हाथरस : बलात्कार पीडितेचे कुटुंबीय स्वतःच्याच घरात कैद्यासारखे राहतायत...

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्यंत निघृण पद्धतीनं सामूहिक बलात्कार करण्यात आला, तसंच त्यानंतर तिच्यावर प्रचंड अत्याचारही करण्यात आले होते.

शेजारच्याच तथाकथित उच्च जातीतील काही जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पीडितेच्या मृत्यूनंतर प्रशासनानं कुटुंबीयांना न सांगताच तिच्या पार्थिवावर रात्रीच्या अंधारात अंत्यसंस्कार केले. त्यामुळे जगभरात या प्रकरणाची चर्चा झाली आणि संताप व्यक्त करण्यात आला होता.

या प्रकरणी टीका होत असतानाच सरकारनं योग्य तपास आणि जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून न्यायाचं आश्वासन दिलं.

पण चार आरोपींवर खटला सुरू असून एका वर्षानंतर हे प्रकरण अजूनही न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेत अडकून आहे. दरम्यान, पीडित तरुणीच्या कुटुंबानं त्यांना त्यांच्याच घरात कैद्यासारखं राहण्याची वेळ आली असल्याचं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर काही दिवसांपूर्वी मी सर्वांत आधी हाथरस जिल्ह्यातल्या भुलगढी या भागाला भेट दिली. या घटनेची जगभरातील माध्यमांत चर्चा होती. त्यामुळे पीडितेच्या घरी पत्रकार, कॅमेरामन यांची गर्दी होती. विरोधी पक्षातल्या सर्वच पक्षांच्या नेते आणि राजाकारण्यांनी भेट देत तरुणीच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला तसंच न्यायासाठी लढण्याचं आश्वासनही दिलं.

"14 सप्टेंबरला बाजरीच्या शेतामध्ये संपूर्ण जखमी आणि बेशुद्ध तसंच कमरेखाली विवस्त्र अशा अवस्थेत आमची मुलगी आढळली. तिचा पाठिचा कणा मोडलेला होता. शरिरातून रक्तस्त्राव सुरू होता आणि ती रक्ताच्या उलट्याही करत होती. दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 29 सप्टेंबरला रुग्णालयात तिचा मृत्यू झाला," असं पीडितेच्या आईनं मला सांगितलं.

आम्ही नुकतीच पीडितेच्या घरी भेट दिली तेव्हा, गावात हे कुटुंब एकटं पडलं असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यांना घरातच कैदेत राहावं लागत आहे. कायम हाती मशीनगन घेतलेल्या सुरक्षारक्षकांचा वेढा, 24 तास सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची निगराणी, येणाऱ्या जाणाऱ्यावर बारीक नजर अशा परिस्थितीत ते राहत आहेत.

(उच्चवर्णीयांकडून पीडितेच्या कुटुंबाला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता असल्यानं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.)

"हे संपूर्ण वर्षच वाया गेलं," अशी उद्विग्नता तरुणीच्या मोठ्या भावानं व्यक्क केली.

"सुरक्षा रक्षकांमुळं आम्ही सुरक्षित आहोत. पण आम्ही कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही. सरकारनं नुकसान भरपाईपोटी दिलेली रक्कम आणि राशन यावरच आम्ही जगत आहोत," असंही त्यांनी सांगितलं.

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयाला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची तरतूद असलेल्या कायद्यानुसार, पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

"किराणा दुकानात किंवा डॉक्टरकडे जातानाही आम्हाला, सुरक्षा रक्षकांबरोबरच जावं लागतं. त्यामुळे आम्हालाही कैदेत असल्यासारखंच वाटतं," असं तिचा भाऊ म्हणाला.

ही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी कुटुंब त्यांच्या लहानश्या शेतीच्या तुकड्याच्या आधारे आणि इतर लहानसहान कामं करून उदरनिर्वाह भागवत होतं. पण आता ते शक्य नाही. चारा आणण्यासाठी बाहेर जाणं शक्य नसल्यामुळे त्यांना त्यांच्या सातपैकी सहा म्हशी विकाव्या लागल्या आहेत. दुसरीकडं प्रशासनानं अद्याप नवीन घर आणि कुटुंबातील सदस्याला नोकरीचं आश्वासन पूर्ण केलेलं नाही.

तरुणी आणि तिचं कुटुंबीय दलित आहेत. पीडितेनं उच्चवर्णीय ठाकूर समाजातील चार जणांनी तिच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली होती. तपास करणाऱ्या संस्थांनी त्यांच्यावर हत्या, सामूहिक बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोप निश्चित करत खटला सुरू केला आहे.

आरोपींच्या कुटुंबीयांनी मात्र याप्रकरणी उलट आरोप केले आहेत. पीडित तरुणीचे ठाकूर समाजातील एका व्यक्तीबरोबर स्वखुशीनं संबंध होते. पीडितेच्या कुटुंबीयांना ते मान्य नसल्यानं, त्यांनीच तिची हत्या केली असून हा 'ऑनर किलिंग'चा प्रकार असल्याचे आरोपही केली आहेत. या भागात दबदबा असलेल्या ठाकूर समाजातील काही लोकांनी आरोपींच्या समर्थनार्थ काही रॅलीही काढल्या होत्या.

पीडित आणि आरोपी यांची घरं एका अरुंद गल्लीनं विभागली गेली आहेत. पण अनेक शतकांपासूनचं हे अंतर भरून न निघणारं असं आहे. त्यात या घटनेनंतर ही दरी अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे.

"त्यांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना हीन वागणूक दिली होती. तसंच आमच्याबरोबर आजही भेदभाव केला जात आहे," असं पीडितेच्या मोठ्या भावानं म्हटलं.

"आमच्या बहिणीवर हल्ला झाला तेव्हा किंवा ती रुग्णालयात मृत्यूशी झुज देत होती तेव्हा किंवा अगदी तिच्या मृत्यूनंतरदेखील गावातील कोणीही तिची चौकशी करायला आलं नाही. आरोपींना पाठिंबा द्यायला मात्र, संपूर्ण गाव कोर्टात येतं."

पीडितेच्या भावानं जबाब नोंदवण्यासाठी आणि खटल्यासाठी हाथरस जिल्हा न्यायालयात गेल्या काही दिवसांत अनेक चकरा मारल्या आहेत. त्यानंतर गुरुवारी जबाब नोंदवण्यासाठी पीडितेची आई न्यायालयात गेली होती.

न्यायालयात चकरा मारणं हे अत्यंत तणावाचा असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांच्या वकील सीमा कुशवाह यांनी धमक्या मिळाल्याची तक्रार केली आहे. तर बचाव पक्षाचे वकील मुन्ना सिह पंधीर यांनी हे दावे फेटाळले आहेत.

न्यायालयात जात असताना काही जण कारचा पाठलाग करतात, असं कुशवाह यांनी म्हटलं आहे. तर कोर्टात काही पुरुष वकिलांनी त्यांना, दिल्लीमधील वकील हाथरसमधील खटल्यात युक्तीवाद करू शकत नाही असं सांगितलं. त्यांनी मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आणि मला माझ्या मर्यादेत राहण्यास सांगण्यात आलं, असंही त्या म्हणाल्या.

मार्च महिन्यात एकदा, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं दोन वेळा कोर्टाचं कामकाज स्थगित करावं लागलं होतं. अनेकदा जिल्ह्याच्या सीमेपासून कोर्टापर्यंत पोलिसांना त्यांची कार सुरक्षितपणे कोर्टापर्यंत आणावी लागते. पण तरीही काही दिवसांपूर्वीच कोर्टानं प्रकरण जिल्ह्याबाहेर स्थलांतरीत करण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली.

आतापर्यंत 104 पैकी 16 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात डॉक्टर, पोलीस अधिकारी, कुटुंबीय, स्थानिक पत्रकार यांचा समावेश आहे. तसंच दोन ते तीन महिन्यांत सुनावणी संपवण्याची शक्यता असल्याचं, कुशवाह म्हणाल्या. "आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे," असं त्यांनी सांगितलं.

कुशवाह या पीडितेच्या कुटुंबासाठी आणखी एक खटला लढत आहेत. पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी प्रशासनानं कुटुंबीयांची परवानगी घेतली होती किंवा नाही आणि जर घेतली नसेल तर यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची, याबाबतचा हा खटला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सध्या हा खटला सुरू आहे.

कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्याच्या मुदद्याचाही यात समावेश आहे. "कुटुंबाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हायचं आहे, आणि मला वाटतं तसं व्हायला हवं. सुरक्षा रक्षक त्यांना शारीरिक सुरक्षा देऊ शकतात. पण त्यांच्या मानसिक आणि भावनिक सुरक्षेचं काय? त्यांना पुन्हा एकदा नव्यानं जीवन जगता यावं यासाठी सरकारनं त्यांना हाथरसपासून दूर कुठंतरी राहण्याची सोय करून द्यायला हवी," असं कुशवाह म्हणाल्या.

जातीय मतभेदामुळं दोन्ही बाजुंनी गावामध्ये भीती आणि प्रचंड तणावाचं वातावरण आहे. आरोपीचे कुटुंबीय संतपालेले असून पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याची शिकार केल्याचा आरोप करत आहेत.

"तुम्ही इथे कशासाठी आला आहात?" एका आरोपीच्या नातेवाईक असलेल्या वयस्कर महिला माझ्यावर ओरडल्या. "आमची मुलं निर्दोष आहेत. माध्यमांनी त्यांची प्रतिमा खलनायकासारखी रंगवली म्हणून, ते तुरुंगात आहेत," असं त्यांनी म्हटलं.

गावातील ठाकूर कुटुंबांतील बहुतांश लोकांनी या मुद्द्यावर बोलणं टाळलं. प्रकरण न्यायालयात असून याबाबत काहीही माहिती नसल्याचं ते म्हणाले. "आम्ही गरीबी आणि महागाईशी झगडत आहोत. आमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत," असं एका व्यक्तीनं म्हटलं.

"लोक अनेक प्रकारच्या गोष्टी बोलतात, पण नेमकं काय झालं हे कोण सांगू शकतं? केवळ तिला [पीडितेला] माहिती आणि देवाला माहिती," असं 76 वर्षीय बलबीर सिंह म्हणाले.

गावात अजूनही तणावाचं वातावरण असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र "जे घडलं, ते घडलं, त्यांनाही गावात राहायचं आहे आणि आम्हालाही राहायचं आहे," असं ते म्हणाले.

पीडितेच्या कुटुंबीयांनी मात्र, त्यांना राहायचं नसल्याचं म्हटलं आहे. त्यांचं आयुष्य पूर्णपणे अशांत झाल्याचं त्यांनी सांगितलं.

पीडितेच्या आईला जेव्हाही, लाब काळे केस असलेल्या मुलीची आठवण येते, तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात.

"हे सर्व कसं घडलं? यावर आजूनही आमचा विश्वास बसत नाही. आई मुलीला कधी विसरू शकते का? मी जेवण करते तेव्हा मला तिची आठवण येते, मी झोपायला जाते तेव्हा मला तिची आठवण येते. माझ्या मुलीचा एवढ्या क्रूरपणे अंत होईल, असं अगदी वाईट स्वप्नातही मला कधी वाटलं नाही," असं त्या म्हणतात.

"मात्र माझी मुलगी खूप शूर होती. ती बलात्कार झाल्याचं सारखं सांगत होती. गावातील लोकांना ते आवडलं नाही. यामुळे गावाची बदनामी होईल. हे प्रकरण मिटवून टाकायला हवं, असं त्यांना वाटत होतं."

या घरात राहणं शक्य नाही, कारण याठिकाणच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या कित्येक आठवणी आहेत, असं पीडितेची वहिनी म्हणाली.

"आम्ही नेहमी सोबत असायचो. मी गर्भवती होते तेव्हा ती मला स्वयंपाक किंवा इतर कामं करू देत नव्हती. ही घटना घडली त्यादिवशीही ती भाजी करून आणि कणीक मळून गेली होती. चारा घेऊन आल्यानंतर पोळ्या करते असं तिनं सांगितलं होतं."

"पण ती परत आलीच नाही," असं म्हणत पीडितेच्या वहिणीला रडू कोसळलं.

"गेल्या एका वर्षात घडलेली एकमेव चांगली बाब म्हणजे माझ्या बहिणीनं लावलेली तुळस बहरली. तिनं लावलं तेव्हा ते एक लहान रोप होतं, अता पाहा कसं मोठं झालं आहे," असं पीडितेचा लहान भाऊ म्हणाला.

आम्ही पीडितेच्या घरापासून जवळपास एक किमी अंतरावर असलेल्या शेतात गेलो. त्याठिकाणी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

गेल्यावर्षी आम्ही तिथं भेट दिली होती, तेव्हा त्याठिकाणी राखेचा ढीग होता. आता तो भाग गवतानं झाकण्यात आला आहे. आजुबाजुला गवताचे ढीग आहेत. 29 सप्टेंबरच्या रात्री जे काही घडलं, त्याच्या सर्व खुणा झाकण्यात आल्या आहेत.

पीडितेच्या अस्थींबद्दल आम्ही विचारणा केली. त्यावर, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही अस्थी गोळाच करणार नाही, असं तिचा भाऊ म्हणाला.

"जेव्हा त्या चार आरोपींना फासावर चढवलं जाईल आणि आम्ही जे दुःख एक वर्षापासून भोगलं आहे, ते त्यांचे कुटुंबीय भोगतील तेव्हाच न्याय मिळेल," असं पीडितेची वहिनी म्हणाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)