अयोध्या राम मंदिर : एका कारसेवकाला आता 'हे राम' का म्हणावं वाटतं?

प्रा. अभिजीत देशपांडे
    • Author, प्रा. अभिजीत देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

माणसं परस्परांना भेटतात, तेव्हा अभिवादनासाठी हिंदी आणि मराठीत ‘राम राम’ म्हणण्याची प्रथा आहे. आश्चर्य, दु:ख, ताण व्यक्त करण्यासाठी विशेषत: नाराजीच्या वा वेदनादायी प्रसंगाला तीव्र प्रतिसाद म्हणून ‘हे राम !’ हे उद्गार काढले जातात.

‘Oh God!’, ‘या अल्लाह!’ किंवा ‘अरे देवा !’ याच तीव्र व्यथेचा, उद्विग्नतेचा सूर व्यक्त करणारे ‘हे राम !’ हे देखील एक सांस्कृतिक-भाषिक रूप आहे.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होते आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरी दिवाळी म्हणून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

घरातच नव्हे तर रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, कुठलाही अपराधभाव न बाळगता धडधडीतपणे सरकारी यंत्रणांचा वापर करूनही, उत्सवाचे नव्हे, उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात आहे.

अन्य धर्मियांना व सर्वच विवेकी माणसांना दहशत वाटावी, असा हा विजयोत्सव निव्वळ धार्मिक वा सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय पातळीवर साजरा केला जातो आहे.

या वातावरणाला माझी प्रतिक्रिया आहे - ‘हे राम !’

घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण आणि त्यातच रामजन्मभूमी आंदोलन ऐन भरात होते, तेव्हा मी जेमतेम 18 वर्षांचा होतो.

अयोध्येच्या 6 डिसेंबर 1992 च्या कारसेवेत सहभागी झालो. बाबरी मशीद पाडण्याचा साक्षीदार झालो आणि चालू असलेल्या मशीद पाडण्याच्या शिस्तबद्ध कामात सहभागी होऊन काही अंशी त्या ऐतिहासिक पापकृतीचा भागीदारही बनलो.

तोवर देश पेटला होता. पसरलेल्या दंगली आणि धार्मिक तणाव पाहून कमालीचा अस्वस्थ झालो.

धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, राष्ट्र कशाने बनते, आपला इतिहास नेमका काय, प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न वाढले होते.

आजूबाजूच्या ‘गर्व से कहो’च्या वातावरणात उत्तरे मिळण्याची शक्यता नव्हतीच. प्रश्नांचा वणवा तसाच घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि वाचनातून प्रश्नांचा गुंता, त्याचा भला मोठा आवाका दिसायला लागला. चाचपडताना भारतीय संस्कृतीतील बौद्ध आणि चार्वाक दर्शनांशी वाटा दिसू लागल्या.

समकालीन विवेकी परंपरांनी अधिक प्रश्न उपस्थित केले आणि विचारप्रवृत्तही केलं. विचारान्ती स्वतःपुरता जात-देव-धर्म गळून पडला. हिंदू असण्याचा गर्व आणि माज खाडकन उतरला.

अभिजित देशपांडे

एका अजस्त्र पापयोजनेत मी सहभागी होतो, याचं लख्ख भान आलं. आणि त्यातूनच आत्मशोध आणि कबुलीजबाब म्हणून 2004 साली प्रदीर्घ लेख लिहिला- ‘एक होता कारसेवक’. त्याचेच पुढे पुस्तकही झाले.

आजवर त्याच्या सहा आवृत्त्या निघाल्या. आपलं लेखन दीर्घकाळ टिकावं, ते कालसुसंगत असावं, असं लेखकाला वाटणं स्वाभाविक म्हणता येईल. पण मला मात्र हे पुस्तक आजही, तितकंच सुसंगत आहे, ही बाब अस्वस्थ करते.

मी 1992 च्या अनुषंगाने मांडलेले प्रस्फोटक वातावरण 2004 साली पुस्तक लिहिताना फारसे बदललेले नव्हतेच.

2002 ची गुजरातची हिंसा त्यावेळी ताजी होती. रामजन्मभूमीच्या मुद्यावरून पुढे थेट दंगली झाल्या नाहीत तरी दहशत, हिंसा, अन्याय पसरवणारा उन्माद आता 2024 मध्ये कैक पटींनी वाढला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, अयोध्येला गेलेल्या एका कारसेवकाची कहाणी 'हो, मी बाबरी पाडली, पण...'

बाबरी मशीद पाडताना होता, त्यापेक्षाही आताचा हा उन्माद अधिक भयावह आहे. समाज म्हणून आपल्या सामूहिक विवेकाच्या पराभवाकडे पाहताना व्यक्ती म्हणून हतबल वाटते.

मुद्दा अयोध्या प्रश्नापुरता मर्यादित नाही. त्याच्या कितीतरी पलीकडे जाणारा आहे. निमित्त आता अयोध्येचे आहे म्हणून त्याबद्दल बोलायला हवे. रामजन्मभूमीचा वाद '1853 ते 1949 ते 1986 ते 1992 ते 2002 ते 2019 ते 2024' असा व्यापक काल पटलावरचा आहे.

अनेक धार्मिक-राजकीय-सांस्कृतिक घटना-प्रसंगांनी, व्यक्ती आणि शक्तींनी त्याला अधिकच गुंतागुंतीचे करून ठेवले. 1992 साली बाबरी मशीद पाडली आणि 2024 साली राममंदिर बांधले जाते आहे. तेवढ्यापुरता हा मुद्दा नाही.

मूळ प्रश्न आहे, या सगळ्या अयोध्याकांडात,1853 ते आजवरच्या इतिहासक्रमात आपण काय उद्ध्वस्त केले आणि काय उभारतो आहोत?

आपण काय काय आणि कसे हे सगळे क्रमश: उद्ध्वस्त केले आहे ?

सामाजिक सौहार्दाची वीण उसवली

भारत स्वतंत्र झाला त्यावेळीही आपण समाज म्हणून जातीपाती, पंथ, भाषा, धर्म आदींच्या संकुचित कप्प्यांमध्ये विभागलेलो होतोच. कुठलाच समाज कुठल्याच टप्प्यावर पूर्णपणे एकसंध, एकजिनसी नसतोच. आपणही नव्हतो. परंतु स्वातंत्र्य चळवळीत आपली जवळ येण्याची, संघटित होण्याची प्रक्रिया घडू लागली होती.

समाज म्हणून आपले सामाजिक-सांस्कृतिक बंध विणले जात होते. परस्परांना समजून घेण्याची, सहभावाची आणि सामाजिक सहजीवनाची बांधणी होत होती. ती सोपी नसतेच. अनेक वर्षे आणि युगे हे घडत, घडवत राहावे लागते.

आपल्या कला, नाटक, चित्रपट (अगदी व्यावसायिक ‘अमर-अकबर-ऍन्थनी’ सारख्या चित्रपटांनीही) एकात्मतेचा आणि सामाजिक सौहार्दाचा हा प्रकल्प निष्ठेने चालवला. त्यात सगळेच सहभागी होते. ‘युटोपियन’ वाटले तरी नव्वदच्या दशकातील दुरदर्शन युगातील ‘एक चिडिया-अनेक चिडिया,’ ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ तील एकात्मतेचे हे सुंदर चित्र- सगळे त्याच व्यापक सांस्कृतिक प्रकल्पाचा भाग होते.

राम मंदिर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राम मंदिर

फाळणीच्या जखमा मिटत नाहीत तोवर रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाने पुन्हा त्या जखमांवरची खपली निघाली. आणि पुढील घटनांनी जखम अधिकाधिक चिघळत गेली. आता तर आक्रमक राजकीय वातावरणाने सामाजिक सौहार्दाची वीण पुरती उसवून टाकली आहे. घराघरांतही तटबंदी उभी राहिली आहे.

सत्याला सुरूंग लावला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1853 सालचा वादाचा मुद्दा बाबरी मशीद परिसरात असलेला रामचबुतरा हा होता. त्यावरून तणाव निर्माण झाले. कोर्टकचेऱ्या झाल्या. 1949 साली 22 डिसेंबरच्या मध्यरात्री (23 डिसेंबरच्या पहाटे) कुणीतरी रामाची मूर्ती बाबरी मशीदीच्या दारात ठेवली आणि पसरवले की मशिदीत साक्षात प्रभूरामचंद्र प्रकटले. हिंदू आखाड्यांनी तिथे रामचरित मानसाचे पठण सुरू केले. तत्कालीन प्रशासनाने वादावर उपाय म्हणून मशिदीला टाळे ठोकले. पण महंतांना मात्र मूर्तीपूजा करण्याची परवानगी दिली.

1986 साली जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने बाबरी मशीदीचे टाळे उघडले, मग रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रखर रूपातून आक्रमक हिंदुत्वाचे युग सुरू झाले.

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी जमलेल्या कारसेवकांनी नियोजनबद्ध रीतीने मशीद पाडली. हिंदूंना अयोध्येत जमविणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनी त्याची नैतिक जबाबदारीही सोयीस्करपणे झटकली. कारसेवकांचे ते उत्स्फूर्त कृत्य होते, असे म्हटले. न्यायालयानेही ही मोजक्या समाजकंटकांनी केलेली कृती होती, असे म्हणून ती कृती घडवून आणणाऱ्या आयोजकांना मोकळे सोडले. ती कृती किती नियोजनबद्ध होती, याचा मी खुद्द साक्षीदार आहे.

डिसेंबर 1992 च्या बाबरी मशीद पाडण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डिसेंबर 1992 च्या बाबरी मशीद पाडण्यात आली.

6 डिसेंबर 1992 च्या मध्यरात्री कारसेवकांना झोपेतून जागे करून त्यांना मशीद स्थानी जत्थ्याने आणून इथे प्राचीन हिंदू मूर्ती आणि अवशेष सापडल्याचे सांगितले गेले. भोळ्या-भाबड्या हिंदूंनी (त्यावेळेस त्यात मीही होतो) त्यांचे दर्शनही घेतले.

2019 सालच्या अयोध्या निकालात मात्र सर्वोच्च न्यायालयाने बाबरी ढाच्याच्या जागी आधी कोणतेही हिंदू बांधकाम असल्याचे पुरावे नाहीत, असे स्पष्ट म्हटले आहे. याचा अर्थ, न्यायालयासमोरील पुरातत्त्वशास्त्रीय कोणत्याही पुराव्यात, तिथे काही हिंदू मंदिर होते आणि ते पाडून मशीद बांधली गेली, हे सिद्ध झालेले नाही. आणि तरीही जनतेत आस्थेच्या आडून असत्य पसरवले गेले आहे.

न्यायाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह

एकूण इतिहासक्रम पाहता, अयोध्या प्रश्नांबाबतच्या जवळपास सर्व न्यायालयीन निकालांनी न्यायाची संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

1949 साली हिंदूंनी मशिदीबाहेर मूर्ती ठेवली. भजन कीर्तन सुरू केले. एका मुस्लीम नागरिकाने स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली तर त्यावर प्रशासनाचा न्याय काय, तर मशिदीला टाळे आणि तिथेच मूर्तीपुजेला मात्र परवानगी. हे निव्वळ अजब तर्कट आहे.

1992 मधील बाबरी मशीद पतनानंतर, 1947 पूर्वीचे कोणतेही धार्मिक स्थळांबाबतचे वाद उपस्थित करू नयेत, असे विवेकी धोरण असताना, नंतर न्यायालयांनीच ते सोयीस्करपणे धाब्यावर बसवले. आता तर काशी, मथुरा यावरचा वाद न्यायालयात नव्याने जातो, तेव्हा न्यायालये वरील धोरणाच्या आधारे शांतता टिकवून ठेवण्याऐवजी अन्यायाला पोषक भूमीच तयार करीत आहेत.

2019 साली अयोध्या प्रश्नाचा ‘सर्वोच्च’ निकाल लागला आणि न्यायालयानेच अनेक बाबतीत ‘न्याय’ ‘निकाला’त काढला. पाडणारे कारसेवक गुन्हेगार, समाजकंटक पण ते मोकाट राहिले. नंतर त्यांचे जाहीर सत्कार होत राहिले.

सु्प्रीम कोर्ट

फोटो स्रोत, ANI

कारसेवकांना अयोध्येत जमवून, त्यांच्यात उन्माद पेरून हे सगळे शिस्तबद्ध पद्धतीने घडवून आणणारे यच्चयावत धर्मनेते, राजकीय नेते, तथाकथित सांस्कृतिक नेते मात्र सगळ्या गुन्ह्यांतून मोकळे सुटले. मशfदीच्या हिंदू प्राचीन अवशेष सापडले नसले तरी तीच जागा ‘उदार’ न्यायालयांनी मंदिरासाठी हिंदू पक्षाला दिली. आणि मुस्लीम पक्षाला मात्र ‘उदार’ न्यायालयांनी अन्यत्र हलवले. यात कोणता न्याय आहे, हे न्यायतज्ज्ञांनी भोळसट जनतेला निदान समजावून तरी सांगावे.

संविधानाची चौकट खिळखिळी झाली

लोकशाही म्हणजे झुंडशाही नव्हे. बहुमताला महत्त्व असले तरी लोकशाहीत बहुसंख्येच्या बळावर अल्पमताला आणि अल्पसंख्याकांना चिरडून पुढे जाणे नसते. पण आता दिसते आहे ती उभारलेल्या बहुमताची दहशत, झुंडीचे उन्मत्त चित्कार आणि त्याखाली दबलेले अल्पसंख्याकांचे आवाज.

त्यालाच आपण बहुमत आणि म्हणून लोकशाही मानण्याचे अविवेकी वर्तन करीत आहोत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, करूणा, न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता- ही संविधानसंमत यच्चयावत लोकशाही मूल्ये पायदळी तुडविणारा आंधळा समाज आपण निर्माण केला आहे.

सरकार संविधानाला गुंडाळून ठेवणारे निर्लज्ज वर्तन उघडपणे, कुठलाही अपराधभाव न बाळगता पदोपदी करते आहे. राज्यव्यवस्थेला हा आपण सार्वभौम असल्याचा पुरावा वाटतो. त्यामुळे ही बाब अभिमानाने मिरवली जाते आहे. हे बहुमत रचलेले आहे.

बहुमताचे हे आभासी आक्रमक चित्र आहे. त्याआधारे संविधानाने उत्तम समाजनिर्मितीसाठी घालून दिलेली चौकट मात्र निखळू लागली आहे आणि समाजाला त्याची जाणीवही नाही. आणि ती होईल, तेव्हा खूप उशीर झालेला असू शकतो.

ओळख पुसण्याचा प्रयत्न

बहुविधता ही आपली ओळख. त्यातूनही परस्परांना जोडत आपण सहभाव युगानुयुगे जपत आलो आहोत. संघर्ष झाले तरी कालांतराने फिके झाले. मुस्लीमांनी आक्रमणे केली तरी राजवटी स्थिरावल्यावर भाषिक-सांस्कृतिक आदानप्रदानही झाली आहे.

आपण काय मिरवतो आहोत आणि आपले प्रत्यक्षातील वर्तन काय आहे? हिंदू असणे म्हणजे नेमके काय? संघ परिवाराने ज्या पायावर हा सगळा ‘ओळखीच्या राजकारणा’चा (Identity Politics) इमला उभारला आहे, तोच भुसभुशीत आहे.

दहा वेगवेगळ्या तोंडांनी दहा परस्परविरोधी वक्तव्ये करण्याची वाक्पटुता त्यांच्या ठायी मुरलेली आहे. हिंदू असणे ही आता निव्वळ धार्मिक ओळख राहिलेली नाही. संघ परिवाराच्या मते, ती सांस्कृतिक ओळख आहे. तर प्रत्यक्ष व्यवहारात ती आता उग्र राजकीय ओळख बनली आहे.

प्रा. देशपांडे

मूळ सहिष्णू, सहभावाधारित जीवनमूल्ये असलेली भारतीय संस्कृती ‘सर्वत्र सुखिन: सन्तु’ या विधानांतून मिरवण्यापुरतीच राहते. परंतु व्यवहारात आक्रमकता हे हिंदू असल्याचे लक्षण मानले जाते. इथल्या अन्य धर्मीयांचे पूर्वजही भारतीयच आहेत, असे एका तोंडाने म्हणायचे आणि दुसऱ्या तोंडाने अन्य धर्मीयांचा दुस्वास करणारी विधाने करायची.

मूळ उदार विकसनशील ओळख पुसून संस्कृतीला एका ‘हिंदू’साच्यात बसविण्याचा महाप्रयोग सुरू आहे. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आणि म्हणून ती ओळख हिंदुत्ववाद्यांना मान्य नाही. धर्मनिरपेक्षतेतील उदार सहभाव नाकारून, पुसून ‘हिंदू असणे’ हेच व्यापक असल्याचे स्थापित केले जाते आहे.

आपण या सगळ्यांत काय उभारले?

झुंड आणि टोळ्या उभारल्या. असत्याचे इमले उभारले. हिंसा आणि आक्रमकता हीच आपली ओळख बनवली. उन्मादाचे उत्सवीकरण केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे-धर्मव्यवस्था-राज्यव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांच्या लबाड संगनमताने अधर्म, कुराज्य आणि अन्याय यांची प्रतिष्ठापना केली.

म्हणूनच 22 जानेवारीच्या दिशेने वाटचाल करताना, अयोध्या प्रश्नाच्या अनुषंगाने, आपण समाज म्हणून आजवर काय पाडले आणि काय उभारले, हे समजून घेणे अगत्याचे आहे. अन्यथा, या नव्याने रचलेल्या इतिहासात हळूहळू 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिवस लुप्त पावेल.

आणि नजीकच्या काळात 30 जानेवारीला गांधीजींचे पुण्यस्मरण करण्याऐवजी नथुरामचे स्मरण प्रस्थापित केले जाईल. तेव्हा तुम्ही ‘हे राम !’ हे उद्गार काढलेत, तर निदान रामाचे नाव घेतलेत म्हणून रामराज्यात तुमची सजा सौम्य केली जाऊ शकते.

(प्रा. अभिजित देशपांडे हे वयाच्या अठराव्या वर्षी 6 डिसेंबरच्या कारसेवेत सहभागी झाले आणि नंतर विचारांती हिंदुत्ववादी विचारांपासून दूर गेले. ‘एक होता कारसेवक’ हे त्यांचे आत्मकथन म्हणजे त्यांचा कबुलीजबाबही आहे, ती व्यक्तिगत परिवर्तनाची डायरीही आहे आणि एका ऐतिहासिक-सांस्कृतिक घटनेचा दस्तावेजही.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)