You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मीरा रोड हत्या प्रकरण: लग्न करुनही सरस्वती वैद्य ही मनोज सानेला 'मामा' का म्हणायची?
(सूचना- या बातमीमधील तपशील काही वाचकांना विचलित करू शकतात)
मुंबई जवळच्या मीरा रोड परिसरात लिव्ह-इन-पार्टनरने महिलेची हत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.
या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव सरस्वती वैद्य असं असून ती 32 वर्षांची होती.
तर, संशयित आरोपीचं नाव मनोज साने असून तो 56 वर्षांचा आहे.
विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, मनोज साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहांचे तुकडे केले, त्यानंतर ते मिस्करमध्ये बारीक करून, कुकरमध्ये शिजवून त्यांची विल्हेवाट लावली, असा त्याच्यावर आरोप आहे.
मीरा रोड लीव्ह ईन रिलेशनशीप हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या 3 सख्ख्या बहिणींचा जबाब आज (9 जून) नोंदवला आहे.
मीरा रोड पोलीस उपायुक्त जयंत बजबाले यांनी माहिती दिली की, सरस्वती वैद्य आणि मनोज साने या दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं असं तपासातून समोर आलं आहे. बहिणींनाही या लग्नाची माहिती होती. परंतु आरोपी मनोज सानेचं वय मुलीपेक्षा खूप जास्त असल्याने ही बाब त्यांनी सगळ्यांपासून लपवली.
याच कारणामुळे इतरांसमोर आपला मामा असल्याचं ती सांगायची.
सरस्वती सानेला चार सख्ख्या बहिणी. सरस्वती सगळ्यात लहान होती. त्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तिचे आई वडील आणि पाच बहिणी औरंगाबादला राहत होत्या. परंतु लहान वयातच आई-वडील विभक्त झाले. यानंतर सरस्वती आपल्या आईसोबत राहत होती. काही वर्षात आईचाही मृत्यू झाला. यानंतर सरस्वतीला अहमदनगरच्या आश्रमात दाखल केलं. जवळपास 10 वर्षं ती त्या आश्रमात होती.
सरस्वतीचं पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण याच आश्रमात झालं. परंतु 18 वर्षांनंतर सरस्वतीला ते आश्रम सोडावा लागला आणि ती औरंगाबाद येथे बहिणीकडे राहण्यासाठी गेली. चार वर्षं ती औरंगाबाद येथे राहिली. यानंतर नोकरी शोधण्याच्या निमित्ताने सरस्वती मुंबईत राहण्यासाठी आली.
बोरिवली परिसरात सरस्वती आणि मनोज साने यांची ओळख झाली. नोकरी मिळवून देतो असं आरोपीने सरस्वतीला सांगितलं. तसंच काही काळ ती आरोपीच्या बोरिवली येथील घरात राहिली. यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचे ठरवल. 2015 मध्ये ते मीरा रोडच्या गीता आकाशदीप इमारतीत राहण्यासाठी आले.
गेल्या जवळपास 8 वर्षाहून अधिक काळापासून दोघं एकत्र राहत आहेत.
सरस्वतीची हत्या नेमकी का करण्यात आली, यामागे कारण काय याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
सध्या बहिणींचा डीएनए तपासला जात असून मृतदेह त्यांच्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरस्वती आपल्या बहिणींच्या संपर्कात होती. यामुळे बहिणींचा जबाबातील माहिती महत्त्वाची असणार आहे.
सदर प्रकरणात मनोज सानेला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सरस्वती वैद्य यांच्या हत्येत अनेक महत्त्वाचे तपशील समोर येत असून त्यांच्या शेजाऱ्यांकडूनही याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
हे लिव्ह-इन जोडपं कसं राहायचं?
हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर ANI वृत्तसंस्थेने शेजाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी एका शेजाऱ्यांने म्हटलं, “ते गेल्या तीन वर्षांपासून आमच्या शेजारी राहायचे. पण ते कुणामध्येच मिसळायचे नाहीत. इतक्या वर्षांपासून आम्हाला त्यांचं नावही माहीत नव्हतं. सणासुदीच्या दिवसांतही बाहेर दिसायचे नाहीत. ते फक्त आपल्यापुरतेच राहायचे.
शेजाऱ्यांना कसा आला संशय?
शेजाऱ्याने याविषयी सांगितलं, “खुनाचा संशय सर्वप्रथम मलाच आला. सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत उंदीर मेल्यासारखा वास त्यांच्या घरातून येत होता. खरंच एखादा उंदीर मरून पडला असेल, असं आम्हाला वाटत होतं. आमच्या शेजारी असं काही घडू शकेल याची आम्हाला अपेक्षा नव्हती.
अशा गोष्टी तर आम्ही टीव्ही आणि वेब सिरीजमध्येच पाहिलेल्या आहेत. खऱ्या आयुष्यात तर कधी पाहिलेल्या नाहीत.
ते पुढे सांगतात, “झालं असं की सोमवारी रात्री मला वास आला. मी घरात शोधाशोध केली. काहीही नव्हतं. शेजाऱ्यांना विचारावं तर त्यांच्या घराला नेहमी कुलूपच असायचं. नंतर बुधवारी मी दुपारी ऑफिसवरून घरी आलो. तेव्हा तर खूपच जास्त वास येत होता. अखेर मी शेजारी जाऊन दरवाजा ठोठावला.
रुम फ्रेशनर आणि सारवासारव
शेजाऱ्यांनी सांगितलं, "यावेळी घराला कुलूप नव्हतं. ते आतमध्येच होते. पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. मी पाच-दहा मिनिटे थांबलो. पुन्हा ठक-ठक केलं. कसला वास येत आहे, हे विचारलं. त्यालाही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात त्यांनी रूम फ्रेशनर मारल्याचा वास आला.
मला तिथेच संशय आला की काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. कारण तसं काही नसतं तर दरवाजा उघडून ते माझ्याशी बोलले असते. नंतर मी खाली गेलो. पंधरा-वीस मिनिटांनी ते स्वतः खाली आले. त्यांच्या हातात काही बॅग होत्या.
मी त्यांना म्हणालो, “तुमच्या घरातून खूप वास येत आहे. काही मरून पडलंय का पाहा, काही वरून उंदीर वगैरे पडला असेल का पाहा, असं मी त्यांना म्हणालो.”
पण तिथेही त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
शेजारी सांगतात, "ते म्हणाले की मला तत्काळ एका ठिकाणी जायचं आहे. मी साडेदहाला परत येईन, तेव्हा पाहू, असं ते म्हणाले. मी म्हणालो पाच मिनिटांत लगेच पाहून घेऊ, पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते खाली आले तेव्हा त्यांच्या अंगातूनही तसाच घाण वास येत होता. बोलताना ते घाबरलेलेही होते. मला त्यामुळे आणखी संशय आला."
"मी बिल्डिंगच्या सेक्रेटरींना याबाबत कळवलं. सेक्रेटरींनी त्यांना घर दिलेल्या एजंटला बोलावलं. पंधरा-वीस मिनिटांत एजंटही आले. नंतर या प्रकरणाचा उलगडा झाला."
पोलिसांनी काय म्हटलं?
मीरा रोड हत्या प्रकरणाविषयी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबले यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, "स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी दुर्गंधी येत होती. त्या फ्लॅटचे कुलूप तोडून पोलिसांनी प्रवेश केला.
"यावेळी पोलिसांना किचनमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्याच बरोबर कटर आदी साहित्य सापडलं. तपास करून मृतदेहाची ओळख पोलिसांनी पटवली. आरोपीला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून साहित्य जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे," असं बजबले यांनी सांगितलं.