बावला मर्डर केस: एक असा खटला, ज्यामुळे 'या' होळकरांनी सोडली इंदूरची गादी

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एक होता राजा, एक होती नर्तकी आणि एक होता व्यापारी.

ही कुठल्या पुस्तकातली कहाणी नाही, तर 95 वर्षांपूर्वी घडलेल्या एका खूनखटल्याची गोष्ट आहे. या कथेतली तीन प्रमुख पात्रं, म्हणजे इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तृतीय, एकेकाळी त्यांच्या राजमहालात नर्तकी असलेली मुमताज बेगम आणि मुंबईतील एक श्रीमंत व्यवसायिक अब्दुल कादर बावला.

बावला आणि मुमताज यांच्या गाडीवर 1925 साली मुंबईच्या अतिश्रीमंत मलबार हिल परिसरात गोळीबार झाला होता, आणि त्याचे पडसाद पुढची काही वर्ष महाराष्ट्रातल्या समाजकारणात उमटत राहिले. देशभरच नाही तर परदेशातही त्याची चर्चा झाली आणि त्यामुळे तुकोजीरावांना इंदूरच्या सिंहासनावरून पायउतार व्हावं लागलं.

मोहम्मद अली जिनांपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत अनेक नेते, पत्रकार आणि समाजसुधारकांनी या प्रकरणात कुणाच्या ना कुणाच्या बाजूनं भूमिका घेतल्या होत्या. त्या कहाणीत पुढे बाबासाहेब आंबेडकर, शाहू महराजांपासून ते विनायक दामोदर सावरकरही येतात.

मुंबईच्या गुन्हे इतिहासात बावला मर्डर केस नावानं गाजलेला हा खटला 95 वर्षांनंतर पुन्हा चर्चेचा विषय बनला, कारण त्यावर लेखक-पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलेलं 'बावला मर्डर केस : लव्ह, लस्ट अँड मर्डर इन कलोनियल इंडिया' हे पुस्तक 28 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालं.

बावला मर्डर प्रकरण नेमकं काय आहे?

घटना आहे 12 जानेवारी 1925 रोजीची. अब्दुल कादर बावला आणि मुमताज गाडीनं फेरफटका मारून मलबार हिल परिसरातल्या घरी परतत होते. सोबत त्यांचा ड्रायव्हर आणि व्यवस्थापक मॅथ्यूही गाडीत होते. हँगिंग गार्डनच्या कोपऱ्यावर, रिज रोडवरून गिब्स रोडकडे त्यांची गाडी जात होती.

अचानक मागून दुसरी एक गाडी आली आणि बावलाच्या गाडीला धडक मारून पुढे जाऊन थांबली. त्यातून सात-आठ माणसं उतरली आणि त्यांनी बावला-मुमताज यांच्या गाडीवर हल्ला चढवला. बावला यांनी प्रतिकार केला तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर मुमताजला गाडीतून खेचून काढण्याच प्रयत्न करत होते, त्यांनी तिच्या चेहऱ्यावर चाकूनं वारही केले.

त्यानंतर जे घडलं, त्याचं वर्णन धवल कुलकर्णी 'बॉलिवूड स्टाईल तुफान मारामारी' अशा शब्दांत करतात. केवळ योगायोगानं ब्रिटिश सैन्यात काम करणारे चार अधिकारी तिथे आले आणि त्या योगायोगानं पुढे इंदूरचा इतिहास बदलला.

चौघेही गोल्फ खेळून परतताना वाट चुकल्यानं नेमके त्याच रस्त्यावर आले, आणि समोरचं दृष्यं पाहून मुमताजला वाचवण्यासाठी धावले. सैनिकांच्या हातात गोल्फ स्टीक सोडून दुसरं काही नव्हतं आणि हल्लेखोर बंदूक, कुकरी, चाकूनं वार करत होते. झटापटीत लेफ्टनंट सीगर्ट यांना गोळ्याही लागल्या.

पण तशातही एका हल्लेखोराला, शफी अहमदला त्यांनी पकडलं. बाकीचे निसटले, मुमताज वाचली, पण बावलाचा मृत्यू झाला.

"मग तपासात शफी अहमद हा इंदूरच्या पोलिस खात्यात रिसालदार पदावर असल्याचं समोर आलं, आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली," असं धवल कुलकर्णी सांगतात.

मुमताज आणि बावला कोण होते?

मुमताज केवळ बावलानं 'ठेवलेली बाई' नव्हती, तर त्याआधी ती इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर (तृतीय) यांच्या महालात राहायची. तिच्याविषयी त्यावेळच्या वृत्तपत्रांत वेगवेगळे दावे समोर येतात. कुणी तिचं वर्णन गायिका, नर्तकी म्हणून करतं तर कुणी ती तुकोजीरावांच्या जनानखान्यात रखेल असल्याचं म्हणतं.

पण मुमताज मूळची पंजाबच्या अमृतसरमधली होती, तिची आई मुंबईत राहायची आणि इंदूरला तुकोजीरावांच्या महालात मुमताजची रवानगी झाली होती याविषयी एकमत आहे. तुकोजीरावांसोबत ती दौऱ्यावरही जायची.

अशाच एका दौऱ्यावरून तुकोजीरावांनी तिला मसूरीला पाठवलं, तेव्हा ट्रेननं दिल्लीत उतरल्यावर तिनं आपली वेगळी वाट धरली. सोबत इंदूरहून आलेल्या लोकांनी तिला विरोध केला. पण पोलिसांनी मुमताजला जाऊ दिलं.

आधी अमृतसर आणि मग कराचीला काही काळ राहिल्यावर मुमताज मुंबईत आली. चरितार्थासाठी तिनं पुन्हा गाणं सुरू केलं आणि अब्दुल कादर बावलाकडे आश्रय घेतला.

बावला हे त्याकाळी मुंबईतलं किती मोठं प्रस्थ होतं, याची माहिती धवल कुलकर्णी देतात, "बावला मोठा व्यापारी होता आणि मुंबईचा नगरसेवकही होता. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळातही बावला यांच्याकडे चाळीस लाख रुपयांची संपत्ती होती."

'मीडिया ट्रायल' आणि तुकोजीरावांवर दबाव

साहजिकच मुंबईतल्या एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या, त्याच्या प्रेमिकेला पळवण्याचा प्रयत्न आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेली सुटका - हे सगळं तेव्हाच्या वृत्तपत्रांसाठी चर्चेचा विषय बनलं.

पत्रकार आणि अभ्यासक सचिन परब सांगतात, "आज ज्या पद्धतीनं सुषांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा झाली, तसा हा खटला देशभर चर्चेचा विषय ठरला त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा होता."

केवळ शफी अहमदच नाही, तर आरोपींपैकी बहुतेक सर्व इंदूरचे असल्याचं समोर आल्यावर थेट इंदूरच्या राजांवरच आरोप होऊ लागले. तेव्हाची मुंबईतली इंग्रजी वृत्तपत्रं त्यात आघाडीवर होतीच, पण बहुतांश मराठी वृत्तपत्रांनीही हे प्रकरण चघळलं.

कोर्टातल्या सुनावणीदरम्यान मुमताजनं दावा केला की इंदूरला असताना तिला एक मुलगीही झाली पण ते बाळ मारून टाकण्यात आलं, आणि म्हणूनच तिनं इंदूर सोडण्याचा निर्णय घेतला होता. इंदूरचे लोक तेव्हापासूनच तिच्या मागावर होते.

अर्थात थेट तुकोजीरावांशी जोडणारा कुठलाही पुरावा कधी समोर आला नाही. तरीही आरोप होत राहिले.

जिन्नांकडे वकीलपत्र आणि पोलीस तपास

हा हायप्रोफाईल खटला असल्यानं मुंबईतल्या वकिलांनाही त्यात रस होता. मोहम्मद अली जिन्ना त्यापैकीच एक.

त्या काळात एक तडफदार वकील म्हणून ओळखले जाणाऱ्या जिन्नांनी अटक झालेल्या नऊपैकी एका आरोपीचं, आनंदराव फाणसे यांचं वकीलपत्र घेतलं होतं. फाणसे हे तुकोजीरावांचे दूरचे नातेवाईक होते आणि इंदूरच्या सैन्यात मोठ्या पदावर होते.

आनंदरावांसह एकूण नऊ जणांना अटक झाली. पण तपासासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तेव्हाचे पोलिस कमिशनर सर पॅट्रिक केली यांनी त्याविषयी उघडपणे भाष्यही केलं.

धवल कुलकर्णी त्याविषयी म्हणतात, "अत्यंत स्वच्छ आणि निस्पृह अधिकारी अशी केली यांची प्रतिमा होती. त्यांनी ठणकावून सांगितलं की आमच्यावर दबाव येतोय, त्याचा तपासावर परिणाम होतोय आणि तुम्ही असा दबाव आणलात तर मी पदाचा राजीनामा देईन."

त्या दबावासमोर न झुकता पोलिसांनी तपास करून खटला तडीस कसा नेला, याचं उदाहरण आजही पोलिस प्रशिक्षणार्थींना दिलं जातं.

मुंबईतले माजी पोलिस अधिकारी आणि इतिहासकार रोहिदास दुसार यांनी तर 'बावला मर्डर केस' नावाचं पुस्तक लिहून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा केला, याची माहिती दिली आहे.

खटल्याचा निकाल काय लागला?

बॉम्बे हायकोर्टानं नऊ आरोपींपैकी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यात शफी अहमदसोबद, इंदूरच्या एअरफोर्समधले कॅप्टन शामराव दिघे आणि दरबारी पुष्पशील फोंडे यांचा समावेश होता.

पण 22-23 वर्षांच्या पुष्पशीलला वेड लागल्यानं त्याची शिक्षा कमी करून काळ्या पाण्याची करण्यात आली. आनंदराव फाणसेंसह आणखी चौघांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर दोघांना सोडून देण्यात आलं.

धवल कुलकर्णी सांगतात, "त्यावेळची वृत्तपत्रं वाचून लक्षात येतं की लोकांना खटल्याची केवढी उत्सुकता होती. आरोपींना फाशी दिली जाण्याची अफवा पसरल्यावर उमरखडीच्या जेलबाहेर लोकांचे थवेच्या थवे जमायचे. शेवटी कुणाला न सांगता चुपचाप फाशी देण्यात आली."

1925 सालीच आरोपींना फाशी झाली आणि त्याच वर्षी या घटनेवर आधारीत 'कुलीन कांता' हा मूकपटही प्रदर्शित झाला.

मात्र अनेक वर्तमानपत्र खरा आरोपी अजून सापडलाच नाही, अशी चर्चा करत होती आणि त्यांचा रोख इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकरांकडे होता. पण दोन समाजसुधारक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होळकरांच्या बाजूनं उभे राहिले.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि प्रबोधनकार

केशव सीताराम ठाकरे त्यावेळी पुण्यात राहायचे आणि प्रबोधन हे पाक्षिक चालवायचे.

सचिन परब सांगतात, "एक पत्रकार या नात्यानंच प्रबोधनकार या सगळ्याशी जोडले गेले. यांनी या प्रकरणावर लेख लिहिले आणि पुढे त्या लेखांच्या पुस्तिकाही छापल्या, ज्याला भरपूर प्रतिसाद मिळाला."

ठाकरेंनी मराठीत लिहिलेल्या 'महामायेचं थैमान' आणि 'बावला-मुमताज प्रकरण' पुस्तिका आणि द टेम्प्ट्रेस ही इंग्रजी पुस्तिकाही गाजली. टेम्प्ट्रेसच्या प्रती इंग्लंडमध्येही विकल्या गेल्या आणि तिथल्या संसदेतल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या, अशी माहिती सचिन परब देतात.

ते सांगतात, "या लेखांतून प्रबोधनकारांचं त्या काळातल्या परिस्थितीचं आकलन दिसून येतं. त्यांनी घेतलेल्या काही भूमिका आता अतिशय टोकाच्या किंवा एखाद्याची खूपच बाजू घेणाऱ्या वाटू शकतात. पण त्यामागची पार्श्वभूमीही समजून घ्यायला हवी."

"जातीपातींमधल्या संघर्षाचा हा काळ होता. त्यावेळेची बहुतांश मराठी वृत्तपत्र ब्राह्मणांच्या हातात होती, त्यातही ब्राह्मणी दृष्टीकोन असणाऱ्यांची संख्या मोठी होती. तर प्रबोधन प्रामुख्यानं बहुजन समाजवादी वृत्तपत्र होतं.

"राजेशाही हा तेव्हा अनेकांसाठी मानबिंदू होता. पण महाराष्ट्रातले सगळे मोठे संस्थानिक हे ब्राह्मणेतर होते आणि त्यातले काही धर्मसुधारणांच्या बाजूनं होते. साहजिकच या सगळ्या प्रकरणाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचीही किनार होती."

प्रकरण इतकं टोकाला गेलं, की इंदूरमध्ये सत्तापालट झाला.

धवल सांगतात, "संस्थानिकांवर कोर्टात खटला चालवता येत नसे, तर चौकशी समिती नेमली जायची. इंग्रज सरकारनं तुकोजीरावांना सांगितलं, की तुम्ही गादी सोडा नाहीतर आम्ही चौकशी समिती बसवू. शेवटी तुकोजीरावांनी गादी सोडली आणि यशवंतराव होळकर सत्तेत आले."

आंबेडकर, सावरकर आणि शाहू महाराज

दोनच वर्षांनी तुकोजीराव पुन्हा चर्चेत आले. सत्ता सोडल्यावर ते परदेशात गेले, तिथे आपल्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान असलेल्या नॅन्सी मिलरच्या प्रेमात पडले. ती अमेरिकन आणि धर्मानं ख्रिश्चन होती.

या नात्याला तुकोजीरावांच्या धनगर समाजातूनही विरोध झाला आणि तो निवळायला मदत केली ती दोघांनी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांनी

धवल सांगतात, "बाबासाहेबांनी बारामतीला धनगर समाजाची सभा घेतली. तर दुसरीकडे तुकोजीरावांनी धमकी दिली होती, की लग्नाला विरोध झाला तर मी मुसलमान होईन. त्यामुळे हिंदू महासभेच्या लोकांनी पुढाकार घेत करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्याकरवी नॅन्सीला हिंदू करून घेतलं आणि त्यांचं शर्मिष्ठा देवी असं नामकरण झालं."

याच डॉ. कुर्तकोटींशी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा प्रचंड संघर्ष झाला होता. तसंच शाहूंनी यशवंतराव होळकर यांच्याशी आपल्या घराण्यातील चुलत बहिणीचं लग्न लावलं होतं, ज्या महाराणी संयोगिता म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळात जातीपातींच्या भींत मोडणारा हा आंतरजातीय विवाह होता, ज्यामुळे शाहू होळकर परिवाराशी जोडले गेले होते.

मुमताजचं पुढे काय झालं?

तुकोजीरावांना सत्ता सोडावी लागली, पण जिच्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे हे सगळं सुरू झालं, त्या मुमताजचं काय?

धवल उत्तर देतात, "मुमताज काही काळ मुंबईत तर काही काळ कराचीत राहिली, तिनं गायिका म्हणून काम केलं. ती नंतर हॉलिवूडला गेली, पण तिचं पुढे काय झालं, याची काहीच माहीती नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)