रेल्वे स्थानकावर हाताला टोचलेली सुई, नंतर आलेला ताप आणि मग कोमात जाऊन मृत्यू

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, भारतीय प्रतिनिधी

26 नोव्हेंबर 1933 चा दिवस होता. कोलकात्याच्या (तेव्हाचे कलकत्ता) प्रचंड गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर एक लहान शरिरयष्टीचा व्यक्ती एका तरुण जमीनदाराला धक्का देत निघून गेला.

हावडा स्थानकावर असलेल्या या गर्दीमध्ये धक्का देणारा खादी किंवा रखरखीत कपडे परिधान केलेला तो व्यक्ती क्षणात दिसेनासा झाला. पण 20 वर्षीय अमरेंद्र चंद्र पांडे यांच्या उजव्या हाताला त्यानं काहीतरी टोचल्याची जाणीव झाली होती आणि त्यांना त्यामुळं वेदना होत होत्या.

"कुणीतरी मला काहीतरी टोचलं", असं ते म्हणाले. मात्र तरीही त्यांनी कुटुंबाबरोबर प्रवास करण्यचा निर्णय घेतला. शेजारच्या झारखंड राज्याच्या पाकूर जिल्ह्यात ते चालले होते. तिथं त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती.

सोबत असलेल्या नातेवाईकांनी अमरेंद्र यांना सोबत न येता रक्ताच्या तपासणी करून घेण्याचा आग्रह केला. पण त्याचवेळी अमरेंद्र यांचे त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असलेले सावत्र भाऊ बेनोयेंद्र तिथं आले.

विशेष म्हणजे कोणीही न बोलावता ते त्याठिकाणी आले होते. त्यांनी घटनेबाबत माहिती घेतली आणि अमरेंद्र यांना जाण्यास उशीर करू नये म्हणून जाण्यासाठी त्यांचं मन वळवलं.

तीन दिवसांनी डॉक्टरांनी अमरेंद्र यांची तपासणी केली. ताप आल्यामुळं ते कोलकात्याला परतले होते. त्यांना हातावर सुईसारखं काहीतरी टोचल्याची खूण दिसत होती. त्याचठिकाणी त्यांना वेदना होत होत्या.

पुढच्या काही दिवसांत त्यांना प्रचंड ताप आला, त्यांच्या काखांमध्ये सूज आली आणि फुफ्फुसांच्या आजाराची लक्षणं दिसली. 3 डिसेंबरला ते कोमात गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं निधन झालं.

अमरेंद्र यांचं न्युमोनियानं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या तपासणीच्या काही रिपोर्टमध्ये त्यांच्या रक्तात प्लेगला कारणीभूत ठरणारे येर्सिनिया पेस्टिस जीवाणू आढळल्याचं स्पष्ट झालं.

उंदीर आणि पिसवे यांच्यामुळं पसरणाऱ्या प्लेग या आजारामुळं 1896 ते 1918 या दरम्यान भारतीय उपखंडात जवळपास 1 कोटी 20 लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला. त्यानंतर 1929 ते 1938 दरम्यान प्लेगमुळं होणाऱ्या मृत्यूचा आकडा 5 लाखांपर्यंत कमी झाला होता. तर अमरेंद्र यांच्या मृत्यूपूर्वी तीन वर्षांपर्यंत कोलकात्यात प्लेगचा एकही रुग्ण आढळलेला नव्हता.

त्यामुळं एका श्रीमंत जमीनदाराच्या कुटुंबाच्या वारसदाराची अशी हत्या झाल्यामुळं ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारत आणि इतरही ठिकाणी एकच खळबळ उडाली. काही जणांनी याला, "इतिहासातील पहिला वैयक्तिक जैविक दहशतवादाचा प्रकार" असंही म्हटलं.

अनेक वृत्तपत्रांनी याचा बारकाईनं पाठपुरावा केला. टाईम मॅगझिननं याला "मर्डर विथ जर्म्स" (जंतुंच्या मदतीनं हत्या) असं म्हटलं तर सिंगापूरच्या स्ट्रेट टाईम्सनं याचा "पंक्चर्ड आर्म मिस्ट्री" असा उल्लेख केला.

कोलकाता पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या प्रकरणात असलेल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या अशा कारस्थानाचं जाळं समोर आलं. त्यात 1900 किलोमीटर लांब असलेल्या मुंबईच्या (तेव्हाचे बॉम्बे) एका रुग्णालयातील जीवघेण्या जीवाणूचा समावेश होता.

कुटुंबातील संपत्तीच्या वादांमुळं भावंडांमध्ये असलेला वाद हे यामागचं मुख्य कारण होतं.

पांडे कुटुंबातील सावंत्र भावंडांमध्ये दोन वर्षांपासून त्यांच्या मृत वडिलांच्या पाकूरमध्ये असलेल्या कोळसा आणि दगडांच्या खाणींवरील हक्काच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. भावंडांच्या भांडणाची ही कथा तेव्हाच्या प्रसिद्ध माध्यमांमध्येही चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या लढाईसारखी मांडण्यात आली होती.

काहींच्या मते अमरेंद्र हे अत्यंत सज्जन, नैतिकता असलेले तसंच उच्च शिक्षण घेण्यास उत्सुक असं होते. त्यांना फिटनेसची आवड होती आणि लोकांमध्येही ते प्रिय होते. तर दुसरीकडे बेनोयेंद्र हे उद्ध्वस्त जीवन जगत होते. दारू आणि स्त्रियांचा नाद त्यांना होता.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार अमरेंद्र यांच्या हत्येचा कट 1932 मध्ये रचण्यात आला होता. बेनोयेंद्र यांचे मित्र आणि डॉक्टर तारानाथ भट्टाचार्य यांनी प्रयोगशाळेत प्लेगच्या जीवाणूचं कल्चर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना अपयश आलं होतं.

बेनोयेंद्र यांनी 1932 च्या उन्हाळ्यामध्येच त्यांच्या सावत्र भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता असंही काही जण म्हणतात. मात्र त्याबाबत मतांतरं आहेत. त्यावेळी दोघं फिरण्यासाठी एका हिलस्टेशनवर गेले होते. तिथं बेनोयेंद्र यांनी एक चष्मा आणला होता आणि तो जोरानं अमेरेंद्र यांच्या नाकावर मारत फोडला होता, असं ब्रिटिश आरोग्य अधिकारी डीपी लँबर्ट यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांतच अमरेंद्र आजारी पडले. त्या चष्म्यावर काही जीवाणू होते, असा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यावेळी अमरेंद्र यांना टिटॅनस झाल्याचं निदान झालं. त्यांना अँटिटिटॅनस सीरम देण्यात आलं. भावाचे उपचार बदलण्यासाठी बेनोयेंद्र यांनी तीन वेगवेगळे डॉक्टर आणले पण त्यांनी नकार दिला, असा आरोपही लँबर्ट यांनी लावला आहे.

त्यानंतर पुढच्या वर्षभरात जे काही घडलं ते खरं तर काळाच्या फार पुढचं होतं.

बेनोयेंद्र संपत्तीचा ताबा घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा डॉक्टर मित्र भट्टाचार्य यांनी चार वेळा प्लेगच्या जीवाणूचं कल्चर मिळवण्याचा प्रयत्न केला.

मे 1932 मध्ये भट्टाचार्य यांनी मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील संचालकांशी संपर्क साधला. भारतात केवळ याच प्रयोगशाळेत प्लेगचे जीवाणू किंवा कल्चर होते. संचालकांनी बंगालच्या सर्जन जनरलच्या परवानगीशिवाय त्यांना कल्चर देण्यास नकार दिला.

त्याच महिन्यात भट्टाचार्य यांनी कोलकाता इथं डॉक्टरांशी संपर्क सांधला आणि प्लेगवर औषध शोधलं असून कल्चरचा वापर करून त्याची चाचणी घ्यायची असल्याचा दावा केला. न्यायालयीन नोंदीनुसार डॉक्टरांनी त्यांना प्रयोगशाळेत काम करण्यास परवानगी दिली,

मात्र, हाफकिन इन्स्टिट्यूटद्वारे मिळालेलं प्लेगच्या जीवाणूचं कल्चर हाताळण्यास बंदी घातली होती. मात्र, जीवाणूचा विकास झाला नाही त्यामुळं या कामात अडथळा आल्याचं डॉक्टर लॅम्बर्ट म्हणाले.

त्यानंतर 1933 मध्ये भट्टाचार्य यांनी पुन्हा कोलकात्याच्या डॉक्टरला हाफकिनच्या संचालकांच्या नावे एक पत्र लिहिण्यास सांगितलं. यामध्ये भट्टाचार्य यांना प्लेगवरील त्यांच्या औषधाच्या चाचणीसाठी संस्थेच्या सुविधा वापरू द्याव्यात अशी परवानगी डॉक्टरांनी मागितली.

उन्हाळ्यामध्ये बेनोयेंद्र हेही मुंबईला आले. त्याठिकाणी भट्टाचार्य यांच्या साथीनं प्लेगचा जीवाणू मिळवण्यासाठी हाफकिनमधील दोन व्हेटरीनरी सर्जनला लाच देण्याचा प्रयत्न केला.

आपण खरंच शास्त्रज्ञ आहोत हे भासवण्यासाठी बेनोयेंद्र यांनी बाजारातून उंदीरही विकत आणले. त्यानंतर ते दोघे आर्थर रोड येथील संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात गेले. त्याठिकाणीही जीवाणू कल्चर करण्यात आलेले होते.

बेनोयेंद्र यांनी त्याठिकाणी त्यांचा मित्र भट्टाचार्यला त्याच्या औषधाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळेत काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये तशी नोंद आहे. मात्र भट्टाचार्य यांनी प्रयोगशाळेत प्रयोग केल्याचे काहीही पुरावे नाहीत.

प्रयोगशाळेत प्रवेश मिळाल्यानंतर जवळपास पाच दिवसांनी म्हणजे 12 जुलैला भट्टाचार्य यांनी अचानकपणे त्यांचं काम थांबवलं आणि बेनोयेंद्रबरोबर ते कोलकात्याला आले.

हत्येनंतर जवळपास तीन महिन्यांनी फेब्रुवारी 1934 मध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक केली. तपासामध्ये बेनोयेंद्र यांच्या प्रवासाची कागदपत्रे, हॉटेलचे बिल, हॉटेलच्या रजिस्टरमधील एंट्री, प्रयोगशाळेतील संदेश आणि त्यांनी उंदीर खरेदी केली त्याठिकाणची पावती असं सर्व हाती लागलं.

जवळपास नऊ महिने चाललेला हा खटला सर्वच दृष्टीने उत्कंठा वाढवणारा होता. बचाव पक्षानं अमरेंद्र यांना उंदरानं चावा घेतला होता असा दावा केला. मात्र हत्येचा आरोप असलेल्या दोन आरोपींनी मुंबईच्या रुग्णालयातून प्लेग बासिली (जीवाणू) ची चोरी केली.

तसंच त्यांनी ते कलकत्त्याला आणले आणि हत्येच्या दिवसापर्यंत म्हणजे 26 नोव्हेंबर 1933 पर्यंत त्याला जिवंत ठेवलं याचे पुरावे असल्याचं न्यायालयानं म्हटलं.

न्यायालयानं बेनोयेंद्र आणि भट्टाचार्य यांना अमरेंद्र यांच्या हत्येच्या कट प्रकरणी दोषी ठरवलं आणि त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. जानेवारी 1936 मध्ये कलकत्ता हायकोर्टानं शिक्षा कमी करत जन्मठेप सुनावली.

या प्रकरणी अटक झालेल्या इतर तीन डॉक्टरांना पुराव्या अभावी सोडण्यात आलं. गुन्हेगारी इतिहासातील हे अद्वितीय प्रकरण असल्याची टिपण्णी याबाबत न्यायाधीशांनी केली होती.

बेनोयेंद्र हे 20 व्या शतकातील व्यक्ती होते. त्यावेळी भारतावर वर्चस्व असलेल्या व्हिक्टोरियन संस्थांना पछाडण्याचा त्याला विश्वास होता, असं हत्येवर आधारित द प्रिन्स अँड द पॉयझनर या पुस्तकावर संशोधन करणारे अमेरिकेचे पत्रकार डॅन मॉरीसन यांनी सांगितलं होतं. रेल्वे स्थानकावर झालेली ही हत्या पूर्णपणे आधुनिक पद्धतीनं झालेली होती, असं मॉरीसन म्हणाले.

जैविक शस्त्रांचा वापर हा अगदी इसवीसन पूर्व सहाव्या शतकापासून होत आलेला आढळतो. त्यावेळी असिरियन्सनी त्यांच्या शत्रूंना विहिरीमध्ये राय एर्गोट नावाच्या बुरशीचा वापर करून विष दिलं होतं. पण अमरेंद्र यांची हत्या ही अनेक अर्थांनी किम जोंग उनचा सावत्र भाऊ कि जोंग नाम याच्या हत्येची आठवण करून देणारी आहे.

ते क्वालालंपूरच्या विमानतळावर वाट पाहत असताना 2017 मध्ये त्यांची हत्या झाली होती. दोन महिलांनी त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत घातक असं रसायन चोळलं होतं. त्या महिलांना नंतर अटक करण्यात आली होती.

जवळपास सर्वांना विसर पडलेल्या या 88 वर्षांपूर्वीच्या घटनेत ज्या व्यक्तीनं या राजकुमाराची हत्या केली तो आणि त्यासाठी वापरलेलं शस्त्र म्हणजे हायपोडर्मिक सुई कधीही सापडली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)