You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कल्पना गिरी हत्याकांड : ज्यामुळे काँग्रेसचा लातूरचा बालेकिल्ला खिळखिळा झाला
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"जुन्या पिढीच्या लोकांना हे माहिती असेल की युथ काँग्रेसच्या एका नेत्याने त्याच्या पत्नीला मारून तंदूरमध्ये जाळलं होतं. 'तंदूर ते लातूर' काँग्रेसचं चरित्र असंच आहे. कल्पना गिरीचे आईवडील न्यायासाठी दारोदार भटकत आहेत. या निर्दोष मुलीच्या आईवडिलांवर दबाव टाकण्यासाठी, त्यांचं तोंड बंद करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. या देशात अशाप्रकारे किती कल्पनांचं जीवन उद्धस्त केलं जाणार आहे, मॅडम सोनियांनी यावर उत्तर द्यावं...."
2014च्या एप्रिलमध्ये यवतमाळला झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आणि कल्पना गिरी हत्याकांड अचानक राष्ट्रीय पातळीवरची न्यूज झाली.
प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवर अर्धा-अर्धा तास त्यावर शो आणि चर्चा सुरू झाल्या.
पण, तोपर्यंत कल्पाना गिरी गायब आणि हत्येचं प्रकरण समोर येऊन फक्त 15 दिवस झाले होते.
लातूर पोलिसांनी तत्कलिन लातूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रसिंग चौहान आणि समिर किल्लारीकर यांच्या इतर कार्यकर्त्यांना अटक केली होती.
आता 8 वर्षांनंतर या केसची स्थिती काय आहे. कल्पना गिरी हत्याकांड नेमकं काय आहे? त्यात कुणाकुणाचं नाव समोर आलं होतं? कल्पना गिरी नेमक्या कोण होत्या याची चर्चा आपण करणार आहोत. तंदूर हत्याकांड वाचण्यासाठी येथे क्लिक करा- नैना साहनी हत्याकांड : आधी खून केला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तंदूरमध्ये जाळला
कोण होत्या कल्पना गिरी?
कल्पना गिरी या लातूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. 28 वर्षीय कल्पना गिरी 7 वर्षं सामाजिक कामात सक्रीय होत्या.
2012 ची लातूर महापालिका निवडणूक लढवण्याची तयारीसुद्धा त्यांनी केली होती. पण त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मात्र मिळू शकलं नव्हतं.
त्यांचं एलएलबीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. वकिलीचा व्यवसाय सुरु करण्याआधी त्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या. त्याचदरम्यान त्या राजकीयकर्यातही सक्रिय होत्या.
"राजकारण माझी आवड आहे म्हणून मी ते करते. पण ही निवडणूक (2014 लोकसभा) झाली की मी राजकारण सोडून देणार आहे, नंतर मी वकिलीचा व्यावसाय करणार आहे," असं कल्पना यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं. कल्पनाची बहिण मंगला गिरी यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली होती.
कल्पना गिरी यांची हत्या नेमकी कशी झाली?
21 मार्च 2014 चा तो दिवस होता. लातूरचे काँग्रसचे आमदार अमित देशमुख यांचा त्यादिवशी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
साई मंदिरात भंडाऱ्याचंसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी रंगपंचमीसुद्धा होती. (लातूरमध्ये धुळवड नाही तर रंगपंचमी साजरी केली जाते.)
त्याच्याच तयारीसाठी लातूर युवक काँग्रेसच्या सचिव कल्पना गिरी सकाळी 7 वाजता त्यांच्या प्रकाश नगरमधल्या घरातून स्कुटी घेऊन निघाल्या होत्या. तिथून त्या साई मंदिरात गेल्या होत्या.
एकमत भवन इथं सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी त्यांची स्कुटी पार्क केली. याच एकमत भवनातून लातूर काँग्रेसची सूत्र हालतात. तिथं स्कुटी पार्क केल्यानंतर मात्र कल्पना बेपत्ता झाल्या.
रात्र झाली तरी कल्पना घरी आल्या नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मित्रमैत्रिणी, कार्यकर्ते, नातेवाईक सर्वत्र शोध घेण्यात आला.
पण कल्पना यांचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली.
तीन दिवस झाले तरी कल्पना यांचा पत्ताच लागला नाही. लातूर पोलिसांनी कल्पना बेपत्ता असल्याची नोंद तर केली होती.
पण त्यांना शोधण्यात यश मात्र येत नव्हतं. अखेर चौथ्या दिवशी तुळजापूर पोलिसांनी अचानक कल्पना गिरी यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं.
कल्पना जिवंत परत येतील अशी आशा लावून बसलेल्या त्यांच्या आईवडिलांसाठी पोलिसांचं असं बोलावणं येणं म्हणजे धक्काच होता.
पण दुर्दैवानं तुळजापूर पोलिसांचा संशय खरा होता. तिथल्या एका तलावात कल्पना यांचा मृतदेह सापडला होता. तो दिवस होता 24 मार्चचा.
तोपर्यंत तिकडे लातूर शहरात काही सामाजिक संस्थांनी कल्पना यांना न्याय मिळावा यासाठी मेणबत्ती मोर्चे काढायला सुरुवात केली होती.
त्यावेळी देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजत होते. अशात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाशी संबंध असेलेल्या महिला कार्यकर्तीचा खून झाला होता.
नेमकं काय घडलं याचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत चालला होता.
त्यातच कल्पनाच्या आईवडिलांनी युवक काँग्रेसच्याच लोकांवर संशय व्यक्त केल्यामुळे प्रकरण आणखीनच गंभीर झालं होतं.
घातपात आणि शारीरिक अत्याचार झाला असल्याचाही संशयही त्यांनी व्यक्त केला होता. तशा प्रकारचा गुन्हासुद्धा त्यांनी पोलिसात नोंदवला.
अमित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून सुरू झालेलं हे प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेसह भाजपनं सुरू केला.
शेवटी पोलिसांनी 28 मार्चला महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यापैकी महेंद्रसिंह हे लातूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते तर समीर हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
पोलीस तपासात या दोघांनीच कल्पना गिरी यांची हत्या केल्याचं मान्य केलं आहे असं, लातूर पोलिसांनी 30 मार्च 2014 ला माडियासमोर जाहीर करून टाकलं.
महेंद्रसिंग चौहान यांचं फटकून वागणं कल्पना यांना आवडत नव्हतं. तुळजापूरमध्ये महेंद्रसिंग चौहान आणि कल्पना यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर कल्पना यांना तुळजापूर जवळच्या तलावात ढकलून महेंद्र यांनी त्यांचा खून केल्याचा दावा समीर किल्लारीकर यांनी पोलिस जबाबात केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं.
या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सीबीआयकडून कोर्टात माडण्यात आला आहे.
त्यानुसार, एकमत भवनातून कल्पना गिरी, महेंद्रसिंग चौहान आणि समीर किल्लारीकर कारमधून तुळजापूरच्या दिशेने गेले.
वाटेत त्यांनी अश्वमेध नावाच्या बारमधून मद्य आणि ग्लास घेतले. हा बार आरोपी महेंद्रसिंग चौहान यांच्या मालकीचा असल्याचा दावा करण्यात येतो.
तिथून पुढे तुळजापूरच्या अलीकडे एक लॉजवर हे तिघे गेले. तिथं त्यांनी मद्यपान केलं. त्यादिवशी रंगपंचमी असल्यामुळे ते जवळच्या तलावावर रंगपंचमी खेळायला गेले आणि तिथंच आरोपीनं कल्पना यांना पाण्यात ढकललं.
त्यानंतर दोन्ही आरोपी कल्पना यांचा मोबाईल सोबत घेऊन लातूरमध्ये आले. चौहान यांनी तो मोबाईल स्वतःच्या विहिरीत फेकला आणि सिमकार्ड गटारात फेकून दिलं.
पण पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाचा आधार घेत आरोपींवर खून, बलात्कार आणि अपहरणाचे गुन्हे दाखल केले. पीएम रिपोर्टनुसार दोन्ही आरोपींचा डीएनए बलात्कार प्रकरणात मॅच झाल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
"कल्पनाने युवक काँग्रेसची निवडणूक लढवू नये असा आरोपींचा आग्रह होता मात्र तिने या निवडणुकीत सहभाग घेतल्याने तिला युवक काँग्रेसचे हे पदाधिकारी जागोजागी अपमानित करीत होते. यामुळेच त्यांनी तिचा घात केला," असा आरोप कल्पना यांच्या बहिण शक्ती गिरी यांनी केला होता.
दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली. तसंच या प्रकरणात प्रसिद्ध विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीसुद्धा याचवेळी करण्यात आली.
पण या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केल्यानंतर.
पुढे लातूरच्या सभेदरम्यान त्यांनी कल्पना गिरींच्या कुटुंबियांची भेटसुद्धा घेतली. नरेंद्र मोदींच्या या पावलानंतर राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. टीव्ही, वृत्तपत्र सर्वंत्र याच्या बातम्या छापून यायला सुरूवात झाली.
आधी लातूर एमआयडीसी पोलिसांमार्फत सुरू करण्यात आलेला हा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
प्रकरणाची वाढती चर्चा पाहाता शेवटी तत्कालिन राज्य सरकारनं सीआयडीकडे हे प्रकरण सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
2014 नंतर मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि 9 ऑगस्ट 2016 रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. 2019 मध्ये सीबीआयनं पहिली चार्जशिट दाखल केली. आतापर्यंत सीबीआयनं या प्रकरणी 2 चार्जशिट दाखल केल्या आहेत. त्यात आरोपींवर हत्येबरोबरच बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
सध्या लातूर सत्र न्यायालयात या प्रकरणाची दररोज सुनावणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.
याच दरम्यान कल्पना गिरीच्या कुटुंबीयांनी 2 वेळा कोर्टात अर्ज दाखल करून काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना आरोपी करण्याची मागणी केली. त्यांचा पहिला अर्ज कोर्टाने फेटाळला. या टप्प्यावर आता त्यांची नावं आरोपी म्हणून दाखल करून घेता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं. तर त्यांचा दुसरा अर्ज मात्र अजूनही अनर्णित आहे.
आरोपीने स्वतःच नार्को टेस्टची मागणी केली
या प्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र चौहान यांनी स्वतःच स्वतःची नार्के टेस्ट करण्याची मागणी केल्यानंतर मात्र खळबळ उडाली.
स्वतःच्या खर्चानं नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ लाय डिटेक्टर चाचणी करण्याची मागणी चौहान यांनी कोर्टात अर्ज करून केली होती. त्यावर कोर्टाकडून वेळेच निर्णय आला नाही म्हणून त्यांनी उपोषणसुद्धा सुरू केलं होतं. पण त्यांची मागणी मात्र मान्य करण्यात आली नाही.
सध्या मुख्य आरोपी महेंद्र चौहान जामीनावर सुटला आहे. त्यांना कोर्टाने सशर्त जामीन दिला आहे.
कुटुंबीयांचे देशमुख बंधूंवर आरोप
कल्पनांचे बंधू गणेश गिरी यांनी मात्र कल्पना यांची काँग्रेस पक्षात वाढत चालेली त्यांची लोकप्रियता त्यांच्यासाठी घातक ठरल्याचं वाटत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनात असलेले संशय आणि भीती व्यक्त केली. तसंच त्यांनी या प्रकरणात अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना या प्रकरणात इतर सहा आरोपींसह आरोपी करून घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठी कोर्टात अर्ज दिल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
"युवक काँग्रेसची पदाधिकारी असताना कल्पना यांना वरिष्ठ नेत्यांचे फोन यायचे, त्याबाबत आरोपींच्या मनात कल्पना यांच्याविषयी राग होता. शिवाय कल्पना यांनी पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात जाऊन युवक काँग्रेसची निवडणूक लढवून जिंकून आल्याचं वरिष्ठ नेत्यांना रुचलं नव्हतं. म्हणून तिचा काटा काढण्यात आला," असं गणेश यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
याबाबत धीरज देशमुख यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रियेसाठी बीबीसीने जेव्हा संपर्क केला तेव्हा, "या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया नाही," असं त्यांनी म्हटलंय.
काँग्रेसचा बालेकिल्ला असा निसटला
कल्पना गिरी हत्याकांड आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 2004चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला होता. 1980 ते 2004 पर्यंत या मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर सतत खासदार म्हणून निवडून येत राहीले.
पण 2004ला भाजपच्या रुपाताई निलंगेकर पाटील त्यांचा पराभव करत जायंट किलर ठरल्या होत्या. पण पुढच्या 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसनं पुन्हा एकदा हा मतदारसंघत ताब्यात घेतला. विलासराव देशमुखांनी त्यांची सगळी शक्ती पणाला लावून जयंतराव आवळे या कोल्हापुरातून आणलेल्या उमेदवाराला निवडून आणलं होतं.
शिवराज पाटील चाकुरकर, विलासराव देशमुख आणि शिवाजीरावर निलंगेकर पाटील या मातब्बर काँग्रेस नेत्याचं एकेकाळी लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व होतं.
पण 2014 ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत शिवराज पाटील चाकूरकर सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते. विलासराव देशमुख हयात नव्हते. तर शिवाजीराव निलंगेकर पाटील वयोवृद्ध झाले होते आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अशात 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं धोरण अवलंबलं. मोदींनी देशभरात ठिकठिकाणी सभा घेत काँग्रेसच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. मोदींच्या टिकांना आणि आरोपांना प्रत्युत्तर देण्यात काँग्रेसची पुरती दमछाक होत होती. त्यातच कल्पना गिरी हत्याकांडाच्या निमित्तानं भाजपच्या हातात आयताच मुद्दा आला होता.
मोदींना त्यांच्या भाषणात या मुद्द्याचा वारंवार उल्लेख केला. मीडियानंही हा मुद्दा लावून धरला. हिंदी न्यूज चॅनेलवर तर अर्धा-अर्धा तास त्यावर शो आणि चर्चा घडल्या.
ज्याची परिणीती 2014 मध्ये लातूरमधून भाजपचा खासदार निवडून येण्यात झाली. भाजपचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय बनसोड यांना तब्बल अडिच लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं हारवलं. गेल्या 2 निवडणुका आता इथं भाजपचाच खासदार आहे.
लातूरमधले ज्येष्ठ पत्रकार दीपरत्न निलंगेकर या 2014 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी कडून मैदानात उतरले होते. निवडणूक हारल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारीता सुरू केली. सध्या ते दुरदर्शनचे लातूर प्रतिनिधी आहेत.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "कल्पना गिरी हत्याकांड प्रकरणामुळे काँग्रेसला लातूरमध्ये बॅकफूटवर जावं लागलं. त्याचा त्यांना फटका बसला. त्यात भाजपनं कल्पना गिरी हत्यकांडाचा मुद्दा गावोगावी पोहोचवला."
पण बालेकिल्ला गमावण्याला काँग्रेसमधला अंतर्गत कलहसुद्धा जबाबदार असल्याचं निलंगेकर यांना वाटतं.
ते सांगतात, "2014च्या लोकसभेला काँग्रेसने उमेदवार देताना घोळ घातल्याचा आरोप त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केला होता. पक्षात दुफळी निर्माण झाली होती. काही नाराज कार्यकर्ते त्यावेळी भाजपमध्येसुद्धा गेले होते. परिणामी भाजपचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आला. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या निवडणुकीत विलासराव हयात नव्हते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)