You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नैना साहनी तंदूर कांड : गस्तीवरच्या हवालदाराने धूर पाहिल्यामुळे उघडकीस आलेले प्रकरण
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
3 जुलै 1995. रात्रीचा एक वाजला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मॅक्सवेल परेरे यांचा फोन वाजला. पलीकडील बाजूस पोलीस उपायुक्त आदित्य आर्य होते.
इतक्या रात्री फोन केल्याबद्दल त्यांनी आधी माफी मागतली आणि मग सांगितले की, एका तंदूरमध्ये प्रेत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे प्रकरण समजायला परेरा यांना थोडा वेळ लागला. त्यांनी आर्य यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, "काय? तुम्ही शुद्धीत आहात का? कुणाचे प्रेत? कुठे? आता तुम्ही कुठे आहात?"
आर्य उत्तरले, "मी सध्या अशोक यात्री निवास हॉटेलमध्ये आहे. इकडे एक बगिया नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट हॉटेलच्या मुख्य भागात नसून बागेत आहे. मी तिथूनच बोलत आहे. तुम्ही तत्काळ इकडे येऊ शकता का?
जेव्हा मॅक्सवेल परेरा अशोक यात्री निवास येथे पोहोचले तेव्हा कनॉट प्लेस पोलीस ठाण्यातील एसएचओ निरंजन सिंह नैना साहनीच्या मृत शरीराचा पंचनामा करवून घेत होते.
लोण्याचे चार स्लॅब
परेरा सांगतात, "नैना साहनी यांचे अत्यंत वाईट प्रकारे जळलेले शरीर बगिया रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघराच्या जमिनीवर पडलेले होते. त्याला एका कापडाने झाकले होते. बगिया रेस्टॉरंटचा मॅनेजर असलेल्या केशव कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले होते."
नैनाच्या शरीराचा मुख्य भाग जळला होता. फक्त आगीत नैना यांचा केसांचा अंबाडा जळला नव्हता. आगीच्या उष्णतेमुळे त्यांची आतडी पोटातून बाहेर आली होती. हे प्रेत अजून अर्धा तास असेच जळत राहिले असते तर काहीही शिल्लक राहिले नसते आणि आम्हाला तपास करणे खूप कठीण गेले असते.
जेव्हा नैना साहनीचे प्रेत जाळणे कठीण गेले तेव्हा सुशील शर्माने बगियाचा मॅनेजर केशवला लोण्याचे चार स्लॅब आणण्यासाठी पाठवले.
कनॉट प्लेस पोलीस ठाण्याच्या निरंजन सिंह यांनी सांगितले, "नैना साहनीचे प्रेत तंदूरच्या आत नाही, तर तंदूरच्या वर ठेवून जाळले जात होते, जसा एखाद्या चितेला अग्नी दिला जातो.
हवालदार कुंजू यांनी सर्वात आधी हे जळलेले प्रेत पाहिले. त्या रात्री 11 वाजता हवालदार अब्दुल नझीर कुंजू आणि होमगार्ड चंदन पाल जनथपथ वर गस्त घालत होते.
आगीच्या ज्वाळा आणि धूर
ते चुकून आपला वायरलेस सेट पोलीस ठाण्यात विसरले होते. तितक्यात त्यांना अशोक यात्री निवासच्या अंगणातून आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसला.
सध्या केरळमधील कोल्लममध्ये राहणाऱ्या अब्दुल नझीर कुंजू यांनी सांगितले, "आगीच्या ज्वाळा पाहून मी बगिया रेस्टॉरंटच्या गेटवर पोहोचलो तेव्हा मी पाहिले की, सुशील शर्मा तिथे उभा होता आणि त्याने गेटला कापड लावले होते. जेव्हा मी आगीचे कारण विचारले तेव्हा केशव म्हणाला की, ते पार्टीसाठी जुनी पोस्टर जाळत आहेत."
"मी तिथून पुढे गेलो. पण मला वाटले, काहीतरी काळेबेरे आहे. मी बगिया रेस्टॉरंटच्या मागील बाजूस गेलो आणि सात-आठ फुटाची भिंत ओलांडून आत आलो. तिथे मला केशवने पुन्हा मला थांबवायचा प्रयत्न केला. जेव्हा तंदूरच्या जेवळ गेलो तेव्हा एक प्रेत जळत असल्याचे मला दिसले."
"जेव्हा मी केशवकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला की, तो बकरा भाजत होता. जेव्हा मी त्या शवाला लाकडाने हलवले तेव्हा समजले की, तो बकरा नसून एक प्रेत आहे. मी ताबडतोड एसएचओंना फोन करून त्यांना या घटनेची माहिती दिली."
तंदूर हत्याकांड, ज्याने भारताला हादरवून सोडले
आता प्रश्न हा आहे की, सुशील शर्माने कोणत्या परिस्थितीत नैना साहनीची हत्या केली होती आणि हत्येच्या आधी त्या दोघांमध्ये नक्की काय घडले होते?
निरंजन सिंह यांनी सांगितले, "सुशील शर्माने मला सांगितले होते की, हत्या केल्यानंतर त्याने शव पॉलिथीनमध्ये गुंडाळले आणि मग ते चादरीत गुंडाळले. पण तो ते शव उचलू शकला नाही. त्यामुळे त्याने खेचत खेचत ते आपल्या मारुती गाडीपर्यंत आणले."
"त्याने ते प्रेत कारच्या डिक्कीमध्ये ठेवले. पण त्याची विल्हेवाट कशी लावायची ते त्याला समजत नव्हते. आधी त्याने विचार केला की, तो प्रेत निजामुद्दिन पुलावरून यमुना नदीत फेकून देऊ शकतो."
"पण मग त्याने हा विचार बदलला. कारण तसे करताना कुणीतरी पाहू शकते, अशी भीती त्याला वाटत होती. मग त्याने विचार केला की, आपल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ते प्रेत जाळून सगळे पुरावे नष्ट करू शकेल. त्याने विचार केला की, असे करताना त्याला कुणीही पाहणार नाही आणि तो प्रेताची विल्हेवाट लावू शकेल."
दोघांमधील वादाचे कारण
निरंजन सिंह यांनी पुढे सांगितले, "सुशील शर्मा आणि नैना साहनी हे दोघेही मंदिर मार्गावरील फ्लॅट-8 ए मध्ये पती-पत्नीसारखे राहत होते. पण त्यांनी हा विवाह सामाजिक दृष्टिकोनातून उघड केलेला नव्हता. तसे करण्यासाठी नैना सुशीलवर दबाव टाकत होती."
"यातूनच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर असेही समोर आले की, नैना सुशीलच्या सवयींमुळे व अत्याचारांमुळे त्रस्त झाली होती आणि तिने आपला जुना मित्र असलेल्या मतलूब करीमकडे मदतीची याचना केली होती. तिला ऑस्ट्रेलियाला जायचे होते. मतलूब करीमने तिला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी शक्य तेवढी मदत केली."
"सुशील शर्माला नैना साहनीवर संशय आला. तो घरी येत असे तेव्हा घरच्या लँडलाइन फोनची तपासणी करत असे. नैना त्या दिवशी कोणाकोणाशी बोलली हे जाणून घेत असे. घटनेच्या दिवशी सुशीलने जेव्हा आपला फोन रिडायल केला तेव्हा पलिकडे मतलूब करीमने फोन उचलला."
"नैना मतलूबच्या संपर्कात आहे, याची यामुळे खात्री झाली. सुशीलला राग आला आणि त्याने आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून नैनावर गोळी झाडली. जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा ठिकठिकाणी रक्ताचे डाग लागले होते. रिव्हॉल्व्हरच्या गोळीने एसीच्या फ्रेममध्ये छिद्र केले होते."
सुशीलने पहिली रात्र गुजरात भवनात घालवली
सुशील शर्माने नैनाची हत्या केल्यानंतर त्या रात्री तो गुजरात भवनात गुजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या डी. के. राव यांच्यासोबत राहिला होता.
निरंजन सिंह सांगतात, "आम्हाला केशवकडून ही माहिती मिळाली होती की, त्या दिवशी सुशीलचे मित्र डी. के. राव त्याला भेटायला आले होते आणि ते गुजरात भवनात राहत आहेत. ही माहिती मिळाल्यावर मी गुजरात भवनमध्ये गेलो. राव खोली क्रमांक 20 मध्ये थांबले होते हे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत एक पाहुणेसुद्धा थांबले होते."
"राव यांचे विमान पहाटे पाच वाजता होते. ते खोली सोडून गेले आणि त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरी आलेला पाहुणासुद्धा गेला. मी लगेचच डी. के. राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. डी. के. राव यांनी सांगितले की, सुशील शर्मा त्या रात्री त्यांच्यासोबतच होता. त्यांनी हेही सांगितले की, तो खूप चिंतीत होता."
"सुशीलला झोप येत नव्हती. तो एकसारखी चादर ओढून घेत होता. सकाळी राव गेल्यानंतर गुजरात भवनमधील कर्मचाऱ्यांनी सुशीलला चहा नेऊन दिला होता."
अटकपूर्व जामीन मिळविण्यात यश
दुसऱ्या दिवशी सुशील शर्मा आधी टॅक्सीने जयपूरला गेला आणि त्यानंतर चेन्नईमार्गे बंगळुरूला पोहोचला.
मॅक्सवेल परेरा म्हणाले, "सुशीलने चेन्नईला जाऊन आपल्या संपर्कांच्या माध्यमातून अनंत नारायण या वकिलांशी संपर्क साधला आणि अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर तो आपला चेहरा बदलण्यासाठी तिरुपतीला गेला आणि केस कापून चेन्नईला परतला."
"या हत्येची भारतभर चर्चा होऊ लागली होती. तरीही चेन्नईच्या न्यायाधीशांनी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या जामीनाला विरोध करण्यासाठी मी एसीपी रंगनाथन यांना चेन्नईला पाठवले. केटीएस तुलसी या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलनाही आम्ही चेन्नईला घेऊन गेलो."
"आम्ही करत असलेल्या प्रयत्नांबद्दल सुशीलला समजले तेव्हा तो शरण येण्यासाठी आपल्या वकिलांसोबत बंगळुरूला गेला होता. आम्हाला पीटीआयकडून ही बातमी समजली. मी स्वतः बंगळुरूला जाण्याचा निर्णय घेतला. याची दोन कारणे होती. एक म्हणजे मी स्वतः कर्नाटकला राहणारा होतो आणि दुसरे कारण म्हणजे मी कायद्याचे शिक्षणही घेतलेले होते.
"निरंजन सिंह आणि गुन्हे शाखेचे राज महेंद्र यांनाही सोबत घेऊन गेलो. तिथून आम्ही सुशीलला ताब्यात घेऊन दिल्लीत परतलो."
केशववर दबाव टाकण्याचा प्रयत्न
या संपूर्ण प्रकरणात रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव कुमार हा सुशील शर्मासोबत असल्याचे दिसून आले.
सुशीलचे आपल्यावर खूप उपकार आहेत, असे सांगून केशव कुमारने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सुरुवातील नकार दिला. पण जेव्हा तो माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाला तेव्हा तसे न करण्यासाठी सुशील शर्माने त्याच्यावर दबाव टाकला.
निरंजन सिंह सांगतात, "केशव आणि सुशील हे दोघेही तिहार जेलमध्ये कैदी होते. आधी केशव हा सुशील शर्माशी एकनिष्ठ होता. पण कालानुक्रमे त्याने माफीचा साक्षीदार होण्याचा निश्चय केला. सुशीलला याविषयी जेव्हा समजले तेव्हा सुशीलने तुरुंगातच केशवला धमकी द्यायला सुरूवात केली."
"त्याच्या सुनावणीमध्ये एक घटना मला केशवने सांगितली. तो म्हणाला की, तुरुंगात असताना त्याला मादक औषधे दिली होती. तो दीड दिवस झोपेतून उठला नव्हता. तेव्हा जेलच्या वॉर्डनला समजले की, दीड-दोन दिवसांपासून तो जेवलेलाही नाही. त्याच दिवशी केशवला त्या वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये पाठविण्यात आले."
"केशवच्या म्हणण्यानुसार हे काम सुशील शर्माने आपल्या माणसांकरवी केले होते."
गृह सचिवांनी केली घटनास्थळाची पाहणी
या पूर्ण प्रकरणात सुशील शर्माला आपल्या राजनैतिक संबंधांचा वापर करण्यापासून थांबविणे हे पोलिसांसमोरील आव्हान होते. हे प्रकरण इतके हाय प्रोफाइल झाले होते की, या तपासणीदरम्यान भारताचे तत्कालीन गृहसचिव पद्मनाभैया हे स्वतः सुशील शर्मा व नैना साहनीच्या मंदिर मार्गावरील घरात पाहणी करण्यास पोहोचले.
मॅक्सवेल परेरा म्हणतात, "नैनाचे काही ज्येष्ठ राजकारण्यांशी संबंध होते, अशाही बातम्या येत होत्या. त्यावेळी आपले पंतप्रधान नरसिंहराव होते. ते बहुधा या सगळ्यामुळे काहीसे चिंतित होते. त्यांनी गुप्तचर विभागाकरवी त्यांच्यावर चौकशी नेमली होती. (उन्होंने इंटेलिजेंस ब्यूरो से उनके ऊपर जाँच बैठा दी.)"
"राजकारण्यांनी घाबरून चुकीचे जबाब देण्यास सुरुवात केली. एकाने सांगितले की, त्याने कधी नैना साहनीला पाहिलेलेच नाही तर दुसऱ्याने सांगितले की, दुसरे लग्न केल्यापासून मी कोणत्याही परस्त्रीकडे पाहिलेले नाही."
डीएनए आणि स्कल सुपर-इम्पोझिशनचा उपयोग
मॅक्सवेल परेरा यांनी सांगितले, "राव यांनी गृहमंत्री एस. बी. चव्हाण यांना सांगितले की, त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे. या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी गृह सचिव पद्मनाभैया यांना दिले. पद्मनाभैया स्वतः सुशील शर्मा व नैना साहनीच्या फ्लॅटवर पोहोचले."
"वर्तमानपत्रांमध्ये ही घटनेविषयी चटपटीत बातम्या द्यायला सुरुवात केली होती. याबद्दल आम्ही कुणाशीही बोलू नये, असे आम्हाला आदेश मिळाले होते."
या चौकशीमध्ये प्रथमच डीएनए आणि स्कल इमेजिंग तंत्राचा वापर करण्यात आला.
परेरा सांगतात, "त्या वेळी माशेलकर हे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव होते. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी हैदराबादमधील सेंटर फॉर मॉलिक्युलर बायोलॉजीमधील डॉक्टर लालजी सिंह यांना पाठवले."
फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली
परेरा यांनी सांगितले, "त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंगचे नमुने घेतले आणि नैना साहनीचा डीएनए तिच्या आई-वडिलांच्या मुलीशिवाय कुणाचाही असू शकत नाही. आम्ही स्कल सुपर-इम्पोझिशन चाचणीसुद्धा करवून घेतली. ती केल्यानंतर ते प्रेत नैना साहनीचेच होते, हे सिद्ध झाले."
"हे सर्व केल्यानंतर आम्ही केवळ 26 दिवसांमध्ये न्यायालयात चार्जशीट दाखल केली."
अनेक वर्षे सुरू असलेल्या या खटल्यामध्ये सुशील शर्माला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.
त्यानंतर 8 ऑक्टोबर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली. सुशील शर्माने आतापर्यंत तिहार जेलमध्ये २३ वर्षांची शिक्षा भोगली आहे.
तो जेलमध्ये आता पुजाऱ्याचे काम करतो. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची तुरुंगातून सुटका करण्यासंदर्भात दिल्ली सरकार विचार करत आहे, अशाही बातम्या आहेत.
सर्वोच्च न्यायालय
मॅक्सवेल परेरा म्हणतात, "सुशील शर्माने सर्वोच्च न्यायालयालाचीही समजूत काढली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, त्याच्यात इतकी सुधारणा झाली आहे की, तो आता सगळ्यांसाठी पुजा करत आहे. आम्हाला याबद्दल कोणताही आक्षेप नाही.
"पोलिसांना जे करायचे होते, ते त्यांना केले आहे. आपल्या देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. नियम आहेत आणि या सगळ्याच्या आधारे निर्णय घेण्यासाठी न्यायपालिका आहे. याबद्दल त्यांचा काय विचार आहे हा त्यांचा विशेषाधिकार आहे."
भारतीय गुन्हे जगताच्या इतिहासात तंदूर हत्याकांडाची सर्वात निंदनीय आणि क्रूर अपराधात गणना होते. याचा परिणाम इतका व्यापक झाला होता की, त्यानंतर बराच काळ लोकांनी तंदूरमध्ये स्वयंपाक करणे सोडून दिले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)