You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृतदेहाचे तुकडे करण्याइतकी क्रूरता कुठून येते? अशा गुन्हेगारांचा सुगावा लागतो कसा?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. 32 वर्षीय महिलेची तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या केली.
तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अगदी 30 वर्षांपूर्वी देखील असंच एक प्रकरण दिल्लीत घडलं होतं.
दिल्लीतील एका वैज्ञानिकाने भांडणानंतर पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून ट्रंकमध्ये भरले.
पुढे रेल्वेतून 1,500 किमी दूर हैद्राबाद गाठलं आणि तिच्या शरीराचे तुकडे एक एक करून तलावाच्या दलदलीत गाडायला सुरुवात केली.
योगायोग म्हणावा की, एक कुत्रा अन्नाच्या शोधात त्या ठिकाणी गेला असता त्याला माणसाचा हात दिसला. त्याने तो दलदलीतून बाहेर काढला.
या प्रकरणाचा तपास करणारे दिल्लीचे पोलीस अधिकारी दीपेंद्र पाठक सांगतात की, "त्या माणसाने मृतदेहाचे तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दुसरं शहर गाठलं. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणं ही काही नवी गोष्ट नाहीये.
पण आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत अगदी पुस्तकी किंवा चित्रपटातली असल्यासारखं वाटतं."
हल्ली अशाच प्रकारच्या हत्या भारतीय प्रसारमाध्यमांच्या हेडलाईनचा विषय बनू लागल्या आहेत. म्हणजे दिल्लीत श्रद्धा वालकर प्रकरण असो की मिरा भाईंदरमध्ये सरस्वती वैद्य हत्या प्रकरण. अशा प्रकरणांमध्ये एकसारख्या गुन्ह्यांची मालिका आढळून येऊ लागलीय.
प्रत्येक प्रकरणात पीडितेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले जातात. तिचे अवयव एकतर रेफ्रिजरेटर किंवा सूटकेसमध्ये भरून दूर निर्जन ठिकाणी जंगलात, रस्त्यावर फेकून दिले जातात.
भारतातील गुन्हेगारी आकडेवारीत याबाबत विशेष अशी माहिती आढळून येत नाही. एकट्या 2021 सालात 29,000 हून अधिक खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ही संख्या 2020 च्या तुलनेत 0.3% जास्त आहे.
बहुतेक हत्या या 'वैयक्तिक सूडभावना, शत्रुत्व आणि पैशाचे व्यवहार' यांच्या वादातून झाल्याचं पुढे आलंय.
या गुन्ह्यांमध्ये कोणतं हत्यार वापरलं किंवा किती मृतदेहांची काटछाट करण्यात आली याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नाही.
खळबळजनक अहवालांचा परिणाम
माध्यमांनी केलेल्या गुन्ह्यांच्या वार्तांकनामुळे लोकांवर होणारा परिणाम अभ्यासणारे लॉरेन कोलमन लिहितात की, "एकसारख्या गुन्ह्यांची मालिका आणि आत्महत्या ही वास्तविकता आहेत. माध्यमांच्या वार्तांकनातून या गोष्टींचा आणखीन फैलाव होतोय."
आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप असलेला आफताब पूनावाला असो की मीरा भाईंदरमध्ये सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील मनोज साने असो हे दोघेही अमेरिकन क्राईम ड्रामा 'डेक्स्टर' पासून प्रेरित असल्याचं वाटतं.
या क्राईम ड्रामा मध्ये एका फॉरेन्सिक तज्ञाची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. तो फॉरेन्सिकमध्ये रक्ताची तपासणी करायचा आणि रात्री सीरियल किलर बनायचा.
विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, मनोज साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहांचे तुकडे केले, त्यानंतर ते मिस्करमध्ये बारीक करून, कुकरमध्ये शिजवून त्यांची विल्हेवाट लावली.
पोलिसांनी सांगितलं की, "दरवाजा तोडल्यावर पोलिसांना किचनमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्याच बरोबर कटर वगैरे साहित्य सापडलं. तपास करून मृतदेहाची ओळख पोलिसांनी पटवली. आरोपीला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून साहित्य जप्त करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे."
गुन्हेगारी मनोवैज्ञानिक अनुजा कपूर सांगतात, "अशा हत्येला जर खळबळजनक ठरवलं तर लोकांमध्ये हिस्टीरिया म्हणजेच उन्माद निर्माण होऊ शकतो. अशा हत्यांच्या प्रचारामुळे इतरांनाही प्रेरणा मिळू शकते."
पण पोलीस आणि गुन्हेगारी मनोवैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, माध्यमांमध्ये खळबळजनक मानली जाणारी फ्रिज आणि सुटकेस हत्येची प्रकरणं ही एकसारख्या गुन्ह्यांची मालिका आहे असं मानण्याचं काही कारण नाही.
पाठक सांगतात की, "एकसारख्या गुन्ह्यांची मालिका हे वास्तव आहे. पण माझ्या अनुभवाप्रमाणे, गुन्ह्यांची नक्कल करण्यापेक्षा लोक चित्रपट आणि कादंबऱ्यांद्वारे अधिक प्रेरित होतात."
हत्या करून झाल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करणं ही जुनी आणि प्रचलित पद्धत आहे.
खळबळजनक बातम्यांचं अती वार्तांकन केल्याने गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याचा समज होतो.
दिल्ली येथील फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख सुधीर के गुप्ता म्हणतात, "हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणारे गुन्हे तुलनेने दुर्मिळ असले तरी ते नेहमीच घडतात. पण अशा सगळ्याच प्रकरणांच्या बातम्या होतात असं नाही. अशा गुन्ह्यांच्या तीनच बातम्या मी पाहिल्या आहेत."
अशा मारेकऱ्यांचा सुगावा तुम्हाला कसा लागतो?
डॉ. गुप्ता यांनी तीन दशकांपूर्वी भारतात फॉरेन्सिक सर्जन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर अशी प्रकरणं आली ज्यात पीडितांना त्यांच्या घराबाहेर बोलवून, निर्जन ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली आणि मृतदेह जंगलात फेकण्यात आले.
शहरीकरण वाढत गेलं तशी कुटुंब लहान होत गेली. अशा लहान कुटुंबांमध्ये अधिक हत्या होऊ लागल्या. काही प्रकरणांमध्ये मृतदेहांचे तुकडे करण्यात आले.
डॉ. गुप्ता सांगतात, "जेव्हा शरीराची छिन्नविछिन्न अवस्था केली जाते तेव्हा घटनेची फॉरेन्सिक पुनर्रचना (रिकंस्ट्रक्शन) केली जाते. त्यानंतर हत्या आणि पीडितेची ओळख पटवणं आमच्यासमोरच आव्हान असतं."
ते सांगतात, "पण जर मानवी हाडांची पूर्ण तपासणी केली तर आपल्याला लिंग, वय, मृत्यूची तारीख आणि कदाचित मृत्यूचं कारण देखील कळू शकतं."
अशा हत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अभ्यासातून बरीच मदत मिळते.
फिनलॅन्ड मध्ये 10 वर्षांच्या कालावधीत 13 प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असं आढळून आलं की, पीडित आणि गुन्हेगार ओळखीचे होते. यातले अर्धे तर जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांपैकीच एक होते.
अभ्यासात असंही आढळून आलं की, हत्येच्या वेळी बहुतेक गुन्हेगार बेरोजगार होते. यापैकी कोणीच मानवी मृतदेह किंवा मानवी शरीर हाताळण्याची आवश्यकता असलेल्या व्यवसायात गुंतलेले नव्हते.
असाच एक अभ्यास पोलंडमधील क्राकोव येथे करण्यात आला होता. मृतदेह छिन्नविछिन्न करणाऱ्या पन्नास वर्षातील 30 गुन्ह्यांचा यात अभ्यास करण्यात आला. यात असं आढळून आलं होतं की, हत्येच्या योजना आखण्यात आलेल्या नव्हत्या.
पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातलगाने स्वतःच्या घरात अशी कृत्य केल्याचं आढळून आलं होतं.
बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या आणखीन एका अभ्यासात असं दिसून आलं होतं की, मृतदेह छिन्नविछिन्न करणाऱ्या 76% हत्या पुरुषांनी केल्या आहेत.
भारतात तर अशा हत्येच्या पद्धतीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवाय गुन्ह्यानंतर किती मारेकरी पोलिसांसमोर शरण आले, किती जणांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहांची विल्हेवाट लावली याविषयीही काहीच माहिती उपलब्ध नाही.
पाठक सांगतात, "अशा हत्या होण्यास काही कारणं आहेत. जसं की वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव, विवाहबाह्य संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप. यामुळे भारताच्या आधुनिक समाजातील फोलपणा दिसून येतो. यामध्ये अनेकदा गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)