भारताच्या सीमेवरील शहरावर ताबा मिळवल्याचा म्यानमारमधील बंडखोर गटाचा दावा

त्वान म्रॅट नैंग

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अराकन आर्मीचे प्रमुख त्वान म्रॅट नैंग
    • Author, जोनाथन हेड (बँकॉक) आणि ओलिव्हर स्लो (लंडन)
    • Role, बीबीसी न्यूज

म्यानमारमधील अराकन आर्मी (एए) या बंडखोर गटानं पलेट्वा शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय.

पलेट्वा हे म्यानमारच्या सीमेवरील चीन स्टेट या भागातील शहर आहे. म्यानमारहून भारताच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील हे महत्त्वाचं शहर आहे.

अराकन आर्मी (एए) हा म्यानमारमधील तीन सशस्त्र गटांपैकी एक आहे. अराकन आर्मी (एए) ने ऑक्टोबरमध्ये म्यानमारमधील लष्कराविरोधात मोठा हल्ला सुरू केला होता.

"संपूर्ण पलेट्वा परिसरात एकही लष्करी छावणी उरलेली नाहीये," असं या गटानं त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर दावा केलाय.

यावर म्यानमारच्या लष्करानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारताच्या सीमेवरील शहरावर ताबा मिळवल्याचा म्यानमारमधील बंडखोर गटाचा दावा

भारत आणि बांगलादेशच्या सीमेजवळ असलेल्या म्यानमारच्या पलेट्वामधील घडामोडींवर भारत सरकारचं बारकाईनं लक्ष असेल.

पलेट्वा हे शहर भारताच्या पाठिंब्यानं सुरू असलेल्या कोट्यवधींच्या विकास प्रकल्पाचा भाग आहे. याचा उद्देश दुर्गम प्रदेशात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा आहे.

अराकन आर्मी म्यानमारच्या अनेक वांशिक सशस्त्र गटांपैकी सर्वांत नवीन गट आहे. पण तो शस्त्रांनी सज्ज आहे आणि अनेक वर्षांपासून सैन्याशी लढा देत आहे. राखीन प्रांत आणि शेजारच्या चीनमध्ये काही भागांमध्ये हा गट जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या लष्कराने देशाची सत्ता काबीज करण्याआधीच, अराकन आर्मीच्या बंडखोरांनी राखीनमध्ये लक्षणीय यश मिळवलं होतं.

दोन वर्षांपूर्वी राज्याच्या 60% भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता.

पण 2021 च्या सत्तापालटाच्या वेळी, ते युद्धविराम पाळत होते. आणि लष्करानंही या गटाशी संघर्ष टाळला होता. जेणेकरून सत्तापालटाला होणारा विरोध चिरडण्यावर ते आपले प्रयत्न केंद्रित करू शकतील.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, म्यानमारचं लष्कर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये अराकन आर्मी गटाने घोषणा केली की, ते ब्रदरहुड अलायन्सचा एक भाग म्हणून लष्करी राजवटीविरुद्धच्या व्यापक संघर्षात सामील होत आहेत आणि त्यांनी देशाच्या बहुतेक भागांमध्ये सैन्याविरुद्ध हल्ल्यांची मालिका सुरू केली.

गेल्या 11 आठवड्यांमध्ये, बंडखोर गटांच्या या युतीनं चीन राज्याच्या सीमेवर लष्कराला अत्यंत अपमानास्पदरित्या पराभूत केलंय.

त्यानंतर गेल्या शनिवारी देशाच्या दुसर्‍या बाजूला एए गटानं पलेट्वा शहरामधील शेवटच्या लष्करी चौकीवर, मीवा येथील टेकडीवरील तळाचा ताबा घेतला. 2020 मध्ये 42 दिवसांच्या लढाईनंतरही त्यांनी ताबा मिळवता आला नव्हता.

कलादान नदीवरील पलेट्वा बंदर त्याच्या नियंत्रणाखाली असल्याने, अराकन आर्मी गट आता भारतीय सीमेवरील रस्ते आणि जल वाहतूक नियंत्रित करू शकते आणि तिथून ते राखीन प्रांतात पुढील हल्ल्यांची योजना करू शकते.

बंडखोरांच्या हातून राखीनमधील कोणतेही मुख्य शहर गमावणे हा लष्कराच्या अधिकारासाठी विनाशकारी धक्का असेल.

राखीनची राजधानी सिटवेला म्यानमारच्या उर्वरित भागाशी जोडणार्‍या रस्त्यावर क्यौकटाव शहर आहे. या शहराकडे अराकन आर्मीला जाण्यापासून रोखण्यासाठी हवाई हल्ले आणि हेलिकॉप्टर गनशिप वापरत असल्याचं समोर आलं आहे.

अराकन आर्मी पुढे काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

म्यानमारचे लष्करप्रमुख मिन आँग हलायिंग हे सध्या तिथले सर्वेसर्वा आहेत. ते आणि त्यांचा इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाने (ज्याला स्थानिक भाषेत जुंटा असंही म्हणतात) तिथल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारविरोधात बंडखोरी करत सत्ता हस्तगत केली.

जुंटा स्वतःचे मनोधैर्य पुनर्स्थापित करू शकेल का आणि आपल्या सैनिकांना आता अनेक स्तरांतून होत असलेल्या विरोधाविरुद्ध लढत राहण्यास प्रवृत्त करेल का, पलेट्वाच्या पतनानंतर आता हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)