म्यानमारच्या लष्कराने टॅटू कापले, बंदींना लघवी प्यायला लावली; प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितली घटना

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जोनाथन हेड आणि बर्मिज सेवा
- Role, बीबीसी न्यूज
म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि बंडखोरांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यात सशस्त्र विरोधकांची सरशी होते आहे. नागरिकांकडून देखील लष्करी राजवटीला विरोध होत आहे. त्याचा परिणाम म्हणून म्यानमारच्या लष्कराकडून नागरिकांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत.
मागील आठवड्यात म्यानमारच्या राखाइन प्रांतातील एका गावात म्यानमारच्या सैनिकांनी घातलेल्या छाप्यात किमान 50 लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक रहिवाशी आणि बंडखोर सैन्याचं म्हणणं आहे.
(इशारा : या लेखातील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते)
एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं बीबीसीला सांगितलं की या गावाला अडीच दिवस दहशतीत ठेवण्यात आलं होतं.
सैनिकांनी गावकऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि त्यांना मारहाण केली होती. गावकऱ्यांच्या त्वचेवर जळणारं पेट्रोल ओतलं गेलं आणि त्यातील काहींना जबरदस्तीनं लघवी पिण्यास भाग पाडण्यात आलं.
म्यानमारचे सैनिक अराकान आर्मीच्या (AA) पाठीराख्यांच्या शोधात होते. अराकान आर्मी ही आता म्यानमारमधील सर्वात प्रभावी बंडखोर सैन्यापैकी एक बनली आहे.
नेलेले अनेकजण अजून परतले नाही
15 ते 70 वर्षांच्या 51 लोकांचा तीव्र छळ करण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आलं, असं बेदखल नागरी सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटनं (NUG)एका पत्रकात म्हटलं आहे. अराकान आर्मीनं 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी कौन्सिलनं हे आरोप फेटाळले असून तीन वर्षापासून म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धातील ते सर्वाधिक वाईट अत्याचारांपैकी एक असतील.
"त्यांनी पुरुषांना विचारलं की या गावात अराकान आर्मी आहे का," असं एका महिलेनं बीबीसीला सांगितलं.
"त्यांनी काहीही उत्तर दिलं, मग त्यांनी सांगितलं की अराकान आर्मी इथं आहे किंवा ते इथं नाहीत किंवा त्यांनी सांगितलं की आम्हाला माहीत नाही, तरी सैनिकांनी त्यांना मारहाण केली."

फोटो स्रोत, Getty Images
फक्त सहा महिन्यांमध्ये अराकान आर्मीनं राखाइन प्रांताचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. त्यामुळे म्यानमारच्या सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं आहे.
मागील वर्षी अराकान आर्मीचा सैन्याबरोबरचा युद्धविराम संपला आणि फेब्रुवारी 2021 मध्ये सत्ता ताब्यात घेणाऱ्या म्यानमारच्या लष्कराला उलथावून टाकण्याच्या उद्देशानं ते देशाच्या इतर भागातील वांशिक बंडखोरांबरोबर संयुक्त कारवाईमध्ये सहभागी झाले.
"माझ्या पतीला लष्कराच्या वाहनातून नेताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. माझ्या मुलाला आम्हा दोघांपासून दूर वेगळं करण्यात आलं आणि आता तो कुठं आहे हे मला माहीत नाही. माझे पती आणि माझा मुलगा आता जिवंत आहेत की मृत आहेत हे मला माहीत नाहीत," असं त्या महिलेनं बीबीसीला सांगितलं.
साक्षीदारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांची नावं देण्यात आलेली नाहीत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की फक्त 1,000 कुटुंब असणाऱ्या या गावातील प्रत्येकाला दोन दिवस उन्हामध्ये उघड्यावर ठेवण्यात आलं होतं. त्यांना थोडसंच खायला किंवा पिण्यासाठी देण्यात आलं.
तर डझनवारी पुरुषांना बांधून ठेवण्यात आलं होतं, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती आणि काहींना पुढील चौकशीसाठी तिथून ट्रकमधून नेण्यात आलं. त्यातील अनेकजण अजून परतायचे आहेत.
टॅटूचा भाग कापून जाळून टाकले
"दिवसभर उन्हात उभं राहिल्यामुळे त्यांना खूप तहान लागली होती आणि ते पाण्यासाठी याचना करत होते. मात्र सैनिकांनी पाण्याच्या बाटलीत लघवी केली आणि ते पुरुषांना पिण्यासाठी दिलं," असं त्या महिलेनं बीबीसीला सांगितलं.
ती म्हणाली की "तिनं अनेक गोळ्यांचे आवाज ऐकले, मात्र कोणाला गोळ्या घालण्यात आल्या ते पाहिलं नाही. कारण आम्हाला डोकं खालच्या दिशेला करण्यास सांगण्यात आलं होतं."
"मला वर पाहण्याची हिंमत झाली नाही. त्यांनी माझ्याजवळ उभ्या असणाऱ्या कोणाला तरी बोलावलं. त्यानंतर मला गोळी झाडल्याचा आवाज आला. तो माणूस कधीच परत आला नाही."
पूर्णवेळ ती रडत होती कारण तिला तिच्या पतीची आणि मुलाची चिंता वाटत होती. ती म्हणाली, "ते जिवंत आहे की मृत हे मला माहित नाही. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते आहे. बुद्धा, कृपया त्यांना वाचव."

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेत वाचलेल्या लोकांनी सांगितलं की मृतदेह दफन करण्यासाठी सैनिक फावडे मागत असल्याचं त्यांनी ऐकलं होतं. त्यातील काही सैनिक दारू प्यायलेले होते.
100 पेक्षा अधिक सैनिकांनी बाई फ्यू या गावात बुधवारी छापा टाकल्याचं मानलं जातं आहे. त्या प्रांतातील सिटवे या राजधानीच्या शहराला लागूनच हे गाव आहे.
सिटवे हे शहर जवळपास 2 लाख लोकवस्तीचं असून ते मोठं बंदर आणि विमानतळ आहे. म्यानमारच्या सैन्याच्या काही उरलेल्या भक्कम तळांपैकी ते एक आहे. मात्र बंडखोर त्याच्या जवळ पोचले आहेत आणि बंडखोरांना बहुतांश स्थानिक राखाइन लोकांची सहानुभूती आहे.
स्थानिकांनी सांगितलं की अराकान आर्मीला पाठिंबा दर्शविणारे टॅटू असलेल्या पुरुषांना छळ करण्यासाठी बाजूला काढण्यात आलं होतं. एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं सांगितलं की सैनिकांनी टॅटू काढलेली त्वचा कापून काढली, त्यावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं.
लष्कराने फेटाळले आरोप
आणखी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं सांगितलं की एका लष्करी अधिकाऱ्यानं गावकऱ्यांना सांगितलं की तो उत्तरेतील शान प्रांतातील लढाईतून आला आहे. जिथं मागील वर्षाच्या अखेरीस लष्कराचं मोठं नुकसान झालं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी आपण आल्याचं त्याचं म्हणणं होतं.
बांग्लादेशच्या सीमेवरील राखाइन प्रांत गमावणं ही बाब लष्करासाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नामुष्कीपैकी एक असणार आहे. 1948 ला म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिथं लष्कराचंच वर्चस्व राहिलेलं आहे.
शुक्रवारी गावातील बाजारपेठेत उभे असलेल्या उरलेल्या लोकांना काही गोष्टी गोळा करण्याचा आणि तिथून निघून जाण्याचा आदेश देण्यात आला.
त्यामध्ये मुख्यत्वे महिला, मुलं आणि वृद्ध होते. ते म्हणाले, सैनिकांनी गावातील सोनं, दागिने किंवा त्यांच्या घरातील सोलर पॅनलसारख्या मौल्यवान वस्तू आधीच लुटल्या होत्या. बहुतांश गावकऱ्यांनी आता सिटवे शहरातील बौद्ध मठांमध्ये आश्रय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीला या गोष्टीची कल्पना आहे की अजूनही बाई फ्यू वर लष्कराचं नियंत्रण आहे आणि तिथे कोणालाच परत येऊ दिलं जात नाहीए. बहुतांश गाव जाळण्यात आल्याच्या काही बातम्या आल्या आहेत.
एनयुजीनं (NUG) वचन दिलं आहे की बाई फ्यू मध्ये युद्ध गुन्हे करण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा केली जाईल.
अराकान आर्मीनं देखील आरोप केला आहे की बाई फ्यूमध्ये काही महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. म्यानमारच्या लष्कराचा उल्लेख अराकान आर्मी क्रूरकर्मा फॅसिस्ट लष्करी कौन्सिल असं करते.
म्यानमारच्या लष्करानं छळ केल्याचे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचं म्हणणं आहे की त्या गावात वाळूच्या पोत्यांचे बंकर्स पाहिल्यानंतर ते तिथं फक्त शांतता आणि सुरक्षेची कारवाई करत होते. त्या परिसरातून अराकान आर्मीनं ड्रोन हल्ले केल्याचा आरोप म्यानमारच्या लष्करानं केला आहे.
राखान प्रांत वेगळा पडल्यामुळे आणि तीव्र संघर्षामुळे बाई फ्यू गावामध्ये नेमकं काय झालं याचा स्वतंत्र तपास नजीकच्या भविष्यात तरी अशक्य आहे.
मात्र या छाप्यातून वाचलेल्या लोकांनी दिलेली माहिती ही म्यानमारच्या इतर भागात काय घडू शकतं याचा अशूभ इशारा आहे. कारण सक्षम आणि वाढत्या आत्मविश्वासानं भारलेल्या सशस्त्र विरोधी लढ्यापुढे म्यानमारच्या लष्कराची पीछेहाट सुरूच आहे.











