डिजिटल भटके म्हणजे कोण? हे लोक जगभर फिरून पैसे कसे कमावतात?

डिजिटल नोमॅड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फातिमा फरहीन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

लहानपणी कदाचित आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की मोठे झाल्यावर जगप्रवास करायचा आहे. पण जसजसे आपण मोठे होतो तसं शिक्षण, नोकरी, संसार, पैसे कमावणे या सर्व गोष्टींमध्ये आयुष्य गुंतत जाते.

जग फिरण्याचे आणि पाहण्याचे स्वप्न मनात दबलेली इच्छा बनून राहते.

पण तुम्हाला माहिती आहे का की डिजिटल भटक्यांमध्ये (डिजिटल नोमॅड) सामिल होऊन तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात फिरू शकता आणि त्याचवेळी नोकरीसुद्धा करू शकता.

डिजिटल भटके कोण असतात?

हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही बंजारा लोकांना पाहिले असेलच. किंवा तुम्ही भटके हा शब्द ऐकला असेलच.

डिजिटल भटके देखील बंजाऱ्यांसारखे किंवा भटक्यांसारखे आयुष्य जगतात आणि जगाच्या वेगवेगळ्या भागात फिरत राहतात.

फरक इतकाच आहे की आधुनिक भटक्या लोकांकडे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा असतात ज्याच्या मदतीने ते त्यांच्या आवडीचे काम/नोकरी देखील करतात.

डिजिटल भटक्यांचा प्रवास

असे म्हटले जाते की स्टीव्हन के. रॉबर्ट्स हे जगातील पहिले डिजिटल भटके होते.

1983 ते 1991 या काळात त्यांनी संपूर्ण अमेरिकेत सायकलवरून सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास केला.

त्यांच्याकडे रेडिओ आणि इतर काही उपकरणं होती ज्याद्वारे ते कामसुद्धा करत असत.

डिजिटल नोमॅड हा शब्द 90 च्या दशकात वापरला जाऊ लागला. संगणक, इंटरनेट, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या वाढत्या वापरामुळे याला आणखीन चालना मिळाली.

कार्ल मलामुड यांनी 1992 साली लिहिलेल्या 'एक्सप्लोरिंग द इंटरनेट' या आपल्या प्रवासवर्णनात पहिल्यांदा 'डिजिटल भटके' हा शब्द वापरला.

1997 मध्ये सुगियो माकिमोटो आणि डेव्हिड मॅनर्स यांनी 'डिजिटल नोमॅड' नावाने एक पुस्तक लिहिले. तेव्हापासून या शब्दाचा वापर तर वाढलाच पण अशा लोकांची संख्याही वाढली.

अमेरिकन कंपनी 'एमबीओ पार्टनर्स'च्या 2023 च्या अहवालानुसार, अमेरिकेत सध्या डिजिटल भटक्या कर्मचा-यांची संख्या एक कोटी 73 लाख इतकी आहे आणि सुमारे दोन कोटी 40 लाख लोक पुढील दोन ते तीन वर्षांत डिजिटल भटके बनण्याची आकांक्षा बाळगतात.

डिजिटल भटक्यांचा वाढता व्यवसाय

2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, डिजिटल भटक्यांचे जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे 787 अब्ज डॉलरचे योगदान आहे.

डिजिटल भटक्यांचा ट्रेंड जसजसा वाढू लागला, तसतसे त्याच्याशी संबंधित व्यवसायही वाढू लागले.

सेफ्टीविंग हे स्टार्टअप जगाच्या कुठल्याही कानाकोप-यातून (रिमोटपणे) काम करणाऱ्या व्यावसायिकांना प्रवास, आरोग्य आणि वैद्यकीय विम्याची सुविधा देतं.

गेल्या वर्षी त्यांनी जवळपास अडीच कोटींची उलाढाल केली, असं त्यांचं म्हणणं आहे. सेलिना ही डिजिटल भटक्यांसाठी वसतिगृहे आणि हॉटेल्सची जागतिक साखळी आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, MAYYUR NOMADGO

फोटो कॅप्शन, डिजिटल भटक्यांचा ट्रेंड जसजसा वाढू लागला, तसतसे त्याच्याशी संबंधित व्यवसायही वाढू लागले

2022 मध्ये त्यांनी 18 नवीन ठिकाणी आपले काम सुरू केले. त्यांचा वार्षिक अहवाल दर्शवितो की 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये कंपनीचा व्यवसाय सुमारे 98 टक्क्यांनी वाढला आहे.

जर्मनीचे रहिवासी योहान्स वोल्कनर यांनी २०१५ मध्ये नोमॅड क्रूझ (भटक्यांचे जहाज) सुरू केली. डिजिटल भटक्यांसाठी ही पहिलीच फिरती परिषद होती. हे लोक जगभर प्रवास करतात आणि या काळात त्यांची कौशल्ये एकमेकांशी शेअर करतात, नेटवर्किंग करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्याचा आनंद एकत्रितपणे लुटतात.

भारत आणि डिजिटल भटके

साहजिकपणे हे सर्व जगभर घडत असताना भारत त्यापासून अलिप्त कसा राहील.

भारतातही डिजिटल भटक्यांची संख्या वाढत आहे. अनेक भारतीयांचा याकडे ओढा आहे इतकंच नाही तर जगभरातील डिजिटल भटक्यांसाठी भारत एक आवडीचे ठिकाण बनत आहे.

उदयपूरचा रहिवासी असलेला मयंक पोखरना स्वतःला डिजिटल भटक्या म्हणवतो. 2015 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बंगळुरू येथून करिअरला सुरुवात केली.

तिथे घर शोधण्यात अडचण आल्यावर त्याने आपल्या काही मित्रांसोबत एक 'को-लिव्हिंग' कंपनी स्थापन केली. काही दिवस नोकरी आणि कंपनी एकत्र चालू राहिली, त्यानंतर 2017 मध्ये मी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कंपनीत रुजू झालो.

निकांसह गणेशोत्सव साजरा करणारे डिजिटल भटके.

फोटो स्रोत, MAYYUR NOMADGO

फोटो कॅप्शन, निकांसह गणेशोत्सव साजरा करणारे डिजिटल भटके.

पण कोरोनानंतर त्यांनी कंपनी बंद करून फ्रीलान्सिंग करायला सुरूवात केली. आत्तापर्यंत भारतातील अनेक शहरांव्यतिरिक्त जगातील दहाहून अधिक देशांमध्ये त्यांनी वास्तव्य आणि काम केले आहे.

तो म्हणतो की तो त्याच्या पत्नीसह सगळीकडे फिरतो. तीसुद्धा नोकरी करते.

बीबीसीला त्यांनी सांगितले की, डिजिटल भटके हे कोणत्याही देशातील नागरिक आणि पर्यटक यांच्यातील दुवा आहेत. पर्यटक काही दिवसांसाठी येतात पण डिजिटल भटके जास्त दिवस मुक्कामी असतात. हे लोक एकाच ठिकाणी काही महिने किंवा कधी कधी एक-दोन वर्षे राहतात.

सर्वांत महत्वाचे काय आहे?

भारतात अशा सर्वप्रकारच्या सोईसुविधा आहेत ज्यामुळे भारत डिजिटल भटक्यांसाठी भविष्यातील एक सोयीस्कर ठिकाण ठरू शकतं, असं त्याला वाटतं.

त्याच्या मते, हाय स्पीड इंटरनेट ही सर्वात मूलभूत गरज आहे आणि भारतात गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे.

भारत सरकार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतं. मयंक म्हणतो की डिजिटल भटके स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्था या दोन्हींशी एकरूप होतात. त्यामुळे सरकारने याकडे थोडे लक्ष दिल्यास जास्त परतावा मिळेल.

तो म्हणतो की भारत हा अतिशय मोठा देश आहे, इथे हवामानाचे इतके प्रकार आहेत की जगभरातील लोक येथे येऊ शकतात आणि वर्षभर हवामानानुसार वेगवेगळ्या भागात राहू शकतात. त्याच्या मते, परदेशातून भारतात येणाऱ्या डिजिटल भटक्यांनाही याचा फायदा होतो, कारण इथे खर्च कमी होतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, MAYYUR NOMADGO

परदेशी कंपन्यांमध्ये काम करताना जर ते डॉलर किंवा पौंडामध्ये कमावत असतील, तर भारतात राहणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

मयंक म्हणतो त्याला असं वाटतं की, याचा सर्वात मोठा फायदा असा होतोय, तो म्हणजे भारताविषयी जगात असलेले गैरसमज आता दूर होत आहेत.

कौशल्य नक्कीच आवश्यक आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. दर महिना-दोन महिन्यांनी जागा बदलावी लागेल, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल. त्याच्या मते, तुम्ही जितके कमी सामान सोबत घेऊन जाल तितके आरामात राहाल.

भारतातील भटक्यांचं गाव

मयंक पोखरणाला जर भारत हे डिजिटल भटक्यांसाठी भविष्यातील एक आवडीचे ठिकाण वाटत असेल, तर कदाचित 'भटक्यांचे गाव' हे त्यामागील एक कारण आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर या छोट्याशा शहरातील रहिवासी मयूर सोनटाके यांने या भटक्या गावाची स्थापना केली आहे.

2014 पर्यंत भारतात कॉर्पोरेट नोकरी करणारा मयूर एका अमेरिकन कंपनीसाठी रिमोट म्हणजेच घरून काम करत होता.

2016 मध्ये त्याचा डिजिटल भटक्या बनण्याचा प्रवास सुरू झाल्याचे तो सांगतो.

नेपाळपासून सुरुवात करून तो दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये गेला. 2017 पासून तो परदेशी लोकांना भारतात येण्यासाठी आमंत्रित करू लागला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, MAYYUR NOMADGO

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यानंतर त्याने गोवा सरकारसोबत जवळून काम केले आणि 2019 मध्ये भटक्या गावाची स्थापना केली.

बीबीसीला त्याने सांगितले की, डिजिटल भटक्यांच्या तीन सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहेत. पहिले, हाय स्पीड इंटरनेट, दुसरे म्हणजे त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत होती आणि तिसरे म्हणजे घरापासून दूर राहिल्याने त्यांना एकटेपणा जाणवत होता.

या तिन्ही गोष्टींबाबत मयूरने त्यांना आश्वासन दिले. पण काही महिन्यांनी कोरोनाची साथ आली. या काळात परदेशी लोक येऊ शकले नाहीत पण भारतातून अनेक लोक त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले. आज त्यातील निम्मे भारतीय आहेत आणि निम्मे तीसहून अधिक देशांमधील परदेशी नागरिक आहेत.

मयूरचा असा विश्वास आहे की भारतात डिजिटल भटकंती वाढत आहेत, ज्यात भारतीय आणि मोठ्या संख्येने परदेशी लोकांचाही समावेश आहे.

भारतातील वाढत्या ट्रेंडमागे त्यांनी अनेक सकारात्मक कारणे सांगितली.

भारतात तरुणांची संख्या खूप जास्त आहे. त्यांपैकी अनेक जण हे उशीरा लग्न करत आहेत आणि मुलांना जन्म देण्याबाबत अनेक जण उत्सुक नाहीयेत. म्हणूनच जोडपी अशा संधी गमावू इच्छित नाहीत.

भारतातील शक्यता

भारतात आणि जगात तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. जगातील इतर देशांपेक्षा भारतात इंटरनेट सुविधा चांगल्या आहेत. उदाहरणार्थ, झूम किंवा गुगल मीट आणि नवीन टूल्स येत आहेत.

गेल्या काही वर्षांत लोकांचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे तरुणांचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढले आहे.

तरुणांमध्ये धोका पत्करण्याची क्षमता वाढत आहे. त्यांच्यात फ्रीलांसर किंवा स्टार्टअप सुरू करून जोखीम पत्करण्याची हिंमत वाढत आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, MAYYUR NOMADGO

त्याच्या मते, येत्या पाच-दहा वर्षांत भारतात डिजिटल भटक्यांची संख्या लक्षणीय वाढेल.

याचे मुख्य कारण सांगताना तो म्हणतो की, जे तरुण सध्या फ्रीलान्सर म्हणून काम करत आहेत किंवा दुर्गम भागातील किंवा डिजिटल भटके आहेत ते येत्या काही वर्षांत व्यवस्थापक बनतील.

सध्याच्या व्यवस्थापकांपेक्षा दुर्गम भागातून काम करू इच्छिणाऱ्या तरुणांवर त्यांचा अधिक विश्वास असेल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)