येत नाही.
“कळस आणि ध्वजाशिवाय मंदिरात प्रतिष्ठापना केली गेल्यास ती रामाची मूर्ती वाटेल पण त्यात राक्षस असेल. राक्षसी शक्ती येऊन त्यामध्ये वास्तव्य करतील.”
वरील विधानं, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी 16 जानेवारीला बीबीसीला दिलेल्या मुलाखतीचा भाग आहेत.
या मुलाखतीत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केवळ प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमावरच प्रश्न उपस्थित केले नाहीत तर पहिल्यांदाच त्या प्रश्नांची उत्तरंही दिली, जे सोशल मीडियावर वारंवार विचारले जात आहेत.
प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत तुम्ही नाराज का आहात?
शंकराचार्य: मंदिर हे देवाचं शरीर असतं. त्याचं शिखर म्हणजे त्यांचे डोळे. त्याचा कलश हे त्यांचे डोके आणि ध्वजपताका त्यांचे केस असतात. याच क्रमाने सर्वकाही असतं. सध्या फक्त धड तयार झालंय आणि जर तुम्ही धडामध्येच प्राण प्रतिष्ठा केलीत तर तो शरीराचा कनिष्ठ भाग होऊन जाईल.
मोदीजी म्हणाले आहेत की अपंग म्हणू नका, दिव्यांग म्हणा, त्यामुळे आजच्या तारखेला हे दिव्यांग मंदिर आहे. सकलांग देवता म्हणजे ज्यांच्या शरीराचे सकल(सर्व) अवयव आहेत, त्यांची दिव्यांग मंदिरात प्रतिष्ठापना कशी होऊ शकते?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ते एक पूर्ण पुरूष आहेत, पूर्ण पुरूषोत्तम आहेत, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. मंदिर पूर्ण झाल्यावरच प्राण प्रतिष्ठा हा शब्द जोडता येईल. सध्या तिथे कोणाचीच प्राण प्रतिष्ठा होऊ शकत नाही, जर असं होत असेल तर ते करणारी व्यक्ती बळजबरीने करत आहे, असा त्याचा अर्थ होतो.
अशा परिस्थितीत काय म्हणणं योग्य ठरेल?
शंकराचार्य: अद्याप डोकं तयार झालेलं नाही. त्यात प्राण टाकण्यात काहीही अर्थ नाही. संपूर्ण शरीर तयार झाल्यावरच प्राण येतील आणि त्याला अजून वेळ आहे. त्यामुळे आता होत असलेल्या कार्यक्रमाला धर्माच्या दृष्टिकोनातून प्राण प्रतिष्ठा म्हणता येणार नाही.
तुम्ही आयोजन करू शकता... रामाची गाणी गाऊ शकता, कीर्तन करू शकता, व्याख्यानं देऊ शकता. हे सर्व करता येईल, पण प्राण प्रतिष्ठा या शब्दाचा वापर मंदिर बांधल्यानंतरच लागू होईल.
पंतप्रधान प्राण प्रतिष्ठा करू शकतात का?
शंकराचार्य: पंतप्रधानांनी तीन वेळा धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली आहे. एकदा भाजपचा सदस्य होताना, कारण पक्षाने निवडणूक आयोगाला तो धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलंय.

फोटो स्रोत, ANI
शंकराचार्य: दुसऱ्यांदा संविधानाची शपथ घेऊन ते खासदार झाले आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान असताना त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतली. त्यामुळे थेट कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार त्यांना असू शकत नाही.
सर्वांचे प्रतिनिधी असल्याच्या नात्याने ते या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचं सांगतात, हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा ते देशातील सर्व धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि तिथे त्यांचं प्रतिनिधित्व करतील.
कोणत्याही एका धर्माच्या बाबतीत त्यांनी असं करता कामा नये. एकतर सर्व धर्माच्या बाबतीत करा किंवा कोणत्याही धर्मात करू नका.
पंतप्रधान मोदी यजमान असू शकतात का?
शंकराचार्य: आपल्या काही धार्मिक श्रद्धा आहेत. पत्नीला दूर ठेवून कोणतीही विवाहित व्यक्ती कुठल्याही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकत नाही. तुमचं लग्न झाले आहे. तुमची पत्नी आहे. जर तसं नसेल तर वेगळी गोष्ट आहे.
तुमचे तिच्याशी संबंध आहेत की नाही? संवाद होतो की नाही. एकत्र राहता किंवा नाही. ही वेगळी गोष्ट आहे, पण धार्मिक कार्यात तिचा अधिकार आहे. ती अर्धे शरीर आहे.
ज्यावेळी एकत्रितपणे सप्तपदी घेतली जाते, त्यावेळी धार्मिक कार्यात मी तुला माझ्या शेजारी स्थान देईन, असं वचन देण्यात येतं. हे वचन आधीच देण्यात आलेलं आहे, त्यामुळे तिला धार्मिक कार्यात संधी द्यावीच लागेल. तुम्ही तिला (पत्नी) वंचित ठेवू शकत नाही.
तुम्ही स्वतः ब्राह्मण नसल्याचं म्हटलं जातंय?
शंकराचार्य: फक्त ब्राह्मणच संन्यासी असू शकतो, दंडी संन्यासी. आपल्या धर्मशास्त्रात ही एक प्रस्थापित पद्धत आहे आणि केवळ ब्राह्मणच संन्यासी होऊ शकतो आणि ते सुद्धा फक्त दंडी संन्यासीच होऊ शकतो आणि फक्त दंडी संन्यासीच शंकराचार्य असू शकतो.

शंकराचार्य: मी ब्राह्मण नाही असं म्हणणाऱ्यांनी कुठल्यातरी कोर्टात खटला भरावा. त्यांनी न्यायालयात हे सिद्ध करावं… हे सिद्ध झालं तर आम्हाला स्वत:लाच या जागेवरून पायउतार व्हावं लागेल.
तुमच्यावर काँग्रेस समर्थक असल्याचा आरोपही लावण्यात येतोय?
शंकराचार्य: ठीक आहे, ते आणखी काय बोलू शकतात? सर्व शास्त्र ओरडून-ओरडून सांगत आहेत की मंदिर हे देवतेचं शरीर आहे. अपूर्ण मंदिरात प्राण प्रतिष्ठा होऊ शकत नाही.
त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आणि त्याउलट मला काँग्रेस समर्थक, ते ब्राह्मण नाहीत, रागीट, मोदीविरोधक अशी लेबलं लावत आहेत. ही आमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत.
प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला विरोध करताना तुम्हाला भीती वाटत नाही का?
शंकराचार्य: आम्ही कोण आहोत? आमच्याकडे एवढ्या महान परंपरेचं, एवढ्या मोठ्या शास्त्रांचं बळ आहे. आम्ही शास्त्राच्या जोरावर बोलत आहोत. हे जे राजकीय हिंदू आहेत, त्यांची संख्या नगण्य आहे.

फोटो स्रोत, ANI
शंकराचार्य: अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन मिस्ड कॉलची माहिती दिली आणि सांगितलं की आम्ही 10 कोटी लोकांना समाविष्ट करून घेतलं. अशाप्रकारे 10 कोटी लोक भाजपवाले झाले. त्यांना जवळपास 21 कोटी मतं मिळतात.
तेवढी लोकं त्यांची झाली, पण देशात 100 कोटी हिंदू आहेत, 50 कोटी हिंदू हे सनातनी आहेत, जे गुरूंच्या आदेशाचं पालन करतात… भारतात जितके हिंदू राहतात त्यापैकी बहुतांश हिंदू त्यांच्यासोबत नाहीत. ते अजूनही आमच्यासोबत आहेत.
तुम्हाला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालंय का?
शंकराचार्य: नाही, मला कोणतंही निमंत्रण पत्र मिळालेलं नाही.
परंपरेने चालत आलेला प्रोटोकॉल तुम्ही हिसकावून घेतला आहे. हिंदू धर्माचे गुरू नसलेल्या दलाई लामांना तुम्ही प्रोटोकॉल देता. तुम्ही रामाच्या मंदिरात शंकराचार्यांना बोलवत नाही. तुम्ही दलाई लामांना बोलवता, याचा अर्थ काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुम्ही वैयक्तिकरित्या नाराज आहात का?
शंकराचार्य: तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या. 2019 मध्ये, आम्ही त्यांच्या (पंतप्रधान मोदी) विरोधात एका व्यक्तीला उभं केलेलं कारण विश्वनाथ कॉरिडॉरच्या नावाखाली सुमारे 150 मंदिरं पाडण्यात आली होती.
आपली पौराणिक मंदिरं असलेल्या तिथल्या मूर्त्या फेकून देण्यास सुरूवात केली गेली होती.

फोटो स्रोत, ANI
शंकराचार्य: काही 2 हजार वर्षं, तर काही 1 हजार वर्ष जुन्या होत्या… आम्ही याच कारणासाठी औरंगजेबाचा द्वेष केला आणि आता आमच्या भावाने किंवा बहिणीने असंच केलं तर आम्ही त्याला माफ कसं करणार… कोणतंही वर्तमानपत्र किंवा टीव्ही याबाबतीत रिपोर्टिंग करत नव्हतं.
आम्हाला एकच मार्ग दिसला तो म्हणजे त्यांच्याविरोधात एका संताला उभं करणं, आणि त्यांची मुलाखत सर्वांनी घेणं हे स्वाभाविक आहे, मोदीजींना धर्मिक व्यक्ती मानलं जातं, आणि त्यांच्याविरोधात संताला उभं राहण्याची गरज का पडली, असं विचारलं जाईल.
जेव्हा ते उभे राहतील, तेव्हा ते आपलं म्हणणं मांडू शकतील, की मंदिरं पाडली गेली. आमच्या धर्माचं नुकसान झालं. त्यामुळे आम्ही त्यांना उभं केलं, पण कोणतीही त्रुटी न काढता त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.
हिंदू धर्माची व्याख्या बदलली जातेय का?
शंकराचार्य: आता असं होतंय की वेद, धर्मग्रंथ, गुरु, धर्माचार्य यांना आम्ही मानणार नाही आणि आमचा नेताच सर्वस्व आहे, तो जे सांगेल तीच पूर्वदिशा असेल. लोकांच्या मनात ही भावना रुजवून हिंदूंना वेठीस धरलं जातंय.
त्याचा तोटा असा होईल की जर आपण राजाला आपलं प्रतिक मानलं तर राजासोबत सर्वकाळ युद्ध होत असतं. राजाला कायमच कोणता ना कोणता शत्रू असतो. एखाद्या वेळी जर निष्काळजीपणामुळे राजा पराभूत झाला तर हिंदू कुठे जाणार? अशा परिस्थितीत हिंदूचा पराभव होईल.
आपल्या पूर्वजांनी हीच पद्धत अंगीकारली होती की आपण राजाला आपलं सर्वस्व मानणार नाही. राजा हा देखील आपलाच एक भाग आहे.
तुम्ही नेत्याच्या परिपत्रकानुसार वर्तन केलंत तर तुम्ही हिंदू आहात, असा नियम आता तयार झालाय. हे योग्य नाही, जो धर्मशास्त्रावर विश्वास ठेवतो आणि त्याचं पालन करतो तो हिंदू आहे.
तुमचं श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी काही भांडण आहे का?
शंकराचार्य: आमच्यात काहीही भांडण नाही. आमचाच अधिकार आहे, कारण सुरूवातीपासूनच शंकराचार्यांचा ट्रस्ट बनवला गेलेला, परंतु कोणतंही कारण न देता तो ट्रस्ट रद्दबातल करण्यात आला.
त्यामध्ये देशातील मोठमोठे धर्मगुरू, चार शंकराचार्य, पाच वैष्णव आचार्य, 13 आखाड्यांचे प्रमुख सामिल होते. अशा प्रकारचा ट्रस्ट रद्दबातल करून पंतप्रधानांनी आपल्या कार्यकर्त्यांचा ट्रस्ट तयार केला.
हा कार्यक्रम तिथल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या वतीने आयोजित केला जातोय, त्यांची नक्कीच काहीतरी मजबुरी असणार आणि आणखी मोठ्या स्तरावर पाहायला गेल्यास तिथे तिच लोकं येतील जी देशभरात घरोघरी जाऊन तांदूळ वाटण्यासाठी त्यांना मदत करतायत.
चंपत राय म्हणाले की, हे मंदिर रामानंद संप्रदायचं आहे.
जर मंदिर रामानंद संप्रदायाचं आहे तर तुम्ही का तिथे बसला आहात, कृपया दूर व्हा आणि ते रामानंद संप्रदायाच्या स्वाधीन करा… जगद्गुरु स्वामी रामानंद रामनरेशाचार्य हे रामानंद संप्रदायाचे सर्वांत मोठे गुरू आहेत. त्यांच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तर निमंत्रणसुद्धा मिळालेलं नाही.
हेही वाचलंत का ?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








