You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मधुमिता शुक्ला : गर्भवती कवयित्रीची हत्या ज्यामुळे एक मंत्री आणि त्याच्या पत्नीला जावं लागलं तुरुंगात
- Author, चंदनकुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
9 मे 2003 चा दिवस. लखनौचे बहुतांश सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी एका विशेष बैठकीत व्यग्र होते. संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या बैठकीत दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी होत असलेल्या ताजियांच्या मिरवणुकीच्या तयारीवर चर्चा सुरू होती.
मोहरमच्या काळात या मिरवणुकांत हजारो लोक सहभागी होतात, त्याची संरक्षण व्यवस्था ही लखनौ पोलिसांसाठी नेहमीच एक आव्हानात्मक स्थिती असायची.
या सगळ्या चर्चेतच तेव्हाचे लखनौचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिल अग्रवाल यांनी लखनौ जिल्ह्याच्या गुन्हे शाखेचे एसपी राजेश पांडेय आणि ट्रान्स गोमती विभागाचे एसपी सत्येंद्रवीर सिंह यांना खुणेनेच बोलवलं.
अनिल अग्रवाल यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना निशांतगंजला जायला सांगितलं. तिथं पेपर मिल कॉलनीमधील घर नंबर सी-33/6 मध्ये एका महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती.
ही महिला होती मधुमिता शुक्ला. तिच्याबद्दल सुरुवातीला पोलिसांना काहीच माहिती नव्हती.
ही माहिती आयपीएस राजेश पांडेय यांनी दिली आहे.
लूट करण्याच्या हेतूने हत्या झाली असावी अशा दृष्टिकोणातून पोलीस याकडे पाहात होते, त्यामुळेच पांडेय यांना ऑफिसमध्ये असलेल्या लुटारूंच्या फोटोचा अल्बम घेऊन जायला सांगितलं होतं आणि प्रत्यक्षदर्शींना ते दाखवून ओळख पटते का हे पाहायला सांगितलं होतं, असं पांडेय सांगतात.
घरातल्या पहिल्याच खोलीत महिलेचं पडलेलं शव पाहताच पोलिसांना लक्षात आलं की या महिलेला अगदी जवळून गोळी मारली आहे. पेपर मिल कॉलनीच्या दोन खोल्यांच्या लहानशा खोलीत झालेली ही हत्या पुढल्या काही तासांतच लखनौ ते दिल्लीपर्यंत सगळं काही हादरवून टाकणार होती.... आणि तसंच झालं...
हत्येच्या दिवशी काय झालं?
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात दोन लोक होते. एक होती मृत व्यक्तीची जुळी बहीण निधी आणि दुसरा होता घरात काम करणारा देशराज. पोलिसांच्या माहितीनुसार हत्येपूर्वी मधुमिताच्या ओळखीचे दोन लोक त्या घरात आले होते. मधुमितानं त्यांना घरात घेऊन देशराजला चहा करायला सांगितलं होतं.
राजेश पांडेय सांगतात, “देशराज चहा करतच होता तेवढ्यात त्याला घरात गोळी झाडल्याचा आवाज आला. तो लगेच गॅसची आच मंद करुन स्वयंपाकघराबाहेर आला, तेव्हा दीदी म्हणजे मधुमिता ज्या खोलीत होती तिचा दरवाजा बाहेरुन बंद करण्यात आला होता आणि ते 2 लोक मोटरसायकलवरुन पळून जात होते.”
पोलिसांनी मधुमिताच्या खोलीतून एक मोबाइल आणि एक डायरी ताब्यात घेतली. आपली बहीण कवियत्री होती असं निधीने पोलिसांना सांगितलं. आतापर्यंत पोलीस या हत्येच्या घटनेला एक गुन्हा अशाच पद्धतीने पाहात होते.
पण पोलिसांनी मोबाइलमधले नंबर्स आणि मेसेज पाहिले तेव्हा मात्र ती काही सामान्य कवियत्री नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या फोनमध्ये अनेक मोठे राजकीय नेते, मंत्री, खासदार आणि आमदारांचे नंबर सेव्ह केलेले होते.
त्यानंतर फक्त एका तासातच लखनौचे एसएसपी अनिल अग्रवाल स्वतःच तिथं आले. निधीने त्यांना, आपल्याला जरा बाजूला जाऊन काही बोलायचं आहे असं सांगितलं.
निधी शुक्ला संध्याकाळी 4 वाजता आपल्या बहीणीच्या घरी पोहोचली होती. परंतु स्थानिक पोलिसांना या हत्येची माहिती संध्याकाळी 7 वाजता दिली होती. निधीनं वारंवार सांगितल्यानंतर एसएसपींनी तिथं आलेले पत्रकार आणि शिपायांना बाजूला जाण्यास सांगितले.
मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निधीनं माहिती दिली. मृत पावलेली मधुमिता गरोदर होती आणि तिच्या पोटात उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री अमरमणी त्रिपाठी यांचं बाळ होतं असं तिनं सांगितलं.
परंतु काळजी घेऊनही ही माहिती माध्यमांना मिळाली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ती ठळक अक्षरांत छापली गेली होती.
कोण आहेत अमरमणी त्रिपाठी?
त्यावेळेस अमरमणी त्रिपाठी हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये एक बडे नेते आणि मंत्री होते. त्याआधी ते 1997-2000 या काळात कल्याणसिंह, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंह यांच्या सरकारांतही मंत्रिपदी होते.
राजेश पांडेय सांगतात, अमरमणी त्रिपाठी मुळचे गोरखपूरचे होते. ते सुरुवातीला हरीशंकर तिवारी यांच्याबरोबर होते आणि राज्य पोलिसांत त्यांचं नाव एक गुन्हेगार म्हणून अनेक ठिकाणी नोंदलं गेलं होतं.
अमरमणी पूर्व उत्तर प्रदेशातील एक मोठे ब्राह्मण नेते म्हणून प्रसिद्ध झाले होतेच. ते 1989, 1996 आणि 2002 साली झालेल्या निवडणुकीत महाराजगंजच्या लक्ष्मीपूर मतदारसंघातून विधानसभेत गेले होते. मधुमिता हत्याकांड खटल्यानंतरही ते 2007 साली नौतनवा मतदारसंघातून विजयी झाले.
त्यावेळचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले पी. एल. पुनिया सांगतात, “सुरुवातीला मायावती अमरमणी यांना फार मानत असत. अमरमणी फार कमी बोलायचे मात्र त्यांना आपलं म्हणणं मांडता यायचं. या खटल्याच्या काळात त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा फार प्रयत्न केला होता.”
हत्येच्या दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदन कक्षात अमरमणी आपल्या काही लोकांसह पूर्णवेळ उपस्थित होते.
राजेश पांडेय यांच्या माहितीनुसार शवविच्छेदनानंतर अमरमणी यांनी मधुमिताच्या शवाला तिच्या लखीमपूर खिरीला पाठवलं आणि डीएनए चाचणी होऊ नये यासाठी त्यांनी तिच्या पोटात असलेल्या अर्भकाचे नमुने यासाठी घेऊ दिले नाहीत.
याची माहिती शवविच्छेदन गृहात उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं एसएसपी अनिल अग्रवाल यांना दिली. मग अग्रवाल यांच्या आदेशानुसार ते शव लखीमपूर खिरीतून परत आणून अर्भकाचे डीएनए नमुने घेतले आणि ते सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली.
याबद्दल सांगताना निधी शुक्ला सांगतात, "आम्ही लोकांनी लखनौपासून 110 किमी प्रवास केला होता आणि हरगावला पोहोचलो होतो, आमचं घर फक्त 25 किलोमीटर अंतरावर असताना आम्हाला परत लखनौला जायला सांगितलं. असं का केलं जातंय याबद्दल सुरुवातीला मनात शंका आली होती.”
नंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला. मात्र सीआयडीचे दोन अधिकारी चौकशीसाठी अमरमणी यांच्या घरी गेल्यावर त्यांनाही राज्य सरकारने निलंबित केलं.
राज्य सरकारच्या या कारवाया अमरमणी त्रिपाठी यांची राजकीय उंची आणि पोहोच किती होती हे दाखवणाऱ्याच होत्या. या कारवायांमुळे हे प्रकरण वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांत एक मोठी बातमी बनून गेलं होतं.
‘वाजपेयींच्या सांगण्यावरुन सीबीआय तपास’
हा दबाव आणि मधुमिता शुक्लाची बहीण निधी यांच्या मागणीवरुन एका आठवड्यातच हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. त्यानंतर 17 मे 2003 रोजी सीबीआयच्या टीमने याच्या तपासाला सुरुवात केली. सीबीआयने हा तपास आपले अधिकारी राजा बालाजी यांच्याकडे सोपवली होती.
हा तपास तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सांगण्यामूळे सीबीआयकडे सोपवण्यात आला असं निधी सांगतात.
निधी सांगतात, “मधूला न्याय देण्यासाठी मी गेल्या 20 वर्षांत अनेक दरवाजे ठोठावले आहेत, अनेक लोकांना पत्रं लिहिली आहेत, इमेल केले आहेत. या प्रकरणासाठी पंतप्रधानपदी राहिलेल्या अटलजींना भेटायला त्यांच्या दिल्लीतल्या 6 कृष्णमेनन या निवासस्थानीही गेले होते.”
निधी शुक्ला यांच्या मते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना सांगितलं की, मधूच्या हत्येच्यावेळेस ते परदेशात होते आणि तिकडच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचून त्यांना तुमच्या देशात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला गेला होता.
अटलजींना त्यामुळे अत्यंत वाईट वाटलं होतं त्यानंतर त्यांनी भारतात एका वरिष्ठ नेत्याला फोन करुन, ते भारतात येईपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडे गेलं पाहिजे असं सांगितल्याचा दावा निधी करतात.
या प्रकरणाचं गांभिर्य ओळखून मायावती यांनी अमरमणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं.
पीएल पुलिया सांगतात, “या आरोपांनंतर अमरमणी यांना स्वतःच राजीनामा द्यायचा होता मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांना पदावरुन हटवलं.”
अमरमणी आणि मधुमिता यांचा संबंध
अमरमणी त्रिपाठी आपलं म्हणणं ठामपणे मांडून ते दुसऱ्याच्या गळी उतरवण्यात एकदम तरबेज मानले जात होते.
मधुमिता शुक्ला मूळची लखनौ जवळच्या लखीमपूर खिरी इथं राहाणारी होती. शालेय जीवनापासूनच ती व्यापीठावर कविता म्हणणे, विनोदी स्वरुपातल्या छटा, राजकीय टीप्पणी करण्यात ती प्रसिद्ध होती आणि त्यामुळेच तिचे कार्यक्रम लोकांना आवडू लागले होते.
2000 साली दिल्लीत झालेल्या एका कवी संमेलनात तिची अमरमणी यांची आई सावित्रीमणी आणि त्यांच्या दोन मुलींशी ओळख झाली. ते सर्व लखनौच्या आसपासच्या भागातले होते त्यामुळे मधू आणि त्यांचे संबंध चांगले झाले.
त्यानंतर सावित्रीमणी मधुमिताला भेटायला तिच्या घरीही आल्या होत्या. एकदा मधुमिता त्यांच्या घरी गेली असताना तिची अमरमणी यांच्याशी ओळख झाली. अमरमणी यांनी तिला आपल्या भाषणासाठी काही ओळी लिहायला सांगितल्या आणि त्यांची ओळख वाढली.
त्यानंतर त्यांच्या सतत भेटी होऊ लागल्या आणि ते एकमेकांच्या फारच जवळ आले. याची कल्पना अमरमणी यांची पत्नी मधुमणी यांनाही आली. त्यामुळे त्या नवरा-बायकोत भांडणं होऊ लागली.
राजेश पांडेय यांच्या मते, एकदा मधुमणी मधुमिताच्या घरीही पोहोचल्या होत्या आणि दोघींमध्ये मोठं भांडणही झालं होतं.
हत्येचा कट
मधुमिता शुक्ला आणि मधुमणी त्रिपाठी यांच्यामध्ये फोनवर अनेकवेळा भांडण झालं होतं.
आपण अमरमणी यांच्यामुळे दोनदा गरोदर राहिल्याचं आणि गर्भपातही केल्याचं मधुमितानं सांगितलं होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मधुमिता तिसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर मात्र मधुमणी त्रिपाठी यांनी आपल्या जवळच्या लोकांकरवी तिला मारण्याचा कट आखू लागल्या, कारण यावेळेस ती गर्भपातास नकार देत होती.
या जवळच्या लोकांनी या कटाची माहिती अमरमणी यांनाही दिली होती. राजेश पांडेय यांच्यामते या कटात अमरमणीही सहभागी झाले होते.
निधी शुक्ला सांगतात, "ज्या दिवशी मधूची हत्या झाली त्या दिवशी ती 19 वर्षं 1 महिना आणि 6 दिवसांची होती. अमरमणी यांचा इतिहास आणि त्यांचं चारित्र्य कसं आहे, हे सर्वांना माहिती होतं. त्यांनी मधूच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला आणि तिलं मूर्ख बनवून तिला फसवण्याचा प्रयत्न केला. तिच्या ते लक्षातच येत नव्हतं."
मधुमिताचं लग्न आयआयटी कानपूरच्या एका मुलाशी नोव्हेंबर 2002मध्ये झाल्याचंही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. इतकंच नाही तर यासाठी कॉलेजच्या हॉस्टेलमधील एका मुलाचं अपहरण करुन त्याला साक्षीदार बनवण्याचाही प्रयत्न झाला.
ते सिद्ध करण्यासाठी मधुमिताचे खोटे कॉल डिटेल्सही सीबीआयला देण्याचा प्रयत्न झाला. मधुमिताची एका मुलाशी आयआयटीच्या कवीसंमेलनासाठी एका मुलाशी अनेकदा फोनवर बोलणं झालं होतं. त्याचा आधार घेऊन हे सगळं रचण्यात आलं होतं.
एवढंच नाही तर लग्न लावणारा एक पुरोहित आणि केशकर्तन करणाऱ्या एका व्यक्तीलाही साक्षीदार करण्याचा प्रयत्न झाला होता. राजेश पांडेय यांनी या खटल्याच्या प्रत्येक पैलूवर किस्सागोई नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर याचा उल्लेख केला आहे.
राजेश पांडेय यांनी बीबीसीशी बोलताना अमरमणी त्रिपाठी काहीही मॅनेज करू शकण्यात एकदम तयार माणूस असल्याचं सांगितलं. नंतर आयआयटी कानपूरच्या संचालकांनी आपल्या तपासाता विद्यार्थी निर्दोष असल्याचं सांगितलं आणि याची तक्रार तेव्हाचे लखनौचे खासदार आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती.
डीएनए तपासानंतर सीबीआयने या प्रकरणी 2003च्या सप्टेंबरमध्ये अमरमणी यांना अटक केली. मात्र अटकेनंतर काही आठवड्यांतच त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.
निधी आरोप करतात, "आमच्या साक्षीदारांना घाबरवलं, धमकावलं जात होतं. आमचे तीन साक्षीदार फुटले. त्यामुळे ही केश दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात गेले."
सर्वोच्च न्यायालयाने नंतर अमरमणी यांचा जामीन रद्द केला आणि तो उत्तराखंडात पाठवला गेला.
डेहराडूनच्या सीबीआय कोर्टाने 24 ऑक्टोबर 2007 रोजी अमरमणी त्रिपाठी, मधुमणी त्रिपाठी, रोहित चतुर्वेदी, संजय राय यांच्या 6 आरोपींना दोषी ठरवलं. हत्येमध्ये सहभागी असलेल्या मधुमणी, अमरमणी यांना जन्मठेप ठोठावली गेली.
गोरखपूर ते सुटकेपर्यंत
उत्तराखंडमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या अमरमणी त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीला 2012 साली गोरखपूरच्या कारागृहात पाठवण्यात आलं.
2013 साली अमरमणी गोरखपूरच्या बीआरडी कॉलेज रुग्णालयात दाखल झाले, त्यांची पत्नी त्याआधीच तेथे दाखल झालेली होती.
निधी शुक्ला सांगतात, "अमरमणी आणि त्यांच्या पत्नीला हरिद्वाकच्या रोशनाबाद तुरुंगात असायला हवं होतं, मात्र तसं न होता ते बीआरडी कॉलेज रुग्णालयात होते. गोरखपूरला त्यांचं घर आहे. असा काय आजार त्यांना होता की त्यांच्यावर डेहराडून वगैरे इतर शहरांत उपचारच होऊ शकत नव्हते?"
2013 सालीही अमरमणी त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे आपल्या सुटकेसाठी अपिल केलं होतं. तेव्हा अमरमणी यांना दुसऱ्या राज्यात शिक्षा झाली असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकार यावर निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका अखिलेश यादव सरकारने घेतली होती.
निधी शुक्ला यांनी अमरमणी आणि त्यांच्या पत्नीला गोरखपूरमध्ये ठेवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असल्याचंही एक प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना उत्तराखंडला पाठवण्याचा आदेश दिला होता.
या महिन्यातच 25 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला यावर 8 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
निधी शुक्ला यांच्या दाव्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अमरमणी यांच्या सुटकेला थांबवण्यास नकार दिला अशा येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. कारण आम्ही तशी कोणतीही याचिकाच केली नव्हती.
कोर्टाने यासाठी आम्हाला वेगळं अपिल करण्यास सांगितलं आहे, असं त्या सांगतात.
निधी शुक्ला सांगतात, "अमरमणी त्रिपाठी यांना सोडण्यासाठी पावलं उचलली जात आहेत असं कुणीतरी मला सांगितलं. म्हणूनच मी सुप्रीम कोर्टात गेले होते. पण मी याची तारीख सांगितली आणि तिथंच माझी चूक झाली. राज्य सरकारने एक दिवस आधीच 24 ऑगस्टला अमरमणी यांना सोडण्याचा निर्णय घेतला."
जर जन्मठेपेच्या कैद्यानं 14 वर्षांची शिक्षा पूर्ण केली असेल आणि त्याकाळात त्याचं वर्तन चांगलं असेल तर अशा कैद्याला मुक्त करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर अमरमणी त्यांच्या पत्नीला मधुमिता शुक्ला हत्याकांड प्रकरणात मुक्त करण्यात आलं.
निधी शुक्ला सांगतात, गेल्या 11 वर्षांच्या काळात अमरमणी आणि त्यांची पत्नी बहुतांशकाळ उपचारांसाठी रुग्णालयातच राहिले. ते कारागृहात फार काळ नव्हतेच.
तसेच त्यांचं वर्तन चांगलं होतं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी असं निधी म्हणतात.
आपण राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यपालांना पत्र लिहिलं असल्याचं त्या सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)